Saturday, November 1, 2008

पहिले दिवाळी लेखन

दिवाळी म्हणजे फराळ, फटाके आणि जाडजूड दिवाळी अंक. दिव्यांच्या उत्सवाची आमच्या मनावर ठसलेली ही छबी. जसजसं वय वाढू लागलं तसतसं या छबीतील अन्य छटा धूसर होऊ लागल्या. नाही म्हणायला दिवाळी अंकांचा उजेड मात्र दरवर्षी पडायचा. त्याच त्या लेखकांची, केवळ नावामुळे झालेली भरती आणि मानधनाच्या हव्यासापायी त्यांनीही केलेले बेचव लेखन यामुळे दिवाळी अंक काय दिवे लावतात हेही लख्ख दिसू लागले. त्यामुळे यथावकाश त्यांच्याशी संबंधच तुटला.

पत्रकारितेत सहा वर्षे घालविल्यानंतरही त्यामुळेच कधी दिवाळी अंकांच्या वाटेला जायचे धाडसच झाले नाही. मात्र काही सहकाऱयांना दसरा उलटला की अगदी सुगीचे दिवस आल्याचा आनंद व्हायचा. "यंदा अकरा अंकांमध्ये हजेरी आहे आपली," भविष्यापासून पुराणकालीन संस्कृतीपर्यंत तलवारीप्रमाणे सपासप लेखणी चालविणाऱया एका सहकाऱयांनी टाळीसाठी हात पुढे करत सांगितले होते. माध्यमांत पहिलेच वर्ष असल्याने रिकामे बसून अनेक कामे लिलया करणारी अनेक माणसे प्रत्येक संस्थेत वारत असतात, याची तेव्हा जाणीव नव्हती. त्यामुळे त्या सहकाऱयाच्या वाक्याला माझी दाद टाळीच्या स्वरूपात नव्हे तर त्यांना टाळायच्या स्वरुपात होते. मात्र अशा पद्धतीने एका अंकात 'मी आणि माझा देव', दुसऱया अंकात 'एक दुर्लक्षित स्थानः मौजे टुकारवाडी', तिसऱया अंकात 'राष्ट्रीय एकात्मता आणि महिला मंडळांचे कार्य' अशा नाना रितीने मजकूर पाडणाऱया लेखकांकडे भुईनळ्यांकडे पहावे तितक्याच अंचब्याने पाहतो.

गेल्या वर्षी एका दिवाळी अंकात लेख लिहिला होता. दौंड तालुक्यात प्रसिद्ध होणाऱया एका गावप्रसिद्ध (जगप्रसिद्धच्या धर्तीवर) अंकाच्या संपादकांनी अत्यंत प्रेमाने तो मागितला. माझ्याही खिशाची तब्येत तेव्हा अशीच होती, की अशा प्रकारचा कोणताही डोस त्याला चालला असता. सुपरस्टार चिरंजीवीवर लिहिलेला एक लेख मी त्या अंकात खपवला. त्या अंकाचा सगळाच प्रकार हौशी मामला असल्याने त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. तरीही मानधनाची रक्कम आणि लेख छापलेला अंक मला त्यावेळी मिळाला, ही त्या हौशी प्रकाशकाची व्यावसायिकता कौतुकास्पदच म्हटली पाहिजेत. कारण 'लोकमत समाचार' या हिंदी वर्तमानपत्राला कविता पाठविल्या होत्या तेव्हा मार्चमध्ये छापलेल्या कवितांचे मानधन (तब्बल रु. १५) मे महिन्यात मिळाले होते. पाठविलेल्या पाच कवितांपैकी नक्की कोणत्या कविता छापल्या होत्या हे मला आज बारा वर्षांनीही माहित नाही.

आता हे सांगायचं कारण म्हणजे, यंदाच्या दिवाळीत आमच्या ह्या 'अनाघ्रात पुष्प' अशा प्रतिभेला ऑनलाईन पंख फुटले. खऱया अर्थाने चर्चा आणि वाद करत ज्ञानाची आराधना करणाऱया 'उपक्रम' या संकेतस्थळाच्या पहिल्या दिवाळी अंकात माझा लेख प्रसिद्ध झाला. भाषा आणि तंत्रज्ञान हे माझे जिव्हाळ्याचे दोन विषय. (या लेखाचे १०० हून अधिक वाचने झाल्याचे दिसते त्यावरून लोकांनाही तो भावला असावा, अशी आशा आहे.) या दोन्ही विषयांची गुंफण असणारा एक लेख लिहिला कारण या विषयावर मराठीत एकही बातमी किंवा लेख मी वाचला नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षभरात बातम्यांच्या निमित्ताने मिळालेल्या माहितीच्या आधारे लेख लिहिला. विशेष म्हणजे 'उपक्रम'च्या संपादक मंडळानेही तो प्रकाशित करण्याच्या लायकीचे मानले.

उपक्रमच्या दिवाळी अंकाचा हा दुवा आणि माझ्या लेखाचा हा दुवा.

Sunday, October 26, 2008

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

दिव्यांच्या संगतीने आपले आयुष्य आणि आत्मा उजळून निघावा! दिवाळी आणि नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!