Some people are determined to be great, when the world refuses to accept their greatness, they turn out to be the largest dwarfs on the earth (काही जण महान बनण्याचा निश्चय करून बसलेले असतात. जग जेव्हा त्यांच्या महानतेला स्वीकार करत नाही, तेव्हा ते जगातील सर्वात मोठे खुजे ठरतात) असे एका लेखकाने म्हटलेले आहे. आज नारायण राणे जे काही करत आहेत, ते या व्याख्येत चपखल बसणारे आहे.
“मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन काँग्रेसने पाळले नाही४ वेळा मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली,” असे सरळ सरळ सांगून पक्ष सोडण्याचे धार्ष्ट्य राणे दाखवतात. त्याच्या पुढच्याच वाक्यात कोकणी जनतेच्या सेवेसाठी मी व माझी मुले सदैव तत्पर आहोत, असेही सांगतात. महत्त्वाकांक्षेने माणसाला पछाडले की त्याचा किती अधःपात होतो, याचे यापेक्षा चांगले उदाहरण सापडणार नाही.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री असा मान नारायण राणे यांना मिळतोय तेवढ्यावर त्यांनी स्वस्थ राहायला हरकत नाही. पण मी म्हणजेच कोकण आणि मी म्हणजेच जनसमर्थन असा विचित्र समज नारायण राणेंनी करून घेतला. त्यामुळे ते जिथे जातील तिथे अस्वस्थ राहणे त्यांच्या नशिबी लिहिलेय. त्यामुळेच राजकीय अडगळीत पडलेले राज ठाकरेही “हा फुटबॉल कोणत्याच गोलीला आपल्याजवळ नको,” अशा शब्दांत त्यांची संभावना करतात तेव्हा त्यात ना काही वावगे वाटते ना आश्चर्य!
महाराष्ट्रात पक्ष सोडून दुसरा घरोबा करणाऱ्या नेत्यांची वानवा नाही. परंतु एखाद्या पक्षात जायचे, पोट तुडुंब भरेस्तोवर खायचे आणि पक्षाला अवकळा आली, की त्याच्या नावाने शंख करून नव्या कुरणाचा शोध घेण्यात राणेंनी महारत साध्य केली आहे. शिवसेनेत सगळी पदे भोगून झाल्यावर शिवसेना अडचणीत असताना त्यांनी त्या पक्षाला बोल लावत काँग्रेसची वाट धरली. आता काँग्रेसला घरघर लागली, की हे चालले नवीन घराच्या शोधात. बरे जायचे तर गुण्यागोविंदानेही जायचे नाही. आधीच्या पक्षाच्या नावाने मनसोक्त शंख करून जाणार!
राणेंनी मीच काँग्रेस सोडतो, असे म्हटले असले तरी काँग्रेसलाच सुटल्यासारखे वाटले असेल. उलट ते भाजपमध्ये जाणार म्हटल्यावर खरे तर भाजपलाच चिंता वाटायला हवी. हा अस्वस्थ अश्वत्थामा जिथे गेला तिथे त्याने विध्वंस केला. आज त्यांच्यामागे चार आमदारही नाहीत. त्यांच्या स्वतःचा तसेच मुलाचा जन्मभूमीत आणि कर्मभूमीत पराभव झाला. अन् तरीही आपणच श्रेष्ठ हा भाव काही जायला तयार नाही. नर सेवा ही नारायण सेवा हा समाजकारणाचा सिद्धांत राणेंनी ‘नारायण सेवा हीच नारायण सेवा‘ इथपर्यंत आणून ठेवली आहे. म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना मंत्रिपद दिलेच पाहिजे. त्यांच्या या उदात्त हेतूला हातभार लावण्यासाठी कोणी आतुर असेल, असे वाटत नाही. तरीही त्यांना सोबत घेऊन जळता निखारा पदरात घेण्याचा चंग बांधलेल्या सर्वांना शुभेच्छा!