Tuesday, January 20, 2009

मुख्यमंत्र्यांचे शहर


नांदेड...महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या या शहराला गेल्या महिन्यापासून मुख्यमंत्र्याचे शहर म्हणून ओळख मिळाली आहे. वास्तविक अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ मुदखेड. मात्र त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरवात त्यांनी या शहरापासून केली आणि तेव्हापासून त्यांची तीच ओळखच बनली. अशोकरावांचे वडील कै. शंकरराव चव्हाण हे नांदेडचे पहिले नगराध्यक्ष. त्यांच्यामुळे देशाच्या नकाशावर या शहराला ठळक स्थान मिळाले. १९८६ मध्ये खासदारकीची निवडणूक लढवून अशोकरावांनी येथूनच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. मात्र नंतर १९९० साली पराभव झाल्याने त्यांनी हा मतदरासंघ बदलला. मात्र आता ते मुख्यमंत्री झाल्याने नांदेडला एक आगळा मान मिळाला आहे. एकाच शहरातील दोन व्यक्ती मुख्यमंत्री होण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे. आता येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता मिळाल्यास अजित पवार मुख्यमंत्री होतील व बारामतीलाही तो मान मिळेल. मात्र त्यातही पहिलेपणाचा मान नांदेडचाच. तरीही शहरात फिरताना मुख्यमंत्र्यांची चापलुसी करणारे बॅनर्स फारसे दिसत नाहीत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

नांदेड झपाट्याने बदलत आहे. अगदी ओळखू न येण्याइतपत. मात्र हा सारा बदल केवळ तीन-चार वर्षांतील आहे. अनेक वर्षांनंतर शहराचा फेरफटका मारून या बदलाचा आढावा घेतला.

प्रथम तुज पाहता...

से Nanded
नांदेडचे रेल्वे स्थानक आता भव्य आणि खरोखर व्यग्र असल्याचे भासते. ही सगळी ब्रॉडगेजची किमया. एरवी या स्थानकाने आतापर्यंत तीनपेक्षा जास्त वेळेस आपले रूप बदलले आहे. जिल्हा परिषद, टपाल कार्यालय, न्यायालय, आधी पालिका आणि आता महापालिका...अशा अनेक कार्यालयांपासून हाकेच्या अंतरावर असणारा भाग आता मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जातो. आमच्या लहानपणी तो शहरापासून दूर वाटायचा. याचं कारण शहरातील मुख्य वस्ती स्टेशनच्या अलिकडे होती. स्टेशनमध्ये कोळशाची इंजिने यायची तेव्हा त्याची शिट्टी घरापर्यंत ऐकू यायची.

नांदेडला पहिली रेल्वे धावली १९०४ मध्ये. त्यावेळी निजामाने मराठवाड्यात मीटरगेज रुळ टाकले. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर (ज्यात दिवंगत स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ आणि दैनिक प्रजावाणीचे संपादक सुधाकर डोईफोडे आघाडीवर होते) इथे ब्रॉडगेज गाडी आली १९९५ मध्ये. विशेष म्हणजे गेल्या १०५ वर्षांत मराठवाड्यात एक फुटाचाही रेल्वेमार्ग वाढलेला नाही. त्यामुळे बीडसारख्या जिल्ह्यात परळी वगळता कुठेही रेल्वे जात नाही. एवढ्या वर्षांमध्ये स्टेशनचा विस्तार अनेकदा झाला. मात्र तेव्हाही घरात करमत नाही म्हणून वेळ काढायला इथे येऊन बसणाऱयांची कमतरता नव्हती. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना तर त्यांच्या सरावासाठी ही हक्काची जागा होती.

लोकांची ती सवय सहजासहजी जाणारही नव्हती. ब्रॉडगेजनंतर मुंबई आणि दिल्लीशी येथील गाड्यांची घसट वाढत गेली आणि रेल्वे स्थानकाला 'व्यावसायिक' स्वरूप येऊ लागले. शहरात येणाऱया पाहुण्याला पहिली झलक मिळते ते येथे. आता गुरू-ता-गद्दीच्या निमित्ताने त्याला एखाद्या तारांकीत हॉटेलचे रुप देण्यात आले आहे. तरीही स्टेशनच्या स्वच्छ आणि छाप पाडणाऱया आवाराबाहेर येताच कचऱयाचे ढीग स्वागत करतातच. हे स्टेशन रोडवर पन्नास पन्नास वर्षे धंदा करणाऱया हॉटेलवाल्यांचे पाप ! नोकरशाहीत हेडमास्तर या नावाने प्रसिद्ध असलेले आणि दोन वेळा केंद्रीय अर्थमंत्री, दोनदा गृहमंत्री आणि दोनदा मुख्यमंत्री झालेले शंकरराव चव्हाण नांदेडकरांना शिस्त लावू शकले नाहीत. तिथे गुरु-ता-गद्दीसाठी ती अंगी बाळगण्यात येईल, अशी अपेक्षा कशी करायची.

रेल्वे स्टेशन हे आमच्यासाठी एका आणखी गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. ते म्हणजे दिवसाच्या कोणत्याही वेळेस आणि रात्री उशिरापर्यंतही, तेथे वर्तमानपत्रे आणि नियतकालिकेही मिळायची. पेपरचे स्टॉल हा प्रकार माझ्या लहानपणी तरी नांदे़मध्ये अनोळखी प्रकार होता. वर्तमानपत्रे एक तर घरी पोऱया टाकायचा किंवा बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनहून येणारी एखादी व्यक्ती ते आणायची. त्यामुळे सकाळी घरी पेपर आला नाही तर रेल्वे स्टेशनपर्यंत जाऊन ते आणावे लागायचे. विशेष म्हणजे या स्टॉलवर मराठीपेक्षाही हिंदी किंवा तेलुगु नियतकालिके अधिक मिळायची.

सध्या दिल्ली ते बंगळूर धावणाऱया एक्स्प्रेस गाड्यांची वर्दळ नांदेडच्या स्थानकावर चालू असते. तिकिट तपासनीस कठोरतेने तिकिट तपासतात आणि फलाटांवर गप्पा मारणाऱयांपेक्षा प्रवाशांची संख्या अधिक दिसते. थोडक्यात म्हणजे गावाचा प्रवास शहराकडे होतोय!

संथ वाहते गोदावरी

से Nanded
गोदावरी ही नांदेडची ओळख मानण्यात येते. खरं तर पावसाळ्यात दुथडी भरून वाहताना गोदावरी पाहण्यात जी मजा आहे ती अन्य कशात नाही. मात्र ते पाणी अन्य ऋतुंत तसेच वाहिल याची खात्री नाही. शिवाय वाढत्या लोकसंख्येचे दुखणेही नाल्याच्या रुपाने तीला वाहावे लागते. गोदावरीची अगदीच मुळा मुठा झालेली नाही. त्यामुळे अजूनही तीत पाणी आणि रसायने वेगवेगळी ओळखता येतात. शिवाय नांदेडमध्ये उद्योग चालण्यापेक्षा बंद पडण्याचेच प्रमाण अधिक असल्याने त्या तुलनेत अजूनही येथे पाणी वाहते.

अगदी अलिकडे , कदाचित गुरु-ता-गद्दीच्या निमित्ताने असावे, पण गोदावरीच्या एका काठाचे चांगलेच सुशोभीकरण झाले आहे. नव्या पुलावरून (तसा तो बांधूनही तीस-एक वर्षे झाली असतील पण निजामाच्या राजवटीत बांधलेल्या पुलाच्या तुलनेत तो नवा आहे), सायंकाळच्या वेळी गुरुद्वारा लंगर साहिब, गुरुद्वारा नगीना घाट असे ओळीने गुरुद्वारे रोषण झालेले असतात. नदीवर नव्याने बांधलेले घाट या गुरुद्वारांवरील दिव्यांच्या उजेडात नदीपात्रातील आपले सुंदर प्रतिबिंब न्याहाळत असतात. केंद्र सरकारकडून आलेल्या १३०० कोटी रुपयांपैकी काही अंश तरी खर्च झाला आहे, हे या सुशोभित घाटांवरून दिसून येते. एरवी गोवर्धन घाटापासून नगीना घाटपर्यंत पूर्वी घाणीचेच साम्राज्य होते. त्याजागी ही रम्य आणि सुशोभित जागा माणसांना किमान पाच मिनिटे तरी खिळवून ठेवते. ही नव्याची नवलाई न ठरता कायमस्वरूपी हेच दृश्य दिसावे, अशीच इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे.

म्हातारा इतुका न...


से Nanded
नाही. मी या पुतळ्याबद्दल बोलत नाही आहे. हा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. निजामाच्या जोखडातून मराठवाड्याला सोडविल्याबद्दल कृतज्ञता म्हणून तो उभारण्यात आला आहे. त्यांच्या मागे जो टॉवर आहे, तो मात्र सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा आहे. एकेकाळी सर्वात उंच बांधकाम म्हणून तिला मान होता. आता अवतीभवतीच्या इमारती आणि मुख्यतः गल्लीभूषण, रस्ताभूषणांच्या बॅनरची गर्दी झाल्यामुळे टॉवरची रया गेल्यात जमा आहे. आधी साध्या चुन्याच्या असलेल्या टॉवरला पंधरा पर्षांपूर्वी काळ्या टाईल्सचे चिलखत लावण्यात आले. त्यामुळे तो बिचारा आणखी बापुडवाणा दिसू लागला. शिवाय त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात उष्णता वाढू लागल्याचेही वाद सुरू झाले. आता यंदा जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण योजनेच्या निमित्ताने त्याला पुन्हा मेक-अप करण्यात येत आहे. तो झाल्यावर टॉवर पुन्हा नायक होणार, चरित्र नायक होणार का एखादे विनोदी पात्र बनून वर्तमानाची खिल्ली उडविणार, काळच जाणे. (कारण त्याची साक्ष काढायला टॉवरवरचे घड्याळ अद्याप चालू आहे.)

तरी उघड्यावर असल्याने टॉवर सुदैवाने लोकांना दिसतो तरी. नांदेडमध्ये एक किल्ला आहे हे त्या शहरात राहणाऱया अनेकांना माहितही नाही. गोदावरीच्या काठीच वसलेल्या त्या नंदगिरीच्या किल्ल्यावर पालिकेने (आता महापालिकेने) कब्जा करून तिथे डंकिन केले आहे. त्यामुळे सामान्य लोकांना तिथे प्रवेशच नाही.

तीन सौ साल गुरु दे नाल

से Nanded

गेल्या अनेक वर्षांमध्ये नांदेडच्या दृष्टीने घडलेली सर्वात चांगली घटना म्हणजे गुरु-ता-गद्दी सोहळा. या सोहळ्याच्या निमित्ताने नांदेडमध्ये अनेक चांगली कामे झाली, रस्ते सुधारले, नव्या इमारती झाल्या. परदेशातून आलेल्यांसाठी खास एक एनआरआय भवन उभे राहिले. मागे १९९९ साली शहरात खालसा त्रिशताब्दी सोहळा झाला होता. त्यावेळी सुमारे पाच लाख लोक जमले होते तरीही प्रशासनाची कोंडी झाली होती. यंदा मात्र अंदाज २० लाख शीख यात्रेकरू (सरकारी भाषेत भाविक) जमले असतानाही सर्व काही सुरळीत सुरू होते. याचे श्रेय चव्हाण यांना निश्चितच जाते. तत्कालिन मुख्यमंत्र्यांचे असहकार्य असतानाही त्यांनी या सर्व कामांची नीट संपादनी केली. त्यानंतर पंतप्रधान आणि त्यांच्या वरिष्ठ मॅडम यांना नांदेडमध्ये आणून आपण कसे काम करतो, याची झलकही दाखविली. त्याचे फळ म्हणून त्यांना दोन महिन्यांतच मुख्यमंत्रीपद मिळाले असावे.


से Nanded

बाहेरच्या लोकांनी विचारले, तुमच्याकडे पाहण्यासारखे काय आहे, की नांदेडकर हमखास गुरुद्वाऱयाचे नाव घेतात. त्याचे महत्त्व आहेही तसेच. मात्र गुरु गोविंदसिंह यांची समाधी असलेल्या सचखंड साहिबशिवाय शहर व परिसरात आणखी आठ ते नऊ गुरुद्वारे आहेत. गुरद्वारा नगीनाघाट साहिब, गुरुद्वारा माता साहिब, बंदाघाट साहिब यांसाऱखे गुरुद्वारे केवळ पाहण्यासाठीच नाहीत, तर ते अनुभवण्यासारखेही नक्कीच आहेत. मालटेकडी साहिब सारखे नवे गुरुद्वारेही येथे नव्याने उभारण्यात येत आहेत.

शीख संप्रदायाचे नांदेडशी असलेले नाते शहरात जागोजागी दृष्टीस पडते. त्यात काही असाहजिक आहे, असे मला वाटतही नाही. गुरु गोविंदसिंह रुग्णालय, श्री गुरु गोविंदसिंह इंजिनियर कॉलेज अशा संस्था आहेत, तशा गुरु गोविंदसिंह चषकासाऱख्या हॉकी स्पर्धा आहेत. अशा बाबी पाहून अनेकांना नांदेड महाराष्ट्रात आहे का पंजाबमध्ये असा प्रश्न पडतो. त्यात शहरात सर्रास वापरण्यात येणारी हैदराबादी हिंदी...तो एक वेगळाच सांस्कृतिक धक्का आहे. विशेष म्हणजे नांदेडमधील शीखांची भाषा पंजाबी शीष अगदी थट्टेवारी नेतात.

तरीही पंजाबमधील राजकारणाची अपरिहार्य़ सावली येथे पडलेलीच असते. पंजाबमधील दहशतवाद ऐन भरात असताना, १९८६ साली गुरुद्वारा लंगर साहिबमध्ये शीखांमधीलच एका पंथाच्या प्रमुखाचा मुक्काम होता. हा धर्मगुरु दहशतवाद आणि खासकरून त्यासाठी धर्माचा वापर याच्या विरोधात होता. तर त्याची लंगर साहिबच्या दारात स्टेनगनने गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आता, गुरु-ता-गद्दी व्यवस्थापन समितीचे कामकाज आणि तिचे अध्यक्ष एम. एस. गिल यांच्याबद्दलच्या तक्रारी, यांनी स्थानिक वर्तमानपत्रांना गेले वर्षभर खाद्य पुरविले.

नांदेडचा मुख्य गुरुद्वारा, सचखंड साहिब हा गुरु गोविंदसिंग यांच्या समाधीस्थळी बांधलेला आहे. राजा रणजितसिंह यांनी त्यांच्या कालखंडात या गुरुद्वाऱयाचे बांधकाम करवून घेतले. गुरु गोविंदसिंग यांचे दागिने, शस्त्र येथे ठेवलेले आहेत. मुख्य म्हणजे ते सर्वसामान्यांना पाहताही येतात. केवळ चॅनेल किंवा माध्यमांसमोर तोंड उघडणाऱया बोलघेवड्या विश्वस्तांपुरते ते मर्यादित नाहीत. प्रत्येक शीख व्यक्तीला त्याच्या उत्पन्नाच्या दहा टक्के हिस्सा गुरुद्वाऱयाला द्यावा लागतो. शिवाय वयाच्या साठाव्या वर्षीपर्यंत एकदा तरी सचखंड साहिबचे दर्शन घ्यावे लागते. त्यामुळे घुमटाला सोन्याचा पत्रा आणि आत सोन्याची नक्षी असलेल्या या प्रार्थनास्थळाला उत्पन्नाची वानवा नाही. मात्र एकूणच भक्तांना देवाआधी दानपेटीचे दर्शन घडविण्याची जाज्वल्य परंपरा गुरुद्वाऱयांमध्ये नसते. तरीही, अगदी आपापल्या क्षेत्रात मोठी उंची गाठलेली मंडळी येथे भक्तीभावनेने सेवा करतात. इंग्लंडमध्ये मोठा उद्योग सांभाळणारी आसामी येथे येणाऱ्यांची पादत्राणे सांभाळत असते तर पी. एचडी. केलेले प्राध्यापक लंगरमध्ये वाढपी काम करतात. तेथे कोणीही कोणत्याही प्रकारचा बडेजाव नाही. गुरु गोविंदसिंग यांच्याशी संबंधित आठ गुरुद्वारे नांदेडमध्ये आहेत. शिवाय घोड्यांची पागाही आहे. पंजाबमधील अत्यंत उंची जातीचे घोडे येथे पाहायला मिळतात. होळी आणि दसऱयाला हे पांढरेशुभ्र घोडे जेव्हा शहरात मिरवणुकीने फिरतात, त्यावेळी डोळ्यांचे पारणे फिटते.

सर्वे यस्य वशात् गात् स्मृतिपथं

से Nanded
नांदेडला महापालिका मिळाली १९९७ मध्ये. त्यासाठी नदीपलिकडील वाघाळा आणि सिडको, हडको हा भाग शहराला जोडण्यात आला. आता तरोडा हा नांदेडच्या सीमेवर वसलेल्या खेड्याचा समावेश पालिका ह्द्दीत करण्याची योजना आहे. त्याला विरोध म्हणून आंदोलने सुरू झाली आहेत. पन्नास वर्षॉपूर्वी पालिकेचे कामकाज ज्या इमारतीत होत होते, ती इमारत आता पूर्णपणे पाडण्यात आली आहे. त्याजागी नवीन इमारतीचे बांधकाम चालू आहे. पालिकेच्या इमारतीशेजारी ग्रंथालय आणि वाचनालय होते. तेही जमीनदोस्त करण्यात आले आहे. पालिकेच्या इमारतीतील लालबहादूर शास्त्री सभागृह हे पूर्वी शहरात प्रसिद्ध होते. १९८३-८४ साली जेव्हा पहिल्यांदा दूरदर्शनचे प्रक्षेपण शहरात सुरू झाले, तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये झालेले दौरे आम्ही याच सभागृहात वाचनालयातील टीव्हीवर पाहिले होते.

आता नवीन होणाऱया इमारतीत सभागृह असेल मात्र त्याला लालबहादूर शास्त्रींचे नाव असेल का नाही, याबाबत मला शंका आहे. वाचनालय आणि ग्रंथालयाच्या बाबतीत तर आणखीच गंमत आहे. हे दोन्ही आता शिवाजीनगर आणि गोकुळनगर भागात हलविण्यात आले आहेत. मात्र जुन्या ग्रंथालयाच्या जाण्याने जनता राजवटीची नांदेडमधील शेवटची आठवण नाहीशी झाली आहे. एरवी शहरभर निरनिराळ्या इमारतींना कॉंग्रेसच्या नेत्यांची अथवा गुरु गोविंदसिंहांचे नाव आहे. ही एकमेव संस्था होती जी राम मनोहर लोहिया यांच्या नावाने उभी होती. सर्व सरकारी संस्था कॉंग्रेसच्या ताब्यात असण्याच्या आणि राजकीयदृष्ट्या शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पक्ष अशा पक्षांचा जोर असतानाच्या काळात आता स्थलांतरीत वाचनालयाला त्यांचे नाव देण्याची मागणी आता कोण करणार. या वाचनालयात बसून एमपीएससी-यूपीएससीचा अभ्यास करणाऱयांची संख्या खूप मोठी होती. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगु, उर्दू या सहा भाषांतील नियतकालिके, वर्तमानपत्रे या वाचनालयात येत असत. मला वैयक्तिकदृष्ट्या राम मनोहर लोहिया वाचनालयाबद्दल विशेष ममत्व होते. कारण व्यंगचित्रांची माझी पहिली ओळख येथेच झाली. टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेस, हिंदू, इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया, संडे, धर्मयुग, जनसत्ता . चे वाचन मी येथेच केले. नांदेडमध्ये हाताच्या बोटांपेक्षाही कमी असे माझे जे मित्र होते ते या वाचनालयातच भेटले होते. सर्व भारतीय भाषा एकाच लिपीचे वेगवेगळे रुप घेऊन लिहिल्या जातात, हे सांगणारे भारतीय वर्णमाला हा ग्रंथ मी येथेच वाचला. त्यामुळे पुढे मला निरतिशय फायदा झाला. थोडक्यात म्हणजे आज मी जो काय आहे तो या वाचनायलामुळे आहे.

पुढे मी अमेरिकन लायब्ररी, ब्रिटीश लायब्ररी, एशियाटिक सोसायटी (सेंट्रल लायब्ररी), मॅक्स म्युल्लर भवन, पुण्यातील नगर वाचन मंदिर विभागीय ग्रंथालय अशी अनेक वाचनायलये पालथी घातली. मात्र रा. . लो. वाचनालयासारखा मोकाट संचार कुठेही केला नाही. त्या वाचनालयात पुस्तके फारशी उत्कृष्ट होती, सुविधा चांगल्या होत्या अशातला भाग नाही. मात्र तेथील कर्मचारी वर्ग आमचा दोस्त झाला होता शिवाय आम्हाला हवं ते तिथे मिळत होतं. ते वाचनालय उभं असलेली जमीन बोडकी झालेली परवा पाहिली आणि त्या सगळ्या आठवणी आल्या. सर्वे यस्य वशात् गात् स्मृतिगात्पथं कालाय तस्मै नमः....!

---------------------