Friday, June 20, 2008

मूर्ती महान व किर्तीही महान...

माणसाने किती नम्र असावे?. गेल्या दोन दिवसांमध्ये दोन मोठ्या माणसांना भेटण्याची संधी मला मिळाली. (याचे कारण अर्थातच पत्रकारितेचा धंदा!) पण या दोन्ही माणसांना भेटून  त्यांच्या साधेपणाची आणि ऋजुतेची चुणुकच मला पहायला मिळाली. दोन्ही व्यक्तिंबद्दल मी यापूर्वी वाचलेलं, ऐकलं होतं. मात्र त्याची प्रचिती मला इतक्यात मिळेल, असे वाटले नव्हते.


यातील पहिली व्यक्ती म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक आणि सर्वेसर्वा एन. आर. नारायण मूर्ती. मूर्ती यांच्याबद्दल आधी खूपच ऐकलं होतं. आमच्या वर्तमानपत्राच्या सकाळच्या मिटिंगमध्ये मूर्ती आज शहरात आहेत, असं मी सांगितलं. त्यावर साहेबांचा हुकूम आला, की त्यांची एक एक्स्लूजिव मुलाखत घेऊन ये. मी (मनातल्या मनात) कपाळाला हात लावला. आता नारायण मूर्ती म्हणजे पुण्यातील कोणी पत्रकबाज पुढारी नाहीत, की उचलला मोबाईल अन मिळविली प्रतिक्रिया.




आधी मिडिया को-ऑर्डिनेटरला फोन लावला...त्यानं मोघम उत्तर दिल्यावर केवळ नशिबावरच हवाला ठेवला. त्यानंतर ल मेरिदियन या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोचलो. मूर्ती तिथे आलेले आहेत, हे कळाल्यावर जीवात जीव आला. पण त्यांच्यापर्यंत पोचायचे कसे ते कुठल्या सूटमध्ये आहेत, हे आधी शोधून काढले. त्यानंतर दारावरच स्वयंसेवकाने अडविले. पुन्हा प्रतिक्षा. थोड्या वेळाने शेवटी धीर करून आणि निर्वाणीचा उपाय म्हणून त्यांना विचारले, “सर, तुमच्याशी दोन मिनिटे बोलता येईल का?”


“नाही, मला आता वेळ नाही. कार्यक्रम सुरू होत आहे,” मूर्ती यांनी फारशा रुक्ष नसलेल्या स्वरात सांगितले. 


“सर, मग कार्यक्रम संपल्यावर तरी बोलूया,” मी चिकाटी न सोडता म्हणालो.


“नाही, कार्यक्रम संपला की लगेच मला विमान पकडून बंगळूरला जायचे आहे,” मूर्तींनी सांगितले. हा संवाद अर्थातच इंग्रजीत चालू होता. 


त्यानंतर मात्र मूर्ती यांची खास मुलाखत मिळण्याची आशा संपली. मात्र मी कार्यक्रमात बसलो होतो आणि आम्हाला हवं तसं ते मोजकेच मात्र पूरेसे बोलले. खासकरून ‘त्यावेळी आम्ही नऊ रुपयांत पोटभर जेवत असू,’ ही त्यांची आठवण मला खूप भावली. त्यातून आमची एक बातमी पूर्ण झाली.


दुसरे दिवशी कोल्हापूरचे राजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज पुण्यात होते. शिवरायांच्या नावाने आजकाल कोणीही दुकान थाटतो आणि येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळवितो. त्यावर महाराजांचे मत मिळवावे, अशी कल्पना मीच मांडली होती. त्याप्रकारे महाराष्ट्रातील गड किल्ले या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते आलेले आसताना त्यांना गाठण्याची संधी साधली. प्रकाशन समारंभानंतर दोन मिनिटांच्या विश्रामकाळात महाराजांकडे जाऊन त्यांना स्वतःची ओळख सांगितली. मग विषयाला हात घातला. त्यांनीही कुठलेही आढेवेढे न घेता बोलायला संमती दिली.


“महाराज, आजकाल कोणीही उठतो आणि शिवरायांचे नाव घेतो. त्यातून अनेकदा चुकीच्या गोष्टी घडत आहेत. यावर तुमचे मत काय आहे,” मी त्यांना विचारले. 




“शिवराय सर्वांचे आहेत. त्यांचे नाव कोणीही घेऊ शकतो. महाराष्ट्रात शिवरायांना वगळल्यास काय राहते. मात्र त्यातून चुकीच्या गोष्टीही घडत आहेत,” शाहू महाराज म्हणाले. त्यानंतरही आमचे प्रश्नात्तेर चालूच होते. कोणताही त्रागा न करता किंवा रुबाब न दाखविता शाहू महाराज उत्तरं देत होतं. कुठलाही लवाजमा न बाळगता आणि ‘पोझ’ न घेता ते बोलत होते. आदल्याच दिवशी काही सरकारी संस्थानिकांचा आणि मंत्र्यांचा बडेजाव आणि नाटकीपणा पाहणाऱया माझ्यासारख्याला हा प्रकार नवा होता. केवळ आजूबाजूच्या लोकांची गर्दी आणि गडबड वाढत असल्याने आम्हाला ती भेट आटोपती घ्यावी लागली.


अशाप्रकारे दोन दिवसांत दोन मोठ्या माणसांची भेट झाली होती. दोघांच्याही साधेपणाचा ठसा मनावर चांगलाच ठसला आहे.