Showing posts with label Anna Hazare. Show all posts
Showing posts with label Anna Hazare. Show all posts

Thursday, June 23, 2011

झेंडू क्रांती

नानासाहेब नवलाखे आपल्या वाड्याच्या सदरेवर येरझारा घालत होते. कित्येक तास त्यांचा हा उपक्रम चालू होता. गेल्या कित्येक दिवसांपासून तो त्यांचा नित्यक्रमच झाला होता. त्यांच्यासारख्या देशभक्ताने खरे म्हणजे इतके त्रागा करून घ्यायला नको होता. पण घटनाच अशा घडत होत्या, की नानासाहेबांसारख्या धीरोदात्त व्यक्तीवरही तळमळत बसण्याची वेळ आली होती.


फार नाही, चार महिन्यांपूर्वी नानासाहेबांना पाहणाऱ्या व्यक्तीला काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले असते. त्या वेळी त्यांच्या डोळ्यात स्वप्ने आणि मनात आशा होती. जगभर चालू असलेल्या घडामोडींनी त्यांच्या अंतःकरणात स्वदेशप्रेमाचे भरते आले होते. ट्युनिशिया, इजिप्त सारख्या देशांमध्ये कधी मोगरा क्रांती तर कधी अन्य कुठली क्रांती झाल्याच्या वार्ता धडकत होत्या आणि इकडे नानासाहेबांच्या हृदयाची धडधड वाढत होती.


"संपूर्ण जगभर बदलांचे वारे वाहत आहेत. आपला देश त्यापासून दूर राहू शकत नाही," ते म्हणायचे. त्यांच्या या आशावादाला इंधन पुरविण्याचे काम त्यांचा नातू इमाने इतबारे करत असे. कधी तो फेसबुकवर किती लोकांनी क्रांतीच्या नावाने लाईक केले हे सांगे तर कधी लोकांनी राजकारण्यांना किती तऱ्हेने शिव्या घातल्या याची जंत्री देत असे. त्यामुळे नानासाहेबांच्या धूसर चष्म्यापुढे एकदम भगतसिंग आणि महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत उभा राहत असे.


या आशावादाला जागूनच नानासाहेबांनी त्यांच्या गावातल्या पुढाऱ्याच्या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. त्यांच्या या आंदोलनाला गावाच्या पातळीवर जेव्हढी प्रसिद्धी शक्य होती, तेव्हढी मिळाली होती. गावातील प्रत्येक मोकळा माणूस त्यांच्या या आंदोलनात सहभागी झाला होता. दोन दिवस नेटाने हे आंदोलन चालविले, की गावचा पुढारी शरण येणार आणि त्यानंतर राज्य व त्यानंतर देश, अशी क्रमाने सुधारणा करण्याचे मनसुबे नानासाहेब करू लागले.


"आजोबा, तुमच्या आंदोलनाला गावातल्या सगळ्या पोरांनी फेसबुकवर पाठिंबा दिलाय," नातवाने ओरडून दिलेल्या या निरोपानंतर तर नवलाखेंना स्वर्ग दोन बोटेच उरला. आता आपले जीवीतध्येय हाताशी आल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. त्या भारावलेल्या स्थितीतच त्यांनी आंदोलनाचा श्रीगणेशा केला. इतर देशांमध्ये जर मोगरा क्रांती होऊ शकते, तर आपल्या देशात कमळ क्रांती का होऊ शकणार नाही, हा त्यांचा साधा सवाल होता. नानासाहेबांच्या टीकाकारांकडे याचे उत्तर नव्हते. १८५७ च्या क्रांतीकाळातील भाकरी आणि फूल या प्रतिकांची नानासाहेबांना आठवण होऊ लागली.


नानासाहेबांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आणि आपली वाट फुलांऐवजी काट्यातून जाते, याची जाणीव त्यांना झाली. त्यांच्या आंदोलनातून काय फळ मिळेल, याची गणिते पाठिंबा देणाऱ्यांनी आधीच करून ठेवली होती. त्या तुलनेत नानासाहेबांची पाटी कोरी होती.


"नाना, तुम्ही आंदोलन करा. आपल्या समाजाला एका चांगल्या नेत्याची गरज आहे," असे जेव्हा लोकं सांगत त्यावेळी समाज म्हणजे आपली जात हे कळायला नानासाहेबांना बराच वेळ लागला. त्यांना वाटले समाज म्हणजे सगळा समाज...


काही लोकांनी येऊन नानासाहेबांचा जयजयकार केला. त्यानंतर ते दिसेनासे झाले. काही दिवसांनी नानासाहेबांना कळाले, की नानासाहेबांचे मंदिर उभारण्याचे त्या गावकऱ्यांनी ठरविले आहे आणि त्यासाठी त्यांच्या नावाने वर्गणी गोळा करण्याचे काम जोरात सुरू आहे. अशाच तऱ्हेने विविध पातळ्यांवर नानासाहेबांच्या नावानं अनेकांचे धंदे सुरू होते. त्यांच्या स्वतःच्या कानावर यासंबंधी बातम्याही येत होत्या. त्याच संबंधात विचार करत ते फेऱ्या मारत होते.


तितक्यात त्यांच्या मुलाने येऊन अत्यंत उत्साहात सांगितले, "बाबा, आपल्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी फेसबुकवर अनेक पेजेस तयार आहेत. खूप लोकांनी पत्रकं काढून पाठिंबा दिला आहे. तुम्ही म्हणता तशी क्रांती आता जवळ आली."


याच्यावर वैतागून नानासाहेब म्हणाले, "अरे, कसली आलीय डोंबलाची क्रांती. इथं प्रत्येकाला स्वतःचा फायदा पाहिजे."


त्यावर गोंधळलेला नातू म्हणाला, "अहो, पण तुम्हीच म्हणाला होतात ना जस्मिन क्रांतीसारखी क्रांती होईल."


त्यावर डोळे झुकावत आणि मान डोलावत नानासाहेब उत्तरले, "बाळ, आता माझं मत बदललंय. त्या क्रांत्या विसर. आपल्याकडे एकच क्रांती शक्य आहे ती म्हणजे झेंडू क्रांती. ती क्रांती करण्याच्या मागे लाग."