Sunday, June 17, 2007

आवस वाडा होऽऽ मायऽ

आवस वाडा होऽऽ मायऽ...पिंकीच्या आय, चिंकीच्या माय...आवस वाडा होऽऽऽआमच्या लहानपणी खेडेगावात वाडा होता गं बाय! शंभरी गाठलेला; पण एखाद्या चिवट म्हाताऱ्यासारखा होता गं आय....डग म्हणत नव्हता गं. वाड्याचा दरवाजा खूप मोठा आणि त्याला एक छोटा दिंडी दरवाजा होता हां! दिंडी दरवाजातून वाड्यात दिवसभरी वर्दळ असे गं बाय... त्यावेळी आया आपल्या पोरींवर अन्‌ बापडे तरण्या पोरांवर नजर ठेवत असत गं बाय! मोठा दरवाजा वाहनांसाठी मात्र उघडला जाई. दरवाजातून आत गेलं, की ते फरशीचे मोठे अंगण दिसं ग माय. याच अंगणात माझ्या आयचं आणि शेजारणीचं कितीदा पाण्यासाठी भांडण झालं. एकदा तर तिथेच त्यांच्या भांडणात मी आयचा हात रोखायला गेले, नि आयनं हिसका दिला नि मी पडले...केवढी खोक आली मला...बाबांनी मला डॉक्‍टरकडे नेऊन मलमपट्टी केली...त्याचा खर्चही भांडण झालेल्या काकूंकडून वसूल केला हां...एवढी भांडणं होऊनही आम्ही 7-8 कुटुंबं मात्र कितीतरी वर्षं गुण्यागोविंदाने राहत होतो. वाडा तसा दोन मजलीच. याच अंगणात आमचीही मुले मनसोक्त खेळली. नंतर थांबवावी लागली त्यांची, ही बात वेगळी! मुलींनी भोंडला केला. खूपदा...त्यावेळी हीऽऽऽ गर्दी जमायची इथे...मुलींचीही अन्‌ मुलांचीही....आता नाही रायलं गं...बायका मंगळागौर-हरितालिकेचे खेळ खेळल्या. त्यांच्यात त्यावेळी किती संवाद होई! त्या संवादामुळे वाड्यातील नवरोबा मंडळीना कितीदा पगार कमी पडला हो, काय सांगायचं? पेठेतले व्यापारी तर कितीदा म्हणत, या बायकांचे सण रोज रोज का नसतात म्हणून.अंगणात आमच्या अंगतीपंगती होत. आता कुठं राहिल्या हो आता तशा पंगती. परवाच तर माझ्या मुलाचे लग्न झाले. त्याची पार्टी थ्री-स्टार हॉटेलमध्ये दिली. त्यावेळी इतकी आठवण झाली त्या पंगतीची. काय सांगू बायांनो...आमच्या पंगतीमध्ये पुरुषमंडळीही सहभागी होत. आमच्या आया मात्र घरातूनच डोकावून पाहत...घरी गेल्यावर आई विचारी हो, कशी होती त्या चिंगीच्या आईने केलेली भाजी? बरी होती ना? आपल्यासारखी नव्हती ना, वाटलंच मला...मेली कूपनचं तेल वापरते पंगतीच्या दिवशी...असं आई बोलायची गं...मी मात्र चिंगीच्याच ताटातली भाजी जास्त खात असे, हीहीहीही!आम्ही उन्हाळ्यात अंगणातच झोपत असू. मात्र बाबा न दादा रात्रभर झोपत नसत. त्यांना थंडी सहन होत नसे. आम्ही सकाळी उठलो ना, की ते खालीच झोपलेले दिसत. गणपतीत घरोघरी आरत्या आणि प्रसादांची अगदी धमाल असे. गणपतीपेक्षा आम्हीच मोदक जास्त खात असू. बघा हो बाय, काय आमच्या वाड्यात जगण्याची गंमत होती?आता कोणतरी या वाड्यात रहायला पायजे गं बाई! आता आम्ही शहरात राहतो. आमचा स्वतःचा फलॅट आहे. मुलगा स्टेटस्‌मध्ये राहतो. इकडे येणं होत नाही गं....वाड्याच्या आठवणी लिहून वेळ काढते गं बाय...त्यामुळे आता वाड्याची देखभाल करायला, लक्ष द्यायला कोणीतरी रहायला पाहिजे गं बाय....कोणीतरी लक्ष द्या गंऽऽऽ

"शिवाजी' दिसे दिन रजनी

`शिवाजी' रिलीज झाला आणि सर्वांची ताणलेली उत्सुकता पुन्हा पहिल्या स्थितीत आली. गेली दोन वर्षे चोहोकडे केवळ "शिवाजी'च्याच चर्चेचे साम्राज्य होते. त्यात मुख्य मुद्दा होता तो म्हणजे रजनीकांतला सोळा कोटी रुपये मानधन मिळाल्याचा. ऋतिक रोशनला अलीकडेच पाच चित्रपटांसाठी आठ ते दहा कोटी रुपये मिळाल्याच्या बातमीच्या पार्श्‍वभूमीवर हा आकडा म्हणजे अगदी "छप्परफाड'च होता. त्यामुळे याच अंगाने चित्रपटाची चर्चा झाली. जणू काही रजनीकांतला पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम मिळाली होती. सात वर्षांपूर्वी "पडैयप्पा'च्या वेळेस मी वाचले होते, की टेरिटरी हक्क आणि मानधन मिळून रजनीकांतला वीस कोटी रुपये मिळतात. सात वर्षांत त्याची किंमत घटण्याऐवजी वाढलीच आहे. मात्र सोळा कोटींचे तुणतुणे वाजविणाऱ्यांचे खरे दुखणे वेगळेच होते. त्यांच्या दृष्टीने खरे कलावंत ते बॉलिवूडचेच आणि जे काय पैसे, महत्त्व मिळणार ते त्यांनाच! त्यामुळे रजनीकांतला एवढे पैसे मिळतात म्हणून लगेच अनेकांना कंठ फुटला. मराठी प्रेक्षकांच्या दृष्टीने तर ही फारच मोठी गोष्ट होती. मराठी पडद्यावर तीस तीस वर्षे "अभिनय' करणारे कलावंत पैसा मिळतो म्हणून हिंदी मालिकांमध्ये नोकर-चाकरांची भूमिका करताना पाहणाऱ्यांसाठी तर हा अकल्पनीय फटका होता. रजनीच्या सोळा कोटींची पराकोटीची चर्चा करणाऱ्या कुठे माहित असणार, की तो चित्रपटासाठी मानधन आधी घेत नाही. प्रत्येक चित्रपटासाठी तो फक्त एक हजार रुपये "टोकन अमाऊंट' घेतो. त्यानंतर चित्रपटाला यश मिळाले, की वितरणाच्या हक्कांतून आपला वाटा मिळवितो. त्याच्या "मुथु'ने (1995) जपानमध्ये 35 ते चाळीस कोटींचा धंदा केला होता. म्हणजे बघा, तमिळनाडू आणि तेलुगुत तो किती कमावत असेल. जितका यशात सहभागी तितकाच अपयशातही, हा नियमही पाळणारा रजनीच! म्हणूनच "बाबा' (2003) चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही, तेव्हा त्याने सर्व वितरकांना त्यांचे पैसे परत केले होते. (रजनीचा चित्रपट म्हणजे वितरकांनाही मोठीच रक्कम गुंतवावी लागते. "शिवाजी'च्याच बाबतीत बोलायचे, तर केरळमधील केवळ पलक्काड जिल्ह्यासाठी त्याच्या वितरणाचे हक्क सतरा कोटींना विकले गेले. आंध्रातील एका -एका भागासाठी साठ-साठ कोटींची बोली लागल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच वाचनात आल्या होत्या.)

"शिवाजी' चित्रपटाला आलेला खर्च शंभर कोटी रुपयांच्या घरात आला असल्याचे बोलले जाते. त्यातही दम नाही. "शिवाजी'चा निर्देशक शंकर आहे. शंकर हा खर्चिक, भव्य आणि फॅंटसीमय चित्रीकरणासाठी आणि सामाजिक महत्त्वाच्या मुद्यांवर व्यावसायिक चित्रपट काढणारा प्रतिभावान निर्देशक म्हणून ओळखला जातो. "जंटलमन' या त्याच्या पहिल्याच चित्रपटापासून त्याने स्वतःची आगळी ओळख उभी केलेली आहे. भारतीय चित्रपटांना संगणकीय करामतींची ओळख शंकरच्याच "कादलन' (1994-हिंदीतील "हमसे है मुकाबला') या चित्रपटातून झाली. त्यानंतर कमल हासनला वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकाच्या वेशभूषेत त्यानेच सादर केले होते. "इंदियन' (1996-हिंदीतील "हिंदुस्तानी') नावाच्या या चित्रपटात कमल हासन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट झाल्याचे एक "स्पेशल इफेक्‍ट'चे दृश्‍य होतेच. त्यानंतर "जीन्स" (1998) या त्याच्या चित्रपटात एका गाण्याचे चित्रीकरण जगाच्या सात आश्‍चर्यांच्या पार्श्‍वभूमीवर करून त्याने खळबळ उडवून दिली. "मुदलवन' (1999-हिंदीत "नायक' (2002)) हाही चित्रपट त्यावेळचा "बिग बजेट' चित्रपटच होता. "शिवाजी'च्या अगोदरचा शंकरचा लेटेस्ट चित्रपट म्हणजे "अन्नियन' (2005-हिंदीत अपरिचित). हा चित्रपट अठरा कोटींच्या खर्चाने काढला होता. या चित्रपटात तर त्याने संगणकीय करामतींची बरसातच केलेली! "ब्लॉकबस्टर' म्हणून समाविष्ट झालेला हा चित्रपट फ्रेंच भाषेत डब झालेला एकमेव भारतीय चित्रपट आहे.

"शिवाजी'ची आणखी एक खासियत म्हणजे त्याला संगीत ए. आर. रहमानचे आहे. रजनीच्या चित्रपटाला संगीत देणे म्हणजे एक मोठी सन्मान असल्याचे तमिळ चित्रपटसृष्टीत मानले जाते. रहमानला "95 सालीच "मुथु" आणि त्यानंतर "99 साली "पडैयप्पा' व नंतर "बाबा'मधून ही संधी मिळाली. मात्र "चंद्रमुखी' (2050) या रजनीच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटाला संगीत विद्यासागरचे होते. त्यामुळे "शिवाजी'साठी त्याला पुन्हा संधी मिळणे, ही त्याचे तमिळ चित्रपटसृष्टीतील पुनरागमन मानले जाते. दक्षिण भारतीय चित्रपटांतील (खरं तर भारतीय चित्रपटसृष्टीतीलच) तीन बडी नावे एकत्र आल्याने "शिवाजी'ची बाजी मोठी झाली. मात्र या तिघांच्याही विशिष्ट कर्तृत्वाबाबत माहिती नसणारी माणसंच त्यांच्याबाबत बोलत असल्याने "कोटी'चीच बात मोठी झाली. नही सुवर्णे ध्वनीस्तादृक यादृक कांस्ये प्रजायते...

आता "शिवाजी'च्या कथेबाबत...तमिळ चित्रपटांमध्ये ज्यांनी रजनीकांत पाहिला आहे, त्यांना रजनीच्या चित्रपटात कथा कितपत महत्त्वाची असते, हेही माहित असतं. प्रसिद्ध क्रिकेटपटू डब्लू. जी. ग्रेस यांचा एक किस्सा आहे...ग्रेस हे मैदानावरील त्यांच्या दांडगाईबद्दल प्रसिद्ध होते. एकदा ते फलंदाजीसाठी मैदानावर उतरले असताना लवकरच बाद झाले. पंचांनी ग्रेस यांना बाद दिल्याचा इशारा केला, मात्र ग्रेस जागेवरून हटले नाहीत. त्यावेळी पंच म्हणाले, ""तू बाद आहेस, मी निर्णय दिला आहे.'' त्यावर ग्रेस म्हणाले, ""तो निर्णय मागे घे. हे लोकं (प्रेक्षक) माझी फलंदाजी पहायला आहे आहेत, तुझे निर्णय पहायला नाही.'' रजनीच्या चित्रपटांची "कथा' वेगळी नाही...रजनी म्हणजे हवेत सिगारेटी फेकून तोंडात झेलणारा व मरतानाही ती तोंडातून न काढता (गिरफ्तार), बंदुकीच्या गोळीमागे पळणारा (त्यागी) किंवा तत्सम माकडचेष्टा करणारा अभिनेता (?) असे काही चित्रपटरसिक मानतात. "प्रागैतिहासिक' किंवा "अश्‍मयुगातील' चित्रपट पाहून त्यावर मते बनविणारी ही मंडळी असतात. रजनी म्हणजे स्टाईल, हे कितीही खरं असलं तरी असं म्हणतात, की "Rajni don't do thing stylishly, but what he does becomes style.' रजनीकांत याच्या चित्रपटाबाबत एका शब्दात वर्णन करायचे झाल्यास असं म्हणता येईल, "पूर्ण मनोरंजन.' साठ-साठ वर्षांच्या म्हाताऱ्या चार चार तास रांगेत उभं राहून चित्रपटाचं तिकिट काढतायत, असं दृश्‍य एरवी दिसत नाही अन्‌ ते रजनीकांतच्या चित्रपटालाच दिसते याचं कारण हे आहे. रजनीकांतच्या प्रत्येक चित्रपटात थोडीसा कौटुंबिक, थोडासा हास्याचा, थोडासा मारामारी आणि त्याची नेहमीची "स्टाईल', हा सर्वच मसाला भरलेला असतो. त्यामुळेच त्याच्या चित्रपटात पूरेपूर मनोरंजन मिळणार, याची खूणगाठ मनाशी बांधूनच, तसा विश्‍वास मनी बाळगूनच प्रत्येक प्रेक्षक त्याच्या चित्रपटाला जातात, हे त्याच्या प्रदीर्घ यशाचं कारण आहे. अन्‌ त्याहूनही महत्त्वाचं, मोठं कारण म्हणजे....
त्या विश्‍वासाला क्‍वचितच तडा जातो...!