Friday, October 14, 2016

'धृतराष्ट्र विकारा'चा पहिला अपवाद

            पंधरा दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात फिरत असताना जरा जनमानसाचा अंदाज घेण्याचा जरा प्रयत्न केला. अलम दुनियेत बदनाम झालेल्या तेथील सरकारबद्दल लोकांना काय वाटते, याचा अंदाज घेऊन पाहिला. रेल्वेतील सहप्रवासी असोत किंवा कानपूरच्या रस्त्यावर वाहने चालवणारे चालक, त्यांच्या तोंडून एकूण वर्तमानाबद्दल फारशी तक्रार दिसली नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबद्दल त्यांना सहानुभूती असल्याचे जाणवत होते. त्यांच्या काळात राज्यात विकास झाल्याचे उदाहरणानिशी ते सांगत होते. कानपूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून काही वर्षांपूर्वी 15-16 किलोमीटर अंतर कापण्यासाठी दोन तास लागायचे. आता हा वेळ अर्ध्या तासावर आला आहे, याचे चालकाला समाधान होते. त्यांच्या काळात लखनौमध्ये तयार झालेल्या पर्यटन केंद्राचीही बरीच स्तुती ऐकली. अर्थात् उत्तर प्रदेशातील विकासाची तळरेषा खरोखरच एवढ्या तळाशी आहे, की काहीसे बोटभर वर गेले तरी त्यांना आकाश ठेंगणे वाटावे. एकूण व्यवस्थेतील अनागोंदी (किंवा अनागोंदीची व्यवस्था) या बाबतीत त्या राज्याची स्पर्धा फक्त महाराष्ट्राशी होऊ शकेल.
            सांगायचा मुद्दा हा, की अखिलेश यादव हे वाटतात तेवढे अक्षम मुख्यमंत्री नाहीत, असा साधारण सूर आहे. अशा या मुख्यमंत्र्याला त्याच्याच वडिलांनी गच्ची देण्याचा एकूण अंदाज दिसतोय. भारतीय राजकारणातील – किंबहुना भारतीय समाजजीवनातील – हे एक आक्रितच म्हणायला पाहिजे. याचे कारण भारतातील प्राचीन म्हणजे अतिप्राचीन परंपरा. आपला पुत्र कसाही असला, तरी त्याची पाठराखण करायची, भलेही त्यात स्वतःचा नाश झाला तरी चालेल, ही ती परंपरा. सत्यम या माहिती तंत्रज्ञान कंपनीचा फुगा फुटला तेव्हा एका फ्रेंच संकेतस्थळासाठी मी लेख लिहिला होता. त्यावेळी धृतराष्ट्र सिंड्रोम (धृतराष्ट्र विकार) हा वाक्प्रयोग मी केला होता. आपला मुलगा/मुलगी चुकूच शकत नाहीत, आपली गादी त्यांनीच सांभाळावी, त्यांचे सगळे दोष इतरांनी गोड मानून घ्यावेत, हा या विकाराने ग्रस्त असलेल्यांचा आग्रह असतो. राजकीय नेते असो की उद्योगपती, कलावंत असो की खेळाडू, भारतातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात या रोगाची लक्षणे आढळतील. अपोलो टायर्सच्या रौनकसिंग आणि त्यांचा मुलगा ओमकारसिंग कन्वर यांच्यातील वाद हा एक अपवाद, पण तोही संपत्तीचा वाद होता. 
         खासकरून राजकीय क्षेत्रामध्ये या विकाराने पार उच्छाद मांडलेला दिसून येईल. 'धृतराष्ट्र विकारा'ची लागण झालेली नाही, असा एकही पक्ष दिसणार नाही. आपल्या वंशाच्या दिव्यांसाठी इतरांना राबवून घेणारे, त्यांना पणाला लावणारे आणि प्रसंगी त्यांचा राजकीय बळी घेणारे अनेक धृतराष्ट्र देशाने पाहिले आहेत. त्यात वैविध्यही भरपूर. 
       द्रामुकच्या करुणानिधींनी आधी आपल्या ज्येष्ठ पुत्राला पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा एम. जी. रामचंद्रन यांनी वेगळी चूल मांडली. तरीही तो मुलगा वारल्यानंतर करुणानिधींनी आधी आपल्या अळगिरी या मुलाला बढती दिली आणि आता स्टॅलिन यांना गादीचा वारस म्हणून नियुक्त केले आहे. तेलुगु देसमच्या एन. टी. आर. यांनी ज्येष्ठ पुत्र हरिकृष्णा, मुलगी पुरंदरेश्वरी देवी यांना राजकारणात आणले आणि तिसरा मुलगा बाळकृष्णाला चित्रपटांत आणले. ते अजून आपापल्या क्षेत्रांमध्ये आहेतच, शिवाय आता त्यांचा नातू ज्युनियर एनटीआर चित्रपटांमध्ये त्यांचा वारसा चालवत आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या एच. डी. देवेगौडा यांनी आपला मुलगा कुमारस्वामी यांच्या हाती पक्षाची सूत्रे सोपविली आहेत. केरळमध्ये ई. एम. एस. नंबुद्रीपाद यांनी आपल्या मुलाला आणलेच होते. शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुलासाठी पुतण्याला अडगळीत टाकले. त्यांचे 'जाहीर' विरोधक व जुने'जाणते राजे' शरद पवार यांनीही आपल्या मुलीसाठी पुतण्याला हातभर अंतरावरच ठेवले आहे. अकाली दलाच्या प्रकाशसिंग बादल यांच्या तर संपूर्ण कुटुंबानेच सत्तापदे बळकावून ठेवली आहेत. मात्र त्यातही मुलगा सुखबिरसिंग बादल यांना उपमुख्यमंत्री नेमून 'हातचा एक' ठेवला आहेच. काँग्रेसमध्ये तर पक्ष अकबर रोडवर (पक्ष कार्यालय) सुरू होतो आणि 10, जनपथपाशी (सोनिया व राहुल गांधींचे निवासस्थान) संपतो. बाकी मग राज्यात त्याच पाढ्याची उजळणी चालू असते. राष्ट्रीय जनता दलाच्या लालूप्रसाद यादवांबद्दल तर बोलायलाच नको. भाजपमध्ये महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनी मुलीसाठी असाच राजहट्ट करून पुतण्याला अलगद राष्ट्रवादी काँग्रेसच्या झोळीत टाकले. जाऊ द्या, कोळसा उगाळावा तेवढा काळा...
          यातील एकाही वारसदाराने आपल्या कर्तृत्वाने आसमंत उजळून टाकलेला नाही किंवा असामान्य दूरदृष्टी दाखवून लोकोपकार केलेला नाही. फक्त त्यांच्या त्यांच्या पित्याची नेमप्लेट हीच त्यांची जमेची बाजू. अखिलेश यादव सत्तेवर आले, तेव्हा तेही याच यादीतील आणखी एक भर हेच वर्णन त्यांना लागू होते. आजही त्यांनी फार काही असामान्य कामगिरी केलेली नाही. मात्र कुटुंबात पेचप्रसंग उद्भवलेला असताना त्यांच्या पिताश्रींनी आपले वजन मुलाच्या बाजूने न टाकता भावाच्या बाजूने टाकावे, हे वेगळेपण खरे. त्यातही फरक आहे. धृतराष्ट्र आपल्या पोरावर आंधळा विश्वास दाखवत असताना चुकीच्या बाजूने उभा टाकला होता. आज मुलायमसिंग मुलगा विकासाच्या गोष्टी करत असताना गुंडगिरी आणि हेकेखोरी करणाऱ्या भावाच्या बाजूने उभे आहेत. त्यामुळे पुत्रप्रेमाला बळी न पडल्याबद्दल त्यांचे धड अभिनंदनही करता येत नाही.
         आपल्या संपूर्ण कुळाचा एकमेकांशी भांडून नाश होताना जेथे कृष्णाने पाहिला, त्याच यादवांच्या भूमीतील ही घडामोड उदात्त वगैरे आहे, अशातला भाग नाही. फक्त भारतीय राजकारणाच्या काळ्याकुट्ट पडद्यावर पडलेला हा जरा वेगळ्या रंगाचा - पण डागच – होय. हेच त्याचे आगळेपण!