Friday, August 17, 2007

"द किंग' रॉक्‍स ऍज ऑलवेज!

त्याला जाऊनही आता तीस वर्षे झाली. तरीही संगीत रसिकांच्या, म्हणजे जे कुंपणांचा विचार न करता केवळ संगीताचा आस्वाद घेतात, त्यांच्‌ यासाठी एल्व्हिस प्रिस्ले या नावाची जादू अद्यापही कायम आहे. त्याचा तो जोष, बाज आणि गायकीचा ढंग अन्य कोणाला जमला नाही...अन्‌ कोणाला जमला तरी जनांना तो भावला नाही.

एल्व्हिस आरोन प्रिस्ले हे नाव पहिल्यांदा ऐकले १९९२ साली. दूरदर्शनच्या सकाळी सातच्या बातम्यांमध्ये. (त्यावेळी सकाळी उठणे आणि बातम्या ऐकणे, अशा दोन्ही चांगल्या सवयी अंगात होत्या.) प्रिस्ले याच्यावर अमेरिकेच्या टपाल खात्याने विशेष तिकिट काढले होते. त्याची ती बातमी होती. त्या बातमीसोबत दूरदर्शनच्या तेव्हाच्या आणि काही प्रमाणात आताच्याही रिवाजानुसार एल्व्हिसच्या चित्रपटाच्या आणि काही कार्यक्रमांच्या ध्वनिचित्रफितीचे तुकडेही होते. त्यावेळी ती बातमी आणि ते तुकडे दोन्हीही स्मरणात राहिले.

त्यानंतर सुमारे पाच वर्षांनी विविध आंतरराष्ट्रीय रेडियो केंद्रे ऐकत असताना एल्व्हिस ही काय जादू आहे, याची थोडीशी कल्पना आली. त्याचदरम्यान "इनाडू' या तेलुगु वर्तमानपत्रात एल्व्हिसच्या ग्रेसलॅंड या स्मारकाजवळ होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल वाचनात आले. त्यामुळे त्याच्‌ याबद्दल वाचन करून माहिती घेतली. केवळ ४२ व्या वर्षी हृदय विकाराच्या धक्‍क्‍याने गेलेला हा गायक...अमेरिकेच्या रॉक संगीताला त्याने वेगळ्या उंचीवर नेले. हे संगीत जगभर लोकप्रिय करण्याचे त्याचे एकहाती कर्तृत्व होते, असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही.
त्याच वेळेस एल्व्हिसचे "जेलहाऊस रॉक' ऐकले...अरे, हे कुठेतरी ऐकल्यासारखे वाटते....हा विचार करत असतानाच "दिल' चित्रपटातील "खंबे जैसी खडी है,' हे गाणे आठवले. अच्छा, म्हणजे ते गाणे याच्‌ यावरून उचलले होय? आणखी शोध घेतला असता "हम किसी से कम नही' या चित्रपटातील "बचना ऐ हसीनो...' या गाण्याचा स्रोतही एल्व्‌ हिसच असल्याचे लक्षात आले. त्यादृष्टीने पाहिले असता, एल्व्हिसचे हिंदी चित्रपटसृष्टीवर मोठे उपकार आहेत.एल्व्हिसने काय केले? त्याने रॉक संगीताला मूळ प्रवाहात आणले. एल्‌ व्व्हिसच्या काळात "जाझ'आणि "ब्लू' हे कृष्णवंशीयांचे संगीतप्रकार म ानले जात. कृष्णवंशीय कलावंतांची या क्षेत्रातील नावे पाहिल्यानंतर तो समजही फारसा अनाठायी वाटत नाही. मात्र गोऱ्यांचे संगीत हे केवळ पाश्‍चात्य शास्त्रीय संगीतापुरते मर्यादित झाले होते. नाही म्हणायला, "कंट्री' प्रकारात त्यांचे वर्चस्व होते. मात्र अमेरिका आणि काही प्रमाणात पाश्‍चात्य जग वगळता इतरत्र "कंट्री'ला लोकप्रियता नव्हती अन्‌ आजही नाही. 'एमपी3' आणि "आयपॉड'ने आज संगीतविश्‍व लोकांच्या खिशापर्यंत आणले आहे. तरीही नॅशविलेचे नाव विचारल्यास किती जणांना माहित असेल? दरवर्षी तिथे जमणारा "कंट्री' कलावंतांचा मेळावा हा संगीतभोक्‍त्यांच्या दृष्टीने एक अवर्णनीय आनंदाचाच सोहळा.

तर सांगायचे म्हणजे एल्व्हिसमुळे रॉक संगीत जगाच्या व्यासपीठावर आले. त्यातून त्याच्या काळच्या "करंट' विषयांना हात घालून त्याने आणखी एक पाऊल टाकले. एल्व्हिसचा जोश जेवढा डोळ्यात भरणार, तेवढेच त्याचे "क्रूनिंग' कानाचे पारणे फेडणारा! महायुद्धोतर काळ, साठच्या दशकातील अमेरिकेतील भरकटलेली पिढी आणि त्यानंतर सत्त्‌ ारच्या दशकातील अस्वस्थ तरुणाई...या सर्वांना खरा आवाज दिला ए ल्व्हिसने. त्यानंतर सुमारे दशकभराने मायकल जॅक्‍सनने "बीट इट'चा मंत्र देऊन तरुणांना जागे केले...नाचते केले. मात्र त्यांना भानावर आणण्याचे काम एल्व्हिसचेच. त्याच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे, ""काही लोक पायांचा ताल धरतात. काही बोटे नाचवितात. काही जण मागे पुढे झुलतात. मी त्यांना एकाच वेळी सगळे करायला लावतो.''एल्व्हिसला त्याचे चाहते "किंग' म्हणतात. एखाद्या राजासारखीच त्याची ऐट होती. एल्व्हिसच्या केसांची स्टाईल, झकपक कपड्यांची स्टाईल न ंतर अनेकांनी उचलली. पण "किंग'चा शाही बाज काही वेगळाच. त्याचे चाहते आजही त्याच्यासारखा वेश करून ग्रेसलॅंडला जमतात. यंदाही त्याच्या स्मारकाला जमलेली गर्दी पाहिली अन्‌ मनात विचार आला...
द किंग रॉक्‍स...ऍज ऑल्वेज

Thursday, August 16, 2007

कथा अमेरिकेच्या वर्तमानपत्रांची

"वॉल स्ट्रीट जर्नल' हे वर्तमानपत्र घेण्याचा प्रयत्न करून रुपर्ट मर्डोक यांनी एक नवा इतिहास लिहिला आहे. अमेरिकेच्या इतिहासात एखाद्या परकीय पत्रकार अथवा माध्यमसम्राटाचा यानिमित्ताने प्रथमच प्रवेश झाला आहे. (किमान एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरी!) या निमित्ताने अमेरिकेच्या पत्रकारितेचा इतिहास चाळण्याची सहज इच्छा झाली.

अमेरिकेचे पहिले वर्तमानपत्र केवळ एका अंकापुरते निघाले होते, ही माहिती वाचून मला पहिल्यांदा धक्का बसला. "पब्लिक ऑक्‍युरेन्सेस बॉथ फॉरेन अँड डोमेस्टिक' हे अमेरिकेचे अनेक पाने असलेले, मुद्रित असे पहिले वृत्तपत्र. बेंजामिन हॅरिस याने हे चार पानांचे वृत्तपत्र काढले होते. त्याचा पहिला अंक काढताच सरकारने प्रकाशकाला अटक केली आणि अंकाच्या प्रती जाळण्यात आल्या. पत्रकारितेच्या मुक्त स्वातंत्र्याची ही सुरवात! वर्ष होते १६९०. त्यानंतरची मोठी घटना म्हणजे बेंजामिन फ्रॅंकलिन या मोठ्या नेत्याची पत्रकारितेची कारकीर्द. बेंजामिनचा भाऊ जेम्स फ्रॅंकलिन याने "न्यू इंग्लंड करंट' नावाचे एक वर्तमानपत्र काढले होते. त्यात ‘सायलेंस डूगुड’ या नावाने बेंजामिन याने काही लेख लिहिले. विशेष म्हणजे खुद्द जेम्स यालाही ही माहिती नव्हती! १७२८ मध्ये बेंजा मिन फिलाडेल्फियाला गेला व त्याने तेथे "पेनसिल्व्हानिया गॅझेट'ची जबाबदारी सांभाळली.

खऱ्या अर्थाने आजच्या वर्तमानपत्राचे पूर्वसुरी म्हणता येईल, असे वृत्तपत्र १८३५ मध्ये "न्यू यॉर्क हेरॉल्ड'च्या रूपाने आकाराला आले. जेम्स गॉर्डन बेनेट याने हे वृत्तपत्र काढले होते. वार्ताहरांना नियमित बिट देणारे आणि प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती घेणारे पहिले वर्तमानपत्र म्हणून याची नोंद आहे. देशात आणि परदेशात (युरोपमध्ये) प्रतिनिधी नेमून अमेरिकी वृत्तपत्रांच्या क्षेत्रात त्याने आगळे पाऊल टाकले. त्याचा प्रतिस्पर्धी "न्यू यॉर्क ट्रिब्यून' (स्थापना १८४१) यानेही इतरत्र आपल्या आवृत्या पाठविण्यास सुरवात केली. छपाईचा वेग वाढविणारे लिनोटाईप यंत्र वापरणारे हे पहिले वर्तमानपत्र. आज जगात माध्यम क्षेत्रांमध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे ‘न्यू यॉर्क टाईम्स’ हे वृत्तपत्र १८५१ साली स्थापन झाले. जॉर्ज जोन्स आणि हेन्‍री रेमंड यांनी या वर्तमानपत्राची स्थापना केली. गुलाम गिरीच्या मुद्यावरून झालेल्या अमेरिकेच्या यादवी युद्धामुळे वर्तमानपत्रांना खरी ऊर्जा मिळाली. या काळात अमेरिकी वर्तमानपत्रांनी मोठी प्रगती केली. यावेळी अधिकांत अधिक बातम्या देण्याची वर्तमानपत्रांची गरज भागविण्यासाठी न्यू यॉर्कच्या सहा मोठ्या वर्तमानपत्रांनी एकत्र येऊन बातम्या पुरविणाऱ्या संस्थेची स्थापना केली. हीच ती आजची "असोसिएटेड प्रेस.'

डेव्हिड लिव्हिंग्स्टन हा धर्मप्रसारक आफ्रिकेत गेला होता. काही दिवसांनी त्याचा ठावठिकाणा कोणालाच कळेना झाला. त्याची बातमी देतानाच बेनेट याने हेन्‍री स्टॅनली याला डेव्हिडला शोधण्यासाठी पाठविले. हेन्‍रीने त्याला शोधूनही काढले. शोधपत्रकारितेची ही सुरवात मानण्यात येते.

अमेरिकेच्या वर्तमानपत्रसृष्टीत सर्वकाही चांगलेच होते, अशातला भाग नाही. "सिटीझन केन' हा चित्रपट माहितेय? अमेरिकेतील तत्कालिन वृत्तपत्रसृष्टीतील एक भारदस्त व्यक्तिमत्व विलियम रॅंडॉल्फ हर्स्ट याच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. हर्स्ट हा अगदी वादग्रस्त आणि नफेखोर व्यक्तिमत्वाचा माणूस होता. स्वतःचे वर्तमानपत्रे खपविण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्याची तयारी होती. "सिटीझन केन' हा चित्रपट त्याच्या जीवनावर आधारित असल्याची चर्चा चित्रपट निर्मिती अवस्थेत असतानाच सुरू होती. त्यामुळे हर्स्ट महाशय अस्वस्थ झाले असल्यास नवल नाही. त्याने या चित्रपटाच्या निर्मात्यांशी संपर्क साधला आणि चित्रपटाची सर्व रिळांची (मास्टर रिलसह) विल्हेवाट लावण्यासाठी मोठी रक्कम देऊ केली. मात्र निर्मात्यांनी त्याच्या या "ऑफरला' नकार दिला. मग साम आणि दामच्या मार्गाचे प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर दंडाच्या मार्गाचा त्याने वलंब केला. आपल्या वर्तमानपत्रातील गॉसिप लिहिणारी पत्रकार लुएला पार्सन्स हिला त्याने याकामी लावले. लुएला पार्सन्स स्‌ टुडिओच्या अधिकारी आणि वितरकांना फोन करायची आणि त्यांच्या खासगी गोष्टी पेपरमध्ये छापण्याची धमकी देत असे.

हर्स्टच्या व्यावसायिक नीतिमत्तेवर १८९८ सालातील एक तार मोठा प्रकाश टाकते. स्वतःचे वर्तमानपत्र खपावे यासाठी हर्स्ट याला अमे रिका आणि स्पेनमध्ये क्‍युबाच्या मुद्द्यावरून युद्ध व्हावे, असे वाटत होते. "न्यू यॉर्क जर्नल' या त्याच्या मुख्य वर्तमानपत्रात यासंबंधी अतिरंजीत आणि भडक भाषेतील मजकूर प्रकाशित होई. स्पेनने केलेल्या अत्याचारांच्या कहाण्या छापण्यासाठी त्याने आपल्या वार्ताहरांना ठिकठिकाणी पाठविले होते. हे वार्ताहर खऱ्या खोट्या बातम्याही पाठवत असत. जे प्रामाणिक होते ते अशा बातम्या पाठवत नसत. त्यामुळे त्यांना वैयक्तिकरीत्या नुकसानही झाले. अशाचपैकी एक जण होता फ्रेडरिक रेमिंग्टन. क्‍यूबात गेल्यानंतर त्याने हर्स्टला खऱ्या परिस्थितीची कल्पना देणारी तार पाठविली.

" इथे युद्ध होणार नाही. मी परत येतो.'

हर्स्टने त्याला उलट तार केली, "तू तिथेच थांब. तू छायाचित्रे पाठव. मी युद्ध सुरू करतो.'

अन्‌ खरोखर हर्स्टने आपल्या बातम्यांच्या जोरावर युद्ध सुरू केलेही. मात्र वृत्तपत्र मालकांचे हे नमुने केवळ हर्स्टपुरतेच मर्यादीत नव्हते. "शिकागो ट्रिब्यून'चा मालक कर्नल रॉबर्ट मॅककॉर्मिक याने आपला फ्रान्समधील वार्ताहर विलियम शिरेर याला हुकूम दिला. काय दिला? तर नऊ वर्षांपूर्वी फ्रान्समधील एका शेतात मॅककॉर्मिकची हरवलेली दुर्बिण शिरेर याने शोधून काढावी. याच माळेतील आणखी एक मणी म्हणजे "इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्यून'चा मालक जेम्स गॉर्डन बेनेट ज्युनियर. त्याने हट्टाने सतत २४ वर्षे आपल्या वर्तमानपत्रात हवामानाची एकच माहिती छापली. एकदा त्याने वर्तमानपत्राच्या कार्यालयात प्रवेश केल्यानंतर खोलीच्या उजव्या बाजूला उभे असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले.
(संदर्भ ः द युनिवर्सल जर्नलिस्ट ले. डेव्हिड रॅंडाल, प्रकाशन वर्ष २०००)

हर्स्ट याचा व्यावसायिक प्रतिस्पर्धी होता जोसेफ पुलित्झर. या दोघा ंच्या स्पर्धेतून जी सवंग पत्रकारिता निर्माण झाली, तिच्यामुळे "यलो जर्नलीझम' (पीत पत्रकारिता) ही संज्ञा जन्माला आली.

पुलित्झरची चित्तरकथा

जोसेफ पुलित्झर हा मूळचा हंगेरियन. १८६४ मध्ये तो अमेरिकेत आला. १८७२ मध्ये त्याने पहिल्यांदा "वेस्टलिशे पोस्ट' हे वृत्तपत्र आणि त्यानंतर १८७९ मध्ये "सेंट लुईस डिस्पॅच' हे वृत्तपत्र विकत घेतले. या दोन्ही वर्तमानपत्रांचे विलीनीकरण करून त्याने " सेंट लुईस डिस्पॅच-पोस्ट' नावाचे वर्तमानपत्र काढले. १८८२ मध्ये त्याने "न्यू यॉर्क वर्ल्ड' नावाचे वर्तमानपत्र विकत घेतले. नुकसानीत जाणारे हे वर्तमानपत्र पुलित्झरच्या स्पर्शाने पुन्हा जोमाने व्यवसाय करू लागले. १८९५ मध्ये हर्स्ट याने न्यू यॉर्क सन नावाचे वर्तमानपत्र विकत घेतले. त्यानंतर अमेरिका-स्पेन युद्धाच्या वार्तांकनादरम्यान भडक बातम्या देण्याची या दोघांमध्ये स्पर्धा लागली. त्याचा एक मासला वर आलाच आहे. १९११ मध्ये मृत्यूनंतर पत्रकारांना पुरस्कार देण्यासाठी पुलित्झर याने मृत्यूपत्रात तरतूद केली होती. १९१७ मध्ये पहिल्यांदा या पुरस्कारांचे वितरण झाले. आज या पुरस्कारांना मोठी प्रतिष्ठा आहे.

--------------
कार्यशैलीतील फरक
"न्यू यॉर्क टाईम्स' हे आज जगभरातील नावाजलेले दैनिक आहे. वॉशिंग्टनधील सत्ताधाऱ्यांना धक्के देण्याचे काम हे वर्तमानपत्र अनेकदा करते. त्यादृष्टीने "वॉशिंग्टन पोस्ट'च्या बरोबरीने त्याचे नाव घेतले जाते. या वर्तमानपत्राच्या यशामागे त्याची कार्यशैली कारणीभूत आहे. यात वर्तमानपत्राशी संबंधित रूथ ऍडलर यांनी लिहिलेल्या "अ डे इन दि लाईफ ऑफ दि न्यू यॉर्क टाईम्स' (प्रकाशन वर्ष १९८१) या पुस्तकातून या कार्यशैलीची झलक मिळते.

सकाळी तीन वाजता "न्यू यॉर्क टाईम्स'ची शेवटची शहर आवृत्ती प्रकाशनाला जात असताना या पुस्तकाला सुरवात होते. वर्तमानपत्राचे सहायक वृत्त संपादक टॉम डॅफ्रन आपल्या सहकाऱ्यांना "गुड नाईट'चा निरोप पाठवितात. यावेळी वर्तमानपत्राच्या न्यू यॉर्क येथील कार्यालयात काम थांबत असते. त्याच वेळेस जगभरातील "टाईम्स'चे वार्ताहर त्यांच्या त्यांच्या जागी कशा पद्धतीने बातम्या मिळविण्यासाठी झगडत आहेत, याचे वर्णन येते. त्यांत व्हिएतनाममध्ये युद्धभूमीवर गेलेल्या पत्रकारांप्रमाणेच पाकिस्तानातील सत्तासंघर्षाची इत्थंभूत बातम्या काढण्यासाठी झुल्फिकार अली भूत्तोंना त्यांच्या शाही प्रासादात भेटणाऱ्या वार्ताहराचाही समावेश आहे.

त्यातीलच एक वार्ताहर आहे जिम फेलोन. जेरुसलेममध्ये तो वार्तांकन करत आहे. शालेय जीवनात एक साधारण मुलगा असलेला जिम "टाईम्स'मध्ये "कॉपी बॉय' म्हणून लागतो. उपसंपादकांनी दिलेल्या बातम्या "कंपोझिंग'साठी द्यायचे, हे त्याचे काम. मात्र या कामाऐवजी पत्रकारिता त्याला अधिक आवडते. त्यासाठी तो पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण करतो. वर्गात पहिला येतो. विशेष म्हणजे त्याच्या या यशाची दखल वरिष्ठ घेतात आणि त्याला वार्ताहर म्हणून दाखल करून घेतात. बढत्या मिळत मिळत तो इस्राएलमध्ये जातो. वार्तारांना परदेशात पाठविल्यानंतर काही काळाने ते तेथील वातावरणाशी एकरूप होतात. त्याचा त्यांच्या कामावरही परिणाम होतो. त्यामुळे अशा वार्ताहरांना ठराविक काळाने दुसरीकडे, देशात अथवा परदेशात पाठविण्याचे "टाईम्स'चे धोरण आहे.अशा अनेक बाबी हे पुस्तक वाचल्यानंतर समोर येतात. त्यात काळानुसार काही बदल झाले असले, तरी भारतीय आणि अमेरिकी वर्तमानपत्रांच्या कार्यशैलीतील फरक यामुळे ठळकपणे समोर येते.

Monday, August 13, 2007

मासेल्लाह!

२८ फेब्रुवारी २००७ चा दिवस! देशाचा अर्थसंकल्प मांडण्यास आणखी चोवीस तास उरले होते. मी मात्र माझा वेगळाच संकल्प पूर्ण करण्याच्या मागे होतो. आठवड्यातून एकदाच येणाऱ्या मंगल दिनाचा, म्हणजेच साप्ताहिक सुट्टीचा आस्वाद घेत होतो. साधारणतः माणूस, तोही एकटा माणूस सुट्टीच्या दिवशी एकच काम करत असतो-ते म्हणजे आळसाचा आस्वाद घेणे. मनुष्याला जगण्यासाठी करावी लागणारी कामे एका दिवसासाठी का होईना मागे टाकण्यासारखे दुसरे सुख नाही. मीही या सुखाला पारखा होऊ इच्छित नाही. त्यामुळेच अंथरुणावर पडून राहून टीव्ही पाहण्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही काम करणे हे ’अमंगळ’ कृत्य असल्याची माझी ठाम धारणा आहे.

नाही म्हणायला मंगळवारच्या माझ्या या ’शबाथ’ला एकच काम मी नेमाने करतो. ते म्हणजे जीवसृष्टीच्या आद्य प्रणेत्यांना आपल्या पोटात जागा करून देतो. पुण्यनगरीतील अनेक हॉटेल मला या पुण्याच्या कामात हातभार लावायला उभी आहेत. मात्र माशांवरचे माझे प्रेम आणि या हॉटेल्सची दानत यांचे प्रमाण जुळत नसल्याने अनेकदा माझी हालत ’बील भरा, लेकिन पेट नही भरा,’ अशी होते. माशांच्या नादापायी कित्येकदा पैसे पाण्यात (आणि रश्श्यातही) घातल्यानंतर मी हात आवरता घ्यायला शिकलो. परंतु जीभ आवरणे अद्यापही मला जमलेले नाही. याच मत्स्यप्रेमातून मी घरात अग्निदिव्य करायच्या टोकापर्यंत आलो.

घरात गॅस स्टोव्ह आणि अन्य सामान असल्याने स्वतःला पाकसिद्धी आल्याची मनोमन खात्री तर होतीच. दुकानात गेल्यावर दिसणारी ’परंपरा’ची फिश करीची पाकिटे खुणावू लागली होती. हक्का नूडल्स करण्याचा मोठा सराव असल्याने तर रेडिमेड रेसिपिज हे माझे हक्काचे तंत्र झालेले. असे सर्व दुवे जुळून आल्यानंतर मी पाय मागे घेण्यात अर्थ नव्हता. ग्राहक पेठेतून आणलेले पाकिट रोज मला खुणावत होते. अन तो मंगळवार उजाडला. मी माझा अनेक दिवसांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरसावलो. सकाळपासून दोन चित्रपट पाहून झाले होते. सायंकाळ हळू हळू दाटून आली. रात्रीच्या बेताची पूर्वतयारी म्हणून दहा-बारा पोळ्या करून ठेवल्या. आता फक्त समोरच्या दुकानातून मासे आणायचे आणि पाकिटावरील सूचनांनुसार ’करी’ तयार करायची, एवढेच काम बाकी होते. ’मासेमैदान’ जवळच होते.

मग काय! माशांच्या दुकानात गेलो आणि आयुष्यात पहिल्यांदाच मासेखरेदी केली. सुरमई खाणार त्याला आणखी खावे वाटणार, हे मनात पक्कं असल्याने परवडत नसतानाही सुरमईची खरेदी केली. ७४ रुपयांमध्ये केवळ ३०० ग्रॅम सुरमई मिळणार, हे ऎकून मन थोडेसे खट्टूच झाले. तरीही मिळतील ते तीन तुकडे घेऊन घरी आलो. मासे धुण्यात काही वेळ गेला. तेवढ्या वेळात थोडासा टीव्ही पाहून झाला. त्यानंतर गॅसवर पातेले ठेवून त्यात पाकिट मोकळे केले. पातेल्यातील पाण्याला उकळी यायला वेळ लागला नाही, अन माझ्याही मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. भांडयात दिसणारे माशांचे तीन तुकडे गॅसवरील पातेल्यात टाकले आणि ते तुकडे हलविण्यासाठी चमचा शोधू लागलो...चमचा हातात घेऊन वळलो आणि माझ्या तोंडचे पाणी पळाले. मी टाकलेला एक तुकडा दुप्पट आकाराचा होऊन पाण्यावर तरंगत होता. त्याच्या खाली असलेला तुकडा अगदी होडीसारखा झाला होता. तिसरा तुकडा फुगला नव्हता, मात्र तो फुगला असता तर बरे झाले असते अशी परिस्थिती होती. त्या तुकड्याच्या दोन बाजूंनी दोन उंचवटे स्प्रिंगसारखे वर आले होते.

करायला गेलो एक आणि झाले भलतेच अशी माझी अवस्था झाली. हे तुकडे शिजले तरी ते खावेत की नाहीत, याचा संभ्रम निर्माण झाला. खावे तर हे असे बिभत्स तुकडे खावे लागणार आणि न खावे तर ७४ रुपये आणि तीन तास वाया जाणार...पुन्हा खाण्यासाठी बाहेर कुठेतरी जावे लागनार. स्पिल्बर्गचा ’जॉज’ नेमका आठवला आणि असे थरकाप उडविणारे मासे खाण्यापेक्षा त्यांचा घास होणे अधिक सोपे असे, असा विचार मनाला चाटून गेला.

शेवटी जीव मुठीत धरून ते तुकडे पानात घेतले आणि खायला सुरवात केली. चव चांगली लागत असली, तरी हा पदार्थ खाताना माझी अवस्था ’अप्यन्नपुष्टा प्रतिकूलशब्दौ’ अशी होती. पूर्ण जेवण होईपर्यंत मात्र मी ताटाकडे लक्ष दिले नाही. न जाणो मध्येच तो मासा जीवंत होऊन माझा घास घ्यायचा, अशी भीती वाटतच होती. एखादी गोष्ट खूप चांगली झाली, की ’माशाल्लाह’ म्हणतात, हे माहित होते. मात्र आपली सपशेल फजिती झाली, की त्याला काय म्हणायचं यासाठी मला एक नवा शब्द सापडला...’मासेल्लाह!’