Sunday, July 8, 2007

वाह ताज!

ताज महल हे जगाचे अद्‌भूत आश्‍चर्य असल्याचे आज आम्हाला समजले. ही बातमी अशा धक्कादायक रितीने आमच्यासमोर आली, की ताज महल भारताचे एक मोठे आकर्षण आहे, हे इतके दिवस माहित असल्याबद्दल आमची आम्हालाच लाज वाटायला लागली. त्यात वोटिंगचा मामला असल्याने तर आमची फारच गोची झाली. काय आहे माहितंय का, आम्हाला स्वतःला कधीही मत नसतं. मनुने जे स्त्रियांच्या बाबतीत सांगितलंय, त्यात आम्ही किंचित फेरफार करून तेच सूत्र घेऊन जगतोय.

काय सांगितलं मनुनं?
स्त्रीने लहानपणी वडिलांची, तरुणपणी पतीची आणि मोठेपणी मुलाच्या आज्ञेत रहावे.

आम्ही काय करतो?

लहानपणी कॉप्या पुरविणाऱ्या शिक्षकांचे, मोठेपणी परमदयाळू साहेबांचे आणि म्हातारपणी...अद्याप ती वेळ आलेली नाही, मात्र आम्हाला माहितेय जगाला काहीतरी शिकविणारी कोणाचीतरी भाषणे ऐकण्यातच आमचे जीवन खर्च व्हायचे! तर, अशा या परिस्थितीत ताजला सात आश्‍चर्यांमध्ये समाविष्ट करण्यासाठी वोटिंगची वेळ आली, अन्‌ आमच्यासमोर धर्मसंकटच उभे राहिले. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी आम्हाला एका ऐतिहासिक वास्तूसाठी साद घालत होते. नाही म्हणायला शाळेत इतिहासाचा वर्ग चालू असताना बाहेरच्या मित्रांनी घातलेली साद ऐकून अनेकदा शिक्षकांनी आमचे कान पिरगाळले. (बळी तो कान पिळी! ही म्हण आम्ही तेव्हाच शिकलो.) ताज जहांगीरने बांधला, की शहाजहांने हेही, देवाशप्पथ सांगतो, आम्हाला माहित नव्हते. घरातली मोरी तुटली ती बांधण्यासाठी सहा महिने झाले बायको शिव्या घालते, आम्ही मरायला कशाला शाहजहांच्या इमारतीची चांभार चौकशी करायला जातो.
मात्र गेल्या आठवड्यात आक्रितच घडले आणि ताजची सगळी जातकुळी आम्हाला टीव्हीवाल्यांनी कळविली. इतके दिवस आम्हाला आपलं माहित होतं, की पिक्‍चरमध्ये गाण्यांमध्ये हिरो-हिरोईनला नाचण्यासाठी ही जागा चांगली असते. तेव्हा आम्हाला ताजची एव्हढी "हिस्टरी' कळाल्यानंतर वोटिंगचा प्रश्‍न आला. आम्हीही बेलाशक वोटिंग केलं. भारताच्या पर्यटनमंत्र्यांचाच आदेश होता. (आम्ही मात्र त्यांच्या नव्हे; तर आमच्या गृहमंत्र्यांच्या आदेशावरून वोटिंग केलं. कायंय, दिवसभर घरात बसून "न्यूज चॅनेल्स' त्याच पाहत असतात! त्यामुळे त्यांचं जनरल नॉलेज आमच्यापेक्षा चांगलं आहे, असं आमच्या आळीतील प्रतिष्ठित नागरिकांपासून पेठांमधील दुकानदारांपर्यंत सर्वांचे एकमत आहे.) तर, मोबाईल आणि इंटरनेट मार्फत वोटिंग केल्यानंतर ताज हाच जगातील एकमेव आश्‍चर्य असल्याचं आमचं ठाम मत बनलं. त्यामागची कारणं शोधू जाता आमच्या मेंदूला आलेल्या झिणझिण्यांमधून काढलेले काही निष्कर्ष असेः

n शाहजहांच्या काळात सहा सहा हजारांच्या साड्या घातलेल्या बायांचे "सांगोपांग' दर्शन घडविणारे टीव्ही, वेशीवर चाललेल्या गंमती सोडून वॉशिंग्टनमध्ये चाललेल्या भानगडी छापणारी वर्तमानपत्रे अशी प्रबोधनात्मक माध्यमे, हवा तो "कॉल' येण्याऐवजी "अमिताभ के छिंकने का डायलर टोन बिठाना है?' असे नम्रपणे विचारणाऱ्या मोबाईल कंपन्या असं काहीही नव्हतं. थोडक्‍यात सांगायचं तर शाहजहां हा "पगारी बेरोजगार' होता. त्यामुळे वेळ घालविण्यासाठी त्याने हे एवढे मोठे बांधकाम केले असण्याची शक्‍यता जास्त आहे.

n बायको मेली म्हणून तिच्या स्मृत्यर्थ शाहजहांने ही इमारत बांधली, हे अर्धसत्य आहे. अहो, मला सांगा, तरुण वयात..अन्‌ तेही एखाद्या राजाच्या...बायकोची कटकट त्याच्यामागून जाते ही त्या राजाला केवढी आनंदाची गोष्ट. या आनंदामुळेच त्याने हर्षवायू होऊन इमारत बांधायला घेतली असेल. तेव्हाच्या इंजिनियर, कंत्राटदार आणि मजुरांनीही "बरीय आपली रोजगार हमी योजना,' म्हणून त्यात आनंदाने भाग घेतला असावा.

n उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या जन्मी शाहजहांला मोठे कर्ज दिले असावे. त्याची परतफेड करण्यासाठी व या जन्मी अधिकाऱ्यांचे दुकान चालविण्यासाठी शाहजहांला "कबर' कसावी लागली असेल.

n बांधकाम व्यावसायिकांचे यमुनेवर अतिक्रमण होऊ नये, म्हणूनही त्याने ही अफलातून इमारत बांधली असण्याची शक्‍यता आहे. प्लॅन मंजूर करून घेणे, मोजमाप करणे, वीट-सिमेंटच्या खर्चाची फिकीर न करता बांधकाम करायचेच असेल, तर आतापर्यंतही आम्हीही दोन घरे बांधली असती.

n ऍक्‍चुअली शाहजहांला साखर कारखाना काढायचा होता. त्यासाठी मुमताज महलच्या नावावर एक सहकारी संस्थाही त्याने स्थापन केली होती. मात्र अवधच्या नबाबाचाही एक साखर कारखाना असल्यामुळे आणि त्याच्याच साखरेला उठाव नसल्यामुळे (याबाबतच्या हकीगती त्याने महाराष्ट्रातील आपल्या वकिलांमार्फत इकडच्या स्वारींकडे पाठविल्या होत्या. त्यातील कागदं अजूनही भारत इतिहास संशोधन मंडळाच्या शेजारच्या मिसळीच्या दुकानात क्वचित मिळतात. ज्यादिवशी मिसळ कमी तिखट लागेल, त्यादिवशी नेमकं समजावं, की हा कागद "त्या' साखरेच्या बखरीतला आहे. असो.) शाहजहांला कारखाना काही थाटता आला नाही. मात्र त्यादरम्यान मुमताजचेच निधन झाले. त्यामुळे नबाबाला आणखी अपशकून करण्यासाठी त्याने तिथे मुमताजची कबरच स्थापन केली.ताजची खरी स्टोरी काही आम्हाला माहित नाही. ती माहित करून घेण्याची इच्छाही नाही. काही लोक तर म्हणतात, की ताजच्या नावावर धंदा करण्यासाठीच ही मोहीम काही जणांनी काढली आहे. पहा रेमो काय म्हणतो.
आम्ही वर सांगितल्याप्रमाणे आम्हाला स्वतःला काही मतच नाही. त्यामुळे खरं काय ते आपण कसं सांगणार? मात्र अंतराळातील सगळ्या ग्रह-गोल आणि आकाशगंगांपेक्षाही दाटीवाटीने वसलेल्या आमच्या देशात, घरातून बाहेर पडून दुकानापर्यंत पोचेपर्यंत वस्तुंच्या किमती वाढणाऱ्या आमच्या देशात, दरसाल दरशेकडाच्या हिशोबाने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या या देशात, काहींना उंची पगार आणि सोयी; तर काहींना न मागता सगळं मिळतानाही "संयम पाळा' म्हणून तरुणांना शिकविणाऱ्यांच्या या देशात, क्षणाक्षणाला माती, पाणी आणि वायुचे प्रदूषण करून येणाऱ्या पिढीला जगणे अशक्‍य करणाऱ्यांच्या या देशात...अजूनही जीवनावर प्रेम करत जगणाऱ्या सामान्य माणसांचा समावेश जगाच्या आश्‍चर्यामध्ये कधी होणार?
----------

ताज महल

ताज तेरे लिये इक मज़हर-ए-उल्फ़त ही सही तुम को इस वादी-ए-रंगीं से अक़ीदत ही सही
मेरे महबूब कहीं और मिला कर मुझ से!

बज़्म-ए-शाही में ग़रीबों का गुज़र क्या मानी सब्त जिस राह पे हों सतवत-ए-शाही के निशाँ उस पे उल्फ़त भरी रूहों का सफ़र क्या मानी

मेरी महबूब पस-ए-पर्दा-ए-तशीर-ए-वफ़ा तू ने सतवत के निशानों को तो देखा होता मुर्दा शाहों के मक़ाबिर से बहलेवाली अपने तारीक मकानों को तो देखा होता

अनगिनत लोगों ने दुनिया में मुहब्बत की है कौन कहता है कि सादिक़ न थे जज़्बे उन के लेकिन उन के लिये तषीर का सामान नहीं क्यूँ के वो लोग भी अपनी ही तरह मुफ़लिस थे v
ये इमारात-ओ-मक़ाबिर ये फ़सीलें, ये हिसार मुतल-क़ुल्हुक्म शहनशाहों की अज़मत के सुतूँ दामन-ए-दहर पे उस रंग की गुलकारी है जिस में शामिल है तेरे और मेरे अजदाद का ख़ूँ

मेरी महबूब! उन्हें भी तो मुहब्बत होगी जिनकी सन्नाई ने बख़्शी है इसे शक्ल-ए-जमील उन के प्यारों के मक़ाबिर रहे बेनाम-ओ-नमूद आज तक उन पे जलाई न किसी ने क़ंदील

ये चमनज़ार ये जमुना का किनारा ये महल ये मुनक़्क़श दर-ओ-दीवार, ये महराब ये ताक़ इक शहनशाह ने दौलत का सहारा ले कर हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक
मेरे महबूब कहीं और मिला कर मुझसे!




मरहूम शायर साहिर लुधियानवी यांची ही नज़्म. उम्मीद है सबको समझ आयेगी!