Friday, November 6, 2009

कस्त्वं कोऽहं कुत आयातः

मी कोण हा मानवाला पडलेला पहिला प्रश्न आणि त्याचे उत्तर आजतागायत तो शोधतोच आहे. मी कोण हा प्रश्न जसा माणसाला पडतो, तसाच माझा कोण किंवा आपला कोण हाही प्रश्न त्याला फार चटकन पडतो. जे माणसाचे तेच देशाचे. तेच राज्याचे. त्यामुळेच महाराष्ट्रात मराठी माणसाच्या नावाने आंदोलने सुरू झाली, की मराठी कोण आणि उपरा कोण असा वाद सुरू होतो. भारतातही राष्ट्रियतेचा वाद असाच माजलेला आहे. त्यातही काही समूह, काही देश स्वतःची वेगळी अशी ओळख जपतात. मात्र आपण कोण याचा धुंडाळा एक राष्ट्र म्हणून घेणारे देश विरळेच. सध्यातरी हा देश आहे फ्रांस. गेल्याच आठवड्यात मी फ्रांसमधील राजकीय घडामोडींवर लिहून, त्याचा आपल्या देशाशी संबंध जोडला होता. त्यातच याही आठवड्यात तशीच एक घटना घडली, जी आपल्या दृष्टीने रिलिवंट किंवा संबंधित आहे म्हणा.

फ्रांसचे गृह मंत्री एरिक बेसाँ यांनी फ्रासंच्या राष्ट्रीयतेवर, फ्रेंच म्हणून असलेल्या ओळखीबाबत चर्चा सुरू केली आहे. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत देशातील आणि फ्रांसबाहेर असलेल्या फ्रेंच वसाहतीतील नागरिकांना या चर्चेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र संकेतस्थळही सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मूळ फ्रेंच नागरिक आणि परकीय नागरिक यांच्यात तणावाचे अनेक प्रसंग आले. 2005 साली तर या तणावाने दंगलींचे स्वरूप घेतले. शिवाय धार्मिक चिन्हांवर बंदी घालण्याचा विषय तर फ्रांसमध्ये अनेक वर्षे वादाचा विषय आहे. बेसाँ यांनीच गेल्या आठवड्यात बुरख्यावर बंदी घालण्याचे सूतोवाच केले होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लोकशाहीच्या तत्वांची देणगी फ्रांसने जगाला दिली आहे. मात्र तेवढे पुरेसे नाही. आताच्या काळाला सुसंगत अशी ओळख आपण निर्माण केली पाहिजे. त्यामुळेच नागरिकांनी या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन बेसाँ यांनी केले आहे.

हे झाले फ्रांसचे. आपण मारे विविधतेत एकता, गंगा जमना संस्कृती वगैरेंच्या गप्पा करतो. मात्र भारतीय म्हणजे काय याचा आपण कधी विचार केलेलाच नाही. भारतीय सोडून द्या, अगदी महाराष्ट्रीय म्हणजे कोण, याचीही आपण चर्चा केलेली नाही. कोणीतरी येतं आणि मराठी माणसावर अन्याय होतो म्हणतं. पण मराठी माणूस म्हणजे नक्की कोणता, हे कोणीच सांगत नाही. मागे एकदा मॅक्स मुल्लर भवनने जर्मन भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेतली होती. त्यावेळी कॅनडात राहणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याने छान निंबध लिहिला होता. कॅनडात असताना मी भारतीय असतो, भारतात आल्यावर अनिवासी भारतीय असतो, काहीजण मला दक्षिण भारतीयच म्हणून ओळखतात, माझ्या राज्यात गेल्यावर मी चेन्नईवाला असतो, चेन्नईला गेल्यावर मी हिंदू असतो, हिंदूंमध्ये मी ब्राह्मण असतो आणि ब्राह्मणांमध्येही मी अमुक शाखेचा असतो…इत्यादी.

खऱोखरच आपल्यालाही ही समस्या जाणवत असते. मी कोण म्हणून कसं सांगायचं. आता माझ्याबद्दलच सांगायचे तर पुण्यात मी मराठवाड्यातला त्यातही नांदेडचा असतो. नांदेडला गेल्यावर इतक्या वर्षांच्या पुण्यातील वास्तव्यामुळे सगळे मला पुणेकरच म्हणतात. पुण्यात आल्यानंतर अनेक दिवस विचित्र उच्चारांमुळे माझ्याशी कोणी मराठी बोलायचेच नाही. दक्षिण भारतीय गाण्यांच्या आवडीमुळे मला अनेक लोकं दाक्षिण्यात्यच समजायचे. दाक्षिणात्य लोकांच्या दृष्टीने मी नेहमीच मराठी माणूस होतो. आज का आनंदमध्ये असताना तर सगळे हिंदी भाषक मला माझ्या मराठीपणाची जाणीव करून देत असत. तो त्यांच्या व्यावसायिक अस्तित्वासाठीच्या संघर्षाचा भाग होता, ही गोष्ट वेगळी.

‘अपनी खुदी को जो समझा, उसने खुदा को पहचाना ,’ अशी ओळ एका जुन्या गाण्यात मी ऐकली होती. मग भारतात एवढ्या प्राचीन काळापासून ऋषीमुनी काय सांगत होते? स्वतःला ओळखा म्हणजे तुम्हाला भगवंत मिळतील, अशीच त्यांची शिकवण होती. तरीही भारतात, महाराष्ट्रात आजपर्यंत या विषयावर कोणीच काही बोलले नाही. भारतीय असणे म्हणजे काय, मराठी माणसाचे लक्षण कोणते, भारतीय माणसाचे गुणधर्म काय, भारतीय नागरिकाचा ठळक अंगभूत गुणविशेष काय याबाबत आजवर आपण चर्चाच केली नाही. त्यामुळेच जगातील दृढतम वर्णव्यवस्था असूनही आपण स्वतःला वर्णविद्वेषविरोधातील लढ्याचे नेते समजतो. मूळ लढवय्या असलेला समाज स्वतःला शांततेचा अग्रदूत म्हणवून घेतो आणि आपसातच लाथाळ्या करून एकमेकांची डोकी फोडतो. अशी चर्चा आपल्याकडे व्हायलाच हवी, होऊ दे थोडी वादावादी आणि आरोप-प्रत्यारोप…पण काहीतरी चांगले हाती लागेल. ते एक वाक्य आहे ना…तुम्ही तारे वेचण्यासाठी जाता तेव्हा अयशस्वी होता. मात्र परत येताना तुमचे हात चिखलाने भरलेले असतील, असंही नाही ना.

Wednesday, November 4, 2009

चार एक्क्यांचा डाव

हाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे कवित्व अद्याप सुरू आहे. मनसे फॅक्टर आणि शिवसेनेची हार ही या निवडणूक निकालांची वैशिष्ठ्ये असल्याचे सांगण्यात येते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे झालेले पुनरागमन अनेकांना रुचलेले नाही. मलाही. मात्र शेवटी हा राजकीय व्यवस्थेचा अटळ परिणाम आहे. तो नाकारून कसा चालेल. मात्र राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने या निकालांमुळे मोठा फायदा झालेला आहे. पुढील काळात राज्याला दिशा देऊ शकतील, असे चार नेते या निवडणुकांमुळे महाराष्ट्राच्या समोर आले आहेत. म्हणजे ते आदी होतेच, मात्र त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या धोरणीपणाची चुणूक याच वेळेस दाखविली.

राज ठाकरे


हा यंदाच्या निवडणुकीतील हुकुमाचा एक्का. राज ठाकरे आणि त्यांची मनसे गेल्या वर्षभरापासून चर्चेत होती. राज्याबाहेरच्या माध्यमांमध्ये आणि लोकांमध्येही मनसेच्या प्रदर्शनाबाबत खूप उत्सुकता होती. ती वावगी नव्हती हे निकालांनी सिद्ध केले. 2008च्या जानेवारीत राज ठाकरेंनी मराठीपणाचा मुद्दा उचलला आणि जणू एखाद्या मधमाशाच्या पोळ्यात हात घातला. या दीड वर्षात त्यांनी जेवढ्या शिव्या खाल्ल्या असतील, जेवढा अपप्रचार झेलला असेल तेवढा देशात कोणीही झेलला नसेल. न्यायाधीशांच्या निकालपत्रातही त्यांचे दाखले देण्यात येतात, म्हणजे बघा.


मनसेच्या यशामागे राज ठाकरे यांच्याकडे असलेली शिवसेनाप्रमुखांची शैली, त्यांची ढब आहे, हे खरेच. मात्र त्यांनी केलेले इम्प्रोव्हायजेशन, कालसुसंगत बदल फारसे कोणी नोंदले नाहीत. बाळासाहेब हा शिवसेना नावाच्या भव्य व्यासपीठावरचा एकपात्री खेळ होता. त्यांच्या ओघवत्या शैलीत आणि संवादात्मक भाषेत त्यांनी टीका करावी, शिव्याशाप द्यावेत यात कोणाला काही खटकत नसे. राज ठाकरे टीका करतात, नकला करतात मात्र राजकीय व्यासपीठावरून ऐतिहासिक दस्तावेजांचे दाखले देणारा सध्याच्या काळात ते एकमेव नेते आहेत. ही त्यांनी खास कमावलेली शैली आहे. शिवसेनेत असताना ते कधी असे करताना दिसत नव्हते. याकामी त्यांना त्यांच्या अनेक साथीदारांची मदत मिळते, हे खरे असले तरी पी. एचडीच्या प्रबंधात शोभेल अशा संदर्भाच्या टीपण्या जोडत राजकीय भाषण करायला जाण लागते ती खास ठाकरे यांची देणगी.


सगळं जग टीका करत असताना, वेड्यात काढत असताना राज यांनी स्वतःचा पक्ष वाढविला. त्याला मुख्य प्रवाहात आणलं. त्यांच्या या आत्मविश्वासाला दादच द्यावी लागेल. पुण्यात जर्मन शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा व्हावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या. अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर खटले भरल्या गेले. त्यातले सगळेच जसे राजकीय सुडबुद्धीने भरलेले नाहीत तसे सगळेच जेन्युइनही नाहीत. काही लोकं पक्ष सोडून गेले आणि जाताना नाना आरोप करून गेले. मात्र अशा परिस्थितीतही मनसेचे इंजिन ट्रॅकवर ठेवण्यात राजना यश आलं. मनसे म्हणजे गुंडगिरी असं म्हणणाऱ्यांना ही एक चपराक आहे.


मनसेतला मोठा दोष म्हणजे एका नेत्यावर अवलंबून असला तरी त्या नेत्याच्या आदेशावर चालणारा तो पक्ष नाही. कार्यकर्ते स्वतःच्या विचारानुसार काहीतरी करतात आणि नेते त्याचे समर्थन करतात, असं चाललं आहे. राजचा राज्याभिषेक झाला आहे मात्र त्यांचे अष्टप्रधान मंडळ अस्तित्वात यायचं आहे. बाळासाहेब स्वतः जेवढे मोठे झाले तेवढेच त्यांनी मनोहर जोशी, सुधार जोशी, छगन भुजबळ, नारायण राणे यांना मोठे केले. मनसेत राज वगळता कोणाचीही सार्वत्रिक ओळख नाही. मनसेचे आमदार तर निवडून आले, आता त्यांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजेत, काम करायला पाहिजे यावर माझा विश्वास नाही. तसं असतं तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन्ही निवडणुकांत विजय मिळाला नसता. त्या साधूने सापाला दिलेला सल्ला आजही तितकाच खरा आहे, “डसू नको पण फणा काढायला काय हरकत आहे?”


अजित पवार


एका पुतण्याने स्वतःचा पक्ष काढून तो यशस्वी करावा आणि दुसऱ्या पुतण्याने काकांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावा, हा अगदीच योगायोग आहे. यंदाची निवडणूक ही अजितदादांनी अगदी अस्तित्वाची लढाई बनविली होती. त्यामुळेच कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला 20 जागा कमी मिळाल्या आणि अजितदादांचे 15 ते 20 समर्थक अपक्ष आमदार बनले, या योग जुळून आला. खुद्ध पुणे परिसरात तीन आमदार अजित पवार यांना मानणारे आहेत आणि तिघेही बंडखोर असावे, याची संगती त्याशिवाय लागणारी नाही. शिवाय पक्षातर्फे निवडून आलेल्यांमध्ये दादांना विरोध करण्याचा प्राज्ञा कुठे आहे.


आपण केंद्रात पंतप्रधान व्हावे आणि सुप्रिया सुळे यांना वारसदार नेमावे, ही शरद पवार यांची मूळ योजना. लोकसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत ती कागदावर भक्कम वाटायची. मात्र त्या निवडणुकीच्या निकालानंतर योजनेचाही निक्काल लागला आणि अजितदादांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यदाकदाचित राष्ट्रवादीचे अधिक आमदार निवडून आले असते, तर सुप्रियांना मुख्यमंत्री करण्याची चाल साहेब खेळणे शक्य होते. त्यातूनच अजितदादांच्या माणसांना तिकिटवाटपात झुकते माप देण्यात आले नव्हते. केवळ मुख्यमंत्रिपद घ्यायचे यासाठी दोनदा उपमुख्यमंत्रिपद नाकारणाऱ्या अजितदादांच्या हा प्रतिष्ठेचा प्रश्न होता. निव़डणुकीपूर्वी पुण्यात मनसेचीही सरकार स्थापनेसाठी मदत घेता येऊ शकते, ही त्यांची सूचना हा केवळ बोलभांडपणा नव्हता. तो एक गर्भित इशारा होता. आताही उपमुख्यमंत्र्याच्या निवडीवरून जो गोंधळ त्यांनी घातला, तो फुकाफुकी केलेला तमाशा नव्हता. शरद पवार यांच्या अगदी ऐन भराच्या काळात त्यांना स्वतःचे जास्तीत जास्त 60 आमदार निवडून आणता आले. आता पक्षातले 10 ते 15 आणि बंडखोर 15 असे 30आमदार आपण निवडून आणू शकतो, हे अजितदादांनी दाखवून दिले आहे.


राजकारण हा रमीच्या डावासारखा असतो. त्यात केवळ एक्का हातात असून चालत नाही. राजा, राणी असा सिक्वेंसही जुळावा लागतो. शिवाय जोकरचाही जोर पाहावा लागतो. दादांना कदाचित हे यावेळी जमले नसेल. ज्यावेळी त्यांच्या हातात सिक्वेंसचे पत्ते येतील, त्यावेळी राज्यात पुलोदच काय, वसंतदादांचीही पुनरावृत्ती होऊ शकते, हे या निवडणुकीचे इंगित.


अशोक चव्हाण


अशोक शंकरराव चव्हाण महाराष्ट्राला नवी दिशा देऊ शकतील, हे विधान प्रचंड वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. अकरा महिन्यांपूर्वी त्यांना मुख्यमंत्री केले तेव्हा कॉंग्रेसला पराजयाचे डोहाळे लागले आहेत, असा सूर काढला गेला. त्यांच्या कर्तृत्वावर विरोधकांचा सोडा, त्यांच्या स्वपक्षीयांचाही विश्वास नव्हता. मात्र नांदेड जिल्ह्यात स्वतःच्या राजकारणाची शैली बदलण्याऱ्या चव्हाण यांनी वडिलांच्या राजकारणापासून फारकत घेऊन, नाना क्लृप्त्या लढवून आपल्या पक्षाला विजयी केलं. तोंडाची वाफ फारशी न दवडता प्रतिस्पर्ध्यांची हवा काढण्याचं तंत्र चव्हाण यांनी राबवलं. त्यामुळेच बाळासाहेब शिवरकर, प्रताप पाटील चिखलीकर असे विलासराव समर्थक घरी बसले. राणेंच्या स्वतःच्या जिल्ह्यात पडझड पाहावी लागली.


खुर्चीत बसताच पहिल्याच महिऩ्यात चव्हाण यांनी नांदेडला स्वतंत्र विभागीय कार्यालय स्थापन करून वादाला तोंड फोडलं. पण त्यात स्वतः एका शब्दाचीही भर घातली नाही. लातूरकर देशमुख समर्थक आणि अन्य नेत्यांची ती झुंज दोन महिने चालली. त्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी स्मारकाच्या समितीवर बाबासाहेब पुरंदरे यांना घेऊन, मराठा संघटनांना उचकवलं. त्या वादात मराठा-मराठेतर असं ध्रुवीकरण झाल्याचं राष्ट्रवादीला निवडणुकीच्या निकालानंतर समजलं. गेल्या खेपेस शिवाजी महाराजांच्या नावावर नौका पार करणारी राष्ट्वादी यावेळेस त्याच शिवाजीमुळे रसातळाला गेली. आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना बेडूक म्हणून चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना भडकाविण्याचे काम केले. त्यांनी ते केळीचे साल एवढे बेमालूम फेकले, की खरोखरच राज मोठा झाल्याचा भ्रम करून घेऊन उद्धवनी सरकारऐवजी त्यांच्यावरच तोफा रोखल्या. त्या सालीवरून घसरल्याचे दादूंनाही उशिराच समजलं. सत्तेच्या रेसमध्ये कॉंग्रेसचा शंभर वर्ष जुना गाडा विनमध्य़े आणायचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.


माणसं जोडण्याचे राजकारण शंकररावांनी कधीच केले नाही. हेडमास्तर या नावानेच त्यांना ओळखले जाई. आताआतापर्यंत अशोकरावही माणसं जोडण्याच्या फंदात पडले नव्हते. मात्र गेल्या पाच एक वर्षांपासून त्यांनी स्वतःच्या शैलीत प्रचंड बदल केले आहेत. आपल्या मुख्य आधारवर्गातील प्रत्येकाला समाधानी ठेवण्याचे धोरण त्यांनी अंगिकारले आहे. एखाद्याला तोडून बोलणे, कोणाचा अपमान करणे अशा प्रकारांपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कारवर चप्पल फेकणारे चिखलीकर समर्थक किंवा हेलिकॉप्टरवर शिवनेरी येथे दगडफेक करणारे मराठा ब्रिगेडचे कार्यकर्ते, यांच्याविरोधात चव्हाण कठोरपणे बोलल्याचे वाचले किंवा ऐकले आहे तुम्ही? पक्षश्रेष्ठी या चार अक्षरी मंत्रावर चव्हाण यांची श्रद्धा आहे. ते त्यांचे बळ आहे आणि दुबळी जागाही. त्यांच्या सगळ्या चालींमध्ये ते भान बाळगलेले असते. त्यामुळेच विलासरावांप्रमाणे काही अवचित घडलं नाही तर ते आपली कारकीर्द पूर्णही करू शकतात. कारण चव्हाणांना सत्य साई बाबा जसे प्रसन्न आहेत तसे सत्तेचे बाबा कोण हेही माहित आहे.


उद्धव ठाकरे


उद्धव ठाकरे हे नायकच मात्र ग्रीक शोकांतिकेतील नायकाप्रमाणे झाले आहेत. प्रतिस्पर्ध्याच्या विजयापेक्षा आपल्या पराभवाची चर्चा जास्त व्हावी, याचं शल्य त्यांना असणारच. खरं तर त्यांनी खूप मेहनत घेतली होती मात्र नाटकातील केवळ मुख्य पात्राने चांगलं काम करून भागत नाही, त्याला इतरांची तशीच जोड मिळावी लागते. त्यांच्या दुर्दैवाने त्यांना पात्रं नाही, मेषपात्रं मिळाली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी रान उठविलं असेल, मात्र त्यांनीच नेमलेल्या रामदास कदमांना मराठवाडा किंवा विदर्भात कोणती पिकं केव्हा घेतात, हे तरी माहित आहे का. बाळासाहेबांच्या सान्निध्यात अनेक कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला बहर आला. दिवाकर रावते, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे अशी अनेक नावे आहेत. उद्धव यांच्याकडे स्वतःची अशी कुठलीच नावे नाहीत. या चपलाच आपली संपत्ती आहे, असं प्रबोधनकार सांगत असल्याचं शिवसेनाप्रमुख नेहमी आठवण सांगतात. उद्धव यांची माणसं कार्यकर्त्यांना त्यांच्यापर्यंत पोचूच देणार नसतील, तर चपला अन्यत्रच वळतील. मीनाताई ठाकरे गेल्या तेव्हा मी मुंबईत होतो. त्यांच्या अस्थी राज्यभर फिरविण्यात आल्या होत्या. मुंबईच्या आमदार निवासात शिवसेना कार्यकर्ते त्या अस्थी नांदेडला नेण्यासाठी थांबले होते. त्या अस्थी मी डोक्यावर घेईन, या कारणासाठी तेव्हा भांडणारे कार्यकर्ते आज भाजपमध्ये आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत.


मी थकलेलो नाही, पराभूत नाही, हे सांगण्यासाठी उद्धव दोन दिवस न घेते तर त्यांच्या संघर्षाला उदात्ततेची किनार लाभली असती. मनसेसारखे आव्हान, भाजपसारखा आपमतलबी सहकारी, कॉंग्रेस-राष्ट्रवादी सारखे निर्ढावलेले सत्ताधारी आणि शिवसेनाप्रमुखांचा वारसा चालविण्याचे आव्हान, तेही त्यांच्यापेक्षा सर्वस्वी वेगळ्या अशा शैलीत, ही सामान्य गोष्ट नाही. उद्धव यांचा एकट्याचा खांदा त्यासाठी पुरेसा नव्हता, ही गोष्ट त्यांच्याशिवाय इतर सगळ्यांना कळत होती. मी चुकलो, असं म्हणायची पद्धत ठाकरे घराण्यात नाही. त्यामुळेच आपले धोरण चुकले, हे त्यांनी मान्य केलं नाही. उलट दोन वर्षांत मनसे फॅक्टर नाहीसा होईल, असा स्वप्नाळू आशावाद त्यांनी व्यक्त केला. नारायण राणे बाहेर पडले तेव्हा भुजबळ 1992 मध्ये बाहेर पडले आणि 1995 मध्ये आम्ही सत्तेत आलो, असा फसवा युक्तिवाद त्यांनी केला. शिवसेनेची राडा संस्कृती त्यांनी नष्ट केली हे खरे, पण त्यामुळे संघटनेची परिणामकारकता गेली त्याचे काय? असाच फसवा युक्तिवाद त्यांनी मुंबई महापालिकेतील विजयानंतरही केला होता.


उद्धव यांच्या नेतृत्वाला भवितव्य आहे का, या प्रश्नाला मी उत्तर देईल, हो आहे. निवडणुकीत जे पानिपत झालंय ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं नव्हे तर त्यांच्या माणसांचं झालंय. काही झालं तरी 44 आमदार त्यांनी स्वबळावर निवडून आणलेत. रणांगणात स्वतः उतरून दिशा देण्याची ताकद त्यांच्यात आहे, प्रश्न आहे तो त्यांच्या माणसांची पारख करण्याचा आणि माणसांवर विश्वास टाकण्याचा. आनंद दिघे यांनी स्वतःचे साम्राज्य स्थापन केले तरी बाळासाहेबांनी कधी ठाण्यात लुडबुड केली नाही. कारण त्यांनी काही केलं तरी फायदा संघटनेचा होतो, हे तत्व बाळासाहेबांनी बाळगलं. बाकी काही नाही तरी उद्धवनी तो कित्ता बाळगावा.

Monday, November 2, 2009

दहा मिनिटांत पत्रकार व्हा!

पत्रकार. हा एक सन्मानाचा शब्द आहे. आपल्याला माहिती देणाऱ्यांची जडणघडण करण्याऱ्या शाळा अस्तित्वात आहेत. कारण आपणा सर्वांना सातत्याने माहिती हवी आहे. बातम्या नसलेले जीवन म्हणजे प्रेम नसलेल्या जीवनासारखेच आहे...अगदी निराशाजनक प्रवासासारखेच. आपल्याला रिकामपणाचीही भीती वाटते आणि पत्रकाराचेही. तो आपल्यामधेच राहतो, अगदी आपल्या अवतीभवतीच असतो आणि आपण त्याने दिलेली माहिती वाचत असतो. कारण माहिती मिळविणे हा आपला हक्क आहे..

चांगला पत्रकार होण्यासाठी काही बाबी आवश्यक आहेत. काही सवयी अंगी बाळगाव्या लागतात. हे एक तंत्र आहे, परिणाम करण्याचे, भय निर्माण करण्याची कला आहे. हे तंत्र फार सोपे आहे. त्याचं म्हणजे, पहिली गोष्ट, कधीही, अगदी कधीही दुर्लक्ष करायचे नाही. कोणत्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे नाही. पत्रकाराला कोणत्याही बाबीकडे दुर्लक्ष करून चालत नाही, तो त्याच्या व्यवसायाचा अपमान आहे. त्यानंतर त्याने धक्कादायक, भावना उत्तेजित करण्याची कला अंगी बाळगली पाहिजे. प्रत्येक घडनेतून भय, सनसनाटी, असुरक्षिततेची भावना, सूड अशा भावनांना उठाव दिला पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे, त्याने आकड्यांची कसरत केली पाहिजे, त्यांना उठाव दिला पाहिजे. खऱ्या आकड्यांची पडताळणी करायला कोण येतंय? समजा आलाच एखादा तावातावाने, तर त्याला सांगायचं, की जिथून आकडेवारी घेतली ते सोर्स गोंधळलेले आहेत आणि ही आकडेवारी अंदाजाने दिलेली आहे. एवीतेवी, वर्तमानपत्रात आजचा विषय उद्या पहिल्या पानावर नसतो आणि आदल्या दिवशीची पहिल्या पानाची बातमी आज आतल्या पानात असते. त्यामुळे कोणाच्याही फारसे लक्षात राहते नाही. कारण शेवटी ती माहिती आहे आणि सतत बदलत असते. नेहमी प्राथमिक क्लृप्ती करावी. म्हणजे 50,000 जणांना फटका बसला असे न म्हणता अर्धा लाख लोकांना फटका असे म्हणावे. ते स्पष्टच जास्त भयावह वाटते. मी वर ते सांगितले आहे. हा कौशल्याचा प्रश्न नाही, हा तंत्राचा प्रश्न आहे. केवळ एक विमान पडले असे म्हणू नका... ते अगदीच निरस, सपाट विधान आहे. असं म्हणा, विमानाचा स्फोट झाला, ते विखरुन पडले किंवा ते कोसळले. माणसे मरत नाहीत, ते ठार होतात, मारले जातात, ........या पद्धतीने पाहिले तर पत्रकार आणि खाटिक यांचे काम एकसारखेच असते. ते विकायचे काम करतात आणि त्यातूनच जनतेचे पोषणही करतात. मात्र पत्रकार असण्याचे काही फायदे आहेत. तुम्ही योग्य त्या माणसांचे संरक्षण करता आणि दुसरे बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू अशा कसोटीच्या प्रसंगी तुम्हाला अधिक काम असते. लोकही तुमच्याकडे सल्ला किंवा माहिती मागण्यासाठी येतात. (त्यांनी ती नाही मागितली तरी तुम्ही ती देता हा भाग वेगळा.)

तिसरं, नेहमी बातमीत आकडेवीरी, सर्वेक्षणे किंवा टक्केवारी देत जा. कारण त्याचा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक प्रभाव पडतो. आपल्या अगदी लहान वयापासून आपण आकडेवारीवर जगत असतो. केवल वर्णनापेक्षा आकडेवारी केव्हाही उत्तम कारण लोकांना हवा तो अर्थ ते त्यातून काढू शकतात. बाकी काही सांगायची गरज राहत नाही. मात्र आकडे हे अगदीच गुळगुळीत, अगदीच अनघड असतात. आपल्याला हवे ते त्यांच्यामार्फत आपल्याला सांगावे लागते.

चौथी गोष्ट, माणसांना पकडा आणि रस काढण्यासाठी फळांना पिळावे तसे त्यांना पिळून काढा...दुःख, निराशा, आनंद या त्यांच्या भावना कोणताही अपराधभाव, कोणतीही खंत न बाळगता त्यांच्याकडून वदवून घ्या. त्याबद्दल उद्या नका बोलू. सगळे विषय एकात एक गुंफवा. त्यासाठी काही तर्क असलाच पाहिजे असे नाही. एखादा विनोद, एखादा किस्सा, खेळ किंवा युद्ध...मनात कोणतीही भावना बाळगू नका. एखाद्या डॉक्टरप्रमाणेच ती व्यावसायिकवृत्तीची एक सर्वमान्य खूण आहे. काही करू नका...कोणावर आरोप करू नका. ते सगळं इतरांवर सोडा आणि ते असलेच पाहिजेत असे नाही.

थोडक्यात सांगायचे म्हणजेः चांगला पत्रकार होण्यासाठी तुम्ही 1) लोकांना जाणवू न देता त्यांना धक्का द्यायला पाहिजे, 2) गोष्ट फुगवून सांगा, 3) खूप आकडेवारी द्या, ती तपासलेली नसली तरी चालेल, 4) पत्रकार असणे म्हणजे काहीतरी उपयोगी काम करत आहे, याव्यतिरिक्त मनात कोणतीही भावना ठेवू नका. तेव्हा मग तुम्ही सगळ्या जनतेसाठी एक सत्यशोधनाचे यंत्र, एक अपरिहार्य अशी वस्तू बनता.

---------------

Devenez journaliste en 10 minutes  या फ्रेंच ब्लॉगपोस्टचा लेखक दिस्मास यांच्या परवानगीने केलेला हा अनुवाद. सध्याच्या बहुतांश पत्रकारांची, त्यात मीही आहेच, वृत्ती आणि मजबूरी दिस्मास यांनी छान मांडली आहे. मला ते भावले.

Sunday, November 1, 2009

फोलपटराव, निर्माते-दिग्दर्शक

मुलाखतकारः नमस्कार, आज आपणblog भेटणार आहोत प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक फोलपटराव यांना. खरं तर प्रेक्षक आणि वाचक यांना फोलपटरावांची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता भासू नये. झपाट्याने अस्तंगत होणारे टांगाचालक, पाठ्यपुस्तके विक्रेत्यांच्या हृदयद्रावक समस्या अशा विविध विषयांवर त्यांनी चित्रपट काढले आहेत. तर आज आपण त्यांना पहिला प्रश्न हाच विचारू या, की अशा वेगळ्या वाटांनी जाणारे चित्रपट काढण्यामागची त्यांची प्रेरणा काय आहे.

फोलपटरावः मी मुळात चित्रपट व्यवसायाकडे वळलो अपघाताने. बारावी झाल्यानंतर योगायोगाने मला खूप गुण मिळाले. त्यामुळे वैद्यकीय शाखेत प्रवेशही मिळाला. मात्र ते शिक्षण घेत असतानाच, डॉक्टर झालेल्या माणसाने कलेच्या प्रांतात जावे अशी एक साथच असल्याचे माझ्या लक्षात आले. मग वैद्यकीय अभ्यासापेक्षा याच विषयाचा मी अभ्यास करायला लागलो. त्याच तंद्रीत असताना एकदा माझ्या दुचाकीचा अपघात झाला. त्यावेळी दवाखान्यात दाखल असताना रात्रपाळीतील नर्सेसच्या हालअपेष्टा मी दिवसरात्र जागून पाहत होतो. त्याचा परिणाम म्हणून मला दवाखान्यातून पंधरा दिवसांऐवजी एका आठवड्यातच डिस्चार्ज देण्यात आला. याच अनुभवातून माझा पहिला चित्रपट सलाईन आणि ऑक्सिजनचा जन्म झाला.

प्रश्नः या चित्रपटाच्या अनुभवाचा मग पुढील कलाकृतीच्या वेळी तुम्हाला कसा फायदा झाला.

फोलपटरावः खूपच. म्हणजे हा माझा पहिला चित्रपट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मदतीने बनविण्यात आला होता. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक चित्रपटासाठी कोणाला कसे बनवायचे, यात मी एक्स्पर्ट झालो. शिवाय ओसाड फेस्टिव्हल, रान फेस्टिव्हल अशा महोत्सवांमध्ये त्याचे प्रदर्शन झाले. त्यामुळे करपरती आणि राज्य सरकारच्या अनुदानातून काहीही तयार केले तरी ते खपविता येते, हे मला कळाले. हा चित्रपट जेव्हा आपल्याकडे प्रदर्शित झाला तेव्हा मात्र मला काहीसा वेगळा अनुभव आला. काही प्रेक्षकांनी मला पत्र पाठवून या चित्रपटामुळे खूपच मनोरंजन होते, अशी तक्रार केली. त्यामुळे पुढील सगळ्या चित्रपटांमध्ये 10 टक्के मनोरंजन आणि 90 टक्के चर्चासत्र असायलाच हवा, यावर माझा कटाक्ष आहे. त्यामुळे लोकंही त्यांना प्रतिसाद देतात.

प्रश्नः तुमचा नवा जो चित्रपट आहे, काळा कोळसा सर्वकाळ, त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे

फोलपटरावः आता हा जो चित्रपट आहे तो आहे कोळशाच्या नामशेष होत चाललेल्या वखारींच्या संदर्भात. सुमारे दीड दोन शतके अनेक घरांत ज्यांनी चूल पेटविली, त्या कोळशांच्या वखारींना एक सांस्कृतिक महत्व आहे. कोळशाच्या काळ्या रंगातून अनेक जीवनांमध्ये रंग भरले. कित्येक मोठ्या व्यक्ती पूर्वी स्वतः जाऊन कोळसे विकत घेत. मात्र आज गॅस आणि ओव्हनच्या काळात ही संस्था काळाच्या पडद्याआड जात आहे. त्यामुळे त्यावर एक चित्रपट तयार करावा, असे मी ठरविले. सुदैवाने केंद्र सरकारच्या ऊर्जा बचत ब्युरोच्या अधिकाऱ्यांनाही ही कल्पना पटली. त्यामुळे त्यांनीही लगेच चित्रपटासाठी अनुदान मंजूर केले. कोळशाची वखार चालविणाऱ्या एका घराण्यातील तीन पिढ्यांची ही कथा आहे.

प्रश्नः ही कल्पना तुम्हाला कशी सुचली

फोलपटरावः काय झालं, की माझ्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिग्नलमन या चित्रपटाच्या एका शोला मी गेलो होतो. आता माझ्या बहुतेक चित्रपटांमध्ये सिल्हौट पद्धतीने चित्रीकरण केलेले असल्याने अंधाराला मुख्य स्थान असते, हे तुम्हाला माहित आहे. तर त्या शोला पडद्यावर बराच वेळ अंधार असल्याने एका प्रेक्षकाने, कदाचित खेड्यातला असावा तो, अस्वस्थ होऊन काडी पेटविली. त्यावेळी मला वाटले, की या काडीमुळे मल्टिप्लेक्सच्या खुर्च्यांनी पेट घेतला तर...अन् यातूनच काळा कोळसा सर्वकाळचा जन्म झाला. अर्थात् नेहमीच्या पद्धतीने यात मी मुख्य कथेऐवजी पात्रांचे रडके चेहरे, भक्क अंधार आणि दीनवाणे संगीत यांनाच जास्त महत्व दिले आहे.

प्रश्नः चित्रपटसृष्टीत एक दशक घालविल्यानंतर आणि एवढे चित्रपट काढल्यानंतरही तुम्हाला एकही पारितोषिक मिळालेले नाही, याची खंत वाटते का

फोलपटरावः बिल्कुल नाही. पारितोषिकांच्या स्पर्धेवर माझा कधीही विश्वास नव्हता आणि आजही नाही. कारण मला पारितोषिक मिळणार नाही, याची मला खात्री आहे. माझ्या दृष्टीने थिएटर किंवा मल्टिप्लेक्सला चांगल्या मूडमध्ये आलेला प्रेक्षक अस्वस्थ होऊन गेला पाहिजे, हीच मोठी गोष्ट आहे. नांगरलेली नांगी या चित्रपटाच्या वेळची गोष्ट आहे. चित्रपटाचा मुख्य नायक, एक पाप्याचे पितर असलेला शेतकरी, अत्यंत दयनीय, केविलवाण्या परिस्थितीत शेतात माजलेले तण उपटून काढत असतो, असे एक दृश्य त्या चित्रपटात आहे. ते दृश्य पाहून अनेक प्रेक्षक स्वतःचे केस उपटायला सुरवात करत असत, हे मी माझे सर्वात मोठे पारितोषिक समजतो.

प्रश्नः फोलपटरावजी, एक शेवटचा प्रश्न. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सांगू इच्छिता

फोलपटरावः माझे एकच सांगणे आहे. लक्षात ठेवा, आपण समाजाचे काही देणं लागतो. त्यामुळे काहीही समस्याग्रस्त दिसलं की ते समाजाला देऊन टाका. आपण समस्येची उत्तरं द्यावीच, असं नाही. त्यामुळे जी काही मिळेल ती समस्या शोधा आणि त्या सगळ्यांना. सुदैवाने सध्या मराठी चित्रपटांत अनेक वेगळे प्रयोग होत आहेत. त्यात नजरबंदीचा हाही प्रयोग सर्वांनी करावा, असे मला वाटते.