Tuesday, September 25, 2012

ट(फु)गा फुटला

Chief Minister Prithviraj Chavan and Deputy Chief Minister Ajit Pawar अखेर महाराष्ट्राचे स्वयंनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. अलीकडे महाराष्ट्रात रुजलेल्या खुशामतखोरीच्या राजकारणाला अनुसरून राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांनीही राजीनामे दिले. अखेर राजीनामे दिले, असेच म्हणायला हवे, कारण पवार काय, आर आर पाटील काय किंवा सुनील तटकरे तसेच छगन भुजबळ काय, यांच्या राजीनाम्यासाठी राजकारणात अनेकांनी कंबर कसली होती. मात्र राष्ट्रवादीची टीम त्या सर्वांना पुरून येत होती.

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून अजित पवारांनी बहुतेक सूत्रे हातात घेतली होती. प्रशासनावर स्वतःची पकड बसविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याला पूरक म्हणून मुख्यमंत्री फायली हलवत नाहीत, निर्णय घेत नाहीत अशा गप्पा पसरविण्यात आल्या. त्यांत थोडेफार तथ्यही होते आणि जनतेसमोर निर्माण झालेले चित्रही तसेच होते. मात्र काँग्रेसजनांना अन्य काही जमत नसले तरी शत्रू किंवा मित्र पक्षाला कसा गारद करायचा, यात त्यांचा 'हात' धरणारा कोणी नाही.

डिसेंबर ते जानेवारीच्या काळात जिल्हा परिषद निवडणुकांसाठी साखर कारखानदार आणि उत्पादक शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी मुक्तहस्ते पाणी धरणांतून सोडण्यात आले. नेहमीप्रमाणे पावसाळ्यात पाऊस पडला, की धरणे भरतील आणि सर्वांना गप्प करता येईल, हा त्यांचा होरा. दुर्दैवाने पावसानेही त्यांना हुलकावणी दिली आणि कोरडी पडलेली धरणे लोकांच्या डोळ्यांना खुपू लागली. राष्ट्रवादीच्या कंपूने केलेली पाण्याची चोरी चर्चेचा विषय झाली आणि काँग्रेसजनांना आयते कोलीत मिळाले. आधी तटकरे आणि अजित पवारांना शरसंधान करण्यात आले. परत तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या दिल्लीतील महाराष्ट्र भवनाच्या बांधकामात झालेले 'आर्मस्ट्राँग कन्स्ट्रक्षन' अशी प्रकरणेही निघत राहिली. याच दरम्यान, मंत्रालयाला आग लागणे, पुण्यात स्फोट अशा काही घटना घडल्यामुळे या विषयांवरून लोकांचे पवार काका-पुतणे मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमेतवर भाष्य करत असताना राष्ट्रवादीच्या तटबंदीतील चिरे काढण्याचे काम चालू होते. विजय पांढरे यांच्या पत्रामुळे पवारांच्या अडचणींत आणखी भर पडली. सरतेशेवटी मुख्यमंत्र्यांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर पवारांपुढे दुसरा मार्ग उरला नाही.

पवारांचा राजीनामा म्हणजे नाटक असल्याची शिवसेना, भाजप आणि मनसेची प्रतिक्रिया साहजिक व अपेक्षित म्हणायला हवी. वाहिन्यांवरील चर्चेत किरीट सोमय्यांनी सरकारचे वाभाडे काढले. मात्र सर्वात कडी केली ती आमदार शशिकांत शिंदे यांनी. पांढरे यांचे मानसिक संतुलन ढासळले असल्याचे त्यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांत सरकारवर टीका करणाऱ्यांना वेडे ठरविण्याची एक पद्धत सुरू झाली आहे. त्याचाच एक नमुना शिंदेंनी पेश केला.

आज कुमार सप्तर्षींशी बोलताना मात्र त्यांनी वेगळेच भाष्य केले. त्यांच्या मते, अजित पवारांभोवती कार्यक्षमतेचे आणि तडफदारपणाचे वलय निर्माण करण्यात आले होते. त्यांच्या हडेलहप्पी वर्तनावर आक्षेप घेणाऱ्यांना सकारात्मक पाहण्या-बोलण्याचे धडे देण्यात येत असत्. तो फुगा आज फुटला. सरकारी म्हणजेच जनतेचा पैसा कसा खर्च झाला, हे विचारण्याचा जनतेला हक्क आहे. मात्र अजित पवार त्याला त्राग्याने उत्तर देत आहेत. सिमेंटमध्ये भेसळ झाली हा पांढरे यांचा आक्षेप आहे. त्याचे उत्तर मिळालेच पाहिजे. अजित पवारांच्या आजच्या पवित्र्याने पांढरे यांचे आरोप खरे असल्याचे भासत आहे.

ते काही असले तरी टगेगिरीचा फुगा फुटला आहे. काकांसारखेच अजित पवारही चार दिवसांच्या रुसव्या फुगव्यानंतर मंत्रिमंडळात परतले तरी ती पूर्वीची टगेगिरी आता नसणार, एवढं नक्की.