Friday, October 3, 2008

चल भाऊ, डोकं खाऊ!

मी पुण्यात राहतो. आता खरं तर हे आपणहून सांगायची गरज नाही. कारण कोणतीही व्यक्ती इतरांना न कळालेली गोष्ट आपल्याला कळाली आहे अशा आविर्भावात सांगू लागला, की तो एकतर पुण्यात राहतो किंवा केव्हा ना केव्हा पुण्याचं पाणी चाखलेला आहे हे लक्षात येतं. पुण्यात राहणार्‍या प्रत्येकाला नागरिकत्वाचा दाखला मिळो न मिळो, पण शहाणपणाचा मक्ता मिळालेला असतो हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट नाही तरी शनिवारवाड्याइतके उघड खचितच आहे.
तर अशा या शहाणपणाच्या पुण्यनगरीत अन्य लोकांना असतात तशाच सवयी मलाही आहेत. 'अभिमानाने सांगाल रांगेत उभे राहून या हॉटेलमध्ये जेवलो,' हे माझही ब्रीद आहे. 'ज्ञान मिळविताना असे मिळवा की आपल्या कधी मॄत्यू येणारच नाही, पुण्य करताना असा विचार करा की आपल्याला उद्याच मॄत्यू येणार आहे,' असं एक संस्कॄत वचन आहे. त्यात बदल करून मी असं वागतो, की 'जेवण करताना मी असं करतो की आपल्याला उद्याच मरण येणार आहे आणि जगाला उपदेश देताना असा देतो, की जगाच्या सुरवातीपासून मी येथे एकटाच शहाणा आहे.' तास तासभर दरवाजाजवळ 'ताट'कळत उभे राहिल्याशिवाय माझं पोटच भरत नाही. आणि एकदा का पोट भरलं की अख्ख्या जगाला फुकटची शिकवणी देण्याची जी मजा आहे, ती अन्य कशात आहे काय?

असं एकूण बरं चाललं असलं तरी आपण जास्त खातो की काय, अशी एक शंका मनाला चाटून जात होती. सांगणारे असंही सांगतात, की मी जगण्यासाठी खात नसून खाण्यासाठी जगत असतो. अन त्या खाण्याची रेंजही मोठी आहे. मात्र माझ्या या भूकेला आता शास्त्रीय आधार मिळाला आहे. मी माझ्या आयुष्यासाठी, वैयक्तिक फयद्यासाठी खावखाव करत नसून त्याचा माझ्या कौतुकास्पद बुद्धिमत्तेशी थेट संबंध आहे, असं शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यांच्या मते, बौद्धिक काम करणारी माणसं अधिक खातात. माझ्यावर खार खाऊन असणार्‍या लोकांच्या हे संशोधन पचनी पडणार नाही, हे मला पक्कं ठाऊक आहे। मात्र कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहतो थोडाच? आता शास्त्रज्ञांनी आणखी एक उपकार करावा। त्यांनी बुद्धिमान माणसे आळशी असतात असाही एक शोध लावावा. दिवस रात्र बसून राहणारी, कोणतंही काम व करणारी आणि आराम करायला मला वेळ पुरत नाही, अशी तक्रार अभिमानाने करणारी जी मोजकी मंडळी आहेत, त्यांची बुद्धिमत्ता इतरांपेक्षा जास्त असते, असा निष्कर्ष काढणारे एखादे संशोधन त्यांनी करावे, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी लागेल तितक्या वेळा सँपलिंग करण्यासाठी इतरांना सांगण्याचे माझी तयारी आहे। म्हणजे कसं, माझी प्रोफाईल पूर्ण होईल.

Sunday, September 28, 2008

वाघनखांचा शिर ‘पेच’

इंग्रजी पत्रकारितेत आलो, तेव्हा कोणत्या बातम्या कराव्या लागतील किंवा मी करेन, याबाबतीत इतरांइतकीच मलाही शंका होती. मात्र गेल्या महिन्यात मी दिलेल्या दोन बातम्यांमुळेच मला स्वतःला मी करत असलेल्या कामाबाबत अभिमान वाटत आहे। पहिली बातमी विंचूरकर वाड्याच्या बाबत होती. माझी गेली पोस्टही त्याचसंबंधात होती. ती बातमी पुणे मिररमध्ये आल्यानंतर मुंबई मिररनेही छापली. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा त्यात उल्लेख असल्याने त्यांनी या वृत्ताची दखल घेतली. ते स्वतः गणेशोत्सवाच्या काळातच पुण्यातील विंचूरकर वाड्यात येऊन गेल्याचे मला कळाले. तेव्हा त्यांच्याकडे यासंबंधात फॉलो-अपसाठी विचारणा करण्याची जबाबदारी साहजिकच येऊन पडली.

विविध मार्गांनी आर. आर. आबांशी संपर्क साधल्यानंतर, यथावकाश मूळ बातमीचा इम्पॅक्टही छापला. त्याचवेळेस आणखी एक मोठी बातमी माझ्या हाताला लागली. ती म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न चालू असल्याची.

आता ही बातमी मूळातच एवढी मोठी होती, की ती अगदी व्यवस्थित तयारी करून, सर्व माहिती करून आणि खातरजमा करूनच द्यावी लागणार होती। त्यामुळे आधी लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून आधी यासंबंधात माहिती मागवली. ‘कदाचित शिवाजी महाराजांची असणारी वाघनखे आमच्या संग्रहात आहेत. ती प्रदर्शनासाठी पाठविण्याबात आम्हाला विनंती करण्यात आली आहे. सुरक्षेची खात्री पटल्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ,’ असे त्यांचे उत्तर आले. अर्धे काम त्यात फत्ते झाले!

आता जबाबदारी होती आबांना स्वतःला विचारण्याची. त्यासाठी त्यांना फॅक्स केला, फोन करायचा प्रयत्न केला मात्र उत्तर काही आले नाही. त्यावेळी गणेशोत्सव चालू असल्याने साहेब गणपती पहायला गेले आहेत, असे त्यांचे कर्मचारी सांगायचे. (होय, असंच सांगायचे.) शेवटी जलसंपदा विभागातील यांत्रिकी विभागाच्या कार्यक्रमासाठी आबा येणार आहेत, असे कळाले तेव्हा तिथेच त्याना गाठायचे ठरविले. त्याच कार्यक्रमाच्या संबंधात मानार हाऊसची एक बातमी दिलेली असल्याने तिथंही अर्धे काम झाले होतेच.

त्या कार्यक्रमात तानाजी खोत याच्यासोबत नेट लावून बसलो. चार मंत्र्यांची बडबड, एका राजकीय कार्य़कर्त्याची चापलूसगिरी आणि काही सरकारी अधिकाऱयांची लाचारी सहन केल्यानंतर आबा व्यासपीठावरून उतरताना त्यांना गाठले. पाऊस मी म्हणत होता आणि इकडे आमच्या बातमीदारीचा कस लागत होता. कार्यक्रमाला आलेल्या अन्य सात-आठ बातमीदारांना झुकांडी देऊन, एकदाचा आबांचा कोट आम्हाला मिळाला.

“प्रस्ताव दिला होता त्यांना. आम्ही सुरक्षा पुरवावी अशी त्यांची मागणी आहे. ती फाईल चार दिवसांपूर्वी माझ्याकडे आली आहे,” आर. आर. पाटील म्हणाले आणि आमचे घोडे गंगेत न्हाले (म्हणजे शेजारून वाहणाऱया मुळा नदीत) नंतर जेवणावर ताव मारला तरी पोट आधीच भरले होते.

त्यानंतर इतिहास तज्ज्ञांना विचारावे, तर बाबासाहेब पुरंदरे अमेरिकेला गेलेले. त्यामुळे त्यांच्या आधीच्या एका लेखातूनच माहिती घेतली. निनाद बेडेकर यांना फोन केला तर त्यांचे म्हणणे असे, की शिवाजी महाराजांनी अफझलखानाला वाघनखांनी नव्हे, तर तलवारीने मारले होते. कवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभूषषण ग्रंथात ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराजांची वाघनखे आहेत, याचेही ठोस पुरावे नसून, नंतरच्या बखरींनी वाघनखांचा उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले. हा एक नवाच पेच निर्माण झाला होता. होता म्हणजे आहे. त्यात विकिपेडियावर शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे म्हणून जे छायाचित्र आहे, ते म्हैसूरचे असल्याचे त्या फलकावर लिहिले आहे.
विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाने ते छायाचित्र खरे आहे अथवा नाही, याबाबत काहीही भाष्य केलेले नाही। मात्र मूळ वाघनखांचे छायाचित्र मला पाठविल्याचा मेल पाठविला. पण त्यात छायाचित्राची लिंक नाही. संग्रहालयाच्या संकेतस्थळावर शोध घेतला असता वाघनखांचे (टाईगर क्लॉ) एक वेगळेच छायाचित्र दिसते. मात्र त्यात महाराष्ट्र किंवा शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही. असा हा घोळ आहे. अन तरीही, वाघनखांची बातमी ही माझ्या पत्रकारितेचा शिरपेच आहे!