Sunday, May 15, 2011

अम्मांच्या विजयाचे कवित्व

तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय संपादन करून आणि प्रतिस्पर्धी द्राविड मुन्नेट्र कळगमची धूळधाण उडवून राज्याच्या राजकारणात जयललिता यांनी एक नवा अध्याय लिहिला आहे. मागील चुकांपासून योग्य धडा घेऊन आणि प्रतिस्पर्ध्यांच्या उणिवांचा अगदी योग्य पद्धतीने फायदा उचलून त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची तयारी सुरू केली आहे.

कलैञर करुणानिधी आणि त्यांच्या पक्षाला करुणानिधींच्या कुटुंबकबिल्याची हडेलहप्पी भोवली. व्यक्तिभोवती एकवटलेल्या कुठल्याही पक्षाला धडा मिळेल, अशी द्रामुक पक्षाची वाताहात झाली. निवडणूक निकालांच्या पहिल्या विश्लेषणात, अनेक राजकीय तज्ज्ञांनी तर हा अम्मांचा विजय नसून द्रामुकचा पराभव असल्याचे मत व्यक्त केले.

2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या कौतुकात रंगलेल्या माध्यमांना या पराभवाची चिरफाड करण्यासाठी आयतेच कारण मिळाले. मात्र करुणानिधींची भैरवी सुरू झाली, ती त्यांच्या मुला आणि नातवंडांनी तमिळनाडूत सुरू केलेल्या 'हम करे सो कायदा' वृत्तीने. मदुराई जिल्हा आणि त्या शेजारच्या भागात अळगिरी यांनी स्थापन केलेले खाण साम्राज्य, स्टॅलिन व त्याच्या मुलांनी चेन्नैतील चित्रसृष्टीला मुठीत धरण्याचा केलेला आटापिटा आणि मारन कुटुंबियांसोबतच्या भांडणातून कनिमोळींना दिलेले मोकळे रान...या सगळ्या गोष्टी द्रामुकच्या गळ्यातील फास ठरल्या.  ऐन मतदानाच्या दोन दिवस आधी करुणानिधी यांच्या लेखणीतून उतरलेला पोन्नर शंकर हा चि‌त्रपट प्रदर्शित करण्यात आला. थिरुवारुर येथे घरोघरी जाऊन, मी तुमचा मुलगा, सखा, माझ्या मायभूमीतील लोकांनो मला मतदान करा, असा आक्रोश करुणानिधींनी केला. मात्र त्यांच्या भावनिक आवाहनाला यावेळी दाद मिळाली नाही.

निवडणुकीच्या काळात जयललिता प्रचार करत होत्या, त्यावेळी 2-जी स्पेक्ट्रमबाबत त्यांनी फारसा गवगवा केलाच नव्हता मुळी. अनेक राजकीय निरीक्षकांनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटले होते.

आपले मतदार कोण आहेत आणि राज्याच्या समस्या काय आहेत, याचा पुरता आराखडा पुरट्चि तलैवी (श्रेष्ठ नेत्या) जयललिता यांच्याकडे तयार होता, हे त्यामागचे कारण होते. राज्यातील वाढते भारनियमन, कायदा व सुव्यवस्था आणि महागाई या तीनच मुद्यांभोवती त्यांनी आपला प्रचार फिरता ठेवला होता. मतदानाला येणाऱ्या गोरगरीब जनतेला ७५ हजार कोटी रुपयांच्या काल्पनिक नुकसानीपेक्षा आपल्या घरी वीज गायब असणे महत्त्वाचे, हे शालेय पातळीवर शिक्षण सोडलेल्या अम्मांना माहित होते. त्यांच्या सुदैवाने संपूर्ण निवडणुकीच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांनी 2-जी स्पेक्ट्रमचा मुद्दा बातम्यांत येत राहील, याची व्यवस्था केली होती. करुणानिधींच्या विरोधात लोकांमध्ये किती असंतोष भरला होता, याचे उदाहरण काल 'दिन थंदी' वृत्तपत्राच्या अग्रलेखात देण्यात आले.

द्रामुकच्या एका मंत्र्याने एका खेड्यातील 10,000 मतदारांना टोकन वाटले होते. त्यांनी या उमेदवाराला मतदान करायचे आणि तालुक्यातील शो-रूममधून टीव्हीएस-50 न्यायची, अशी व्यवस्था करण्यात आली होती. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात केवळ आठ टीव्हीएस-50 नेण्यात आल्या. यावरून लोकांनी किती ठरवून उमेदवारांना घराचा रस्ता दाखवला, याची चुणूक मिळते.

तमिळनाडूत जनतेवर मोठा प्रभाव असलेले चित्रतारकाही द्रामुकच्या विरोधात गेल्याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी पक्षाला बसला. दोन वर्षांपूर्वी करुणानिधी यांच्या चित्रपट उद्योगातील कामगिरीसाठी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचे कर्ते-करविते अर्थातच करुणानिधींचे बगलबच्चेच होते. त्या कार्यक्रमात अजित या लोकप्रिय तरुण अभिनेत्याने द्रामुकच्या नेत्यांकडून चित्रपट कलाकारांचा किती छळ केला जातो, या कलाकारांना कसे वेठीस धरण्यात येते याचे जाहीरपणे वाभाडे काढले. तो हा कैफियत मांडत असताना रजनीकांतने उठून उभे राहून आणि टाळ्या वाजवून दाद दिली होती.

'इळैय दळपदि' (तरुण सेनापती) या नावाने ओळखला जाणारा विजय याने निवडणुकीच्या काही दिवस आधीच अण्णा द्रामुकमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजयच्या दोन चित्रपटांची (वेट्टैकारन् आणि कावलन्) निर्मिती मारन कुटुंबियांच्या सन पिक्चर्सने केली होती. मारन कुटुंबियांशी वितुष्ट आल्यानंतर करुणानिधी कुटुंबाने त्यांच्या व्यवसायात अडथळे निर्माण करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. त्यात विजयचे चित्रपटही भरडल्या गेले. त्याचा परिपाक त्याने अण्णा द्रामुकशी जवळीक दाखविण्यात झाली. मात्र चतुर जयललिता यांनी यावेळी चित्रपट कलाकारांवर भिस्त न ठेवता स्वतःच्या आराखड्यांनुसारच रणनीती ठेवली. विजयकांत आणि सरतकुमार या दोन अभिनेते-राजकारण्यांच्या पक्षाशी युती केली, तरी त्यांनी त्यांच्यासोबत प्रचारसभा घेतल्या नाहीत. याऐवजी आंध्रातील चंद्राबाबू नायडू यांना आमंत्रित करून त्यांच्या सभा आंध्राच्या सीमेजवळील भागात त्यांच्या सभा घेतल्या.

महाराष्ट्राप्रमाणेच याही निवडणुकीत पैशांच्या आधारावर मतदारांना विकत घेण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाला. निवडणूक आयोगाने जप्त केलेल्या पैशांचेच प्रमाण ७५ ते ८० टक्क्यांच्या घरात जाते. जयललिता त्यांच्या मागील स्वभावाप्रमाणे वागल्या, तर या पैसे वाटण्याच्या प्रकरणात स्टॅलिनना अडकवून त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावतील, याची दाट शक्यता आहे.  करुणानिधींच्या सत्ताकाळात बांधलेल्या नवीन विधानसभा इमारतीत जाण्याऐवजी जुन्या इमारतीतूनच काम चालविण्याची घोषणा करून जयललिता यांनी स्वतःच्या कणखरपणाची झलक दाखविली आहे.

लोकांनी द्रामुकला इतक्या कठोरपणे धुडकावले आहे, की ३३ जागा मिळविणारा देसिय मुरपोक्कु द्राविड कळगम हा विजयकांत यांचा पक्ष द्रामुकपेक्षा वरचढ ठरला आहे. अण्णा द्रामुकला स्वबळावर सत्ता मिळाली आहे. त्यामुळे युतीतील सहकारी असला, तरी 'देमुद्राक'ला विरोधी पक्ष म्हणून मान्यता देऊन जयललिता करुणानिधींचा पत्ता साफ करू शकतात. शपथविधी समारंभाला मला बोलाविल्यास मी जाईन, असं विजयकांत म्हणाल्याची आजची बातमी आहे. ती बरीचशी सूचक आहे.