Monday, February 14, 2011

मुंह देखने वालों के लिये जाम नही है...

मुंह देखने वालों के लिये जाम नहीं है

मासूम फरीश्तों का ये काम नहीं है...

प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या आवाजातील ही गझल. ती ऐकताना वेगळ्या संवेदना निर्माण होत असल्या तरी गेल्या आठवड्यात इजिप्तमध्ये झालेल्या घडामोडींमुळे या ओळी परत आठवल्या.

अध्यक्ष होस्नी मुबारक यांनी पदत्याग केला आणि इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगमुळे इजिप्तमध्ये क्रांती झाल्याचे यच्चयावत प्रसारमाध्यमांनी जाहीर करून टाकले. जणू काही इंटरनेट नसते तर इजिप्तमध्ये भावना आणि आकांक्षा दडपलेल्या हजारो युवकांनी स्वतःची शक्ती दाखवून देण्याची संधी कधीही मिळाली नसती.

तहरीर चौकात गर्दी करणाऱ्या असंख्य युवकांना आंतरजालावरील आवाहनामुळेच तेथे उपस्थित राहण्याचे बळ मिळाले, हे मलाही मान्य आहे. मात्र त्या युवकांचे चौकात उपस्थित राहणे, हेच या रक्तविहीन क्रांतीचे इंगित होय, असंही मला वाटतंय.

इजिप्तच्या युवकांएवढेच दडपशाहीला तोंड देणारे जगात अनेक युवक आहेत. त्या त्या देशांच्या सरकारांना हात न लावता त्यांना सोशल नेटवर्किंग करणेही शक्य आहे. लोकशाही आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चीनमध्येही बायडू सारखी संकेतस्थळे आहेतच. मात्र आपल्या देशात चाललंय ते अत्यंत हीन आहे आणि त्याचा पाडाव केलाच पाहिजे, ही ऊर्मी निर्माण होणं अधिक महत्त्वाचं आहे. ही ऊर्मी निर्माण झालेली नसेल, तर शेकड्यांनी सोशल नेटवर्किंग स्थळांवर खंडीभर बायटी उधळूनही क्रांतीतर सोडाच, साधी राजकीय घडामोडही होऊ शकत नाही हे भारताच्या स्थितीवरून दिसून येतं.

मुंबईत २६ नोव्हेंबर २०११ रोजी झालेल्या हल्ल्याच्या वेळेस काय कमी क्षोभ झाला होता? त्यावेळी भारतात ऑनलाईन क्रांती झाल्यासारखीच परिस्थिती होती. इजिप्तवर केवळ हुकूमशहाचीच दडपशाही होती. इथे तर आपल्यातूनच फुटून निघालेल्या परकीयांनी आपल्या सत्ताधाऱ्यांच्या नेभळटपणाचा आणि भोंगळपणाचा फायदा उचलून हल्ला केला होता. त्यावेळी फेसबुक किंवा ऑर्कूटसारख्या संकेतस्थळांवर निषेध उतू जात होता. त्याचे पुढे काय झाले?

एसी केबिनमध्ये बसून निषेधाच्या गप्पा केल्याने किंवा राजकारण्यांच्या नावाने खडे फोडल्याने क्रांती होत नसते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान वर्तमानपत्रे ही आजच्या आंतरजालाप्रमाणेच माध्यम म्हणून मान्यता पावत होती. त्यावेळी वर्तमानपत्रांनी बजावलेली भूमिका आजच्या फेसबुकपेक्षा काही कमी नव्हती. त्यामुळे आंतरजाल असो वा नसो, क्रांती योग्य ती जागा पाहूनच जन्म घेते. याच क्रांतीच्या दरम्यानचे एक प्रसिद्ध चित्र, Liberty Leads Itself, हे या संदर्भात मोठे अन्वर्थक आहे.

LIbert Leads Itself…फ्रेंच राज्यक्रांती दरम्यानचे अन्वर्थक चित्र. सौजन्यः dipity.com

त्यामुळे इजिप्तमध्ये क्रांतीची दखल करताना आणि तेथील सत्तांतराचे स्वागत करतानाच, केवळ आंतरजालामुळे हे घडले नाही, तर लोकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन जीवाची बाजी लावल्याने हे घडल्याचे लक्षात घ्यावेच लागेल. नसता आज ५-७ टक्के असलेला भारतातील आंतरजालाचा वापर दहा पट वाढला म्हणजे क्रांती होईल, असा वावगा आशावाद जन्माला येईल.