Thursday, April 1, 2010

द. भि., मराठी, कन्नड, फ्रेंच व जर्मन इ. इ.

चला. अपेक्षेप्रमाणे मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यापेक्षा अन्य बाबींवरच चर्चा झाली. अमिताभ बच्चन यांना बोलावून जो काही 'राग'रंग आयोजकांना निर्माण करायचा होता, तो तर झालाच. किंबहुना त्याहूनही बराच जास्त झाला. एरवी साहित्य संस्थाची पाटिलकी करणाऱ्यांना नाही तरी अध्यक्षांचे 'कौतिक' जास्त होऊ नये, याची काळजी लागलेलीच असते. त्यामुळे तीन दिवसांच्या या उत्सवात मराठी, साहित्य किंवा समाज यांना नवीन काहीतरी देणारे काय घडले, याबद्दल शंकेला पुरेपूर वाव आहे. नाही म्हणायला परवा पुण्यात संमेलनाच्या यशापयशाचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यातील चर्चा नेहमीच्या अभि'जात' मार्गाने झाल्यामुळे तो प्रयत्न बाळसं धरण्यापूर्वीच संपला.

खरं तर अध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांनी त्यांच्या भाषणात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. साहित्य संमेलन किंवा तत्संबंधित व्यासपीठावर त्याची चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. पण कसचं काय? गुळाचा गणपती बसवावा, तसा अध्यक्ष बसविला. तो काय बोलला याच्याशी कोणाला काय देणंघेणं होतं? मराठी भाषेच्या शब्दसमृद्धीच्या संदर्भात बोलताना, द. भि. म्हणाले, मराठीला समृद्ध करायचे असेल तर परिभाषा आणि बोली भाषांतील शब्द अधिकाधिक स्वीकारून भाषा समृद्ध करता येते. परिभाषा ही भाषेसाठी आवश्यक आहे, तिची कितीही चेष्टा केली तरी तिच्यावाचून चालू शकत नाही, हे कोणीतरी सांगणे आवश्यक होते. एरवी मराठी साहित्यिकांमध्ये आजवर नवीन शब्दांची चेष्टा करण्याची टूमच चालत आलेली आहे. संस्कृतच्या नावाने खडे फोडत चांगल्या शब्दांना विरोध करायचा आणि स्वतः नवीन शब्द देण्याच्या बाबतीत शून्य योगदान द्यायचं, ही या साहित्यिकांची खासियत.

राज्य सरकारने स्वीकारलेल्या मराठी परिभाषेला सर्वात मोठा विरोध केला होता तो आचार्य अत्रे यांनी. डॉ. रघुवीर यांच्या नेतृत्वाखालील समितीने हा परिभाषा कोश तयार केला. होता. त्याच्यावर अत्र्यांनी उठवलेली झोड आमदार अत्रे या पुस्तकात मूळातून वाचण्यासारखी आहे. राज्यपाल या शब्दाला विरोध करताना अत्र्यांनी म्हटले होते, की राज्यपाल ही राज्यावर चढलेली पाल आहे का? "मी एका विद्यार्थ्याला विचारले, विजयालक्ष्मी पंडीत कोण आहेत. तो म्हणाला त्या महाराष्ट्रावर चढलेली पाल आहे," हे त्यांचं वाक्य अगदी मनावर ठसलेलं आहे. गंमत म्हणजे हाच शब्द इतका रुळला आहे, की आज या शब्दाला असा काही विरोध झाला असेल, हे कोणाला खरेही वाटणार नाही. याचप्रमाणे या कोशातील अन्य शब्दांनाही त्यांनी विरोध केला होता. अधीक्षक, निरीक्षक, प्रशासक अशा अनेक पदनामांची भर या कोशाने मराठीत टाकली व आज ते सर्वत्र प्रचलित आहेत. आचार्य अत्रे यांनी या पदनाम कोशाची संभावना 'बदनाम कोश' अशी केली होती. ते विरोध करू शकत होते, कारण त्यांचे कर्तृत्व तसे होते. त्यांच्या नंतरच्या लोकांनी विरोधाची परंपरा कायम ठेवली पण कर्तृत्वाची नाही. सरकारी पत्रकांची आणि पत्रांची यथेच्छ टवाळी करणारे लेखन मराठीत निर्माण झाले. मात्र टीका करणाऱ्यांनी त्याला पर्याय म्हणून स्वतः काहीच केले नाही. त्यामुळे गेली चाळीस वर्षे सरकार भाषेसाठी दिशाहीनपणे काहीतरी करतंय आणि साहित्यिक त्याला विरोध करतायत, असं विचित्र दृश्य महाराष्ट्रात निर्माण झालं.

इंग्रजीला प्रतिशब्द देताना संस्कृतचा आधार घेण्याची सरकारी पद्धत आहे. संस्कृतचं नाव काढलं, की अनेकांच्या भुवया वर चढतात. असे अवघड शब्द तरुण पिढीतील मुलांना कसे झेपणार, हा त्यांचा सवाल असतो. गंमत म्हणजे हा विरोध करणाऱ्यांना मराठीतील बोली भाषांतील शब्दांचाही गंध नसतो. आता मराठीचाच नसतो म्हटल्यावर मराठीशी अगदी जवळचा संबंध असलेल्या द्रविड कुळातील भाषांचा प्रश्नच नाही. तसं नसतं, तर मराठी, कन्नड आणि तेलुगु या एकमेकांशी जवळच्या संबंध असलेल्या भाषांमध्ये काही आदानप्रदान घडले असते. दुर्दैवाने तसे होत नाही. त्यामुळे धार इकडे ना तिकडे अशी अवस्था झाली आहे. राजकीय पक्ष आपली आंदोलने चालविताना अन्य भाषांची उदाहरणे देतात, मात्र अन्य भाषांच्या बाबतीत ती भाषा पुढे नेण्यासाठी जे प्रयत्न चालू असतात त्यांची दाखलही धेण्यात येत नाही. इथे प्रयत्नही नाहीत आणि त्यांची दाखलही नाही.

या संमेलनाची आयोजक संस्था महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठीसाठी किती कोश निर्माण केले वा अन्य कोणते प्रयत्न केले, ते परिषदेच्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर भरलेल्या संमेलनात मांडले असते, तर बरे झाले असते. परिषदेचे जाऊ द्या, अन्य कोणी करत असेल तर त्यांची तरी दाखल घ्यावी कि नाही? पुण्यात फ्युएल नावाचा एक गट आहे. मोझील्ला तसेच अन्य मोफत व मुक्त स्रोत सोफ्टवेअरसाठी मराठी प्रतिशब्दांची निर्मिती (हा शब्द जाणून बुजून वापरलेला आहे) करण्याचा स्तुत्य उपक्रम हि मंडळी राबवितात. हाय टेक संमेलनाच्या बातम्या सगळीकडे अहमहमिकेने छापून आणणारे संयोजक या मंडळीना विसरले. मुद्दा या एका गटाचा नाही.

यांसारखी अनेक मंडळी त्यांच्या त्यांच्या परीने काम करत आहेत. (उदा. शब्दभांडार -हा तर खऱ्या अर्थाने समस्त मराठी जणांचा शब्दयज्ञ आहे.) त्यांची दाखल तुम्ही घेणार की नाही हा प्रश्न आहे. जर नसाल, तर नव्या पारिभाषिक संज्ञा निर्माण झालेल्या तुम्हाला कशा कळतील? याचाच अर्थ, नवे शब्द आणि संकल्पना भाषेत रुजविण्यासाठी लोकांनी प्रयत्न करावेत असे दभिंचे भाषण सांगत असले, तरी त्याची खरी गरज साहित्यिक आणि त्यांच्या संस्थांनाच आहे.
(कन्नड व अन्य भाषांतील शब्दनिर्मितीचे प्रयत्न पुढील भागात. )

Sunday, March 28, 2010

सीएम जाए पर बच्चन न जाए!

Amitabh Satakar साहित्य संमेलनाच्या मांडवातून आताच परतलो आहे. पहिल्यांदा चांगली वार्ता. संमेलनाच्या मांडवात प्रचंड म्हणावी अशी गर्दी पुस्तकांच्या दालनात होती. एकीकडे अमिताभ बच्चनचा कार्यक्रम चालू असतानाही दृष्ट लागाव्या अशा उत्साहाने लोकं पुस्तकांची चळत पाहत, न्याहाळत, हाताळत होते. माझ्यासारख्या काकदृष्टी माणसाला हा एक कल्चर शॉक होता. लोकांनी किती पुस्तके विकत घेतली, कोणत्या प्रकारची विकत घेतली हा वेगळा मुद्दा आहे. मात्र मुद्रीत माध्यमं हळूहळू कालबाह्य होत असल्याची समजूत करून घेतलेल्या मला, एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तके पाहण्यासाठी का होईना, येताहेत ही एक धक्कादायक गोष्ट आहे.

बरं, हे नुसतेच पुस्तकांचे दालन नव्हते. पुण्यात पुस्तक प्रदर्शन ही फार मोठी कौतुकाची गोष्ट नाही. मात्र विस्तार, प्रतिनिधीत्व आणि पुस्तकांची संख्या-प्रकार यादृष्टीनेही हे दालन अन्य प्रदर्शनांपेक्षा वेगळे होते. मला खरोखरच आवडले ते.  अगदी राज्य शासनाच्या स्टॉलवरील कन्नड साहित्य परिचय या पुस्तकानेही मला भूरळ घातली होती. मात्र अशा प्रकारची पुस्तके नेटवर सर्रास मिळत असल्याने मी तो मोह टाळला. बाहेर आलो तोवर पडद्यावरचा अभिनयसम्राट खरोखर महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा हा हुकुमी मंत्र आळवून समोरच्यांवर भुरळ पाडण्यात यशस्वी झाला होता.

अलीबाबाच्या गोष्टीत एक शीळा उघडण्यासाठी पासवर्ड होता. तसाच महाराष्ट्रात हे वरील चार शब्द बोलले की  टाळ्यांचा खजिना हमखास. बाहेर वाटेल ते पुरस्कार स्वीकारून महाराष्ट्रात मात्र स्वतःच्या मनाप्रमाणे मंत्र्यांना नाचविणाऱ्या म्हाताऱ्या नट्याही हे चारच (त्यापेक्षा जास्त बोलले की पैसे कट!) शब्द बोलून अनेकांना डोलवायला लागतात. “68 वर्षांपैकी 38 वर्षे मी महाराष्ट्रात राहिलो,” हे बच्चन यांचे बोल चॅनेलवर ओथंबून गळायला सुरवात झाली आहे. उद्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर त्याचे ओरखडे दिसू लागतील. चार दशकांत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात शून्य योगदान देणाऱ्या व्यक्तींकडून मराठीचा गौरव ऐकून अंगावर रोमांच उठावेत, इतकी का अमृतात भेसळ झाली आहे? बच्चन महाशयांनी विंदा, ज्ञानेश्वर, एकनाथ अशा अनेकांचा उल्लेख केला. सुरेश भटांच्या ओळी म्हटल्या. कौशल इनामदारांचा सत्कार केला. आयुष्यभर मेकअपमनचं काम केलेल्या कामगाराकडे, कारकीर्दीत मुख्य भूमिका मिळेनाशा झाल्यावर बच्चन महाशयांनी मराठी चित्रपट केला. वरच्या भाषणातील संत-कवींची माहिती लिहून देणाऱ्यास ते पुढेमागे एखादी जाहिरात फुकट करून देतील, अशी अपेक्षा करूया.

जानेवारी फेब्रुवारी 2008 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बच्चन यांच्यावर शरसंधान केले नसते, तर त्यांना ही सगळी महती कळाली असती का? मनसेच्या आंदोलनावेळीस कॉंग्रेसप्रणीत माध्यम व लुडबुडी मंडळी छोरा गंगा किनारेवालाच्या बाजूने होती. त्यामुळेच विनाकारण, संबंध नसताना बच्चन यांना साहित्य संमेलनाची निमंत्रणे गेली. खासदार सुरेश कलमाडी, आमदार उल्हास पवार आणि नगरसेवक सतीश देसाई ही संमेलनाच्या आयोजकांतील कारभारी माणसे पाहिली की हा डाव लक्षात येतो. आयोजकांच्या दुर्दैवाने संमेलनाच्या वेळेपर्यंत सर्वच भूमिकांची अदलाबदल झाली. नायक बच्चन कॉंग्रेससाठी खलनायक झाले. त्यामुळे चव्हाण बिचारे ‘बच्चन के रहना रे बाब’ करत फिरत होते.

अशोक चव्हाण यांची लाचारी आपण एका बाजूस ठेऊया. (त्यांनी जशी लोकलज्जा ठेवली आहे तशी.)  मात्र वांद्रेच्या कार्यक्रमात त्यांनी आडमार्गे उपस्थित केलेला मुद्दा काय चुकीचा होता? सी-लिंकच्या कार्यक्रमात अमिताभला मानाने बोलवावे अशी कोणती मर्दुमकी त्यांनी गाजविली आहे? त्या पुलासाठी त्यांनी काही रक्कम दिली आहे का? संमेलनाहून परतताना बच्चन यांची गाडी जाईपर्यंत गेटवर चेंगराचेंगरी व्हायची बाकी राहिली होती. अनेक वृद्ध लोकांची (व त्यांची संख्या पुण्यात काही कमी नाही) जी काय गत झाली, त्यातून कुठली साहित्यसेवा आयोजकांनी केली. अमिताभला पाहण्यासाठी आलेल्या रसिकांची गुणवत्ता एका उदाहरणात दिसून येते. आपण अग्निपथ ही कविता वाचणार म्हटल्यावर प्रेक्षकांना बच्चन आता ‘अग्निपथ’मधील संवाद म्हणणार असेच वाटले. काय आरोळ्या उठल्या. पुढच्या दोन मिनिटांत मंडपात शांतता! मग आयत्या घरात घरोबा अशी त्यांना वागणूक कशासाठी. चित्रपट अभिनेत्यांनी, त्यातही बॉलिवूडच्या लाडावलेल्या दिवट्यांनी असे काय केले आहे, की समाजाच्या प्रत्येक घडामोडीत त्यांच्या उपस्थितीची आम्हाला गरज भासते आहे. धन्य ते प्रेक्षक, धन्य ते आयोजक आणि धन्य धन्य ते साहित्यसेवक!