Tuesday, September 5, 2017

खाप पंचायती आणि लिबरल पंचायती

गेल्या काही वर्षांपासून उत्तर भारतातील खाप पंचायतीचे नाव वारंवार चर्चेत येते. या खाप पंचायती म्हणजे जाती–जातींमध्ये आपसात निवाडा करण्याचे व्यासपीठ. त्यांना राज्यघटनेअंतर्गत स्थापन झालेल्या न्यायालयांची ना तमा असते ना भीती. हम करे सो कायदा और हम करे सो फैसला, हा त्यांचा खाक्या. आपल्या मागासपणामुळे आणि कालबाह्य निर्णयांमुळे या खाप पंचायती बुद्धिवाद्यांच्या नेहमीच रडारवर असतात.


पण गंमत म्हणजे देशातील लिबरलांची स्थिती काही वेगळी नसते. त्यांनी स्वतःचे निर्णय घेऊन टाकलेले असतात. त्यांनी श्रद्धा ठेवलेले वाक्य हा अंतिम शब्द असतो आणि त्याच्या विरोधात ब्र काढणे हे सुद्धा अब्रह्मण्यम् असते.


कर्नाटकातील गौरी लंकेश यांच्या हत्येने ही वस्तुस्थिती परत समोर आली आहे. बंगळुरुतील राहत्या घराबाहेर गौरी लंकेश यांची यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. ‘लंकेश पत्रिके‘ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या प्रमुख होत्या. मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास तिघा आरोपींनी त्यांना घराबाहेर बोलावलं. त्यांच्यासोबत झालेल्या वादावादीनंतर आरोपींनी गौरी यांच्यावर गोळ्या झाडून पोबारा केला.


मारेकऱ्यांनी गौरी लंकेश यांच्यावर 50 मीटर अंतरावरुन सात गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. या घटनेनंतर लगोलग लिबरल व सेक्युलरांनी नेहमीप्रमाणे ट्वीटाट्वीट सुरू केली. काही जणांनी फेसबुकवर पोस्टी टाकल्या. त्यांच्या हत्येची जी बातमी आली, त्यात त्या ‘भाजप/संघ/उजव्या विचारसरणीविरुद्ध‘ लिहायच्या हे त्यांचे क्वालिफिकेशन आवर्जून दिलेले होते. आणि ज्याअर्थी त्या भाजप/संघाविरुद्ध लिहायच्या त्याअर्थी त्यांचा खून त्यांनीच केला, हे लिबरल खापांनी ठरवूनही राहिले असते.


वास्तविक ज्यावेळी त्यांची हत्या झाली, त्यावेळी गौरी या सिद्धरामैय्या सरकारच्या भ्रष्टाचारावर एका बातमीवर काम करत होत्या. त्यापेक्षाही म्हणजे त्यांच्या स्वतःच्या डाव्या गोतावळ्यात अनेक चिरफळ्या उडालेल्या होत्या. “आपल्यापैकी काही जण आपसात भांडत आहेत, आपण एकमेकांना एक्स्पोझ करू नये, एकमेकांना सांभाळून घेऊन आपल्या सर्वात मोठ्या शत्रूशी लढायला हवे,” असे त्यांनी सकाळी 3:30 वाजता केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.


गौरी राहिल्या असत्या तर कोणाला तरी नक्कीच फरक पडला असता. त्यामुळेच त्यांना संपविण्याचा डाव रचला गेला असावा. आपल्यापैकी काही जण चुकू शकतात, आपापसात भांडणे नको, ‘एक्स्पोझ‘ करू नये असे का म्हणाल्या? म्हणजेच असे प्रयत्न चालू होते? या हत्येमागील नक्षलवाद्यांच्या संबंधांचा तपास करू, असे कर्नाटकचे काँग्रेस मंत्री का म्हणतात? त्यांची ‘वादावादी‘ नक्की काय झाली होती?


भाजप/संघाने त्यांना संपविण्याचे काही कारण नव्हते. गौरी लंकेश यांच्यावर बदनमीचा खटला चालून त्यांना शिक्षाही झाली होती. याचाच अर्थ भाजप/संघ यांनी सनदशीर मार्ग अवलंबिला होता आणि त्यात यशही मिळविले होते. त्यासाठी सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तेव्हा त्यांना आणखी जीवे मारण्याची गरज संघ/भाजपला नव्हती.


दुसरीकडे गौरी लंकेश पक्क्या नक्षल समर्थक म्हणून कर्नाटकाला परिचित होत्या. तेच त्यांच्यावर उलटले नसतील कशावरून? One who lives by bullet dies by bullet. अन् हिंदुत्ववादी/संघ विरोधक म्हणजे लोकशाहीवादी नाही. तरीही सगळे सेक्युलर/लिबरल हत्येनंतर पाच मिनिटांत खुनाचा उलगडा झाल्यासारखे हायतौबा करायला लागले. कारण दोषी कोणाला ठरवायचे, हे त्यांच्या खाप पंचायतीने ठरवून टाकले होते.


अनेकदा असे होते, की तपासाच्या सुरूवातीला चुकीच्या दिशेने तपास झाला की नंतर ती केस भरकटत जाते. इंद्राणी मुखर्जीच्या केसमध्ये तिच्या मुलीचा खून झाला, हेच दोन वर्षांनी समोर आले होते. कारण तोपर्यंत धागेदोरेच मिळाले नव्हते. त्याप्रमाणे या केसमध्येही होऊ शकते. दाभोलकरांचा खून झाला 2013 साली. त्यानंतर एक वर्ष त्या तपासाला गतीच मिळाली नाही. तपास करताना अधिकाऱ्यांना ट्वीटर/फेसबुक आणि प्रेस रिलीजमधून कोण काय म्हणतोय, याच्यापेक्षा कृत्यामागचे मोटीव्ह लक्षात घ्यावे लागते. त्यावेळी तसे झाले नाही. फक्त सनातनने खून केला, या गृहितकावर (निर्णयावर) तपास चालू राहिला. म्हणूनच मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना झापले. “मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून तुम्ही तपास करता का,” असे खुद्द न्यायालयानेच म्हटले होते. पण लिबरल खापांना न्यायालयाची पर्वाच कुठे आहे?


त्यांनी कानफाट्या ठरवून टाकला आहे आणि सगळ्या गावाचा दोषारोप त्याच्यावर करण्याचेही ठरवून टाकले आहे. अन् त्याच्यावर अवघड कोणी प्रश्न विचारला, की खापवाले जसे वाळीत टाकतात, तसे ‘भक्त‘ म्हणून त्याची संभावना करतात. म्हणजेच शहाणपण आतापर्यंत फक्त सत्तेपुढे चालत नसे. आता ते लिबरलांपुढेही चालत नाही, असे म्हणावे लागेल.


अपडेट – या लेखाचा उद्देश लिबरलांच्या एकांगीपणाचा व निवडकपणाचा निर्देश करणे हा आहे. त्यातून गौरी लंकेश यांच्या हत्येचे समर्थन करण्याचा कोणताही हेतू नाही. त्यांची हत्या निषेधार्हच आहे. हे स्पष्टपणे सांगण्याची सूचना काही वाचकांनी केल्यामुळे हे आवर्जून लिहीत आहे.