मी या जगात आलो तेव्हापासून हे जग सुधारण्याची मला तीव्र तळमळ होती. मात्र काय करणार, एक सामान्य माणूस म्हणून माझ्या हातात काही शस्त्र नव्हते. त्यामुळे "उद्धवा, अजब तुझे सरकार' असे गात (मनातल्या मनात) मला रहावे लागत असे. मात्र पाच वर्षांपूर्वी या भारतवर्षात वृत्तवाहिन्यांनी "संभवामि युगे युगे' करत अवतार घेतला आणि समस्त "विनाशायच दुष्कृतां' होऊ लागले. तरीही काहीतरी उणं असल्याची जाणीव मनाला बोचत होती. त्या विनाशाच्या कामात आपला खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळत नव्हती. त्यामुळे रुखरुख लागून राहिली होती. मात्र दोन वर्षांपूर्वी देशात मोबाईल क्रांती होऊ लागली. या मोबाईल क्रांतीने स्वतःची पिल्ले खाण्याऐवजी वेगळ्या पिल्लांना जन्म दिला. त्यातून संवादाचे पूल उभारले जाऊ लागले. त्यातच आमच्या हाती एक अजब उपकरण आले, त्याचा उपयोग आम्ही कधी शस्त्र तर कधी साधन म्हणून करू लागलो. ते शस्त्र म्हणजे एसएमएस.
या साधनाने मी या जगात एवढी उलथापालथ केली आहे, जगाचा एवढा चेहरामोहरा बदलला आहे, की मला आता लोकांनी "एसएमएस्शाह' (शहेनशहाच्या धर्तीवर) म्हणायला हरकत नाही.या जगातील विषमता, अज्ञान, अन्याय वगैरे निरनिराळे दुर्गुण पाहून पूर्वी मला चीड यायची. आता मात्र मी मोबाईलच्या काही कळा दाबून जगाची ही अवकळा बदलू शकतो. मी एक एसएमएस करायचा अवकाश, या जगात जे काही उदात्त, मंगल वगैरे व्हायचे असेल ते घडू शकते. देशाच्या राष्ट्रपतीपदी प्रतिभाताई पाटील याच निवडून याव्यात, असे मत मी तीन वाहिन्यांना एसएमएसद्वारे पाठविले होते. आज बघा, त्या निवडून आल्या आहेत. तेही प्रचंड मतांनी. मी एकच एसएमएस केला असता तर त्या साध्या निवडून आल्या असत्या. भारतात अतिवृष्टीचे प्रमाण ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेल्या हवामानातील बदलांमुळेच वाढले आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी व्हायला पाहिजे, असे मत मी एका हिंदी वाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमानंतर एसएमएसद्वारे नोंदविले होते. त्याचा परिणाम म्हणून तापमानवाढही कमी झाली आणि त्यामुळे अतिवृष्टीही कमी झाली. माझ्या एसएमएसमुळेच हा क्रांतीकारी परिणाम झाला.
एकदा आम्ही कुटुंबासह भाजी खरेदी करून घरी परतत होतो. त्या दिवशी भोपळा दोन रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे एकदम पाच किलो विकत घेतले होते. रस्त्यातच एका दुकानात अमेरिकी सैनिकांना इराकमधून परत बोलाविण्याबद्दल सिनेटमध्ये चाललेल्या चर्चेची बातमी दाखवत होते. लगेच घरी येताच आधी ती वाहिनी लावली. त्यानंतर केला एक एसएमएस...‘इराकमध्ये अमेरिकी साम्राज्यवादी धोरणांची हद्द झाली असून, अमेरिकी सैन्य परत आलेच पाहिजे.’ गंमत बघा, दुसऱ्याच दिवशी इराकमधील अमेरिकी सैनिकांसाठी निधी वाढविण्यास सिनेटने नकार दिला.
संपूर्ण जंबुद्वीपाच्या (भारताचे प्राचीन नाव हो. "इंडियन सबकॉन्टिनंट'ची एकात्मता दर्शविण्यासाठी हेच नाव पाहिजे) जनतेप्रमाणे क्रिकेट हा माझाही जन्मसिद्ध हक्क आहे. क्रिकेट हा खेळण्यासाठी नसून, आपली तज्ज्ञ मतं व्यक्त करण्यासाठी केलेली सोय आहे, यावरही माझी इतरांपेक्षा अंमळ जास्तच श्रद्धा आहे. त्यामुळे त्याच श्रद्धेचे प्रतिबिंब एसएमएसमधूनही पडायला नको? त्यामुळेच विविध वाहिन्यांवर क्रिकेटची कॉमेंटरी कमी पडेल एवढे एसएमएस मी केले. त्याचा परिणामही भारतीय संघाच्या कामगिरीवर पडलेला दिसला. संघाची तयारी कमी आहे, असा एसएमएस मी संघ वेस्ट इंडिजला जाण्यापूर्वीच केला होता. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत संघाची झालेली वाताहात सर्वांच्या समोर आहे. या पराभवातूनही संघ सावरेल, असा एसएमएस मी एका वाहिनीला केला होता. त्यानंतर भारतीय संघाने बांगलादेशमध्ये विजय मिळविला, दक्षिण आफ्रिकेतही चांगली कामगिरी केली.
एसएमएस बाबत मी एवढा तज्ज्ञ झाल्यामुळे माझा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. मात्र त्याचा मला कधी कधी अवचित फटका बसतो. एक हिंदी वृत्तवाहिनी एका प्रेमप्रकरणाचा "आँखो देखा हाल' प्रसारीत करत होती. त्यावर प्रथेप्रमाणे प्रतिक्रियांचे एसएमएसही मागविले होते. मीही अशा बाबती मागे राहतो काय? मीही एसएमएस केला. "प्रेमप्रकरण ही काळाची गरज असून, प्रत्येकाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे,' अशा आशयाचा एसएमएस मी केला होता. कसा माहित नाही, तो एसएमएस जायच्या जागी न जाता वाट चुकला आणि वाहिनीऐवजी एका "वहिनी'च्या मोबाईलवर पोचला. त्यानंतर माझे हाल येथे सांगण्यासारखे नाहीत. मात्र जगाच्या सुधारणेचा वसा घेतलेला असल्याने आणि एसएमएस या माध्यमावर माझी नितांत श्रद्धा असल्याने अशा क्षुल्लक प्रकारांनी विचलीत होणाऱ्यांपैकी मी नाही.
या जगात सर्व तऱ्हेचे परिवर्तन मी एसएमएसच्या माध्यमातून करू शकेन, याचा मला विश्वास आहे. तुमच्या गल्लीतील रस्त्यावर खड्डा पडला आहे? राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास नकार दिला आहे? केंद्रातील मंत्रिमंडळातून एखाद्या मंत्र्याला काढावे, असे तुम्हाला वाटते? आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळावा, असे तुम्हाला वाटते? जगात सगळीकडे दहशतवाद आणि अशांतता पसरली असून, केवळ भारतीय संस्कृतीच ही परिस्थिती बदलू शकते, असे तुम्हाला वाटते?आधुनिक विज्ञानाचा अध्यात्माशी आणि शिक्षणाचा अज्ञानाशी मेळ घालायला हवा, असे तुम्हाला वाटते? ईश्वर हा एखादा करबुडवा सरकारी कर्मचारी असून, त्याला रिटायर करायला हवे, असे तुम्हाला वाटते? तुम्हाला काहीही वाटत नसलं तरी तुमचे नाव सगळीकडे पोचायला पाहिजे, असे तुम्हाला वाटते?
प्रश्न अनेक, उत्तर मात्र एक आणि एकच! एसएमएस!!!
सर्व समस्यांवर रामबाण उपाय. हे विश्व घडविणाऱ्या ब्रह्मदेवालाही एवढ्या घडामोडींवर मार्ग काढणारा आणि घडामोड करणारा एसएमएस घडविता आला नाही. आधुनिक विज्ञानाने हे साधन शोधून या जगात सर्व विषयांत तज्ज्ञ असलेल्यांची एक नवी जमात निर्माण केली आहे. त्याबद्दल विज्ञानाचे आभार आणि तुम्हाला काय वाटतं, एसएमएस हे खरंच क्रांतीकारी साधन आहे का. तुमची मतं जरूर एसएमएसने कळवा हं.