Saturday, January 22, 2011

महाबळेश्वरचे गौडबंगाल-२

महाबळेश्वर पहिल्या फेरीच्या वेळीस हे शुल्क देणे आवश्यक होते. दुसऱ्या फेरीच्या वेळीस वेगळाच प्रकार. पावत्याची बंडले हातात घेतलेली माणसे रस्त्यात उभे राहतात. प्रशासनभीरू वाहनचालकाने गाडी थांबवली तर रक्कम वसूल करण्यात येते. अन्यथा तसेच पुढे जाऊ देतात. म्हणजे शुल्क अधिकृत नाही, पण लोकांनी दिलेच तर कशाला नाकारा असा काहीसा प्रकार असावा.

वाईचे आमदार मकरंद पाटील म्हणतात, "या करातून किती वसुली होते, त्याचा आढावा घेण्यास सांगितले आहे. जर ही रक्कम अगदीच मामुली असेल, तर हा कर रद्द करण्यात येईल." आता आठ वर्षांनंतर ही जाग येण्याचं कारण म्हणजे लोकांकडून पैसै घेऊनही शहराच्या दृष्टीने त्याचा विनियोग झालेला नाही. त्यामुळे गेल्या महिन्यात 'सीझन'च्या सुरुवातीलाच टॅक्सी चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला. शिवसेनेने महाबळेश्वर बंदचे आवाहन केले.

त्यावेळी प्रशासन थोडेसे हलले आणि व्यवसायाच्या काळात खोटी नको म्हणून रस्ते तयार करण्याचे आश्वासन देण्यात आले. आता महाबळेश्वरला रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. मात्र त्याचा पहिला घाला पडला तेथील वृक्षांवर. मोठ्या गाड्या आणि वाहने यांच्या रस्त्यात झाडांच्या फांद्या येतात, असे कारण देऊन झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही वर्षांत हॉटेल आणि रिसॉर्ट्सचे पीकच आले आहे. भारतातील सर्वात उंचीवरचा मानवनिर्मित उन्हाळ्यातील धबधबा अशा पाट्या मिरविणारी हॉटेल्स जागोजागी उभी राहिली आहेत. आज ज्या ठिकाणी ही हॉटेल्स उभी आहेत, तिथले वृक्ष काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

अशा परिस्थितीत पारा खाली येईलच कशाला. 1981 नंतर महाबळेश्वरात तापमान शून्य अंशांवर आलेले नाही तर गेल्या दहा वर्षांत ते ४ अंशांच्या खाली गेलेले नाही. यंदा तर शहराचे तापमान दहा अंशांवरच थांबले. त्याहून खाली उतरले नाही. अशाही परिस्थितीत बर्फ साचला, पर्यटक आनंदले अशा स्वरूपाचे खेळ चालूच होते. पर्यटकांची गर्दी कायम राहावी यासाठी ही नाटके करण्यात येतात.

शहरातील हॉटेल रेपनचे मालक आणि किमान साडे तीन दशके तिथे राहणारे शिराझ सातारावाला यांनीही याला दुजोरा दिला. काही हॉटेलचालक आणि दलाल यांचे मेतकूट जमले आहे. त्यातूनच हे प्रकार घडविले जात असल्याचा दावा त्यांनी केला. १२ जानेवारीला एका कार्यकर्त्याला दूरध्वनी केला तेव्हा त्याने निक्षून सांगितले, की उद्याच्या वर्तमानपत्रात पाणी गोठल्याची बातमी येणार. त्या दिवशी महाबळेश्वराचे तापमान होते ११ डिग्री सेल्सियस. मला त्याचा तो दावा अतिशयोक्त वाटला. मात्र दुसऱ्या दिवशी तिथे गेल्यानंतर एक वर्तमानपत्र पाहिले, तर खरोखरच महाबळेश्वर गोठल्याची बातमी होती. शिवाय मोटारीच्या टपावरून बर्फ काढणाऱ्या पर्यटकांचे छायाचित्रही.

हा प्रकार करणारी मंडळी एवढी बळजोर आहेत, की या कार्यकर्त्याने आम्हाला गुंगारा दिला. त्याच्या सांगण्यावरून बातमी करण्यासाठी गेलो होतो. सकाळी संपर्क केल्यावर मी तिथे येतो असे कार्यकर्त्याने सांगितले. पुण्याहून निघालेले आम्ही तिथे दुपारी साडे बाराच्या सुमारास पोचलो. कराडहून निघालेला हा कार्यकर्ता मात्र गायब होता. त्यानंतर 'अर्ध्या तासात पोचतो, एका तासात पोचतो' असे करत संपूर्ण दिवस गेला तरी हा माणूस तिथे पोचलाच नाही. शेवटी आमच्या समोर त्याला यायचेच नाही, ही वस्तुस्थिती मान्य करून आम्हाला परत फिरावे लागले.

गेल्या वर्षी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे या प्रकाराला वाचा फुटली. दैनिक ऐक्यच्या त्यावेळच्या बातमीनुसार,

महाबळेश्वरपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेला नॉरहॅम बंगला आणि चार एकर जागेची मालकी मराठी मिशन ऑफ वायडर चर्च मिनिस्टरीज्‌ या संस्थेकडे आहे. तिचे ट्रस्टी मनोज चक्र नारायण (रा. सोलापूर) यांच्याकडून कुमार शिंदे आणि योगेश शिंदे यांनी ही जागा 35 वर्षांच्या भाडेपट्ट्याने दस्त करुन घेतली. या मिळकतीचा ताबा घेतला. हे समजताच रॉबर्ट मोझेस यांनी शिंदे बंधूंच्या या व्यवहाराला हरकत घेऊन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून रितसर पंचनामाही सुरुकेला. तेव्हा सात मोटारींतून 25 गुंडांची टोळी तलवारी, चॉपर, हॉकी स्टिक अशा शस्त्रांनिशी अचानक बंगल्याच्या आवारात आली. पोलिसांनी वाहनांची झडती घेतली तेव्हा, ही शस्त्रे आढळताच त्यातल्या सात जणांना ताब्यात घेतले. बाकीचे गुंड पळून गेले.

त्याहीपूर्वी, २००४ मध्ये सूर्यकांत पांचाळ या कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला झाला. त्यांच्या घरातील कागदपत्रांची नासधूस करण्यात आलीच, शिवाय त्यांच्या आईलाही मारहाण करण्यात आली. त्यांचा गुन्हा एवढाच, की बेकायदा वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकामांच्या विरोधात त्यांनी तक्रार केली. २००८ साली या खटल्याचा निकाल लागला आणि सात जणांना शिक्षा झाली.

महाबळेश्वरचे गौडबंगाल-१

Thursday, January 20, 2011

महाबळेश्वरचे गौडबंगाल-१

mahabaleshwar         वाई सोडून गाडी महाबळेश्वरच्या दिशेने पुढे जात होती तशी मला प्रचंड उत्सुकता लागली होती. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळाला पहिल्यांदा भेट देताना बहुतेक सर्वांना अशीच उत्सुकता वाटत असावी, असा माझा होरा आहे. पांचगणी येता येता मात्र ती उत्सुकता कुठल्या कुठे पळून गेली होती. पांचगणीच्या अलीकडे एक किलोमीटर पासूनच धंदा आणि लूटमार यांचे अफलातून मिश्रण वारंवार आढळत जातं. या लुटमारीला कितीही शिताफीने चुकविले, तरी कोणीकडून आपण इथे आलो, असा प्रश्न मनाशी पडला होता. त्याचवेळेस लोकं मुकाट अशा गैरप्रकारांपुढे मान तुकवितात याचं बिलकुल आश्चर्य वाटलं नाही. महाबळेश्वरच्या पहिल्या दोन भेटींत निर्माण झालेली ही प्रतिमा.

      वर्ष २०११ सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरवड्यात दोनदा या गिरीस्थानाची भेट घेतली. १८३०, म्हणजे मराठ्यांकडून हिंदुस्थान घेतल्यानंतर १२ वर्षांच्या आत, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी महाबळेश्वरचा शोध लावला, असं सांगितलं जातं. तसं पाहिलं तर हे स्थान लोकांना अज्ञात होते, यावर माझा विश्वास नाही. वास्तविक बारा ज्योतिर्लिंगांतील एक असल्याने आणि प्रतापगडाशी अगदीच सलगी राखून असल्याने महाबळेश्वरला त्यापूर्वी लोक जातच असत. महाराष्ट्रात थंड हवेच्या जागा काय कमी आहेत? प्रतापगड, पन्हाळा किंवा अन्य ठिकाणीही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे. मात्र त्या स्थळांशी मराठ्यांचा इतिहास उज्ज्वल जोडलेला आहे. त्याची आठवण लोकांपुढे सतत राहील व आपल्या सत्तेला धोका निर्माण होईल, ही ब्रिटीशांना काळजी होती. यासाठी इतिहासाचा छाप नसलेल्या जागा ब्रिटीशांना हव्या होत्या. महाबळेश्वर किंवा माथेरान यांसारख्या जागांनी ती पूर्ण केली.

     महाबळेश्वरला कुठलाही किल्ला किंवा ऐतिहासिक स्थळ नव्हते. पुरातन मंदिर होते ते आधीच मोडकळीला आलेले आणि दूर होते. फुकटाच्या कमाईवर जगणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ऐष-आरामासाठी याहून अधिक चांगली जागा मिळणे अवघड होते. त्यानंतरच्या १७० वर्षांत चैन, मौजमजा आणि चंगळ याचे पर्याय म्हणून महाबळेश्वर पुढे आले. ब्रिटीश असेपर्यंत त्यांचा वचक होता. त्यानंतर काळ्या साहेबांच्या काळात 'एकमेकां साह्य करू, अवघे लुटू पर्यटक'चे खेळ सुरू झाले.

     जानेवारीच्या सुरवातीला पुणे आणि नाशिकमध्ये पारा तीन-चार अंश सेल्सियसवर घुटमळत असताना महाराष्ट्रातील काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वर १० अंश सेल्सियसच्या खाली यायला तयार नव्हते. त्याचवेळेस वेण्णा तलाव किंवा अशाच कुठल्या जागी बर्फाचे थर साचल्याच्या बातम्या आणि छायाचित्रे दरवर्षीचा नेम पाळून यायला सुरूवात झाली. यामागचे गौडबंगाल आहे तरी काय, याचा अदमास घ्यावा म्हणून आम्ही तेथे गेलो होतो. तिथे जे काही पाहिलं, त्यावरून रहस्यामागचा पडदा संपूर्ण उठला नाही तरी थोडीफार चुणूक पाहायला मिळाली.

     पाचगणी आणि महाबळेश्वर दोन्ही जागी प्रवेश करताना पर्यटकांना प्रति माणशी ५० रुपयांचा प्रदूषण कर द्यावा लागतो. १९८० मध्ये इंदिरा गांधींच्या कृपेने हा भाग पर्यावरण संवेदनशील क्षेत्र जाहीर झाल्याने हा कर. पूर्वीच्या काळी पाप केलं म्हणून भट मंडळी काहीतरी प्रायश्चित सांगायचे आणि यजमान त्याप्रमाणे करून आपला अपराधभाव कमी करायचे, त्याचा हा आधुनिक अवतार. प्रदूषण कर भरून उजाड होणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगांवर कोणते उपकार होणार आहेत, हे कर घेणारे आणि भरणारेच जाणोत.

    गेली अनेक वर्षे लाखो लोकांनी इमाने इतबारे हा कर भरूनही महाबळेश्वरच्या पर्यावरणात खूप सुधारणा झाली आहे, असं दिसून येत नाही. तो कमी म्हणून की काय, प्रत्येक पॉईंटवर प्रवेश करताना पर्यटकांना वेगळे शुल्क द्यावे लागते. शिवाय पार्किंग शुल्क (रु ३०) वेगळे. आता पार्किंगची जागा म्हणाल तर चोहोबाजूंनी झाडांनी वेढलेला धुळीचा एखादा ढिगाराही तुम्हाला पार्किग प्लेस म्हणून दाखविल्या जाऊ शकतो.