Tuesday, November 17, 2009

विक्रम वेताळ आणि सच्छील खेळाडू

राजा विक्रमाने परत आपली जुनी-पुराणी भंगार फटफटी बाहेर काढली आणि तिला कीक मारली. अनेक शतकांच्या शिरस्त्याप्रमाणे तो वेताळाला घेऊन येणार होता. बायपासवरून दहा मिनिटांतच तो शहराजवळच्या जंगलात पोचला. वेताळाची बसण्याची जागा तर त्याला माहितच होती. शिवाय ज्या झाडाजवळून रिअॅलिटी शोचा आवाज ऐकू येतो, तिथे वेताळ असतो हे त्याला माहित होतं. त्यामुळे त्याने तिकडे मोर्चा वळवला आणि वेताळाला उचलून खांद्यावर घेतले. वेताळाचेही आवडते पात्रं शोमधून बाहेर पडल्याने त्यालाही शो बघण्यात रस नव्हता. त्यापेक्षा राजाला जरासे छेडून त्याला ताज्या घडामोडीवर आजचा सवाल विचारावा निघून जावे, असा खासा बेत त्याने रचला होता.

गाडी महामार्गाला लागताच वेताळाने आपले तोंड उघडले. तो म्हणाला, “ए राजा, परिवहन अधिकाऱ्यांनी गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये असा नियम केला आहे. केवळ बोलण्यासाठी तो लागू नाही. तरीही तू असा गप्प गप्प का?  दुचाकी चालकांना अद्याप टोल द्यावा लागत नाही, त्यामुळे तू मला नेण्यासाठी कितीदाही येऊ-जाऊ शकतोस. तरीही सत्ताधारी नेत्यांसारखे न बोलता तुला मुका कावा साधायचा असेलच, तर मी मात्र विरोधी पक्षांसारखा आवाज काढतच राहणार. त्यासाठी कितीदाही निलंबित होण्याची माझी तयारी आहे. कारण मेली कोंबडी आगीला भीत नाही. मग वेताळ कशाला निलंबनाला घाबरेल? मी तुला आता एक फर्मास कथा सांगतो. ती नीट ऐक.  मी त्या कथेवर आधारित एक प्रश्न विचारेन. त्याचे उत्तर कार्यक्रमानंतर एसएमएसद्वारे दे.”

इतके बोलून वाहतूक पोलिस जसे नियम मोडणाऱ्या वाहनांची वाट पाहात रस्त्याच्या कडेला उभे राहतात, तसा एक सहेतूक पॉज वेताळाने घेतला. मग तो महागाईसारखा सुटला, “एक नगरी होती. ती राज्याची राजधानी नव्हती तरी राज्याच्या राजधानीपेक्षा त्या नगरीचा तोरा जास्त होता. कारण राज्याच्या राजाचा, मंत्र्यांचा, सरकारी अधिकाऱ्यांचा, झालंच तर सरकारचाही खजिना भरण्याची ताकद त्या नगरीत होती. अशा या नगरीत राज्याच्या सगळ्या भागातून लोक येत होते. त्याबद्दल त्या नगरीच्या लोकांमध्ये नाराजी होती. त्यामुळेच नाराजीचे नाराजकारण करणारे पक्षही तिथे होते. ही नगरी उभी करण्यासाठी नगरीच्या लोकांनी दिलेल्या लढ्याचे उदाहरण पक्ष देत होते. तरीही नगरी आडवी करण्याऱ्यांना अडवण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. नगरीबाहेरचे लोक याच्याविरूद्ध होते. आता पुढे काय झाले ऐक.

“या नगरीतून मोठे झालेले काही लोक होते. त्यांच्यामध्ये एक सच्छील असा खेळाडू होता. तोंडावर नियंत्रण असल्याबद्दल त्याची ख्याती होती आणि त्याची कामगिरीही चोख होती. राज्यात सगळीकडे त्याच्या नावाचा दबदबा होता. या नगरीच्या लोकांना त्याचा खास अभिमानही होता. आपला माणूस म्हणून त्याच्याकडे सगळे अपेक्षेने पाहायचे. एकदा काय झाले, कोणालाही अशक्य अशी प्रदीर्घ खेळी केल्याबद्दल या सच्छील खेळाडूचा सत्कार सगळ्यांनी आयोजित केला. राज्याच्या, नगरीच्या नव्हे हां, मुखंडांनी त्याला एका मंचावर ठेवले. याचवेळी बोलताना कधी नाही ते या सच्छील खेळाडूने जाहीर केले, की ही नगरी केवळ त्या नगरीच्या नव्हे तर सगळ्या राज्याची आहे. त्याच्या या वाक्याचा खूप गाजावाजा करण्यात आला. ज्येष्ठांनी टीका केली तर कनिष्ठांनी दुर्लक्ष केले. तर आता तू मला सांग, काहीही गरज नसताना या सच्छील खेळाडूने असा बाँबगोळा का टाकला?  गेला काही वर्षे त्याने फिरकी गोलंदाजी केलेली नाही म्हणून का असा दुसरा टाकला? माझ्या प्रश्नाचे उत्तर ताबडतोब दे, राजा नाहीतर तुझ्या या मतलबी मौनाचा मी कडक शब्दांत निषेध करीन. झालंच तर तुझ्या पुतळ्याचे दहन करीन. फेसबुकवरील तुझ्या सगळ्या मित्रांपर्यंत तुझे हे अपयश पोचवीन…” थेट प्रक्षेपण करताना वृत्तवाहिन्यांचे बातमीदार करतात तशी असंबद्ध बडबड करत वेताळ हातवारे करू लागला. तितक्यात कौटुंबिक मालिकांमधील पुरूष मंडळी करतात तसा मख्ख चेहरा करून राजा बोलला.

 

“वेताळा, अरे रिएलिटी शो आणि दररोजच्या मालिका सोडून हा तमाशा बघितल्यामुळे तुला हा प्रश्न पडला का? अरे, ज्या ठिकाणी, ज्या मंचावर हा प्रसंग घडला तो जरा आठवून पाहा बरे. त्यात मुळचे नगरीचे माणसं किती आणि नगरीबाहेरचे मात्र राज्यातील किती, याचा तू अंदाज घेतला का? या सच्छील खेळाडूला फारसे बोलून कधी माहित नव्हते, असे तूच म्हणतोस. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या मुलाखती घेणाऱ्यांनीही त्याला कधी राजकारणाचे प्रश्न विचारले नाहीत. मात्र त्या दिवशी माध्यमांच्या लोकांनी त्याला तावडीत घेऊन त्याला असे काही प्रश्न विचारले, की त्याला ते वाक्य बोलावेच लागले. वरच्यांना सांभाळण्यासाठी जे खालच्यांना दाबतात, त्यांनाच माध्यम म्हणतात हे तुला ठाऊक नाही का? भौगोलिकदृष्ट्या नगरी ही राज्याचाच भाग आहे, हे कोणीही बोलू शकतो. शिवाय वर्षातले आठ-दहा महिने नगरीबाहेर तेही राज्याबाहेरच काढणाऱ्या त्या खेळाडूला वास्तव परिस्थिती काय आहे, याचं ज्ञान असण्याची शक्यता किती?

“वेताळा, आपल्याला हवं ते कोणाकडून कसं बोलवून घेतलं जातं याचा एक उत्तम नमुना तुला माहित आहे का? सर्वोच्च धर्मगुरु पोप एकदा परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांचे विमान जमिनीला लागताच पत्रकारांनी त्यांना घेरले. पत्रकारांनी त्यांना विचारले, तुम्ही येथील वेश्यांना भेटणार का? त्यावर पोप उत्तरले, येथे वेश्या आहेत का? दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत ठळक मथळा होता, पोप विचारतात येथे वेश्या आहेत का? अशा परिस्थितीत त्या बिचाऱ्या खेळाडूचा दोष काय? त्याच खेळाडूचे दुसरे वाक्य होते, की त्याला या नगरीचा नागरिक असल्याचा अभिमान आहे. त्याला मात्र पत्रकारांनी कशी बगल दिली, हे तू पाहिले नाहीस काय? त्यामुळे वेताळा, या साऱ्या घटनेत त्या खेळाडूचा दोष किंचितही नसून त्याच्या तोंडून आपला अजेंडा राबवून घेणारे नगरीबाहेरचे पत्रकार  आणि अशा लोकांना तोंड देण्याचा खेळाडूला नसलेला अनुभव, या तेवढ्य़ा दोषी आहेत.”

राजाने आपले भाषण संपविले नाही तोच वेताळाने एक गडगडाटी हास्य केले. तो म्हणाला, “राजा, तू राजा असल्याने पत्रकारांना कसे हाताळावे तुला माहित आहे. त्यामुळेच तू काहीही बोलत नाहीस. मात्र वेताळ होण्यापूर्वी मीही पत्रकारच होतो. त्यामुळे गप बसणाऱ्यांना कसे बोलते करावे, हे मलाही माहित आहे. आता तू बोललास आणि मी चाललो. आता पुढल्या इलेक्शनपर्यंत मला असेच झाडावर मालिका पाहत बसू दे.”

इतके बोलून वेताळाने फटफटीवरून रस्त्यावर उडी मारली. विरूद्ध बाजूने जाणाऱ्या एका सहा आसनी रिक्षाला हात दाखवून त्याने ती थांबविली आणि राजाला कळायच्या आत तो रिक्षात बसलाही. भाज्यांचे वाढणारे भाव बघत राहावेत तसा राजा त्या रिक्षाकडे पाहत राहिला.