Sunday, November 14, 2010

दिवाळीची धुळवड

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेला एक आठवडा जे काही नाट्य रंगले होते, त्याच्यापुढे दिवाळीतील फटाकेच काय, प्रत्यक्षातील बॉम्बस्फोटसुद्धा कमी पडतील. एकीकडे अशोक चव्हाण यांची गच्छंती होणार म्हणून देव पाण्यात घालून बसलेली माध्यमकर मंडळी, तर दुसरीकडे 'आदर्श' भानगडबाजांमध्ये आपलीही शिरगणती होणार का, याचा धसका घेतलेले राजकारणी असा जंगी सामना रंगला होता. दररोज नवी विधाने आणि दररोज नवी भानगडी...शंभर वर्षांची परंपरा असलेल्या दिवाळी अंकांचीही खुमारी कमी पडेल असा हा मनोरंजनाचा मसाला होता. अशोक शंकरराव चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे ऐन दिवाळीतील धुळवड संपून रंगपंचमीला सुरवात होईल, अशी आशा आहे. चव्हाणांच्या जाण्यानंतर 'आदर्श'चा गलका थांबला, त्यावरून या प्रकरणामागे भ्रष्टाचार आणि त्याची चीड नसून, हा दुराग्रही मुख्यमंत्री कसा जात नाही ते पाहतोच, हा आविर्भाव होता हे स्पष्ट झाले आहे.

* 'आदर्श' प्रकरणात मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मंजूर केल्यानंतर हा राजकीय बळी असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे  यांनी दिली. त्याआधी ती जमीन संरक्षण खात्याची असेल तर प्रकरण गंभीर आहे, हे शरद पवार यांचे विधान होते. या दोन्ही विधानांचा मध्यबिंदू म्हणजे - ती जमीन संरक्षण खात्याची नाही आणि या प्रकरणात अशोक चव्हाण एकटे दोषी नाहीत. आता अशोकरावांच्या गच्छंती नंतर बाकीच्यांचे काँग्रेस पक्ष काय करणार आहे, हा पुढचा प्रश्न आहे. शिवाय अशोकरावांनीही गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून राजीनामा नाही दिलेला, तर सोनियाजींनी आदेश दिल्यामुळे खुर्ची सोडली आहे.

* शंकरराव चव्हाण हे सलग ३४ वर्षे मंत्रीपदी राहिलेले देशातील एकमेव राजकारणी होते. संजय गांधी यांच्या चपला उचलण्यासारखे आगळे कृत्य त्यांच्या नावे असले तरी कारकिर्दीत कधीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले नाहीत. त्यांचे चिरंजीव अशोकराव यांना याच आरोपातून राजीनामा द्यावा लागला, ही काँग्रेसोचित विसंगती होय. शंकररावांचे राजकीय शिष्य विलासराव देशमुख यांच्यावर असे कित्येक आरोप झाले, पण त्यांना राजीनामा कधी द्यावा लागला नाही.

* 'आदर्श' भानगडीच्या आधी काही दिवसांपूर्वीचा घटनाक्रम पाहिला तर मोठे गमतीदार दृश्य दिसतं. आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे गाफिलपणे मुख्यमंत्रांचा उद्धार करताना कॅमेरात बंदिस्त झाले. मुख्यमंत्र्यांची दानत नसल्याचे ते सांगतात. यामुळे विलासराव देशमुख गट वरचढ झाल्याचे राजकीय पत्रकार निष्कर्ष काढतात. त्यानंतर लातूरमध्ये राणे, विलासराव, भुजबळ आणि मुंढे एकत्र येतात. मुंढेंना मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण देतात. त्याचवेळेस राणेही आपला घोडा अडीच घरे आडवा चालवून आपला दावा जाणवून देतात.


एका आठवड्याच्या आत 'आदर्श' सोसायटीच्या गैरव्यवहाराबाबत टाईम्स ऑफ इंडियात बातमी येते. त्यानंतर अन्य मंडळी ती बातमी पुढे चालवितात. आधी चव्हाणांच्या सासूबाईंचे नाव त्यात आढळल्याने पहिले निशाण ते बनतात.  नंतर राणे, शिंदे, कन्हैयालाल गिडवानी, सुरेश प्रभू, देशमुख अशी खाशी मंडळी त्यात अडकतात त्यांच्यासोबत लष्कर आणि प्रशासनातील काही मंडळीही सामील असल्याचे दिसून येते. हा सगळा गोंधळ माध्यमांनी समोर आल्यामुळे माध्यमांना वाटेल, असाच त्याचा परिणाम व्हावा, ही त्यांची इच्छा. त्यामुळे चव्हाणांची गच्छंती होणार हेही ते ठरवून टाकतात व काँग्रेस नेतृत्वाने चव्हाणांना दूर ठेवण्यास सुरवात केली, हाही शोध लावतात.

ओबामांच्या भेटीमुळे चव्हाणांना थोडा काळ मिळतो. त्यानंतर राणे यांच्या पत्नीच्या नावे केलेल्या महाबळेश्वर येथील जमिनीच्या खरेदीचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडतो. राणेही लगोलग खुलासा करतात. त्यानंतर देशमुख आणि शिंदे यांच्या कारकिर्दीत झालेल्या 'आदर्श' गैरव्यवहारांना पाय फुटतात. चव्हाणांचा राजीनामा ठरलेला असतानाच या नेत्यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा आपोआपच कमजोर होतो.

सरतेशेवटी अशोक चव्हाण पायउतार होतात. त्याचवेळेस नवा मुख्यमंत्री स्वच्छ प्रतिमेचा असेल, असे राहुल गांधी सांगतात. आता काँग्रेसमध्ये स्वच्छ प्रतिमेचा माणूस शोधायचा म्हणजे वेळ लागणारच. शिवाय राजकारणात स्वच्छ प्रतिमेचा याचा अर्थ कुठल्याही भानगडीत न पडणारा आणि निष्क्रिय. गांधी घराण्याशी एकनिष्ठता या मुख्य निकषासह वरील सर्व कसोटींवर उत्तीर्ण होणारे म्हणून, पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव वादातीतच होते.

* पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने पुढे करताच राष्ट्रवादीने अजित पवारांना पुढे करणे, काहीसे अनपेक्षित होते. मात्र राज्याच्या राजकीय परिस्थितीत आता संधी नाही घेतली तर परत कधी मिळेल, याची शाश्वती नसल्याने अजितदादांनी सर्व तऱ्हेची फिल्डिंग लावून ठेवली. याउलट पश्चिम महाराष्ट्रात चुकूनमाकून जी काय चांगली कामे होतील, त्याचे श्रेय काँग्रेसच्या पदरात पडू नये, यासाठी राष्ट्रवादीलाही प. महाराष्ट्रातील माणूसच तेथे पाठवणे भाग होते. बिचाऱ्या छगन भुजबळांचा त्यात बळी गेला असेलही. पण राजकारणात थोडंसं इकडं-तिकडं होत असतेच. शिवाय समोर अजितदादाच उभे राहिल्यानंतर आणखी वेगळी अपेक्षा ठेवणे चूकच ठरले असते.

* आता अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील कामांना गती मिळेल, हे त्यांनी जाहीर करणे; त्यानंतर पुण्यातील मॅरिएट हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी काका आणि पुतण्या पवारांनी सरकारला होत नसेल तर खासगी विमानतळ उभारावे, असे प्रफुल्ल पटेलांकडून वदवून घेणे;  लगोलग काकांच्याच वर्तमानपत्रात अशोक चव्हाणांना अनेकदा प्रस्ताव देऊनही त्यांनी विमानतळाचा प्रश्न रखवडला, असा माजी मुख्यमंत्र्यांचा तीन-तीनदा उद्धार करणाऱ्या बातम्या प्रकाशित होणं, ही गतीशील राज्यकारभाराची चुणूकच म्हणायला पाहिजे. अर्थात 'अशोकपर्वा'चे डिंडिम वाजविताना चव्हाणांनी दर्डा साहेबांच्या वृत्तपत्राला झुकतं माप दिल्याचा राग कधीतरी निघणारच होता. तशीही विमानतळासाठी खेड-चाकण परिसरात काकांनी  'नांगरणी' करूनच ठेवली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याच्या आधीच अजित पवारांच्या स्वागतासाठी पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्याची चर्चा सुरू झाली होती.

* एकूणात महाराष्ट्राच्या सत्तापदावर माय नेम इज चव्हाणचे प्रयोग चालूच राहणार आहेत. बघूया, पुढे काय होतं ते.