Friday, July 4, 2008

...तर बुशकडे मदत मागणार?

साहित्याचा आणि माझा तसा काही संबंध नाही. तसा म्हणायला पत्रकारितेत असलो आणि मराठी, इंग्रजी व अन्य भाषांमधून सर्रास उचलेगिरी करत असलो, तरी साहित्यविश्वाशी नाळ जोडण्यासाठी ते पुरेसे आहे का, ,याबाबत माझ्या मनात दाट शंका आहे. लेखन तर कोणीही करते, पण जगात महत्वाचे काही असले तर ते आपले व आपले आवडते लेखनच असा आव जो आणतो त्याला साहित्यिक म्हणायची आजकाल प्रथा आहे। त्यामुळे हाकेच्या अंतरावर साहित्य संमेलन होऊनही ते घरात बसल्या बसल्या टीव्हीवर एन्जॉय करण्याचीच आपली साधी मराठमोळी प्रवृत्ती आहे। हो, ऊगाच खोटं कशाला बोला?
माझ्या मते मराठीत दोन प्रकारचे लेखक आहेत। जे सातत्याने सकस लेखन करतात आणि दुसरे आपण साहित्य संमेलनात का जात नाहीत, याची दिसेल त्या व्यासपीठावर चर्चा करतात असे. त्यातील दुसऱया प्रकारच्या लेखकांशी आपली जरा जास्त जवळीक आहे. म्हणजे काय की, आपण कसं चपलेचा अंगठा तुटलेला आहे हे लपवत लपवत आजकालच्या वस्तूंचा घसरलेला दर्जा आणि पायांचे विकार अशी तात्विक चर्चा करतो, तसे हे दुसरे लेखकही करतात. शेजारून जाणारा माणूस आपल्याला ओळख देणार नाही म्हणून संमेलनाच्या मंडपात न येणारे लेखक, संमेलन म्हणजे केवळ वायफळ खर्च आहे किंवा तत्सम सैद्धांतिक बडबड करतात, त्या एका क्षणात कलेसाठी कला का जीवनासाठी कला असे क्षुल्लक वाद निकाली निघतात. जीवन जगताना खोटं बोलण्यासाठी कला, असं त्याला स्वरूप येतं. एक माजी संमेलनाधध्यक्ष शनिवारवाड्याजवळच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला आले असताना वेटरनेही त्यांना ओळखले नव्हते, ही घटना मी डोळ्यांनी पाहिलेली आहे. नंतर अशाच माणसांची “त्यांनी कोणताही बडेजाव न मिरवता सामान्य माणसासारखं जगले, ” अशी प्रशंसा केलेली बघितल्यावर हसू येणार नाही तर काय होणार?

त्यामुळेच यंदा दोन मराठी साहित्य संमेलने घेण्याची तयारी कौतिकराव ठाले पाटील यांनी दाखविली तेव्हा जरा हायसे वाटले. चला, म्हणजे नेहमीप्रमाणे प्रतिनिधींना पास देण्याची, त्यानिमित्ताने त्यांनीही आपल्या नातेवाईकांना जरा ‘गाव’ दाखवायला आणण्याची परंपरा पाळली जाणार तर. आपल्या नेहमीच्या संमेलनाची संयोजन व्यवस्था उत्तम। भिकार असल्याच्या बातम्या देण्याची सोय झाली. (संयोजन व्यवस्थेबाबतच्या बातम्या एकाआड एक वर्षी अनुकूल वा प्रतिकूल देण्यात येत असाव्यात असा मला अनेक वर्षांपासूनचा वहीम आहे. शेवटी संयोजकांना शिव्या देण्याशिवाय किंवा ते बडे राजकीय आसामी असल्यास त्यांची तारीफ केल्याशिवाय मराठीविषयीची आपली कळकळ, संमेलनाला हजर राहण्याची तत्परता आणि स्वभाषेसाठी कोणतेही कष्ट उपसण्याची तयारी कशी समजून येणार?) नेहमीप्रमाणे अध्यक्षांपेक्षा प्रमुख पाहुण्यांचेच भाषण जोरदार झाल्याचा अभिप्राय यंदाही .येणार तर. शिवाय कोणी मराठीचा अधिकाधिक वापर करायला हवा, असं म्हणालं की यांचीच मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात म्हणून रकानेही भरणार. (कोणा कोणाची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात यावर पी. एच.डी करणारे पत्रकार आहेत तसे वाचकांचा पत्रव्यवहारचे नेहमीचे यशस्वी कलाकारही आहेत. जणू काही मराठी माध्यमांच्या शाळेत शिकलेले सर्वच विद्यार्थी सरस्वतीच्या दरबारात नाच करतात.) सामाजिक बांधिलकीच्या नावाने गळा काढत गद्य न रचणाऱया कवींना मान्यता न देण्याच्या या काळात, असे मनोरंजक आणि वास्तवाशी संबंधित नसलेले लेखन प्रसवणारा कोण लेखक आहे आज?

बाय द वे, अमेरिकेत संमेलन होणार त्यामुळे महामंडळाच्या ग्लोबल कळवळुचीही बूज राखली जाणार. अमेरिकेतल्या यजमानांनाही वाईट वाटायला नको. तसं बघायला गेलं तर घरटी एक अपत्य अमेरिकेत वा इंग्लंडमध्ये असणाऱया कोणाही साहित्यिकाने किंवा साहित्यिक संस्थेच्या पदाधिकाऱयांनी या संमेलनासाठी खर्च मागू नये. तिथल्या अन्य संस्थांचा विरोध असलातरी त्याची काळजी करण्याची गरज नाही. आपण इथल्या, देशातल्या कोणाच्या विरोधाची पर्वा करतो का?

ठाले पाटील यांना या निर्णयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी कॅलिफोर्निया आर्टस असोसिएशनच्या पत्राबाबत विचारले. ते म्हणाले, “अमेरिकेतल्याच दोन संस्थांमध्ये काहीतरी अंतर्गत भांडणे आहेत. त्यामुळे त्यांनी ते पत्र पाठविले आहे.” दोन संस्थांमध्ये भांडणे? ही तर मराठी संस्कृती. ठाले पाटील यांना म्हणालो, “म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आधीच तिथे पोचली म्हणायची.” मात्र ते विनोदाच्या मूडमध्ये नसल्याने माझ्या विनोदावर मीच हसून लाज राखली.

दोन संमेलनाच्या निर्णयाचे द. मा. मिरासदार, राम शेवाळकर यांनीही स्वागत केले. मात्र खरी प्रतिक्रिया दिली ती विठ्ठल वाघ यांनी. ते म्हणाले, “साहित्य संमेलन अमेरिकेत घेण्याचा निर्णय म्हणजे आता मराठीबाबत महाराष्ट्रात काहीही करण्यासारखे नाही, असे होईल. मागच्या वेळी सोलापूर संमेलनात ठाले पाटील बेळगावच्या प्रश्नावर अत्यंत कळवळ्याने बोलले होते. आता ते अमेरिकेतील संमेलनात इराक-इराण प्रश्नावर बुश यांची मदत मागणार आहेत का.”

जाता जाताः कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या घोषणेने दोन दशकांपूर्वी महाराष्ट्रात हवा निर्माण केली होती. या संमेलनाच्या निमित्ताने का होईना रत्नागिरी आणि कॅलिफोर्निया एका पातळीवर येतील.
----------------