Sunday, April 17, 2011

रंगतदार तमिळ अरसियल

बाहेरगावी जाण्यासाठी गाड्या उपलब्ध नसल्याने संतप्त प्रवाशांनी कोयम्बेडु स्थानकाबाहेर शहर बस रोखण्याचा प्रयत्न केला.

           एप्रिल १३, २०११. एकीकडे तमिळनाडू विधानसभेच्या जागांसाठी मतदान सुरु असते आणि दुसरीकडे कोयम्बेडु बस स्थानकावर सकाळपासून प्रवाशांचे जमावच्या जमाव थांबलेले होते. मतदानासाठी आपल्या गावी जाण्यासाठी असावे कदाचित, परंतु मुख्यतः तरुण आणि स्त्रियांचा भरणा असलेली प्रचंड गर्दी स्थानकावर थांबली होती. पुदुच्चेरीला जाण्यासाठी मी सकाळी आठच्या सुमारास कोयम्बेडुला पोचलो तेव्हाच कधीही नसणारी गर्दी मला तिथे जाणवली. एरवी प्लॅटफॉर्मवर जाताच किमान तीन-चार गाड्यांचे वाहक 'पाँडि'-'पाँडि'चे हाकारे देत वाट बघत असतात. आपण पाँडिचेरी असं म्हणताच लगेच, "आम, एरुंग सार," असं म्हणतात. आज मात्र गाड्या नव्हत्या का वाहक नव्हते. होते ते सकाळपासूनच घाम गाळत तिष्ठत उभे असणारे प्रवासी आणि प्रवासीच!
           
           इतक्यात पुदुच्चेरीला जाणारी एक बस प्लॅटफॉर्मजवळ आली. येतानाच तिच्यात थोडासाही धक्का लागला तर ओसंडून बाहेर पडेल, एवढी माणसांची गर्दी होती. आपण इथे उभे असताना त्रयस्थ गाडी एवढी भरून कशी काय येते, याचा अचंबा माझ्यापुढे उभे असणारी दोन मुले करत होती. त्यावर तिथेच उभी असलेली एक तमिळ महिला तिच्या खास हिंदी भाषेत म्हणाली, की या गाड्या पलीकडे उभ्या असतात आणि तिथेच भरतात. त्यामुळे तिकडे चालत गेलो तर तिथे पुदुच्चेरीच्या पंचवीस-एक गाड्या उभ्या. त्या प्रत्येक गाडीत घामाघूम होऊन बसलेली महिला, मुले आणि लुंगीवाल्या पुरुषांची सरमिसळ गर्दी. 

            सकाळी नऊला एका गाडीत जरा जागा पाहून चढलो. अकरा वाजले तरी गाडी हलायला तयार नाही. त्यामुळे ती सोडून दुसरी जरा पुढे उभ्या असलेल्या गाडीत चढलो. एक तास वाट पाहून तीही गाडी सोडली. एव्हाना तमिळनाडू राज्य सरकारच्या वातानुकूलित गाड्या पुदुच्चेरीला जाऊ लागल्या. साध्या गाड्यांपेक्षा दुप्पट भाडं असलेल्या या गाड्यांमध्ये मेंढरांसारखं कोंबून घेऊन माणसे जाऊ लागली. मधूनच चालक-वाहकाची एखादी जोडी यायची आणि चार-पाच तास माणसांना उकडत ठेवलेली एखादी गाडी घेऊन जायचे. आज गाड्यांची एवढी वाईट अवस्था का, हा मला पडलेला प्रश्न होता. त्याचं उत्तर थोड्याच वेळात मिळालं. 

            "सगळे चालक-वाहक मतदानाला गेलेत. ते मतदानाहून परतल्यावरच गाड्या निघणार आहेत." एका युवकाने त्याच्या मित्राला सांगितले. त्याने ज्याला सांगितले, त्याची प्रतिक्रिया मोठी रंजक होती. "नल्ल अरसांग, नल्ल अदिकारि (चांगलं सरकारंय, चांगले अधिकारी आहेत)," तो म्हणाला. 

            आता अशी खबर मिळाल्यावर गुपचूप वाट बघत बसणे, यापलीकडे काय करता येण्यासारखे होते? एक तर कोयम्बेडु स्थानकाचा विस्तार एवढा अवाढव्य, की बाहेर पडायचं म्हटलं तर किमान एक किलोमीटर चालणं आलं. शिवाय बाहेर खासगी गाड्याही नाहीत. पूर्वी थोड्याफार दिसायच्या पण आज मतदानामुळे सगळं शहर शांत होतं. शिवाय कोयम्बेडुच्या बाहेरच चेन्नई मेट्रो रेल्वेचे काम चालू असल्यामुळे तिथे वेगळाच पसारा मांडलेला. नाही म्हणायला एक-दोनदा बाहेर येऊन शेअर टॅक्सी मिळते का ते पाहायचा प्रयत्न केला. शक्यच नव्हतं. रेल्वेने जायचे झाले तरी विळुप्पुरमपर्यंतच जाता येते. तेथून परत पुदुच्चेरी तीन किलोमीटरवर. शेवटी हार मानून वाट बघत बसलो.

           तितक्यात आणखी एक तरुण आला. तिरुच्चि, तिंडिवनम, कडलूर, पुदुच्चेरी या सगळ्या शहरांच्या गाड्या बंद आहेत. त्यामुळे बाहेर शहर बस स्थानकाजवळ एकत्र जाऊन प्रयत्न करू आणि गाड्यांची व्यवस्था करू, असं त्यानं प्रत्येक गाडीतील लोकांना आवाहन केलं. त्याला प्रतिसादही मिळू लागला. मीही त्या जमावासोबत चालू लागलो. खरंच झाली व्यवस्था तर जाता येईल, नाहीतर वाट बघण्याशिवाय काय करता येणार हा माझा विचार. साधारण १००-१५० लोकांचा तो जमाव आला. त्या तरुणाने आणि आणखी एक दोघांनी शहर बस रोखायला सुरवात केली. आम्हाला गाड्या मिळत नाहीत, त्यामुळे आम्ही 'वळि निरुत्थम' (रास्ता रोको) करतोय, असंही त्यानं सांगितलं. बिचारा, शहर बसचा चालक. उतरला खाली आणि एका कडेला जाऊन तंबाखू खात बसला. अशा पद्धतीने काही व्यवस्था होणार नाही, याची खूणगाठ मनाशी बांधून मी परत प्लॅटफॉर्मवर आलो. योगायोगाने तिथेच पुदुच्चेरीची गाडी आली. त्यापेक्षाही योगायोगाने तीत जागा मिळाली. थोड्याच वेळात गाडी ईसीआरवर (ईस्ट कोस्ट रोड- पूर्व किनाऱ्याचा रस्ता) धावू लागली. त्यावेळी गाडीच्या वाहकाला एक दोघांनी या अभूतपूर्व परिस्थितीबद्दल छेडले. तेव्हा सारा उलगडा झाला.

           "काय सांगायचे साहेब, आज जेवायला सुद्धा वेळ मिळाला नाही. तिकडे (पुदुच्चेरीला) गेलो की तिकडे आणि इकडे आलो की इकडे अशी धांदल उडतेय. आज वाईट अवस्था झालीय," तो म्हणाला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या चालक-वाहकांना मतदान करण्यास सांगण्यात आले होते. मतदान करून यायचे आणि गाड्या न्यायच्या असे त्यांना आदेश होते. मात्र मतदानाला एवढा उशीर झाला, की राज्य परिवहन महामंडळाचे सगळेच वेळापत्रक बोंबलले. हे तो सांगत असतानाच मतदान करून आलोय, हेही वाहकाने सांगितले. त्यावेळी साडेतीन वाजले होते.

           वाहक जे सांगत होता ते खरंच होतं. सकाळपासून जेवढ्या माणसांना मी मतदान केल्याचं विचारलं, तेवढ्या लोकांनी होकारार्थी उत्तर दिलं. फक्त एका रिक्षावाल्याचा अपवाद. "पंधरा वर्षांपासून ऑटो चालवतोय. खायची मारामार. मतदानाला वेळ कुठाय," तो सांगत होता. बाकी सगळ्या लोकांनी मतदान केल्याचं सांगितलं. पुदुच्चेरीला तर संध्याकाळी रिक्षावाल्याने थेट शाई लावलेले बोटच दाखवले. तमिळ लोकांना मतदानाबद्दल भारी उत्साह. परंतु, चेन्नईत फिरताना मतदानाचा उघड उत्साह जाणवत नव्हता. कोयम्बेडुपासून जवळच असलेल्या राज्य निवडणूक कार्यालयातही दुपारी चारच्या सुमारास शुकशुकाट दिसत होता. हे अर्थातच मी बसमधून पाहिले. मात्र मतदान चांगले झाले, हे दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांतून कळाले. तमिळनाडूत ८० टक्क्यांच्या जवळपास तर पुदुच्चेरीत ७५ टक्के मतदान झाल्याच्या बातम्या दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांत झळकल्या.

अरसियल = राजकारण