Sunday, March 8, 2015

शिवरायांची जयंती वाटेल तेव्हा पाहिजे!


१९ फेब्रुवारीला तारखेनुसार आणि ८ मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती आल्यामुळे महाराष्ट्रातील मावळ्यांना मोठाच उत्साह आला होता. त्यामुळे प्रत्येक शहराच्या रस्त्या-रस्त्यांवर तीन तीन जण बसून उलट्या बाजूने रस्त्यावरून दुचाकी नेणे काय, हातात शीतपेये वा बियरच्या बाटल्या आणि दुसऱ्या हातात तलवारी नाचविणे काय किंवा रस्त्याने मोठमोठ्याने ओरडत जाणे काय, अशा शौर्य दाखविणाऱ्या बाबींना उधाण आले होते.

टरा टरा आवाज करत जाणाऱ्या दुचाकी म्हणजे हिंदवी स्वराज्याचा जयघोषच होता जणू. ज्याचा आवाज जास्त त्याची शिवाजी भक्ती मोठी. शिवाय एखादी मुलगी किंवा मुलींचा घोळका जवळून जाऊ लागला, की या इतिहासप्रेमाला आणखी उधाण येणारच. त्यामुळे त्यावेळी दुचाकीच्या आवाजासह हॉर्नचा आवाजही वाढलाच पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव लोकांना कशी होईल.

शिवाय महाराजांनी कायद्यांचे पालन करावे, सौजन्याने वागावे अशी शिकवण दिलीही असेल कदाचित. पण ती पाळण्याची आता गरजच काय. हवे तेवढे प्रदूषण करा, हवे तेवढे आवाज काढा...सरकार आपलेच आहे. बजाते रहो! आणखी तुमचे शिवाजी अन् गणेशोत्सव मग आमचे बाबासाहेब, तुमचे बाबासाहेब तर आमचे परशुराम ही स्पर्धा आहेच. त्यांनाही बिचाऱ्यांना आपल्या भावनांचा निचरा करण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक महापुरुषाची जयंती आणि पुण्यतिथी शिमग्यासारखीच साजरी झाली पाहिजे, दिवाळीसारखी नव्हे! तरी बरे गणपती बाप्पांच्या जन्मतारखेचा काही वाद नाही.

तेव्हा महाराजांच्या नावाने हा जो गलका चालला होता, त्यामुळे त्यांना भरून आले असेल. ही भक्ती अशीच दाखवायची असेल, तर शिवरायांची जयंती केवळ दोनदा साजरी करून चालणार नाही. इंग्रजी तारीख आणि मराठी तिथी यासोबतच वारानुसारही जयंती साजरी करावी. शिवाय ग्रेगरीयन आणि रोमन कॅलेंडर वेगवेगळे असल्यामुळे त्यांनुसारही वेगवेगळ्या तारखांना शिवजयंती साजरी करावी. म्हणजे डॉल्बी सिस्टम आणि भर रस्त्यात घातलेले मंडप यांच्या मदतीने आपण आपल्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देऊ शका. वर्षातून अनेकदा, वाटेल तेव्हा!