Thursday, June 14, 2007

शोधू कुठे मी "शिवाजी

आता काय करावे, कुठे जावे...काय वाचावे...काही सुचत नाहीये! सकाळपासून तीन पेप्रं वाचून झाली...आठ चॅनेल रिमोटवर फिरवून झाले. त्यातील सर्व जाहिराती आणि अधून-मधून बातम्याही पाहिल्या...अनेकांना विचारले, ""तुम्ही पाहिले का?'' सर्वांनी नकारार्थी माना वेळावल्या. असं घडलंच कसं?
मुंगीने मेरुपर्वत तर गिळला नाही ना...
एक्‍सप्रेस रेल्वे वेळेवर तर धावली नाही ना...
"पीएमटी' रिकामी येऊन स्टॉपवर योग्य जागी तर थांबली नाही ना...
नाही ना?? मग हे सर्व सुरळीत होत असताना असं का व्हावं...?
माझी प्राणप्रिय बातमी आज का छापून आली नाही...गेल्या वर्षीपासून पेप्रांमध्ये वाचतोय...त्यातही रजनीकांतचे जुने फोटोच पाहतोय..."शिवाजी' येतोय..."शिवाजी' येतोय...कालपर्यंत तर येत होत्या बातम्या...आता का नाही आल्या...पहिल्यांदा वाचलं होतं...रजनीकांतला सोळा कोटींची बिदागी मिळालीय...मला किती पराकोटीचा आनंद झाला...त्यानंतर कितीदा तरी कोटी म्हणजे किती शून्ये, याचा अंदाज घेत होतो...त्यानंतर काही दिवस तर काहीच छापून आलं नाही...
मात्र तेव्हा "शिवाजी'च्या बातम्यांची सवय नव्हती, त्यामुळे फारसे चुकल्यासारखे वाटत नव्हते. त्यानंतर वाहिन्यांवर रजनीच्या चाहत्यांची हलती चित्रे दिसू लागली. तेव्हा मला त्याचा लळाच लागला ना! नंतर मीही "शिवाजी शिवाजी' करायला लागलो. मला आपलं वाटलं रजनीकांतनं शिवाजी महाराजांचं कामच केलंय.. महाराजांवर महाराष्ट्राचा कॉपीराईटच ना! त्यामुळे दुसरं कोणी त्यांचं नाव वापरू शकतं, ही कल्पनाच नाही! हवेत तलवार फेकून महाराज गनीमांना "हातोहात' लोळवतायेत, अशी दृश्‍येही मला दिसू लागली. गेल्या महिन्यांपासून मात्र चोहीकडे "शिवाजी' न्‌ "शिवाजी'च दिसू लागले. मला तर काय करावे न्‌ काय करू नये, असं झालं.
तेव्हाच कळालं रजनीकांत "शिवाजी' आहे मात्र "शिवाजी' नाही.... म्हणजे झालं काय, का मित्रांसोबत बोलताना आपण सोळा कोटींचीच बात काढली ना (एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाच्या फक्त पैशाबद्दलच दिलखुलास बोलतो), तर कोणीतरी म्हणालं, की तो मराठी आहे...हे आणखी काही विपरीतच. तमिळ, म्हणजे एकूणच मराठी आणि हिंदी सोडले तर आपल्याला सगळे हिरो "कोंगाडी'च...नाही म्हणायला तो आपल्या अमिताभच्या काही पिच्चरमध्ये दिसला होता, पण "अमिताभ के सामने रजनीकांत की क्‍या औकात...' इंटरनेटवर त्याच्या स्टाईलबद्दलचे जोक फॉरवर्ड करण्यापुरते त्याचा फार फार तर संबंध! सांगायचं म्हणजे काळ्या काळ्या ढूऽऽसमधला एक, आपण नेहमी टिंगल करतो तो कोंगाडी हिरो मराठी आहे, तो तिकडे एवढा पैसा कमावतो म्हटल्यावर माझ्या तर पोटातच ढवळायला लागलं. अन्‌ त्याचं नाव शिवाजी गायकवाड आहे म्हटल्यावर तर एवढा हेवा वाटला...आयला, आपण एवढे गोरे, अर्धवट हिंदी बोलणारे अन्‌ इथं खितपत पडलोय. तो तिकडे खऱ्याने पैसा ओढतोय.
गेल्या महिन्यापासून तर बाबा "शिवाजी'बाबत खूपच ऐकायला आलं...त्यात पुन्हा सोळा कोटींचीच बात होती. आणखीही काही बाता होत्या. आमच्या दोस्त तर ते तमिळनाडूतील रसिक पाहून "खी खी' हसायलाच लागले. त्यांना कळेचना हे खूळ म्हणायचं का वेड? इकडं मी टीव्ही आणि पेपरमध्ये रोज "शिवाजी'च्या बातम्या वाचत होतो. औरंगजेबाने "शिवाजी'वर ठेवली नसती अशी पाळत मी "शिवाजी'च्या बातम्यांवर ठेवली होती. चॅनेल आणि टीव्हीच्या सौजन्याने मलाही रोज काहीतरी खुराक मिळत होता. पण मला एक कळत नव्हतं, रजनीसाठी एवढी किंमत मोजायला त्याच्या मागच्या पिच्चरमध्ये असं काय होतं? त्याबाबत मात्र कोणीही बोलत नव्हतं. मी मात्र रोज बातम्या वाचायचो. मजा यायची. इतकं की, "इट शिवाजी, स्लीप शिवाजी' अशी माझी अवस्था झाली. रोज बातम्या, रोज आलटून पालटून फोटो...
माझा एक मित्र होता. तो रजनीकांतला रजनी म्हणायचा...त्याच्या पिच्चरच्या गमती सांगायचा...आम्ही त्याला हसायचो. त्यातच काल ती बातमी आली..."शिवाजी'ची दोन आठवड्यांची तिकिटे विकली गेली आहेत. इतकं बरं वाटलं. आता तर चॅनेल आणि बातम्यांचा पाऊस सुरू झाला म्हणा ना...रजनीकांत असा आणि रजनीकांत तसा...रजनीकांत आणि अमिताभ...रजनीकांत आणि त्याचे मानधन...रजनीकांत आणि त्याची स्टाईल...अशा कितीतरी बातम्या, रिपोर्ट...एका चॅनेलवर तर "आय ऍम रजनीकांत' नावाची स्पर्धाच सुरू केली होती...मलाही त्यात भाग घ्यावासा वाटला...असं सगळं छान छान "शिवाजी'चे "रजनी साम्राज्य' स्थापित झाले होते. काल तो पिच्चरही रिलीज झाला....अन्‌ आज? आज मात्र कोणीही बातमी देत नाहीये...
अरे झालं काय...दोन वर्षांपूर्वीसारखं पुन्हा रजनीकांत गायब? मग आम्ही काय करायचं? आता कुठं माहिती घ्यायची? कुठं जाऊ? कुठं माझी तल्लफ भागवू? आता टक्कल पडलेल्या रजनीकांतचे फोटो कुठं पहायचे? त्याच्या पिच्चरसाठी आलेल्या खर्चाची चर्चा कुठं करायची? हा अन्याय आहे. दररोज "शिवाजी'ची एकतरी बातमी वाचली किंवा ऐकली पाहिजे.
मग एकच बातमी रोज छापली तरी चालेल!!!

संयुक्त द्विभाषिक अमेरिका?

हा माझा दोन वर्षांपूर्वीचा लेख आहे. त्यावेळी ‘सकाळ’च्या ‘लक्षवेधी’ सदरात तो छापून आला होता. आता त्यात काही सुधारणा करायच्या आहेल. त्या मी करेनच. तोपर्यंत ही सेवा रुजू करून घ्यावी.
अमेरिकन संस्कृतीचा डंका जगभर वाजत असताना व त्यामुळे जगभरातील मूळ भाषांच्या अस्तित्वावर गदा येत असताना, खुद्द अमेरिकेत मात्र द्विभाषिक व्यवस्थेचे पडघम वाजू लागले आहेत. शेजारच्या कॅनडाप्रमाणेच अमेरिकेतही इंग्रजीसह अन्य एका भाषेला व्यवहारभाषा म्हणून मान्यता मिळायची चिन्हे आहेत. ही दुसरी भाषा असणार आहे स्पॅनिश. सध्याच अमेरिकन जनतेला विमानांचे आरक्षण करताना, व्यवसायासाठी दूरध्वनीचा वापर करताना किंवा बॅंकेत व्यवहार करताना अनेक पर्यांयापैकी एका भाषेची निवड करावी लागत आहे. "हिस्पॅनिक लोकांची संख्या वाढण्यापूर्वी आम्हाला अशा गैरसोयीला तोंड द्यावे लागत नव्हते,' अशी तक्रार अमेरिकन जनता करू लागली आहे. दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश भाषक निर्वासित मोठ्या संख्येने अमेरिकेत स्थलांतर करत असतात. त्यांच्यामुळे स्पॅनिश भाषकांची संख्या नजीकच्या काळात इंग्रजी भाषकांच्या संख्येला ओलांडून जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. हा धोका इंग्रजी भाषकांनी एवढ्या गांभीर्याने घेतला आहे, की "यू. एस. इंग्लिश' या नावाची संघटनाच स्थापन करण्यात आली आहे. इंग्रजीला अमेरिकेची राष्ट्रीय भाषा जाहीर करावे, अशी या संघटनेची मागणी आहे. अमेरिकेची एकात्मता टिकविण्यासाठी हे आवश्‍यक आहे, असे या पक्षाच्या लोकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान जॉर्ज डब्लू. बुश यांनी हिस्पॅनिक समूहात प्रचार करताना अनेकदा स्पॅनिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे मुख्य स्पर्धक जॉन केरी यांनीही तोच मार्ग चोखाळला होता. अमेरिकेच्या आजूबाजूला स्पॅनिश भाषक देशांची मोठी संख्या आहे. तिथून सातत्याने निर्वासित येत असल्याने, त्या भाषेला "मरण' नाही, असे भाषातज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेच्या जनगणना खात्याने मार्च महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसारही, 2050 सालापर्यंत देशात हिस्पॅनिक-अमेरिकन वंशाच्या लोकांची संख्या तिपटीने वाढण्याची शक्‍यता आहे. या वंशाच्या लोकांची संख्या सध्या 3 कोटी 60 लाख आहे, ती 10 कोटी 30 लाख होईल. लोकसंख्येत त्यांचा वाटा 24.4 टक्के असेल, असे या खात्याने म्हटले आहे. मूळ अमेरिकनांचा वाटा सध्या 69.4 टक्के आहे, तो 2050 मध्ये 50.1 टक्‍क्‍यांपर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील शतकात अमेरिकेत जाण्यासाठी TOFEL प्रमाणेच TOSFL परीक्षा द्यावी लागल्यास नवल नाही.

सुसंस्कृत ऋणानुबंधांची इतिश्री!

दूरचित्रवाणी वाहिन्यांनी लोकांच्या मनावर राज्य करण्यापूर्वीच्या काळात नभोवाणी केंद्रांच्या कार्यक्रमांची जगावर सत्ता होती. शीतयुद्धाच्या काळात तर विविध देशांच्या नभोवाणी केंद्रांचीच चलती होती. त्यात एक केंद्र आहे "डॉइट्‌शे वेले' या संस्थेचे. आधी पश्‍चिम जर्मनीच्या व नंतर एकीकृत जर्मनीच्या सरकारचे प्रचाराचे साधन असणाऱ्या या केंद्राचे भारताशी विशेष नाते होते व आहे. त्यामुळेच या केंद्राला मिळणाऱ्या श्रोत्यांच्या पत्रांमध्ये, कित्येक वर्षे भारतातून येणाऱ्या पत्रांची संख्या सर्वाधिक होती. "डॉइट्‌शे वेले' याचा अर्थ होतो "जर्मन तरंग.' मॅक्‍समुल्लर आणि गोएथेच्या परंपरेला जागून या केंद्रावर गेल्या वर्षीपर्यंत संस्कृतमधून कार्यक्रमांचे प्रसारण होत होते. "आकाशवाणी'व्यतिरिक्त नियमितपणे संस्कृतमधून कार्यक्रम प्रसारित करणारे ते जगातील एकमेव आकाशवाणी केंद्र होते. दर पंधरवड्याला सोमवारी संस्कृतमधून सादर होणाऱ्या या कार्यक्रमात जर्मनीतील संस्कृतविषयक घडामोडींची चांगली माहिती मिळत असे. या केंद्राचे हिंदीतील कार्यक्रम दररोज 45 मिनिटे प्रसारित करण्यात येतात, त्यातील 15 मिनिटे संस्कृतच्या वाट्याला येत असत. पूर्व आणि पश्‍चिम जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर, जर्मनीचा रोख युरोपच्या एकत्रीकरणाकडे वळला. त्यानुसार या केंद्रावरूनही केवळ जर्मनीऐवजी संपूर्ण युरोपमधील घडामोडींची माहिती देण्यात येऊ लागली. त्यामुळेच जगभरच्या संस्कृतप्रेमींना विविध विद्यापीठांमध्ये चालणारे संशोधन, विविध चर्चासत्रे आदींची माहिती मिळत असे. नव्या व्यापारी प्रसारणाच्या काळात हे कार्यक्रम चालू ठेवणे "डॉइट्‌शे वेले'ला परवडेनासे झाले आहे. त्यामुळेच या केंद्राने आपले हिंदीतील प्रसारण चालू ठेवले आहे; मात्र संस्कृतमधील कार्यक्रम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. "डॉइट्‌शे वेले'च्या हिंदी प्रसारणास सुरवात झाली 15 ऑगस्ट 1964 रोजी. त्यानंतर 3 फेब्रुवारी 1966 रोजी या केंद्रावरून संस्कृत कार्यक्रमांचे प्रसारण सुरू झाले. "आकाशवाणी'ची "सिग्निचर ट्यून' बनविणाऱ्या अर्न्स्ट शाफर यांच्या प्रयत्नातून ते साध्य झाले होते. जगात त्या वेळी संस्कृतमधून कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एकही नभोवाणी केंद्र नव्हते. या विषयावर भारतीय संसदेत जोरदार चर्चा झाली. सरकारवर टीका झाली. त्यानंतर "आकाशवाणी'वरून संस्कृतमधून बातम्या सादर करण्यात येऊ लागल्या. "डॉइट्‌शे वेले'च्या या उपक्रमाचे भारतात भरघोस स्वागत झाले. देशातील 20 हून अधिक वर्तमानपत्रांनी या घटनेचे स्वागत केले. अलाहाबाद येथे झालेल्या जागतिक हिंदू परिषदेत "डॉइट्‌शे वेले'च्या अभिनंदनाचा खास ठराव संमत करण्यात आला. नंतरच्या काळात भारतात वाढत गेलेल्या "मॅक्‍स मुल्लर भवन' आणि "गोएथे इन्स्टिट्यूट'चा पाया या केंद्राने घातला. आजही जोमाने चालू असलेल्या या केंद्रांवरील संस्कृत "वाणी' नाहीशी झाल्याने मात्र सुमारे चार दशकांच्या सु"संस्कृत' ऋणानुबंधांची इतिश्री झाली आहे.

संस्कृत ते ब्राझील-एक मजेदार प्रवास


संस्कृत आणि ब्राझीलचा संबंध असू शकतो का? जगाच्या नकाशाची थोडीशीही कल्पना ज्याला आहे, त्याला या दोघांचा संबंध असल्याचे सांगितले, तर हसू नाही का येणार? अगदीच संस्कृतमध्ये सांगायचे, तर तो बादरायण संबंध असणार नाही का? मलाही असेच हसू आले होते. मात्र एरिक पॅर्ट्रिज यांच्या "संस्कृत टू ब्राझील ः विग्नटस्‌ अँड एस्सेज ऑन लॅंग्वेजेस' या पुस्तकात हा संबंध ज्या प्रकारे दाखविला आहे, त्यावरून संशयाला जागा राहत नाही. आपण भले कितीही म्हणू, संस्कृत सर्व भाषांची जननी आहे वगैरै...मात्र त्याचा खरा पुरावा अशा उदाहरणांतूनच िदसतो.एरिक साहेबांच्या मते, संस्कृत आणि ब्राझीलचा संबंध जोडण्यास कारणीभूत आहे "भा' हा धातू. आपल्याकडे भास्कर किंवा प्रभाकर यांसारख्या शब्दांतून "भा'हा धातू प्रामुख्याने वापरात आहे. त्याचा अर्थ आहे प्रकाशणे, चकाकणे. संस्कृत आणि युरोपीय भाषांचे सख्य तर जगप्रसिद्धच आहे. त्यामुळे "भा' धातूवरून प्राचीन फ्रेंच भाषेत एक शब्द निर्माण झाला "ब्रेज,' (braise) त्याचा अर्थ आहे जळणारा कोळसा. याच शब्दाचे इंग्रजीत एक रूप बनले "ब्रेझ' (braze). युरोपीय दंतकथांमध्ये "ब्राझील' या नावाने एक देश असून, उत्तर अंटार्क्‍टिकावरील या काल्पनिक देशात "ब्राझीलवूड' नावाचे लाकूड मोठ्या प्रमाणात मिळते, अशी कल्पना होती. आता या लाकडाला "ब्राझीलवूड' का म्हणायचे, तर या लाकडाचा रंग जळत्या कोळशासारखा असतो. पोर्तुगीज दर्यावदी जेव्हा ब्राझीलमध्ये पोचले, तेव्हा त्यांना तेथे असे जळत्या कोळशाच्या रंगाची अनेक झाडे आढळली. त्यामुळे त्यांनी त्या प्रदेशाला ब्राझील हेच नाव दिले.कोलंबस व त्याच्या सहकाऱ्यांनी भारतीय माणसं समजून अमेरिकेतील आदिवासींना ज्याप्रमाणे रेड इंडियन्स म्हणायला सुरवात केली, त्याच धर्तीचे कृत्य होतं हे. मात्र काही का असेना, जागाच्या पाठीवर संस्कृत कुठे ना कुठे, कोण्या ना कोण्या रुपात आहे एवढं नक्की!

गिरीश कर्नाड यांच्या कृती आता मराठीतही!

प्रसिद्ध कन्नड नाटककार आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांनी लिहिलेली दहा नाट्के मराठी प्रेक्षकांसमोर येत आहेत. पॉप्युलर प्रकाशनार्फे ही नाट्के प्रकाशित होणार आहेत. यातील दोन नाट्के एकांकिका असून, ही सर्व नाट्के कर्नाड यांच्या प्रारंभीच्या कृतींपैकी आहेत.
मोठ्या संख्येने असलेल्या वाचकांपर्यंत पोचणे, हा कोणत्याही लेखकासाठी सुखाचा अनुभव असतो, असे मत यानिमित्ताने श्री. कर्नाड यांनी व्यक्त केले. मात्र त्याचवेळेस एखादी कलाकृती भाषांतरीत होत असताना त्यातील काही आस्वाद्य अंश कमी होतो, हेही त्यांनी मान्य केले.
श्री. कर्नाड यांना स्वतःला मराठी उत्तम वाचता व लिहिता येते. त्यामुळेच कन्नडमधून मराठीत येताना त्यांना कमी खळ पोचेल, असे त्यांना वाटते. "मराठी ही कन्नडचीच भाषाभगिनी आहे. त्यामुळे मूळ कृतीतील बहुतांश सौंदर्य त्यात कायम राहते, असे माझे मत आहे. अन्य द्राविड भाषांमध्ये भाषांतर होत असताना ही उणीव अधिक जाणवते. मात्र इंग्रजीत भाषांतर होत असताना ती त्याहूनही अधिक असते," असे ते म्हणतात.
गिरीश कर्नाड यांचे नाव माहित वसेल, असा नाट्यर्सिक निरळा! आधुनिक भारतीय रंगभूमीवर प्रयोगशीलता, नाविन्य, वैचारिकता आणि वैविध्य या वैशिष्ट्यांनी उठून दिसणारी जी व्यक्तिमत्वे आहेत, त्यांमध्ये श्री. कर्नाड यांचे नाव अग्रणी आहे. मराठी प्रेक्षकांसाठीही श्री. कर्नाड यांचे नाव नवे नाही. त्यांच्या ’तुघलक’ आणि ’नागमंडल’ सारख्या नाट्कांवर एक संपूर्ण पिढी पोसलेली आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी केलेला संवाद, महाराष्ट्र-कर्नाटक वादाला काही काळ तरी विस्मरणात ढकलणारा ठरला होता. लेखकाला राजकीय सीमांचे बंधन नसते, हे दाखवून देणारे गिरीश कर्नाड आता थेट मराठी वाचकांच्या भेटीला येत आहेत.