Sunday, April 25, 2010

जो जे वांछेल ते लिहो

माझ्या मागच्या पोस्टवर श्री. विवेक यांनी खालील भाष्य केले आहे. ती टिपणी जशास तशी देत आहे. 

तुम्ही दिलेली
http://www.manase.org/maharashtra.php?mid=79#top ही लिंक उत्सुकतेने बघितली.

ज्ञानेश्वरांपासून ते सावरकरांपर्यंतची नावं घेऊन शेवटी किती मराठी प्रतिशब्द दिलेत... तर तब्बल चार! आणि तेही हॅलो, थॅंक्स, वेबसाईट आणि कॉम्प्युटर! हे चारी शब्द जसेच्या तसे मराठीत वापरले तरी काही फरक पडणार आहे का? हे तर आता आपले मराठीच शब्द झाले आहेत.

ही लिस्ट उगीच टाकायची म्हणून टाकल्यासारखी वाटते. सावरकरांच्या ‘भाषाशुद्धी’चा संदर्भ (रेफरन्स म्हटलं तरी चालेल) घेतला असता तरी सुरुवात करण्यासाठी एक सुंदर यादी देता आली असती. या विषयात भरपूर काम झालेलं आहे. पण राजकीय पक्ष जिथं मतांचा संबंध नसेल तिथं होमवर्क करत नाहीत हेच खरं.

"या शब्दांमध्ये सातत्याने वाढ करण्यात येईल. दर ३ ते ५ दिवसांनी एक शब्द यादीमध्ये येईल." हा त्यांचा क्लेम आपण तपासून पाहूयाच. एक नवा शब्द देण्यासाठी ३ ते ५ दिवस कशाला? हा काही गहन संशोधनाचा विषय आहे काय? तरीदेखील खरोखरीच काही उपयुक्त शब्द मिळाले तर तुम्हां-आम्हाला आनंदच होईल.

‘राज’कारण्यांच्या हातात किती गोष्टी द्यायच्या हाही एक मुद्दा आहेच. दैनंदिन (हाही बहुधा सावरकरांचाच शब्द) व्यवहारात कोणते शब्द वापरावेत हे सांगायला राजकीय पक्ष हवेत काय?

विवेक

१. ही कॉमेंट म्हणजे तुम्ही मनसेची लिंक दिलीत म्हणून केलेली टीका नव्हे.

२. लिस्ट, रेफरन्स, होमवर्क, क्लेम, लिंक, कॉमेंट हेही मराठीच शब्द आहेत असं माझं मत आहे. यांना जुने मराठी प्रतिशब्द असले तरी. एका संकल्पनेला अनेक शब्द उपलब्ध असणं ही भाषेची श्रीमंती आहे. मग ते शब्द मूळचे इंग्रजी असले तरी. जेंव्हा आपण असे शब्द देवनागरीत लिहितो आणि सामान्यपणे मराठी माणसाला त्यांचा अर्थ कळतो तेंव्हा ते शब्द मराठीच झालेले असतात.
­
या विषयात तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल.


सर्वप्रथम मी विवेक यांना धन्यवाद देतो. या ब्लॉगवर आतापर्यंत आलेल्या पोस्टवरील टिपण्यांपैकी स्वतंत्र पोस्टला जन्म देणारी ही पहिली कॉमेंट. या संदर्भात माझे मत मांडतो.

मनसेच्या उपक्रमाबद्दलः मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने जे काही काम, जे काही उपक्रम महाराष्ट्रात चालू आहेत, त्यांच्यापैकी काहींचा उल्लेख मी केला. सर्वच उपक्रमांची मला माहिती आहे, असं नाही. वास्तविक, जे उपक्रम चालू आहेत मात्र ज्यांची दखल घ्यावी तितक्या प्रमाणात घेतली नाही, अशा उपक्रमांबद्दल मला बोलायचे होते. त्यांसदर्भात आधीच्या पोस्टमध्ये फ्यूएल आणि शब्दभांडारचा उल्लेख केला आहेच. त्याच ओघात मनसेबद्दलचाही उल्लेख आला.

मनसेची प्रतिमा एक आक्रमक (हल्लेखोर?) पक्ष अशीच आहे. असे असताना त्यांनी हे विधायक काम हाती घ्यावे, ही मला वाटते कौतुकाचीच गोष्ट आहे. ते करताना त्यांनी कोणाचा उल्लेख करावा, केल्यास त्याची कितपत बूज राखावी, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. राजकीय पक्ष म्हणून सर्वच पक्ष अनेक आंदोलने, उपक्रम राबवितात. त्याची शेवटपर्यंत तड लावताना कोणीही दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न शिवसेनेने, पाणी पुरवठ्याचा प्रश्न स्वाभिमान संघटनेने हाती घेतला होताच. त्यांचे अपेक्षित परिणाम आले नाहीत याचा अर्थ असा नाही, की ते मुद्दे चुकीचे होते किंवा त्यांनी घ्यायला नको होते. महागाईच्या प्रश्नावर भाजप दरवर्षी एक आंदोलन उभे करतो. खुद्द मनसेने अशी अनेक आंदोलने केली, त्या सर्वांचीच परिणती इच्छित स्वरूपात झाली, असे नाही. नवीन शब्दांच्या बाबतीत मनसेच्या या उपक्रमाची तशी गत होऊ नये, इतकीच आपण इच्छा करू शकतो. यापलिकडे काय करणार?

संकेतस्थळांवर केवळ चार शब्द दिसतात, यात मला काही आश्चर्य वाटत नाही. इथे हेही सांगायला हवं, की या उपक्रमाचा एक भाग म्हणून मनसेच्या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर एक शब्द दिलेला असतो. गेल्या आठवड्यात असलेल्या शब्दाच्या जागी आता मला नवीन शब्द दिसत आहे. (गेल्या आठवड्यात संकेतस्थळ होता, तो आता content=आशय आहे) त्याअर्थी अद्यापतरी गांभीर्याने हे काम चालू आहे. राहता राहिला तीन-चार दिवसांच्या अंतराचा प्रश्न. एक लक्षात घ्या, मनसे हा राजकीय पक्ष आहे. ते काही विद्यापीठ किंवा शैक्षणिक संघटना नाही. (याबाबतीत त्यांचं काम कुठवर आलं आहे, हेही बघायला हवं एकदा). त्यामुळे नवीन शब्द ते त्यांच्या गतीने टाकणार. शिवाय, उपक्रमाबद्दल माहिती देणाऱ्या पानावर लिहिलेली वाक्यं मला वाटतं अधिक महत्वाची आहेत.

आवश्यकता नसताना, उगाचच परभाषेतील शब्द न वापरता, कटाक्षाने मराठीतच बोलण्यासाठी या शब्दभांडाराचा उपयोग करावा ही आग्रहाची विनंती. आपणासही शुद्ध मराठी शब्द माहीत असल्यास आम्हाला जरूर कळवावेत.

एक तर ही शब्द वापरण्याची विनंती आहे. दुसरीकडे ज्यांना भाग घ्यायचा आहे, त्यांच्यासाठीही त्यात जागा आहे. राजकारण्यांच्या हातात किती गोष्टी द्यायच्या, हे खरं आहे. महाराष्ट्रातील 80 टक्के समस्या त्याच मानसिकतेतून निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे वरील वाक्याचा आधार घेऊन, लोकांनी आपला वाटा उचलला तर ही समस्या राहणार नाही. वैयक्तिकरित्या, मी स्वतः वरील वाक्यात 'शुद्ध मराठी' ऐवजी 'योग्य मराठी शब्द' असं म्हटलं असतं. अर्थात हा उपक्रम मनसेचा असल्याने जी शब्द किंवा वाक्ययोजना त्यांनी केली आहे, ती आपण चालवून घेतली पाहिजे.

शब्दांबद्दलः हॅलो किंवा थॅक्यू सारखे शब्द दैनंदिन व्यवहाराचा भाग झाले आहेत, हे खरं आहे. मात्र त्यांची व्याप्ती किती आहे हा प्रश्न आहे. शहरी भाग वगळता महाराष्ट्राच्या अनेक भागांत, उदा. मराठवाड्यातील शहरं जिथे माझा बऱ्यापैकी वावर असतो, अशा ठिकाणी हे शब्द आजही सर्रास वापरले जात नाहीत. नमस्कार, नमस्ते, रामराम याच शब्दांची अधिक चलती आहे. उलट, अमरकोशाच्या धर्तीवर समानशब्दांचा कोश करायचा झाल्यास मराठीत हॅलोला नमस्कार, नमस्ते, रामराम, जय भीम, जय महाराष्ट्र (अगदी जय जिजाऊसुद्धा) अशी एक जंत्रीच उभी करता येईल. शिवाय ही झाली बोली भाषेपुरती गोष्ट. लिखित भाषेत, खासकरून औपचारिक संवादाच्या लेखनामध्ये तर मराठी शब्दच 'हटकून' वापरले जावेत, या मताचा मी आहे. त्यासाठी कितीही परिचयाचा परकीय शब्द झाला, तरी त्याला मराठी शब्द मिळालाच पाहिजे, असं मला वाटतं. त्यासाठी गरज पडल्यास समानशील भारतीय भाषांची मदत घ्यावी लागली, तरी हरकत नाही.

एका संकल्पनेला अनेक शब्द उपलब्ध असणं ही भाषेची श्रीमंती आहे.

हे तर अगदी सर्वमान्य तत्व आहे. याच वाक्याची दुसरी बाजू लक्षात घेतली, तर computer ला कॉम्प्युटर व संगणक हे दोन्ही शब्द मराठीत असणं, ही मराठीची श्रीमंती नव्हे काय. काय सांगता, काही दिवसांनी दोन्ही शब्द वापरातून हद्दपार होतीलही. पंधरा वर्षांपूर्वी shorthand हा एक लोकप्रिय विषय़ होता. त्याला मराठीत लघुलेखन हाही शब्द बराच वापरात होता. आज या दोन्हींची चलती नाही. कदाचित संगणकाच्या बाबतीतही तसे होईल. त्यावेळी हे दोन्ही शब्द मराठी शब्दकोशांची शोभा वाढवतील.

त्याचप्रमाणे वेबसाईटला संकेतस्थळ हा बऱ्यापैकी रूढ झालेला शब्द आहे. आंतरजालावर तो अगदी मुक्तहस्ते वापरलेला आढळतो. समस्या ही आहे, की गाडे तिथेच अडले आहे. आता वेब 2.0, वेब 3.0 या संकल्पनांसाठी अद्यापही मराठीत शब्द नाही किंवा त्या दिशेने प्रयत्न होताना दिसत नाही. खरी काळजी ती आहे. इंग्रजी शब्द परिचयाचे होऊन ते मराठी म्हणून वावरायला लागणे, यात आक्षेपार्ह काही नाही. मात्र त्यांचं बऱ्यापैकी देशीकरण व्हावे, इतकीच माझी अपेक्षा आहे. या दृष्टीने घासलेट, टिनपाट, पाटलोण हे माझे आदर्श शब्द आहेत. (लक्षात घ्या, यातील एकाही शब्दाचे कर्तेपण सुशिक्षितांकडे जात नाही.) एक उदाहरण देतो. तेलुगु आणि बंगाली भाषेत फ्रिज हा शब्द फ्रिड्जे असा लिहितात, काहीजण बोलतातही. त्याला कारण ते इंग्रजी लेखनातील स्पेलिंग स्वीकारतात मात्र त्यातील अनुच्चारित अक्षराची संकल्पना नाही उचलत. याउलट आपल्याकडे वर्ल्ड असं लिहिताना मराठीत नसलेली तीच संकल्पना इंग्रजीतून आयात करतो.

सँडविच, टर्की यांसारख्या शब्दांना प्रतिशब्द देणं, ते घडविण्याचा प्रयत्न करणं हे जसं अर्थहीन आहे, तितकंच संकेतस्थळासारख्या वैश्विक (जिथे खास भौगोलिक किंवा सांस्कृतिक संदर्भ चिकटलेले नसतील अशा) संकल्पनांना आपण एतद्देशीय पर्याय निर्माण न करणं हेही घातक होईल. त्यादृष्टीने प्रयत्न कोण करत आहे, हे पाहून त्याची प्रतवारी ठरविणं चुकीचं होईल. "एखादा शब्द चुकीचा आहे असं शंभर वैयाकरणी म्हणत असतील, तरी जोपर्यंत बहुतांश लोक तो वापरत आहेत तोपर्यंत भाषेच्या दृष्टीने तो योग्यच आहे," असं लोकमान्य टिळकांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. जुने असो वा नवे, कोणत्याही भाषेतील प्रत्येक शब्दाला हाच निकष लागू होतो. त्यामुळे नवीन शब्द घडवून, त्यांचे प्रचलन वाढवणे, ही खरी आजची गरज आहे.