Saturday, December 5, 2009

माकडाच्या घराची बातमी

एक होते माकड. दिवसभर आपल्या ऑफिसमध्ये बसून असावे आणि संध्याकाळ इकडे तिकडे उंडारत काढावी, या पलिकडे एखाद्याची जीवनशैली असते, असावी यावर त्याचा विश्वास नव्हता. तरीही कधी कधी त्याला स्वतःच्या अशा उनाड आयुष्याचा कंटाळा यायचा. पावसाळ्यात चुकून मुसळधार पाऊस पडायचा. त्यावेळी हा एखाद्या इमारतीच्या आश्रयाला गेला, की तिथल्या लोकांनी कधीही माकड पाहिलेले नसल्याने ते माकडापेक्षा जास्त चाळे करायचे. झाडावर बसावं तर तिथे म्हाडाच्या घरांपेक्षा जास्त पावसाचं पाणी गळत असायचं. अशावेळी माकड मनातल्या मनात संकल्प करायचे, हे काही ठीक नाही गड्या. आपण एवढे कर्तबगार आणि अशा रितीने पावसात भिजत राहावं. साधे चिमण्या-कावळे सुद्धा स्वतःचे घरटे करतात. थांब, हा पाऊस थांबला की आधी एखादे डुप्ले फ्लॅट घ्यायलाच पाहिजे. वर्तमानपत्रांच्या रिअल इस्टेटच्या पुरवण्या वाचून त्याला सगळ्या बिल्डरांची नावे जवळपास तोंडपाठ झाली होती. त्यामुळे कोणाकडे फ्लॅट बुक करायचा, हेही त्याने मनातल्या मनात ठरवून टाकलेले असायचे. पाऊस थांबला, की मात्र माकडाचा मनोरथही जागच्या जागी उभा असायचा, सरकारी योजनांसारखा. परत त्याचा सामान्य जीवनक्रम सुरू राहायचा.

हिवाळ्यात थंडी वाजू लागली, की माकडाला वाटायचे आपलेही एखादे घरकुल असावे जिथे प्रेमाची ऊब मिळेल. दूरचित्रवाणीच्या जाहिराती पाहून त्याला घर-संसार म्हणजे काही गंमतीचीच गोष्ट आहे, असे वाटत होते. एकदा का थंडीचा मोसम उलटला, की आपण वन रूम किचन का होईना, पण स्वतःच्या जागेत जायचेच, असा बेत तो कुडकुडत करत असायचा. थंडीच्या काळात, दोन हात एकमेकांत गुरफटुन तो असा काही बसायचा, की च्यवनप्राश खाण्याचीसुद्धा त्याला इच्छा व्हायची नाही. मात्र हिवाळा संपला, की फुलांवरील दवबिंदू उडून जावे तसा त्याचा इरादाही नाहिसा व्हायचा. नव्हे, आपण कधी असा विचार केला होता, हेही तो विसरून जायचा.

उन्हाळ्यात झाडाच्या फांद्यावरून येणारे कडक ऊन सोसताना माकडाला वाटायचे, आपलेही घर असते तर त्यात एखादा फ्रीज असता. ऊन्हाने काहिली होत असताना फ्रीज उघडून आपण एखादे शीतपेय पीत बसलो असतो. माकडच ते, शीतपेयासाठी पैसे द्यावे लागतात किंवा भारनियमनामुळे फ्रीजसुद्धा थंड होणे बंद झाल्याची त्याला कल्पना असण्याचे कारण नव्हते. अर्थात एकदा का ऊन सरले, की माकडाच्या प्लॅनचेही बाष्पीभवन होऊन जायचे. मग कुठले घर आणि कुठला विसावा.

ही झाली पारंपरिक कथा. मात्र आपले माकड आहे एकविसाव्या शतकातील. त्यामुळे आपल्या वास्तवात न येणाऱ्या योजनांचेही मार्केटिंग कसे करावे, याचं कौशल्य त्याने विकसित केले होते. त्यामुळे काय व्हायचं, पावसाळा आला की बहुतेक वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी येत असे.

येत्या पावसाळ्यात माकडाचे घर होणार

त्याखाली माकडाच्या योजनेची सगळी माहिती दिलेली असायची. इतकेच नव्हे तर माकडाने केलेली घराची आखणी अगदी सांगोपांग त्यात येत असे. लवकरच जनतेला हे घर पाहायला मिळेल, असेही त्या बातमीत म्हटलेले असायचे. जो प्रकार पावसाळ्यात, तोच प्रकार उन्हाळ्यात. उन्हाळा संपला, की माकडाच्या घराचे बांधकाम सुरू होणार या अतिरिक्त बातमीसह माकडाची योजना अगदी सविस्तर स्वरूपात त्या बातमीत येत असे. एका वर्तमानपत्रात आली, की दुसरे वर्तमानपत्रही ती बातमी आतल्या पानात का होईना, पण छापतच असे. उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही

माकडाचे घर आता अंतिम टप्प्यात, लवकरच बांधकामाला सुरवात

अशी बातमी असायची.

अगदी ताज्यातली ताजी बातमी अशी आहे, की माकडाचे घर होईल तेव्हा होईल, मात्र त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक पेपरने एक वार्ताहर नेमला आहे. चुकून घराचे बांधकाम सुरू झालेच, तर आता स्लॅब पडणार, आता पायऱ्या बांधणार अशा बातम्या छापण्यासाठी या वार्ताहरांशी संपर्क साधण्याचा तुर्तास माकडाचा विचार आहे.

Sunday, November 29, 2009

तुम्ही म्हातारे होऊ नका!

“आजही मी हातात कप घेतला, की तो थरथरायला लागतो. मात्र हातात ब्रश घेतला तर तो थरथरत नाही. एखादी शक्ती माझ्याकडून हे शक्य करून घेत असावी. मात्र माझ्या हातून चांगलेच काम होत असल्याने त्या शक्तीचा मी आभारी आहे,” मंगेश तेंडुलकर बोलत होते. या वाक्यांनी मला स्वतःला आपण काय गमावले आहे, याची जाणीव करून दिली. तेंडुलकर यांच्या 50 व्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे काल बालगंधर्वमध्ये उदॆघाटन झाले. त्यावेळी त्यांनी वरील उदॆगार काढले. व्यंगचित्रे तसे पाहायले गेले तर माझी पहिली आवड. त्यात तेंडुलकरांची चित्रे म्हणजे वेगळीच खुमारी होती. त्यांच्या या वाक्यासरशी मी एकदम 1983 पर्यंत मागे गेलो.

ज्या वयात रविवारची जत्रा मुलांनी वाचू नये, असा संकेत होता त्यावेळी मी ते साप्ताहिक सर्रास वाचत असे. त्याला कारण तेंडुलकरांची व्यंगचित्रे त्यात येत असत. उरुस का अशाच काहिशा नावाने मलपृष्ठाच्या आतील बाजूस त्यांची व्यंगचित्रे येत असत. त्यात शिवाय नाटकांचा समाचार घेणारे त्यांचे खुमासदार सदरही होतेच. त्या व्यंगचित्रांनी बराच काळ प्रभावित केले होते. त्यानंतर विकास सबनीस आणि राज ठाकरे यांच्या शैलीने भुरळ घातली होती. नंतरही काही काळ या सर्वांची गाठभेट अनेक वर्षे दिवाळी अंक किंवा दैनिक वर्तमानपत्रांतून पडत होती. मग काही काळ व्यंगचित्रकार म्हणून जगण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते सगळे डाव वेगळेच पडले. आता तेंडुलकरांच्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने, त्यांच्या या वाक्याने गमावलेल्या त्या कौशल्याची आठवण झाली.

या कार्यक्रमाचे उदॆघाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी मोठे मनोज्ञ भाषण केले. “मुलगा मोठा होताना बापाला खूप आनंद होतो. मात्र आपले वडिल म्हातारे होऊ नयेत, असे मुलाला वाटत असते. वडिलांनी म्हातारे होणे म्हणजे काहीतरी गमावल्यासारखे आहे. त्यामुळे तेंडुलकर, तुम्ही म्हातारे होऊ नका. आहात तसेच राहा,” नाना पाटेकर बोलत होते. त्यांच्या या विनंतीला उत्तर म्हणून बोलतानाच तेंडुलकरांनी वरील वाक्य उच्चारले होते.

या सगळ्या कार्यक्रमात खरंच व्यंगचित्रकार झालो असतो तर…असा विचार येत होता. कार्यक्रम संपला आणि सगळ्या लोकांनी नाना पाटकेरला एकच गराडा घातला. बिचारे तेंडुलकर एका बाजूला पडले. सगळ्यांची घाई नानाची सही घेण्यासाठी. त्यावेळी व्यंगचित्रकार न झाल्याचे आयुष्यात पहिल्यांदाच समाधान वाटले!