Thursday, August 30, 2007

मान न मान, तू मेरा सलमान!

नमस्कार,


आवाज : प्रसिद्ध आणि लोकोद्धारक अभिनेते समलान खान यांच्या कारागृह प्रवासाच्या धावत्या वर्णन ऐकणाऱ्यांचे स्वागत आहे. मी, हांजी हांजी खां आणि प्रसिद्ध चाटुकार अखंड तोंडपुजे, आम्ही तुम्हाला या जगहितकारक यात्रेचे इत्थंभूत वर्णन देण्यासाठी सज्ज आहोत. खान यांच्या या लोकविलक्षण त्यागाबद्दलची हरतऱ्हेची माहिती घेण्यासाठी आपल्याला प्रचंड उत्सुकता आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यासाठीच आपण सध्या खान यांच्या घरासमोरील गल्लीत उभे आहोत. ते बाहेर येऊन कारागृहात प्रवेश करतील, तसतशी ताजी माहिती आम्ही देऊ. त्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. पाहत रहा आमची वाहिनी. आता घेऊ आपण एक ब्रेक. त्यानंतर पहा आमचा वृत्तांत.


(एक ब्रेक : प्रसिद्ध "खपा बनियान -ये धोने की बात है' यांच्या मार्फत प्रायोजित.)


चाटुकार ः ब्रेकनंतर आपले पुन्हा थेट प्रक्षेपणात स्वागत. आपण सध्या उभे आहोत समलान खान यांच्या घराबाहेरील एका गल्लीत. या गल्लीपासूनच समलान यांच्या घराच्या मुख्य दरवाजापर्यंत रस्ता जातो. याच रस्त्यावर समलान लहानपणी गोट्या खेळत होता. त्याच्या खेळादरम्यान उडालेल्या गोट्या लागून चेहऱ्यावर जखमा झालेले अनेक जण इथे आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना समलान खान आज "स्टार' असल्याचा अभिमान आहे. यांतीलच एक आहेत हे वयोवृद्ध मामू. आपण त्यांच्याशीच बोलूया...


आप कोई याद बताएंगे? कोई ऐसी बात जो आप नहीं भूले है?


मामू : हां, जरूर याद है. समलान बचपन से बहुत शरारती था. केंचुले तो वो खेलता ही था...क्रिकेट भी कहता था. बल्ला नहीं थे तो एक-दो बार मेरे दरवाजे की बल्लिंयॉं ही तोड के ले गया. बहुत शरारती था. लेकिन मैंने उसको कभी डांटा नही, क्यों कि वो कहता, चाचा, मैं बडा होने के बाद आपको एक फ्लैट दे दूंगा. और उसने दिया भी...वो स्टार बनने के बाद जुहू में हुसेन भाई से कह के उसने एक फ्लैट मेरे बडे बेटे को दिया.


बघा, म्हणजे समलान हा किती परोपकारी आहे पहा. वयोवृद्ध मामूंना फ्लैट देणारा समलान आता जेलच्या कोठडीत किती कष्ट सहन करतो, हीच आता उत्सुकता आहे.


आताच मिळालेल्या बातमीनुसार, समलान झोपेतून उठला आहे. थोड्या वेळाने तो उठेल. त्यानंतर आंघोळ करून तो कारागृहाकडे रवाना होईल. या प्रत्येक क्षणाचे वृत्त आम्ही तुम्हाला देऊ. कुठेही जाऊ नका. आपण तोपर्यंत घेऊ एक ब्रेक...


(एक ब्रेक : आधीचेच प्रायोजक)


हांजी हांजी खां : मी उभा आहे समलान खान यांच्या बंगल्याच्या बाहेरच्या बाजूस. समलानकडे पाच कुत्रे पाळलेले आहेत. त्यातील दोन तुम्हाला या फ्रेममध्ये दिसत आहेत. याच्याच बाजूला त्यांचे टॉइलेट आणि बाथरूम आहे. सध्या समलान अंघोळ करत आहे...असा अंदाज आहे कारण आतून पाणी वाहण्याचा आवाज येत आहे. थोड्याच वेळात ते बाहेर येतील. त्यानंतर निघतील निदान काही दिवस तरी कारागृहात काढण्यासाठी...


चाटुकार : हांजी हांजी, तुला काय वाटतं...समलानचा गुन्हा त्याला झाली त्या शिक्षेएवढा गंभीर आहे का?


हांजी हांजी खां : चाटुकार, हे पहा समलानला उच्च न्यायालयाने शिक्षा दिली आहे. त्यामुळे आपण त्याबद्दल बोलणे योग्य नाही. चाटुकार, तुला माहितेय...काही वर्षांपूर्वी समलान एका जंगलात तेथील आदिवासींना कपडे आणि केक वाटायला गेला होता. त्यावेळी त्याला जंगलात एक लाकडाचे हरिण दिसले. समलानच्या खेळकर स्वभावानुसार तो त्या लाकडी हरिणाशी खेळू लागला. त्यात ते हरिण तुटले. त्यामुळे त्याला ही शिक्षा झाली नाही. कायदेतज्ज्ञांचे या शिक्षेबाबत वेगवेगळे मत आहे. मात्र, समलानच्या अनेक चित्रपटांत न्यायाधीशाची भूमिका करणारे अभिनेते मैलेश भोट यांच्या मते, ही शिक्षा फारच जास्त आहे. समलानचा स्वभाव, त्याची उदारता आणि सज्जनासारखी वागणूक पाहून त्याला सोडून द्यावे...


चाटुकार ः एक मिनट हांजी हांजी, आताच खबर आली आहे, की समलानची आंघोळ झाली आहे. त्याने पांढरी पॅंट घातली असून, बूट घालण्यासाठी पाय पुढे केला आहे. यावेळी त्याच्या घराच्या गच्चीवर सर्व नातेवाईक जमले होते. त्यांना समलानवर पुष्पवृष्टी करायची होती, मात्र जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्यांना ते जमले नाही. समलानने बूट घातले असून, तो तुरुंगात जाण्यापूर्वी घरातले शेवटचे जेवण घेत आहे. आपण त्याच्या मागावरच राहणार असून, कुठेही जाऊ नका...तोपर्यंत घेऊया थोडीशी विश्रांती!


(ब्रेक : प्रायोजक शामदेव मसाले...इसके बिना खाना अधूरा है!)


हांजी हांजी : नमस्कार, ब्रेकनंतर आपले स्वागत आहे. आपण पहातच आहात समलानच्या घराबाहेर किती मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. प्रत्येकाला आपल्या आवडत्या अभिनेत्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत, त्याची एकदातरी झलक पहायची आहे...समलानचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला सहा महिन्यांपूर्वी...आता त्याच्या तुरुंगात जाण्याने किमान एक वर्षभर लोकांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचे दर्शन होणार नाही. त्यामुळे आज त्यांना एकदा तरी समलानला डोळे भरून पहायचे आहे. त्यातीलच एकाशी आपण बोलूया...


आप कभी आये?


मैं तो आज ही यहां आया. अपने सम्मू भाई को जेल जाना है, ये मालूम हुआ तो वैसेईच भाग के आया.


आप क्याआ करते है?


हमारा तो साईकिल रिपेरिंग का दुकान है.


आप को क्याा लगता है, सम्मू भाई को दी गई सजा सही है?


बिलकुल गलत है जी. उनको कुछ सजा होना ही नहीं चाहिये था. अपुन के यहां कितने जानवर लोग मारते है. और यहां तो एक लकडी का हिरण टूट गया. अदालत को मंगता था तो थोडा सा फैन लेने का था. एक्टहर लोगों को जम में भेजनाईच नहीं चाहिये. हम फिर बात करते है.


आताच कळाले आहे, की समलान खान यांचे जेवण झाले आहे. जेवणात त्यांना त्यांचे आवडते मस्का-पाव आणि बकरीचे मटण दिले होते, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांचा जो जुना नोकर आहे, तुगलक, त्याच्याशी मी बोललो. त्याने सांगितले, की जेवण झाल्यानंतर समलानने दोनदा ढेकर दिला आणि एकदाच पाणी पिले.


चाटुकार : आता तुम्ही पडद्यावर पहात आहात, की समलान त्याचा छोट्या पुतण्या-भाच्यांशी भेटत आहे. तुम्हाला माहित आहे, की समलानला छोटी मुलं खूप आवडतात. त्याच्या नातेवाईकांवर त्याचे खूप प्रेम आहे. आता सहा महिने त्याला या मुलांशिवाय काढायचे आहे. त्यामुळे तो खूप इमोशनल झाल्याचे दिसत आहे. पडद्यावर अत्यंत कठोर भूमिका करणारा समलान मनातून अत्यंत हळवा आहे . त्याचे इथे प्रत्यंतर येत आहे. हांजी हांजी : आणि ती घडी आली...तुम्ही पहात आहात...अर्धा बाह्यांचा शर्ट आणि पांढरी पॅंट घातलेला समलान खान त्याच्या गाडीत बसत आहे. चाहत्यांच्या गराड्यातून वाट काढण्याचे त्याला कष्ट पडत आहे, हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे. तरीही किती शांतपणे तो मार्ग काढत आहे...जीवनातील संकटावर त्याने याच शांततेने मार्ग काढला आहे...असंच वाटत आहे जणू...अन्‌ समलानने त्याच्या गाडीच्या काचा खाली केल्या आहेत...काचा वर चढल्या तरी त्याच्या नजरा त्याच्या घरावरच टिकल्या असल्याचे जाणवत आहे...गाडी स्टार्ट झाली आहे...चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढत गाडी पुढे सरकत आहे...मुख्य रस्त्याला लागल्यानंतर गाडी डावीकडे सरकेल आणि त्यानंतर समलान खान सहा महिन्यांसाठी तुरुंगात पोचेल...मात्र तुम्ही दुसरीकडे वर जाऊ नका...मार्गावरील प्रत्येक चौकात आमचे प्रतिनिधी उभे आहेत. ते तुम्हाला खडा न खडा माहिती देतील. कुठेही जाऊ नका. फक्त थोडीशी विश्रांती...


(ब्रेक ः प्रायोजक हिरो गुंडा मोटार सायकल कंपनी)


(याहून अधिक माहिती घेण्यासाठी कृपया कोणतीही वृत्तवाहिनी पाहणे. माझ्याच्याने ते शक्यH नाही. आपण मूर्खपणाची कोणती पातळी गाठू शकतो, याची मी चाचणी घेत होतो. ही माझी हद्द आहे. तुमची?)

9 comments:

  1. चांगलं झालंय, पण फारच लांबलंय...
    आजच्य इन्स्टंट जमान्यात एवढा वेळची न्यूज कशी झेपायची?

    ReplyDelete
  2. instant cha jamana fakt gharkam, swayampak, abhyaas ani devadharmasathi.

    news channels na tar chewing-gum sarakhya tyach tya batamya 24tas chaghaLat rahayachya asatat. :-)

    chhan jamalaye.. itaka motha text devanagari madhe lihilyabaddal thanks!

    prekshakanni bahishkaar ghatalyakherij he thambanar nahi!

    ReplyDelete
  3. Tambi,
    ZAKAS.
    news channelschi bahuda sarvat murkh kon, he spardha suru asavi! AAPAN 1 karu shakto... TV BANDH karne ha sarvat sopa marg aahe. Salman, Sanjayche kay zale yavar aaple jagne avalambun nahi he nakki.
    AAGE BADHO
    Dadhi

    ReplyDelete
  4. न्यूज चॅनेलचे गणित पक्के जमले आहे. सलमान, संजय यांच्या वेगवेगळ्या प्रकारची वार्तांकन अशाच प्रकारे झाल्याचे अनुभवले आहे. त्यातील बारकावे व्यवस्थित टिपण्यात यश आले आहे. मामूचे मत सुंदरच झाले आहे. व्हेरी गुड !

    ReplyDelete
  5. झाडुन सर्व माध्यमे ही किळसवाणी भुमिका करताहेत. त्यावर भाष्य केल्याबद्दल धन्यवाद.
    http://kasakaay.blogspot.com/2007/09/blog-post.html#links

    ReplyDelete
  6. योग्य तेच लिहीले आहात

    ReplyDelete
  7. माझ्या पोस्टला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच आभार. या विषयावर इतक्या प्रतिक्रिया आल्या त्याअर्थी या विषयावर सर्वांच्याच प्रतिक्रिया तीव्र असल्याचे दिसत आहे. त्यादृष्टीने ही चांगलीच गोष्ट असल्याचे म्हणावे लागेल.

    ReplyDelete
  8. वा! छान जमलंय,
    च्यानल वाल्यांना कधी अक्कल येणार देवजाणे.
    जहीर

    ReplyDelete
  9. धन्यवाद, झहीर. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete