Thursday, October 14, 2010

मुख्यमंत्र्यांची ऐपत

Ashok Chavan chief minister of mahasrashtraअशोकाच्या झाडाला ना फुले ना फळे. या झाडाच्या नादाला लागू नका!

सुमारे एक महिन्यापूर्वी अजित पवार यांनी काढलेले हे उद्गार खोटे ठरविण्यासाठी की काय, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अशोकाच्या झाडाला शब्दार्थ लागत असल्याचे दाखवून दिले. एखाद्या माणसाची नीयत म्हणजे त्या झाडाची ऐपत, असा एक वेगळाच अर्थ त्यांनी मराठी भाषेला प्रदान केला. इतके दिवस नीयत म्हणजे दानत असा अर्थ आम्हाला माहीत होता.

एका पत्रकार परिषदेच्या आधी गाफीलपणे बोलत बसलेल्या माणिकराव ठाकरे आणि सतीश चतुर्वेदी यांच्या संभाषणाला स्टार माझा वाहिनीने पकडले. त्यात माणिकराव म्हणतात, मुख्यमंत्र्यांची नियत नाही पैसे देण्याची. स्टार माझाने चव्हाणांना या बातमीवर प्रतिक्रिया विचारली, तेव्हा चव्हाण म्हणाले, “माणिकराव हिंदीत बोलत होते. त्यांना म्हणायचे होते मुख्यमंत्र्यांची ऐपत नाही दोन कोटी रुपये देण्याची.” हे वाक्य ऐकून तमाम महाराष्ट्राच्या काळजाचा ठोक चुकला असेल. देशातील सर्वात प्रगतीशील राज्याचा मुख्यमंत्री, ज्याच्या घरात वडील व मुलगा मिळून चार दशके सत्ता राबली, त्याची ऐपत नाही दोन कोटी रुपये देण्याची!

तशी अशोकरावांची परिस्थिती बेताचीच. ते त्यांनी व त्यांच्या गृहमंत्र्यांनीही अनेकदा जाणवून दिले आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लोकराज्यच्या खाद्य विशेषांकात अमिताभाभींनीच मुलाखतीत सांगितले होते, "मी धान्य दळून आणते व तेच शिजवते.” आज मध्यमवर्गातही नित्याची झालेली विकतच्या पीठाची सोय ज्या कुटुंबाला परवडत नाही, ते कुटुंब अगदीच गरीब म्हणायचे. त्या मुलाखतीनंतर सहा महिन्यांनी आलेल्या निवडणुकीतही चव्हाण यांनी संपत्तीच्या विवरणात ट्रॅक्टर आणि ट्रॉली दाखविल्या होत्याच की! मुख्य म्हणजे, त्या विवरणात अशोकराव किंवा त्यांच्या संपूर्ण कुटंबात एकही मोटार नाही. कदाचित ट्रॅक्टर भाड्याने देऊन त्यांची उपजीविका चालत असेल.

महाराष्ट्रातील जमिनी विकून त्यातील वाटा जनपथावरील 'आम आदमीं'ना पोचविण्याचे व्रत घेतलेल्या राज्यकर्त्यांना (आठवा सिडको जमीन विक्री गैरव्यवहाराच्या बातम्या) दोन कोटी रुपये देणे जड व्हावे, ही मराठी मातीतील अस्सल 'ब्लॅक कॉमेडी' करून अशोकरावांनी मुख्यमंत्र्यांना कोट्या सुचण्याची परंपरा कायम ठेवली. छान आहे. याआधी बाबासाहेब भोसल्यांनी 'बंडोबा थंडोबा झाले' ही प्रसिद्ध उक्ती समाजाला दिली होती. बिचारे माणिकराव! त्यांना काय माहीत, मुख्यमंत्री कोट्यधीश असतात ते या अर्थाने!!

8 comments:

  1. प्रचंड भारी!
    अशोकरावांचा मी पहिल्यापासूनच फॅन आहे...टॅक्सीवाल्यांच्या लफड्यावेळी त्यांनी ज्या समर्थपणे(!) प्रकरण हाताळलं होतं...तेव्हाच मला जाणवलं होतं!
    अशोकराव रॉक्स! ;)

    ReplyDelete
  2. धन्यवाद, विद्याधर.
    काल स्वतः केलेल्या विनोदावर अशोकराव हसताना वाहिनीच्या फोनवरही ऐकू येत होतं. गरीब गाय आणि पोटात पाय ही म्हण सार्थ करणारा मुख्यमंत्री मिळालाय महाराष्ट्राला.

    ReplyDelete
  3. ‘स्थिरचर व्यापून तो जगदात्मा दशांगुळे उरला’, या उक्ती प्रमाणे भारतात राजकारणाचे झाले आहे. तरी पण आजचा सुशिक्षित तरुण वर्ग समाज राजकारणा पासून लांब का राहतो हे एक न सुटणारे कोडे आहे. लांबच राहतो असे नाही तर त्या विषयी बोलण्याचे सुद्धा टाळतो. आमच्या एकाने काय होणार असा निराशवादी सूर गाण्यापेक्षा राजकारणावर कमीत कमी बोला तरी. आपल्या या वृत्ती मुळे बेकायदेशीर राजकारण्यांचे फावते

    ReplyDelete
  4. खरे आहे. राजकारण हे सगळ्याच क्षेत्राला व्यापणारे आहे. पण त्यापासून पळ काढल्याने समस्या सुटत नाहीत तर त्या वाढतात.

    ReplyDelete
  5. मुख्यमंत्र्याच्या एपतिची चर्चा करणे एकदम मूर्खपणाचे आहे हे कालच्या बातम्या वरून दिसले. त्यांनी आपल्या सासूबाईना आदर्श सोसायटी मुंबईत चक्क करोडो रुपयाचा फ्लॅट घेवून दिला. असा जावई सर्वाना मिळो अशी आपण प्रार्थना करू या.

    ReplyDelete
  6. खरी गोष्ट आहे. कदाचित सासूबाईंसाठी सदनिका विकत घेताना अशोकरावांचे पैसे संपले असतील. कफल्लक मुख्यमंत्री

    ReplyDelete