Wednesday, October 15, 2014

या मोदींचं काय करायचं?

Modiलोकसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी जेव्हा प्रचारासाठी फिरत तेव्हा अन्य कुठल्याही विषयावर बोलायला तयार नव्हती. स्वतःचा कारभार, राज्याचे प्रश्न, लोकांचे म्हणणे यापेक्षा त्यांच्याकडे अधिक तातडीचा आणि अधिक महत्त्वाचा विषय होता - नरेंद्र मोदी.

त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा आहे, त्यांना केवळ केंद्रातील सत्ता हवी आहे, ते हुकूमशहा आहेत, ते देशात विभाजन घडवत आहेत अशा नानाविध आरोपांची राळ राज्यातील सत्ताधाऱ्यांनी उडविली होती. अर्जुनाला ज्याप्रमाणे केवळ पक्ष्याचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे पुरोगामी  लोकशाही आघाडीच्या नेत्यांना केवळ मोदी आणि मोदीच दिसत होते. बाकी कुठलाही मुद्दा त्यांच्या दृष्टीने रद्दबातल ठरला होता.

त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि लोकांनीही अन्य सर्व बाबी नजरेआड करून केवळ मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अन्य कोणतीच बाब पाहिली नाही. आपण मोदींवर जरा जास्तच लक्ष केंद्रीत केले, अशी उपरती आघाडीच्या नेत्यांनाही झाली तर विधानसभा निवडणुकीचा सागरही दगडांवर मोदीनाम लिहून तरून जाण्याचा मनसुबा भाजपच्या मंडळींनी केला.

साडेचार महिन्यांनंतर आज आघाडीच्या नेत्यांसमोर तोच प्रश्न उपस्थित राहिलेला दिसतोय. प्रदेश काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडताना ज्या दोन प्रचार पुस्तिका प्रकाशित केल्या, त्यातील एक संपूर्णतः मोदी सरकारवर केंद्रीत आहे आणि दुसऱ्या पुस्तिकेतील बहुतांश भाग मोदींवरच केंद्रीत आहे. यावरून दोन्ही काँग्रेस नरेंद्र मोदींनी केवढ्या पछाडल्या आहेत, याची कल्पना येऊ शकते.

त्यावेळी मोदी अलेक्झांडरच्या आवेशात फिरत होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे काँग्रेस-राष्ट्रवादीला शक्य होते. आज मोदी नेपोलियनच्या आविर्भावात राज्य करत आहेत. आघाडीच्या नेत्यांना काहीही वाटले तरी अद्याप तरी जनतेच्या मनातून पार उतरून जावे, असे काही त्यांनी केलेले नाही. उलट पाकिस्तानशी चर्चा थांबविण्यासारख्या त्यांच्या पावलामुळे त्यांची प्रतिमा आणखी उजळली आहे. मुख्य म्हणजे मोदींच्या धसक्याने दिल्लीतील नोकरशहा वेळेवर काम करू लागले आहेत, या एकमेव बातमीने सामान्य माणूस किती हरखून गेला असेल, याची आघाडीच्या नेत्यांना कल्पनाच नाही!

अशा परिस्थितीत मोदींना कसे हाताळायचे, ही विवंचना काँग्रेस-राष्ट्रवादीला आजही छळू शकते. एका युरोपियन परिकथेत पुंगीवाला येतो आणि शहरातील सर्व उंदरांना भुलवून आपल्यामागे नेतो. त्याचप्रमाणे अनेक पक्षांतील उंदीर या गारुड घालणाऱ्या पुंगीवाल्याच्या मागे जाण्यास उत्सुक आहेतच.

मोदी नावाचा हिंदू ही केवढी समृद्ध अडगळ आहे, याचा चांगला (खरे तर अगदी वाईट) अनुभव राज ठाकरे यांनी घेतला आहे. स्वतःच्या पक्षाचे नवनिर्माण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, यातच सारे काही आले. तेव्हा या व्यक्तीशी जुळवून घेणेही अवघड आणि थेट विरोध करणेही अवघड, अशी अवघडलेली परिस्थिती त्यांच्यावर आली आहे.

नागपूर आणि सोलापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमांच्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना याचा फटका बसला आणि पुन्हा या व्यक्तीचा सहवास नको, असे जाहीर करून ते मोकळे झाले. त्यांचं तरी काय चुकलं? गेली १५ वर्षे ते स्वतःसारख्याच नोकरशहा पंतप्रधानाला पाहत होते. आता अचानक त्यांनी राजकारणी पंतप्रधान पाहिला तेव्हा धक्का बसणारच.

भारतीय जनता ही भारतीय स्त्री सारखीच आहे. नेता भ्रष्टाचारी असो, निष्क्रिय असो किंवा हेकेखोर असो, जोपर्यंत तो त्यांच्याशी संपर्क राखून असतो, जनतेचा त्याच्यावर विश्वास असतो तोपर्यंत जनता त्या नेत्याच्या मागे राहते. शक्यतोवर त्याच्यासोबत नांदण्याकडे तिचा कल असतो. त्यात नेता स्वतःला स्वच्छ म्हणवून घेत असेल, काम करताना दिसत किंवा दाखवत असेल तर मग तर बोलायलाच नको. त्यामुळे शक्यतो कोणाला धुडकावून लावायचा भारतीय जनतेचा स्वभावच नाही. अगदीच कडेलोट झाला तर गोष्ट वेगळी.

याच कारणामुळे मुंदडा प्रकरणात खोलवर गुरफटलेल्या, आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी केवळ दीड वर्षाच्या अंतराने सत्तेत परतू शकल्या. बोफोर्समध्ये गुंतलेल्या राजीव गांधींना १९८९ मध्ये जवळपास २०० जागा मिळवता आल्या आणि १९९१ साली ते परत पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर होते. सतत चार वर्षे माध्यम आणि विरोधकांच्या तोफखान्याला तोंड देऊनही अशोक चव्हाण मराठवाड्यात स्वतःचे वर्चस्व कायम ठेऊ शकतात. कर्नाटकात येडियुरप्पा, तमिळनाडूत जयललिता आणि प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी हेच दाखवून दिले.

महाराष्ट्रात आज जर कोणत्या गोष्टीचा अभाव असेल तर नेमक्या या गोष्टीचा. इथल्या नेत्यांवर जनतेचा सोडा, त्यांच्या कार्यकर्त्या आणि अनुयायांचा विश्वास नाही, तेथे बाकींच्याची काय कथा. स्वतःचे काम नाही आणि इतरांचा विश्वास नाही, अशा परिस्थितीत झोडपायला एक बरे खेळणे म्हणून मागच्या वेळी त्यांना नरेंद्र मोदींचा वापर करता आला. यावेळी ते मोदींचं काय करणार?

(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. ही नोंद आपण येथेही वाचू शकता.)

Tuesday, October 14, 2014

...खग भेणे वेगळाले पळाले!

post महाराष्ट्र हे प्रवासी पक्षांचे राज्य म्हणून ओळखला जाते. हिवाळ्यात थंडी जाणवू लागली, की हिमालयातून किंवा अगदी रशिया, सायबेरिया अशा प्रांतांतून पक्षी उडत येतात आणि उष्ण वातावरणात काही काळ काढून आपल्या देशात परत जातात. या पक्ष्यांनाही अचंबा वाटावे, असे काही प्रवासी पक्षी निवडणुकांच्या हंगामात आपले पक्ष बदलून कुंपणाच्या पलीकडे उडी मारतात आणि राजकीय वारे फिरले, की परत आपल्या जागी जातात. कालपर्यंतचे बगळे आज कावळे होतात आणि आजचे कावळे उद्या बगळे होतात. सत्तेची ऊब हे त्यांचे एकमेव लक्ष्य असते.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची जी वाताहत झाली, त्याचा धसका घेऊन त्या शिविरातील डझनावारी नेत्यांनी आपल्या टोप्या फिरविल्या आहेत. खरं तर गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी या दोन सणांच्या दरम्यान, ऐन पितृपक्षात, पक्षांतराचा हंगामच सुरू झाला आहे. गेली 15 वर्षे सत्ता भोगणारी मंडळी आता सत्ताबदल होणार, अशी शंका मनात येताच धडाधड कुंपणाच्या पलिकडे उडी मारू लागली आहेत. दुसरीकडे भगव्या झेंड्याखाली नांदणाऱ्या काही मंडळींनीही अचानक धर्मनिरपेक्षतेची दीक्षा घेतली आहे. मात्र त्यांची संख्या आणि चेहरे किरकोळ आहेत.

बबनराव पाचपुते, भास्करराव पाटील खतगांवकर, प्रताप पाटील चिखलीकर, विजयकुमार गावित लोकांनी कमळाच्या आश्रयाखाली जाण्याचा निर्णय घेतला आहे. कमळाच्या पानावरील जलबिंदू ओघळावेत एवढ्या सहजतेने हे नेते आपापले पक्ष सोडून नवीन पक्षाची पायरी चढले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश करून या सर्वांवर कडी केली. हत्ती खड्ड्यात पडला म्हणजे वटवाघूळ सुद्धा त्याला लाथ मारते, अशा अर्थाची एक बंगाली म्हण आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांना ही म्हण माहीत असण्याची शक्यता धूसर असली, तरी तिचा अर्थ आज नक्कीच जाणवत असणार.

रघुनाथ पंडितांनी नलोपाख्यानात नल राजा आल्यानंतर हंसांची जी त्रेधातिरपिट उडाली होती, त्याचे वर्णन केले आहे. त्यात त्यांची 'तदितर खग भेणे वेगळाले पळाले' अशी एक ओळ आहे. नल राजा येताच भीतीने गाळण उडून सगळे हंस मिळेल त्या दिशेने उडाले', असे ते म्हणतात. आपल्या या प्रवासी पक्ष्यांची गती नेमकी अशीच आहे. त्यांच्या या राजकीय उड्डाणाचे याहून समर्पक वर्णन करणारी ओळ दुसरी सापडणार नाही.

कुठल्याही दूषित गोष्टीवर गोमूत्र शिंपडून तिची शुद्धी करता येते, अशी भारतीय (मुख्यतः हिंदू) समाजात समजूत आहे. कालपर्यंत ज्यांच्या विरोधात कंठशोष केला, त्याच मंडळींना पावन करून घेताना भाजपेयींनी कुठले गोमूत्र वापरले माहीत नाही. मात्र नांदेडची जिल्हा बँक बुडविणारे खतगांवकर आणि नंदूरबार जिल्ह्यात घराण्याची सत्ता प्रस्थापित करणारे गावित भगवे उपरणे घालताच कसे काय स्वीकारार्ह होतात, हे गौडबंगाल जनतेला समजले तर त्यांच्या प्रबोधनात भरच पडेल.

इटालीच्या जनतेला फॅसिस्ट विचारसरणीची भूल देताना मुसोलिनी म्हणाला होता, "आपले लक्ष्य केवळ राष्ट्र असले पाहिजे. बाकी सर्व गोष्टी अनुषंगिक आहेत". आपल्या पुरोगामी, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, समतावादी, राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी, प्रखर राष्ट्रीय, देशभक्तीचा अंगार इ. इ. पक्षांनी एक नवीन मंत्र दिला आहे, "काहीही करून खुर्ची मिळवा, बाकी सर्व गोष्टी अनुषंगिक आहेत". मग विचारसरणी, तत्वे आणि इतिहास अशा क्षुल्लक गोष्टींची चाड बाळगण्याची गरजच काय?

कालपर्यंत ज्यांच्या विरोधात आरोपांची राळ उडविली, ज्यांच्या विरोधात आंदोलने केली आणि ज्यांना घालवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, त्यांचीच गळाभेट घेताना ही मंडळी तीळमात्रही कचरत नाहीत. नाहीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र दिलेलाच आहे 'सबका साथ, सबका विकास'. त्याची तामिली ही अशी चालू आहे.

असे म्हणतात, की या जगात प्रलय आला तरी झुरळ हा एकमेव प्राणी त्यात तग धरून राहू शकतो. याचे कारण कोणत्याही परिस्थितीत चिकाटीने राहण्याची झुरळाची शक्ती अपार असते. सत्ता कोणत्याही पक्षाची असो, खुर्चीवर बसणारी व्यक्ती तीच असते, तेव्हा शास्त्रज्ञांचे हे निरीक्षण खोटे नसल्याचे जाणवते.

एक प्रश्न राहून राहून समोर येतो - निवडणुका हा एखादा बोधिवृक्ष आहे का, की ज्याच्या जवळ आल्यावर या लोकांना आत्मसाक्षात्कार कसा काय होतो? जिथे 10-10 वर्षे काढली त्या पक्षात आपले कोणी ऐकत नाही, पक्ष धनदांडग्यांच्या ताब्यात गेला आहे, आपली मुस्कटदाबी होत आहे, असे एकाहून एक शोध यांना लागतात. ज्या पक्षाच्या बळावर आमदारकी-खासदारकी भोगली तिथेच त्यांची घुसमट होत असल्याचा साक्षात्कार होतो. जनतेच्या प्रश्नांबद्दल वर्षानुवर्षे अनभिज्ञ असलेल्या लोकांना, कुठल्याही प्रश्नावर 'मी माहिती मागवली आहे, माहिती घेऊन सांगतो' असे साचेबद्ध उत्तर देणाऱ्यांना, वातानुकूलित कक्ष आणि स्कॉर्पियो-हमर यांसारख्या गाड्यांमध्ये वावरणाऱ्यांना घुसमटीची जाणीव करून देणाऱ्या त्या निवडणूक नामक बोधिवृक्षास नमस्कार असो!

(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. ही नोंद आपण येथेही वाचू शकता).

Monday, September 15, 2014

'जागा'ते रहो!

Assembly-b हवामान बदलाच्या प्रक्रियेमुळे 'नेमेचि येतो मग पावसाळा' ही उक्ती आता नको एवढी खोटी पडू लागली आहे. निवडणुकांचे मात्र तसे नाही. देशात निवडणूक आयोग नावाची संस्था सुदैवाने अद्याप कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळी, म्हणजे एका महिन्यात, होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांचे वायदे बाजार आणि घोडा बाजार सुरू झाले आहेत आणि राजकारणाचा मासळी बाजार झाला आहे.

ऐन कुस्तीत शरीराला भिडण्यापूर्वी प्रतिस्पर्धी पैलवानांनी शब्दांनीच एक दुसऱ्याचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न करावा, तसे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे चार मुख्य पक्ष एकमेकांचे उणीदुणी काढत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष नावाचा आणखी एक खेळाडूही या स्पर्धेत आहे मात्र त्याची दखल घेण्याची गरज असल्याचे बाकीच्या चारही जणांना वाटत नाही. याचे कारण भाजप-शिवसेनेला लागलेले सत्तेचे डोहाळे, काँग्रेसची झालेली गर्भगळीत अवस्था आणि जन्माला येणारे सत्तेचे बाळ कोणत्याही रंगाचे असले तरी त्याच्याशी जुळवून घेण्याची राष्ट्रवादीची नीती! जनमताचे क्रेडीट कार्ड हरविलेल्या मनसेच्या हाती भावी सध्यातरी 'ब्ल्यू प्रिंट'शिवाय काहीही नाही.

'संशयकल्लोळ' नाटक लिहिणारे गोविंद बल्लाळ देवल आज असते, तर त्यांनाही भोवळ आली असती, अशी आजची परिस्थिती आहे. दोन काँग्रेसचा काडीमोड होणार का नाही इतकाच शिवसेना-भाजप त्यांच्या नव्या सहकाऱ्यांसोबत एकत्र नांदतील का, हाही अवघड प्रश्न बनला आहे. 'बिग बॉस'च्या सर्व सत्रांना पुरून उरेल एवढा मसाला त्यात आहे. शिवाय या दोन्ही जोड्यांपैकी कोणता जोडीदार कोणाशी लगट करेल, हेही सांगता येणार नाही. तेव्हा जागावाटपाच्या नावाने डोळे वटारणे, हा केवळ बहाणा आहे. खरी कारणे दोनच – एकमेकांवरील अविश्वास आणि कार्यकर्ते टिकवून धरण्याची गरज.

कोण कोणाला डोळे मारतंय, कोण कोणासोबत जाईल आणि कोण कोणाला फटका करील, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. 'आज जो कोणी गोंधळलेला नाही त्याला बहुधा काहीच माहीत नाही' (Anybody who is not confused here probably does not know anything) असे एक प्रसिद्ध वचन आहे. ज्याला कोणाला याची प्रचिती घ्यायचीय, त्यांनी एखाद्या दिवशी वर्तमानपत्र पाहावे किंवा दिवसभर मराठी वृत्तवाहिनी पाहावी.

1984 साली केवळ दोन खासदार निवडणून आल्यानंतर स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "कमळाबाईचीही तब्येत आताशा फारशी चांगली नाही" अशा शब्दांत हिणवलेली भाजप आज अर्ध्या जागा मागत आहे. 1999 साली स्वाभिमानाचे उबळ आल्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन 15 वर्षे त्यांच्यासोबत सत्ता भोगणारी राष्ट्रवादीही अर्ध्या जागा मागते. राष्ट्रवादीने सगळ्या जागांच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यामुळे रागावलेली काँग्रेस सगळ्या जागांसाठी मुलाखती घेण्याचे जाहीर करते. सत्ताधाऱ्यांचे गलबत सोडून येणाऱ्या सर्व मुशाफिरांना सामावण्यासाठी भाजप सगळ्या जागांवर डोळा ठेवते आणि अवचित मिळालेल्या यशामुळे फुरफुरणाऱ्या मावळ्यांच्या समाधानासाठी शिवसेनाही सर्वच्या सर्व जागा लढविण्याची भाषा करते. अन् हे सर्व करून झाल्यावर टाळकऱ्यांनी 'बोला पुंडलिक वरदा हsरी विठ्ठल‍' म्हणावे तेवढ्याच मानभावीपणे 'आमची युती/आघाडी अभेद्य आहे', असा पुकारा ही मंडळी करतात.

सेना-भाजपची आणखी वेगळीच गोची आहे. गळ्यात गळे आणि मनात अविश्वास बाळगून फिरणाऱ्या या दोन पक्षांची ही वादावादी राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या हातात वाटाण्याच्या अक्षता देण्यासाठीचे नाटक तर नाही ना, हाही एक मुद्दा आहेच.

सगळ्याच पक्षांच्या दृष्टीने ही भाषा समजण्यासारखी आहे. लोकसभेत झालेल्या शिरकाणानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेते व कार्यकर्त्यांचे मनोबल जे घसरले ते सावरण्यासाठी त्यांना "जास्तीत जास्त जागां"चा पुकारा करणे आवश्यकच होते. नाहीतर आधीच काही मंडळी कमळाच्या नादाला लागलेली आणि उरलेलीही जाण्याची शक्यता. त्यामुळे स्वतःच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्याच तंबूत ठेवण्यासाठी त्यांना काही दिले नाही तर दिल्यासारखे तर करावे लागेल. नाही म्हणायला, राष्ट्रवादीच्या दृष्टीने हा खेळ जरा गंभीर आहे. उलट भाजप-सेनेला ऐनवेळी कार्यकर्ते नाराज होऊन चालण्यासारखे नाही, कारण आता त्यांनी काम केले नाही तर "अभी नहीं तो कभी नही" अशी त्यांची स्थिती!

दर निवडणुकीच्या आधी असा घोळ घालणे आता सवयीचे झाले आहे. मात्र यंदाची बातच निराळी आहे. म्हणून 'जागा, जागा'चे जे हाकारे आज ऐकू येत आहेत, त्यांच्यामागे होतकरू बंडकर्‍यांना जागच्या जागी रोखणे, कुंपणावरील लोकांना थांबविणे आणि मुख्य म्हणजे लोकांचे मनोरंजन करणे हे उद्देश नाहीत, असे नाही. शेवटी लोकांचे रंजनही हेही लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहेच ना!

(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेत प्रसिद्ध झालेली माझी नोंद. ही नोंद येथे उपलब्ध आहे).

Sunday, July 27, 2014

एक विलक्षण भुरटे आंदोलन!

पुदुच्चेरी हा भौगोलिकदृष्ट्या विखंडीत आणि राजकीयदृष्ट्या नगण्य प्रदेश. केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्यामुळे तर तेथील घडामोडी राष्ट्रीय माध्यमांमध्ये क्वचितच जागा मिळवितात. वर्ष-दोन वर्षांतून मी तेथे जातो तेव्हा काही ना काही गमतीदार मात्र हमखास पाहायला मिळते. असा एक किस्सा मी याआधी वर्णन केला होता.

त्या किश्श्यावर वरताण असा एक प्रकार मला यंदाच्या दौऱ्यात पाहायला मिळाला. पुदुच्चेरीतील भारतीयार रस्ता आणि फ्रांस्वा मार्तेन रस्सा जिथे मिळतात ती जागा अत्यंत महत्त्वाची आहे. श्री अरविंद आश्रम, आश्रमाचे भोजनगृह, मनक्कुळ विनायगर (गणपती) मंदिर, पुदुच्चेरी सरकारचे सचिवालय, राजनिवास, विधानसभा, फ्रेंच सरकारचे वाणिज्य दूतावास, रोमां रोलां वाचनालय व ग्रंथालय अशा अनेक महत्त्वाच्या जागा या परिसरात आहेत. बहुतेक सरकारी कार्यालये याच ठिकाणी असल्यामुळे आंदोलन निदर्शनांचा येथे धडाका चालू असतो.

गेल्या वेळेस (ऑगस्ट 2012) मध्ये ख्रिश्चन लोकांना आरक्षण देण्यासाठी येथे आंदोलन चालू होते. यावेळीही असे एखादे आंदोलन आहे का, हे मी पाहत होतो. मी गेलो तेव्हा 16 जुलै रोजी भारतीयार उद्यानासमोर नेहरू पुतळ्याच्या बाजूला शिक्षण खात्यातील काही महिला कर्मचाऱ्यांचे चक्री उपोषण चालू होते. दोन तीन दिवसांच्या मुक्कामात, हे चक्री उपोषण म्हणजे या बायका सकाळी येणार, तेथे टाकलेल्या प्लास्टिक खुर्च्यांवर बसणार, काही महिला खाली जमिनीवर सतरंजी अंथरून त्यावर बसणार, मग संध्याकाळी सर्व काही आवरून घरी परतणार, पुन्हा दुसऱ्या दिवशी येणार, असा प्रकार असल्याचे मला दिसले. त्यामुळे त्यात लक्ष देण्यासारखे काही नव्हते.

Devidas0114 मात्र मला हवे होते त्यापेक्षा आणखी कैकपट गमतीशीर असे मला पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले. श्री अरविंद आश्रमाच्या भोजनगृहातून मी बाहेर पडलो. त्यावेळी दुपारचा 11:30 – 12 चा सुमार असेल. प्रवेशद्वाराच्या बाहेर येताच उजव्या बाजूला एक घोळका दिसला. राजनिवासाच्या डाव्या हाताला हा भाग येतो. येथे काहीतरी घडत आहे किंवा घडणार आहे, असा मला वास आला.

तिथे गेलो तर काही लोक एका माणसाचा फोटो एका मोठ्या फळीला चिकटवत असल्याचे दिसले. त्यांच्या भोवती काही छायाचित्रकार सरसारवल्याचे आणि एकजण त्याचे दृश्यांकन करत असल्याचेही दिसले. पुदुच्चेरीत आल्यानंतर दर्शन झाल्यावर मी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे रोमां रोलां वाचनालयात गेलो होतो. साधारण ताज्या घडामोडी काय आहेत, याचा अदमास घेतला होता. त्यामुळे या प्रकाराचा अंदाज याचा यायला लागला.

त्या गृहपाठामुळे हे छायाचित्र नायब राज्यपाल विरेंद्र कटारिया यांचे असल्याचे मी ओळखले. कटारिया यांना चारच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने हटविण्याचे आदेश काढले होते. राज्यातील सत्ताधारी एनआर काँग्रेस पक्ष केंद्रातील नव्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य आहे. शिवाय कटारिया आणि मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्यातून विस्तवही जात नव्हता. त्यामुळे रंगास्वामींच्याच सांगण्यावरून कटारियांचा पत्ता कट झाला होता, हे उघड होते.

आता गुमान आपली खुर्ची सोडण्याऐवजी कटारिया यांनी शेवटची चाल खेळली. राजनिवासात पत्रकार परिषद बोलावून त्यांनी सांगितले, की मुख्यमंत्री आणि त्यांच्या हस्तकांच्या भ्रष्टाचारात त्यांनी आडकाठी आणल्यामुळेच त्यांची गच्छंती करण्यात आली आहे. शिवाय मुख्यमंत्री व मुख्य सचिवांनी मला फसवून (कांची येथील पुजारी) शंकररामन हत्या प्रकरणात शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना निर्दोष सोडण्याच्या न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी घेतल्याचाही आरोप त्यांनी केला. (इतकेच नाही तर स्वतःच्या हकालपट्टीची कारणे शोधण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचाही आधार घेण्याची घोषणा त्यांनी पुढच्या दिवशी केली.)

ही सर्व हकीगत त्या दिवशीच्या वृत्तपत्रांत छापून आली होती. त्यावर राज्यपालांचे आरोप योग्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रियाही छापून आली होती. पण राजापेक्षा राजनिष्ठ नसतील तर ते कार्यकर्ते कसले?

तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळल्याबद्दल कार्यकर्ते येथे त्यांचा रोष व्यक्त करणार हे उघड होते. पण ते नक्की काय करणार, याचा अंदाज येत नव्हता.

इतक्यात त्यातील मुख्य कार्यकर्त्याने पुकारा केला, "मॅडम या, मॅडम या".

आता काय होणार याची मला उत्सुकता लागली होती. म्हणून मी माझा मोबाईल काढून कॅमेरा चालू केला.

Devidas0118 हाक मारलेल्या मॅडम आल्या. हाक मारणारा कार्यकर्ता त्या फोटो नि फळीला रस्त्याच्या एका बाजूला घेऊन आला. त्याला मदतीला पाच-सहा जण होते. उंची साडी घातलेल्या मॅडमही फळीच्या शेजारी होत्या. त्यांनी एका गरीब दिसणाऱ्या बाईला हाक मारली.

ती मध्यमवयीन बाई बिचारी एक बादली घेऊन आली. ती बादली कार्यकर्त्यांच्या घोळक्यात ठेवण्यात आली आणि काही कळायच्या आता कार्यकर्त्यांनी बादलीतला माल हाताने उचलून फळीवर फेकण्यास सुरवात केली. ते शेण असल्याचे वासावरून जाणवले. इकडे छायाचित्रकार हातघाईवर आले. मीही त्या क्लिकक्लिकाटात सामील झालो.

इतक्यात आपली ही नेमबाजी आपल्या चेहऱ्यासह छापून आली पाहिजे, हे एकाच्या लक्षात आले. मग त्याने घोळक्याला सूचना दिल्या आणि कॅमेराधारकांना फळी सहज दिसेल, अशी विभागणी करण्यात आली. मग परत लेन्सात डोळे घालून कटारियांचा चेहरा `गोमय` करण्यास सुरवात केली. सर्व कार्यकर्ते, अगदी त्या मॅडमसकट, इमानदारीने शेण फेकत होते बहुतेक. कारण संपूर्ण फोटोवर हिरवे आच्छादन पसरले होते.

या सर्व वेळेत कार्यकर्त्यांच्या घोषणाही चालूच होत्या. 'राज्यपाल, चले जाव' हे तमिळमधून सर्व जण कटारियांच्या छायाचित्राला ऐकवत होते.

Devidas0116 तितक्यात एका कार्यकर्त्याने ते छायाचित्र पाण्याने धुवून काढले. शेण वाळण्यापूर्वीच धुतल्याने कटारियांचा चेहरा पुन्हा स्वच्छ दिसू लागला. आता हाक मारणाऱ्या कार्यकर्त्याने कुठूनतरी एक प्लास्टिकची पिशवी पैदा केली. त्यातून त्याने नासके-किंवा वाळके म्हणूया – टमाटे काढले आणि सर्वांना वाटण्यास सुरुवात केली. परत नेमबाजी सुरू झाली.

हिरव्या रंगानंतर छायाचित्राला लाल रसाने न्हाऊ घालण्यात आले होते. इतका वेळ सगळा खेळ, बेट लावणारा पंटरसुद्धा पाहणार नाही इतक्या तन्मयतेने नि तिऱ्हाईतपणे पाहणाऱ्या पोलिसांना अचानक गणवेश अंगावर असल्याची नि प्रदेशाच्या प्रमुखाची टवाळकी रोखणे हे स्वतःचे कर्तव्य असल्याची आठवण झाली. त्यामुळे त्यांनी हलकेच ती फळी हटविण्यासाठी पाऊल उचलले. त्याला कार्यकर्त्यांनी रितसर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते ते!

Devidas0122 परंतु, पोलिसांनी हट्टाने ती फळी हिसकावून घेतली आणि त्यांच्या गाडीत ठेवायला पाठवली. कार्यकर्त्यांचेही चित्रण-छायाचित्रण संपले होतेच. साडी व शर्टावर पडलेले शेणाचे डागही धुवायचे होते. त्यामुळे फोटोयुक्त फळीसाठी फारसा सत्याग्रह न करता कार्यकर्त्यांनी ती पोलिसांना घेऊ दिली व लेन्सात डोळे घालून विधाने करण्यास सुरूवात केली. पुण्यात हेच काम करत असल्याने ते काय बोलत असतील याचा अंदाज होताच. फक्त हे लोक कोण होते, एवढेच माझे औत्सुक्य होते.

अपेक्षेप्रमाणे सर्वच वृतपत्रांनी (हिंदूसह) या कार्यक्रमाला ठळक प्रसिद्धी दिली होती. या मॅडमचे नाव सुमती असल्याचे मला दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांतून कळाले. राज्यपाल स्वतःच भ्रष्टाचार करतात, स्वतःच्या मुलीला सरकारी पदावर बसवतात आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात, अशी सुमती मॅडमची तक्रार होती. सरकारने काढून टाकल्यानंतर 4-4 जिवस राज्यपाल राजनिवासात कसे राहतात आणि पत्रकारांना बोलावून वाटेल ते आरोप करतात. त्यामुळे त्यांना एक क्षणही राहण्याचा अधिकार नाही, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती.

Devidas0121या सर्व गोंधळात आणखी एक गमंत झाली. हा सर्व प्रकार मी मोबाईलमध्ये हिरिरीने चित्रबद्ध करत होते. एक व्यक्ती हातात वही घेऊन तेथे आली. काय चाललंय, असे त्याने मला विचारले. माहीत नाही, असे त्यावर मी उत्तर दिले.

"तुम्ही कुठून आलात," त्याने पुन्हा प्रश्न केला.

"मी पुण्याहून आलोय," मी सांगितले.

तो पुढे निघून गेला. त्यानंतर मी त्याची वही पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आले, की तोही पत्रकार होता आणि मी बातमीसाठीच आलोय, असे त्याला वाटले असावे. माझ्या उत्तराने त्याची निराशा केली होती.

कुठून कुठून लोक येतात, (अक्षरशः) असे त्याने मनोमन म्हटले असावे!

Sunday, July 13, 2014

कावळ्याच्या हाती दिला कारभार...

r r patil काही वर्षांपूर्वीची स्थिती होती - महाराष्ट्रात एखादी वाईट गोष्ट घडली किंवा आगळीक घडली, की लोक म्हणायचे, महाराष्ट्राचा बिहार करणार का. कारण महाराष्ट्र हे तेव्हा शांत व विचारी राज्य मानले जायचे तर बिहारमध्ये जंगल राजसारखी परिस्थिती होती. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जायची आणि पुण्याची ख्याती केवळ राज्याचीच नव्हे तर देशाची शैक्षणिक राजधानी अशी होती. भिवंडीत मोहल्ला समितीचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या सुरेश खोपडे यांना देशभरात मान होता तर अरविंद इनामदार आणि ए. ए. खान यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची नावे आदराने घेतली जात होती.

त्यानंतर एखाद दुसरे दशक उलटले असेल नसेल. आज बिहारमध्ये काही समाजविघातक गोष्ट घडली, तर तेथील लोक कदाचित म्हणत असावेत, 'अरे आपल्याला बिहारचा महाराष्ट्र करायचा आहे का?' लोकसभेच्या जागांच्या बाबतीत उत्तर प्रदेशाच्या खालोखाल असणारा महाराष्ट्र कायदाविहीनतेच्या बाबतीतही उत्तर प्रदेशाच्या खालोखाल यावा, हा योगायोग अत्यंत वाईट म्हणायला पाहिजे.

इंटरपोलने नोटीस काढलेल्या चार्ल्स शोभराजसारख्या गुन्हेगाराला पकडणारे मधुकर झेंडे यांच्यासारखे अधिकारी एकेकाळी महाराष्ट्रात होते. आज त्याच महाराष्ट्राच्या पोलिस खात्याची परिस्थिती एवढी वाईट झाली आहे, की पोलिसाचीच गाडी चोरून समाजकंटक, राष्ट्रविरोधी शक्ती ती गाडी पोलिस स्थानकाच्याच बाहेर ठेवतात आणि तीत स्फोट घडवून आणतात. त्यानंतर तपास चालू आहे आणि दहशतवादी हल्ला झाला या साचेबद्ध विधानांव्यतिरिक्त पोलिसांकडून काहीही येत नाही.

नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना पकडल्याची बतावणी करून पोलिस अधिकारी दुसऱ्याच गुन्हेगारांना उभे करतात आणि त्याबद्दल राज्याचा गृहमंत्री त्यांचा सत्कार करण्याची बात करतो. कै. नरेंद्र दाभोलकर ही काही अगदीच सामान्य व्यक्ती नव्हती. समाजात बऱ्यापैकी मान्यता असलेले त्यांचे व्यक्तीत्व होते आणि सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेशी जातकुळी सांगणारी त्यांची विचारसरणी होती. त्यांच्या खुनाला एक वर्ष व्हायला आले, तरी मारेकऱ्यांना पोलिस पकडू शकलेले नाहीत. न्यायालयाला अखेर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे लागले. सामान्य व्यक्तींशी संबंधित गुन्ह्यांच्या बाबतीत तर बोलायलाच नको.

थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात तसे छोट्या छोट्या गुन्ह्यांच्या बाबतीत पोलिसांची अक्षमता सिद्ध झाल्यावर अट्टल गुन्हेगारांनी वर्दीवाल्यांची पत्रास न बाळगता धुडगूस घालावा, यात नवल कुठले? आझाद मैदानावर पोलिसांना मारझोड करणाऱ्या आणि महिला पोलिसांचा विनयभंग करणाऱ्या गुंडांना केवळ ते मुस्लिम असल्यामुळे सोडण्यात येते. मग हिंदु राष्ट्र सेना नावाने गुंडांची टोळी चालवणारा माणूस पुण्यात राजरोस खंडणीखोरी करतो आणि त्याची माणसे सरळ सरळ दिसेल त्या माणसाचे मुडदे पाडतात. याचा अर्थ एक तर त्यांना कायद्याचा धाक नाही, आपले कोणी वाकडे करणार नाही याची त्यांनी खूणगाठ बांधली आहे किंवा हे कृत्य करण्यासाठी त्यांना कोणीतरी मोकळे रान दिलेले आहे. पोलिसांचा खाकी गणवेष हा जरब दाखविण्यासाठी नाही तर केवळ टिकाऊ व मळखाऊ कापड म्हणून असतो, असा समज होण्याची वेळ आली आहे.

आर. आर. पाटील या माणसाने गृहमंत्री पदावर आल्यापासून पद्धतशीरपणे पोलिस दलाचे खच्चीकरण केले आहे. निष्क्रियतेला सज्जनता आणि नाकर्तेपणाला नैतिकता म्हणण्याची पद्धत दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत आपल्याकडे रुढ झाली आहे. त्यामुळे पोकळ भाषणबाजी करत आला दिवस ढकलणाऱ्या पाटील यांच्यासारख्या व्यक्तीचे फावले. तोंडपाटीलकी हा शब्द त्यांच्यावरूनच निघाला असावा, असे वाटण्याइतका त्यांच्या या प्रवचनबाजीचा अतिरेक झाला आहे.

आतापर्यंत पाटील यांच्या किमान पाच-सहा कार्यक्रमांना वा पत्रकार परिषदांना मी उपस्थित राहिलो आहे. कधीही पाटील यांनी समाधानकारक, मुद्देसूद व अभ्यासू उत्तरे दिले आहेत, असे आठवत नाही.

कोणतीही घटना घडली आणि त्यावर प्रश्न विचारला की मान वेळावत आणि चेहऱ्यावर जमेल तितका बालिशपणा आणत, "मला याची माहिती घ्यावी लागेल. ती माहिती घेऊन आम्ही कडक कारवाई करू. कोणाही दोषी व्यक्तीची गय केली जाणार नाही," ही ठराविक वाक्ये फेकायची या पलिकडे कोणतेही कौशल्य आर. आर. पाटील यांनी दाखविलेले नाही. राज्यात एकीकडे हाहाकार उडालेला असला तरी यांना काहीही माहीत नसते आणि अधिकाऱ्यांकडून त्यांना सतत माहिती घ्यायची असते. हे सातत्य अन्य एखाद्या क्षेत्रात कौतुकास्पद ठरले असते. मात्र इथे अनेकांचे जीव जातायत. किती जणांचे आयुष्य उध्वस्त होत आहेत. अज्ञानात सामावलेला आनंद गवसलेला असा माणूस शोधून सापडणार नाही. तो हुडकून काढल्याबद्दल पाटील यांचे मालक शरद पवार यांचा महाराष्ट्र कृतज्ञ आहे. (पवार काका - पुतण्याबद्दल पाटील यांची वक्तव्ये पाहता ते पवार यांना नेते नव्हे तर मालक मानतात, असे मानायला पूर्ण वाव आहे.)

भांडारकर संस्थेवरील हल्ला असो, मुंबईवरील हल्ला असो, दिवे आगर येथील सुवर्ण गणपतीचा मुखवटा चोरी गेलेला असो किंवा ब्राह्मण व मागासवर्गीय जातींबाबत प्रक्षोभक लिखाण केलेल्या पुरुषोत्तम खेडेकराच्या पुस्तकाचे प्रकरण असो, आर. आर. पाटील यांचा तोच 'घेतला वसा टाकणार नाही, कोणतीही कृती करणार नाही' हा बाणा कायमच असणार. यांच्या कारकीर्दीत पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणीही येऊन मारुन जाते, बाया-बापड्यांच्या सोनसाखळ्या दिवसाढवळ्या चोरल्या जातात, तुरुंगातील कैदी फरार होतात किंवा आपसात मारहाण करून एकमेकांचे खून पाडतात, यांच्या कारकीर्दीत पोलिस आमदारांना मारतात आणि आमदार पोलिसांना मारतात, दलितांवर अत्याचारावर अत्याचार घडतात, अल्पसंख्यांकांना लक्ष्य करून मारले जाते पण यांची शांती ढळत नाही. तेवढ्याच शांतचित्ताने हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहणारे त्यांचे मालक उलट त्यांना उत्तम कामगिरीचे प्रशस्तीपत्रक देणार आणि त्याच्या जोरावर यांचे चार वाक्यांचे एकपात्री प्रयोग आणखी चालू राहणार.

'कावळ्याच्या हाती दिला कारभार त्याने घाण करून भरला दरबार' अशी एक म्हण मराठीत आहे. त्याचा अर्थ कोणाला पाहायचा असेल, तर आर. आऱ. पाटील यांच्या कारकीर्दीवर नजर टाकली तरी पुरेल.

Sunday, May 18, 2014

धापा टाकणारे, साईडिंगला गेलेले इंजिन!

जेम्स वॉट किटलीत उसळी मारणारी वाफ दिसली आणि त्याची विचारप्रक्रिया सुरु झाली. काही दिवसांतच त्याने वाफेच्या शक्तीवर चालणारे इंजिन शोधून काढले.
शिवसेनेत बाजूला फेकल्यामुळे राज ठाकरे आतल्या आत धुमसत होते आणि त्यातून त्यांची विचारप्रक्रिया सुरु झाली. काही दिवसांतच त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आणि त्यासाठी रेल्वे इंजिनाचे चिन्ह मिळविले.
मात्र या दोघांतील साधर्म्य येथेच संपते. वॉटने शोध लावलेल्या इंजिनामध्ये उत्तरोत्तर सुधारणा झाली आणि नंतर डिझेल व विजेचे इंजिन आज धावत आहेत. रेल्वे इंजिनाचे चिन्ह असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुधारणा नावाचा प्रकारच आला नाही. त्यामुळे सोळाव्या लोकसभेचे निकाल येताना मनसेचे इंजिन धापा टाकताना दिसत आहे.
सध्याचा रोख पाहता मनसेला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. कारण मोदी नावाच्या सुनामीत भले भले वाहून गेले असताना मनसेच्या अकरा शिलेदारांपैकी कोणीही विजयाच्या किनाऱ्यावर येण्याची सुतराम शक्यता नाही. हत्ती बुडतो आणि शेळी ठाव मागतो, ही जुनी मराठी म्हण चपखल बसावी अशी ही परिस्थिती आहे.

मनसेची स्थापना करताना राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना विठ्ठल आणि त्यांच्या भोवतीच्या लोकांना बडवे म्हणून टीका केली होती. योगायोगाने 2014 च्या निवडणुकीत मतांचा जोगवा मागताना मनसेने एकप्रकारे तशीच भूमिका घेतली होती. आमचे निवडून आलेले खासदार मोदींना पाठिंबा देतील, अशी अफलातून घोषणा केली खरी. परंतु लोकांनी मत देताना विचार केला, की मोदींनाच पाठिंबा द्यायचा तर थेट त्यांच्या उमेदवाराला देऊ. देवाच्या थेट मूर्तीला हात लावता येत असतील तर पुजाऱ्याला कोण विचारणार? म्हणूनच पुण्यासारख्या, शर्मिला ठाकरे यांच्यासारख्यांचा प्रत्यक्ष सहभाग असलेल्या व खुद्द राज ठाकरे यांनी तीन तीन सभा घेतलेल्या, जागी मतदारांनी दिपक पायगुडे यांचा विचारही केलेला नाही. अन्य 10 उमेदवारांबाबत तर बोलायलाच नको.
गेल्या निवडणुकीतही मनसेला जागा मिळालेल्या नव्हत्या, मात्र नवखेपणाचा फायदा त्यांना त्यावेळी मिळाला होता. शिवाय शिवसेनेची मते त्यांनी कापल्याचे निकालांमधून दिसले होते. मात्र मते कापण्याची आपली कामगिरी हेच आपले यश असल्याचा समज मनसेने करून घेतला. शिवाय विधानसभेच्या प्रवेशाच्या निवडणुकीत व नंतर महापालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या माफक यशामुळे तो समज आणखीच दृढ झाला. यंदा त्या कृतक यशाचेही समाधान पक्षाला मिळणार नाही.
अपयश खऱ्या अर्थाने आपल्याला शिकविते आणि यश केवळ आपला अंधविश्वास दृढ करते, असे एका लेखकाने म्हटले आहे. त्याची प्रचिती मनसेला या निकालांमुळे आली असेल.
पुणे पालिकेत मनसेला लक्षणीय विजय मिळाला (म्हणजे तो मुख्य विरोधी पक्ष झाला) तेव्हा निवडून आलेल्या नगरसेवकांना या लेखकाने प्रश्न विचारला होताः तुमच्या या विजयाचे श्रेय तुम्ही कशाला देता? तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता सर्वांनी एकमुखाने उत्तर दिले होते­ – राज ठाकरे यांना!
आज मनसेच्या स्थापनेपासून गेल्या आठ वर्षांत त्या पक्षावर ओढवलेली ही सर्वात दारुण स्थिती असताना त्याचीही जबाबदारी राज ठाकरे यांनाच घ्यावी लागेल. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून दिशा हरविलेल्या गाडीसारखी त्यांची अवस्था होती. प्रचार कोणाविरुद्ध करायचा, एवढेच नक्की होते; कशासाठी करायचा हे नक्की नव्हते.
2009 साली शिवसेनेच्या विरोधात राज ठाकरे यांनी प्रचाराची राळ उठविली होती, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी शाब्दिक वादविवाद करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून घेतले होते. त्या चुकीपासून त्यांनी धडा घेतल्याचे दिसले. त्यामुळे प्रचाराची आपली संहिता सोडून त्यांनी पदरचे डायलॉग टाकण्याची चूक टाळली. म्हणूनच वडा पाव आणि चिकन सूप सारखे उल्लेख राज ठाकरे यांनी करूनही ते शांत राहिले आणि मनसेचे अर्धे अपयश तिथेच निश्चित झाले. उरलेसुरले अपयश मनसेच्या धरसोडीच्या धोरणांमुळे आले. टोलबाबतचे आंदोलन हे याचे ठळक उदाहरण होय.
आपले मुद्दे संपत आल्याची जाणीव कदाचित स्वतः राज ठाकरे यांनाही झाली असेल. विविध वाहिन्यांवरून दिलेल्या त्यांच्या 'एक्सक्लुझिव्ह' मुलाखतींमध्ये त्यांनी घेतलेली शिरजोर भूमिका आणि मुलाखतकर्त्यांवर डाफरण्याच्या देहबोलीतूनच ते दिसून येत होते.
मनसे आणि आम आदमी पक्षासारख्यांना मत म्हणजे काँग्रेसला मत हे मतदारांनी यंदा पक्के ठरविले होते. या पक्षांची भूमिका ही जुन्या उंदराच्या गोष्टीसारखी होती. त्यांनी केवळ 'राजा भिकारी माझी टोपी चोरली' एवढेच गाणे म्हणायचे होते. राजाने प्रतिक्रिया दिली तर उंदीर मोठा होणार, अन्यथा तशीही त्यांची ताकद ती काय?
म्हणूनच राष्ट्रीय पातळीवर मोदींनी जे साध्य केले ते उद्धवनी महाराष्ट्रात साध्य केले. मोदींनीही प्रचाराच्या संपूर्ण काळात अरविंद केजरीवाल यांची दखलही घेतली नाही (केवळ एका अप्रत्यक्ष उल्लेखाचा अपवाद करता). त्याच धर्तीवर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात मनसेची दखलच घेतली नाही. शिवसेनेच्या इतिहासातील ही सर्वात धोरणी निवडणूक नीती म्हणावी लागेल. शिवसेनेने प्रतिसाद देणे बंद करताच मनसेच्या इंजिनातील कोळसा संपला आणि ते हळूहळू सायडिंगला आणण्याची प्रक्रिया सुरू झाली.
सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात मनसेला विश्वासार्ह खेळाडू म्हणून उतरायचे असेल, तर महाराष्ट्राचे बाजूला राहू द्या, राज ठाकरे यांना पक्षाचेच नवनिर्माण करावे लागेल, एवढे नक्की. अर्थात कोणताही पक्षा एका निवडणुकीच्या अपयशाने संपत नसतो आणि राज ठाकरे यांच्यासारख्या मुत्सद्दी राजकारण्याकडून तर ती अपेक्षाच नको, पण त्यांचा मार्ग निर्वेध नाही, एवढे नक्की

(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझी नोंद. ही नोंद येथेही उपलब्ध आहे.)

Wednesday, May 14, 2014

वेळ ओढून आणण्याची हिकमत

   पुण्यात नुकत्याच झालेल्या आणि मतदारांची नावे गायब होण्याच्या प्रकारामुळे गाजलेल्या
लोकसभा निवडणुकीचा किस्सा. काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अन्य उमेदवारांसोबत २६ मार्च रोजी अर्ज भरणार असे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र डॉ. कदम यांनी गुपचूप जाऊन २५ मार्च रोजीच आपला अर्ज भरला आणि विशेष म्हणजे त्यांचे दोन्ही प्रतिस्पर्धी, भारतीय जनता पक्षाचे अनिल शिरोळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीपक पायगुडे यांनीही त्याच दिवशी अर्ज भरला. डॉ. कदम यांच्या या कृतीची कल्पना त्यांच्या स्वपक्षीयांनाही नव्हती, ही आणखी गंमत. याबद्दल पत्रकारांनी शोध घेतला, तेव्हा मुहूर्त साधण्यासाठी असे केल्याचे दबक्या आवाजात सांगण्यात आले. म्हणजेच तो दिवस, ती वेळ शुभ होती असे तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना सांगण्यात आले होते आणि म्हणून तिघांनीही त्याच दिवशी आपला अर्ज भरला. सुदैवाने किंवा दुर्दैवाने (?), या तिघांपैकी एकच जण निवडून येणार आहे आणि बाकी दोघांचा मुहूर्त हुकणार आहे.
  आता एक महिना पुढे जाऊ. ३० एप्रिल रोजी गुजरातेतील संपूर्ण २६ जागांसाठी मतदान होणार असते. वडोदरा येथून भाजपच्या होतकरू पंतप्रधानपदाच्या नवमान्यताप्राप्त पत्नी जशोदाबेन मोदी मतदान करणार असतात. त्यांना १२ वाजून ३९ मिनिटांनी मतदान करण्यास सांगण्यात येते आणि पतीच्या विजयासाठी त्याही या ठरलेल्या वेळेस मतदान करतात. ही वेळ शुभ असल्याचे सांगण्यात आल्यामुळे व त्यांनी ती साधल्यामुळे आता मोदींच्या मार्गात कोणताही राहु() येऊ शकणार नाही, याची भाजपच्या धर्मभोळ्या कार्यकर्त्यांची खात्री झालेली असते.

कुठल्याही किमतीवर विजय मिळविण्याची ईर्षा बाळगणाऱ्या दोन बाजीगरांच्या अतार्किक वागण्याच्या या दोन तऱ्हा. मात्र निवडणुकांच्या हंगामात केवळ याच दोन व्यक्तींनी असे विलक्षण वर्तन केले, असे नाही. आसेतू हिमाचल अशा प्रकारच्या समजुती आणि शुभ वेळ गाठण्यासाठीच्या हिकमती यांचा एक चित्रपटच उभा राहतो.
(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझी नोंद. संपूर्ण नोंद (राहूकाळ, ग्रहतारे आणि मुहूर्त!) वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा)