Wednesday, September 5, 2007

जाको राखे साईयां...!

तीन दशकांच्या आयुष्यात अनेक अपघाताचे प्रसंग...अनेक छोट्या मोठ्या घटना जवळून पाहिल्या. आता वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून काम करताना तर दररोज अपघाताच्या बातम्या नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र "अपघात" फेम मुंबई-पुणे "एक्‍स्प्रेस हाय-वे"वर स्वतः अनुभवलेला अपघात आयुष्यातला आतापर्यंतचा सर्वाधिक थरारक अन्‌ भीतीदायक अनुभव ठरला. मृत्यूजवळ येऊन अगदी केसाच्या अं तराने त्यातून बचावणे म्हणजे काय, हे त्यादिवशी कळाले.
लॉजमध्ये असताना नितिन याची ओळख झाली होती. त्यावेळी मला महिना सहा हजार रुपये पगार होता आणि तो नोकरीसाठी वणवण भटकत होता. नंतर सुदैवाने त्याला "एचएसबीसी'त नोकरी लागली. आता तो माझ्यापेक्षा (आताच्या पगारापेक्षाही) तिप्पट कमावतो. गेल्या वर्षी तो लंडनला जाऊन आला. तरीही अजून त्याने आठवण ठेवली आहे. त्याच्या मित्राला लंडनला जाण्यासाठी निरोप देण्यासाठी जायचे होते. त्यामुळे त्याने बोलाविल्यावर मी हो म्हणालो. रात्रीची ड्यूटी आटोपून बाहेर पडलो तेव्हा नितीन त्याच्या मित्रांसह आणि "तवेरा" गाडीसह तयार होता. गाडीत बसल्यावर त्याच्या मित्रांशी ओळख झाली. त्यातील सुरेश हा लंडनला निघाला होता; तर कार्तिक त्याच्यासोबत कंपनीत काम करत होता. कार्तिक समोर ड्रायव्हरशेजारी आणि आम्ही मागे बसलो होतो. सर्वात मागच्या बाजूला सामान होते.
गाडीने पुणे सोडले तेव्हा गाडीचा वेग साठ ते सत्तर किमी होता. एक्‍स्प्रेस वेला लागल्यावर तो वेग 75 वर आला. मात्र ड्रायव्हर चांगली गाडी चालवत असल्याने आमची काही तक्रार नव्हती. मध्ये एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. त्यावेळी चहासाठी दहा रुपये देताना लक्षात आले, की पाकिटात तीसच रुपये होते. बाकीचे पैसे घरी ठेवले होते. मात्र घरी जायला वेळच मिळाला नसल्याने पैसै तिथेच राहिले. चहाचे पैसे दिल्यानंतर केवळ उरले वीस रुपये. गाडी मित्रांनी भाड्याने केलेली असल्याने तो खर्च माझ्यावर न व्हता. तरीही आणखी खर्चाचे काय करायचे, हा विचार चालू होता.

एव्हाना गाडीतले चालक वगळता सर्वजण झोपले होते. आता मी "बॅटमन' असल्याने (म्हणजे वटवाघूळ वर्गीय मनुष्य) मी झोपण्याचा प्रश्‍नच नव्हता. केवळ अधूनमधून डोळे झाकत होतो. मध्यंतरी एकदा डोळे उघडले तेव्हा आमची जीप एका ट्रकच्या दिशेने जाताना दिसली. पापणी मिटली आणि ती उघडायच्या आत, किंवा ड्रायव्हरला सावध करण्यासाठी ओरडण्याच्या आत "थाऽऽऽऽड' असा आवाज झाला. पुढच्या क्षणी डोळे उघडले तेव्हा मी समोरच्या सीटवर पडलो होतो...शेजारील नितीन समोरच्या दोन सीटमधील पोकळीत पडलेला...पलिकडचा सुरेश त्याच्या समोरच्या सीटवर आदळलेला...
सर्वात आधी जाणवले बाजूचा दरवाजा उघडून ड्रायव्हर बाहेर गेला...सहा-सात पावले मागच्या दिशेने गेल्यानंतर तो रस्त्यातच कोसळला. मीही दरवाजा उघडून बाहेर पडलो. सर्वांना बाहेर काढले. कार्तिकचा सर्व चेहरा रक्‍ताने माखला होता. तो बेशुद्धच होता. त्यामुळे बाहेर काढताच तो खाली पडला. नितीनचा ओठ पूर्ण फाटला होता. सुरेशच्या नाकातून रक्त येत होते. त्यांचे रक्ताळलेले चेहरे पाहून मी स्वतःच्या चेहऱ्यावरून दोन-तीनदा हात फिरवून पाहिला. पण मला काहीही झालेले नव्हते. केवळ पायाला थोडेसे खरचटले होते आणि समोरच्या सीटवर पडल्याने मुका मार लागला. त्यावेळी नशीब बलवत्तर असल्याची जाणीव झाली.
चांगले नशीब एवढ्यावरच थांबले नाही. त्यामुळे हा प्रकार घडला नाही तोच पॅट्रोलवर असलेले हायवे पोलिस तिथे दाखल झाले. त्यांनी लगेच ऍम्ब्युलन्सला कॉल लावला. दहा मिनिटांत ती दाखल झाली. त्यापूर्वी पोलिसांनी सर्वांचे नाव-गाव लिहून घेतले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "तवेरा' ट्रकला धडकल्‌ यानंतर ट्‌कच्या मागच्या बाजूला अडकली व पुढे घासत गेली. काही असो, गाडीतल पाच जणांपैकी केवळ मीच सहीसलामत राहिल्याने सगळी माहिती, जबाब देण्याची जबाबदारी पडली. ते होईपर्यंत सर्वां ना ऍम्बुलन्समध्ये बसविले. आता ऍम्बुलन्सच्या चालकाशेजारी बसण्याची जबाबदारी माझी होती. पनवेलच्या "लाईफ लाईन' हॉस्पिटलच्या दिशेने ऍम्बुलन्स निघाली. ते तीस किलमीटर आता मला प्रकाशवर्षांसारखी भासू लागली. एक नजर रस्तावर आणि एक नजर ऍम्बुलन्सच्या स्पीडमीटर वर होती. त्याचा काटा 80च्या पुढे गेल्यावर अंगावरही "काटा' उभा रहायचा. हॉस्पिटलला गेल्यावर घड्याळात पा हिले...चार वाजून दहा मिनिटे. म्हणजे अपघात साधारण साडेतीन वाजता झाला होता.
रात्री हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या झाल्या. ड्रायव्हर आणि कार्तिक दिसतानाच गंभीर दिसत असल्याने त्यांना तडक "आयसीयू'मध्ये पाठविण्यात आले. सुरेशच्या नाकातील रक्तवाहिनी फुटल्याने आणि डोळ्या ंखाली मार लागल्याने चेहरा सुजला होता. त्याला व नितीनला "रिकव्हरी रूम'मध्ये ठेवण्यात आले. मला सामान आणि काही गरज पडल्यास थांबावे लागले. खिशात वीसच रुपये असल्याने काय करावे, हा प्रश्‍नच होता. पुण्यातील मित्राला फोन करून पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्याने स्वतः न येता कंपनीतील साहेबांकरवी पैसे मिळण्याची व्यवस्था केली. त्यामुळे तेवढी तरी सोय झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी "एचएसबीसी'तील लोकं येण्यास सुरवात झाली. सुरेशला जाता येणार नव्हते. त्‌ याने तिकिटच रद्द केले. डॉक्‍टरांच्या सांगण्यानुसार, या सर्वांना चोवीस तास ठेवावे लागणार होते. त्यात जो येईल त्याला सर्व घटनेची हकीगत सांगावी लागत असल्याने कंटाळा आला होता. अन्‌ येणारा प्रत्येक जण विचारत होता, ""तुम्हाला कसं काय लागलं नाही?''
त्यांना काय सांगणार, देव तारी त्याला "तवेरा' काय मारी?

ड्रायव्हर वगळता सर्वांचे मित्र आणि नातेवाईक आल्यानंतर पुण्याकडे निघण्याचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे सकाळी साडे सहाला स्टॅंडवर जाऊन बस पकडली. खूप समोर नाही, खूप मागे नाही...अशी बेताची मध्यवर्ती सीट पकडून पुण्यात आलो "वन पीस.' पुन्हा खासगी गाडीतून रात्रीच्या वेळी प्रवास न करण्याचा निश्‍चय करूनच.

5 comments:

  1. अपेक्षेप्रमाणे ब्लॉगवर सर्व घटना कळाली. देवाचे नशिब म्हणावे लागेल. सहीसलामत आला ते. आता तरी सांभाळून रहा बाबा.

    ReplyDelete
  2. थरारक अनुभव रंजक पद्धतीने लिहिलाहेस तू.
    वाचताना प्रत्यक्ष तिथे असल्यासारखेच वाटले.

    थोडक्यात वाचलात.
    पुढच्या वेळी काळजी घ्या.
    पुन्हा अशी `संधी' मिळाल्यास, निदान पैसे तरी जवळ थेवा, म्हणजे झालं!

    ReplyDelete
  3. अरे देवीदास तू उपसंपादक आहेस ना? मग किमान तारखी तरी नको का? या बातमीत तीच उणीव आहे. बाकी देव तारी ऐवजी मी म्हणेन की "रजनी तारी त्याला...' कारण रजनीकांत तुझ्यासाठी देव आहे! मुंबई-पुणे हायवेवरच माझ्या एका मित्राला म्हणजे मुंबई "सकाळ'मधील एकावर (इनामदार) अशीच वेळ आली होती. त्याला सुद्धा तुझ्यासारखेच लागले नव्हते आणि त्याचे सुद्धा मग तोंड दुखले होते, सगळ्यांना तेच ते सांगून सांगून.

    ReplyDelete
  4. tumchya sansthche tumchyawar aslelya premamulch tumhi wachalat. shevti paishya peksha prem, aapulki, jivhala jasta mahatvacha. paise kay ya mahinyat wadhtil kinva pudhchya mahinyat. doctor aani devane tumchyavar khup prem dakhavile he kahi kami aahe.

    ReplyDelete
  5. हा जो कुणी "ऍनॉनिमस' आहे, त्याची कॉमेंट वाचून मात्र देवीदास नक्कीच जखमी झाला असेल. अरे "अनामिक्‍या' तुला काही कळते का? देवीदासला असल्या अपघाता-बिपघातात जखमा-बिखमा होत नसतात. त्या तर त्याला "इनबील्ट' किंवा "डिफॉल्ट' झालेल्या आहेत. त्या कशामुळे हे देवीदासला आणि त्याच्या "नीकटवर्तीयां'ना चांगल्याच माहित आहेत. यामुळे हे "अनामिक्‍या' तुला काय गरज होती त्याच्या जखमेवर मीठ चोळायची?

    ReplyDelete