Wednesday, November 28, 2007

टीव्हीशप्पथ हसणार नाही.....

हॅलो...कोण? अच्छा तू होय? का रे कशाला फोन केला? नाही रे, नाही पाहिला तो प्रोग्राम- तुला माहितेय मी असले प्रोग्राम पाहत नाही. अरे, असतं काय त्या कार्यक्रमांमध्ये मला सांग ना? 'आनंदी आनंद गडे' असं हे जग असल्याचं आपल्या काही कवितांमध्ये म्हटलं आहे ना मग आता कोणाला आनंद कमी पडला म्हणून हे असले माकडचाळे रे?

...ए ए मला काय हसण्याची ऍलर्जी नाही हां. मलाही जोक कळतात. ....हो हसताही येतं. पण कोणीतरी उगीच डोळ्यापुढे उभं राहतं आणि काहीतरी अंगविक्षेप करून तुम्हाला हसायला भाग पाडतं, यात कसला विनोद? ....तू पाहतोस ना असले कार्यक्रम. मग तुलाच लखलाभ असोत रे ते.

...माझा आक्षेप? अरे, हे कार्यक्रम हसण्यासारखे असण्याऐवजी हास्यास्पद असतात, हाच माझा ऑब्जेक्शन आहे. नाही, विनोदाच्या नावाखाली असे आचरट उद्योग पूर्वीही होत असत. असरानी, जगदीप अशा लोकांची कारकीर्द त्यातच उभी राहिली माहितेय मला. पण दक्षिण भारतातून रिमेक केलेल्या चित्रपटांमध्ये कादरखान-शक्ती कपूर या जोडगोळीने काही काळ अशा प्रकारचा उच्छादच मांडला होता, हे तुला माहित नसावं कदाचित. हिंदी कशाला, आपल्या मराठीतही लक्ष्या-अशोक सराफ जोडीचे अनेक सिनेमे असेच नाहीत का? आता सुद्धा...

...थांब थांब... त्या उच्छादात आणि आताच्या टोळधाडीत एक फरक माहितेय का तुला? तो प्रकार थिएटरपुरता होता. आता हा टीव्हीतून घरात आलाय...अन हिंदी चॅनेल्सनी जे केलं ते मराठीतही झालंच पाहिजे, हा सॅटेलाईटचा नियम यांना पाळायलाच पाहिजे ना...त्यामुळे कोणी ‘हास्यसम्राट’ घ्या कोणी ‘हास्य़ दरबार’ घ्या चालू आहे ना बाबा. आता तुझ्यासारखे काही प्रेक्षक मिळाले की त्यांचे कार्य तडीस गेलेच म्हणून समज...मला कालच माझ्या ओळखीच्या एकाने विचारलं, “ तुम्ही पाहता का असले हसायचे कार्यक्रम?” मी सांगितलं, “ मी एकदा कार्यक्रम पाहायचा प्रयत्न केला होता. तेव्हा सुरवातीपासून शेवटपर्यंत हसत होतो. आता कधीतरी त्यात काय असते तेही पाहायचे आहे.”

....एक मिनिट, एक मिनिट...मला एक सांग, तू पु. ल. आचार्य अत्रे वगैरंची पुस्तके वाचली आहेस ना? मग तरीही तुला ही असली थेरं चालतात. नाही म्हणजे आपल्याकडे शिमगा वगैरेला असं काहीबाही चालत असतं...पण त्याचा असा बारमाही रतीब नाही घालत कोणी. अन हसण्यासाठी कोण कोण काय करतं, ते पाह्यलं का? म्हणजे ते पाहून हसू येण्याऐवजी किवच येते की रे. कोणी रेड्यासारखं रेकतं काय, कोणी बेंबीच्या देठापासून ओरडतो काय? एका कार्यक्रमात बालनाट्यातील राजा-प्रधानांसारखी वेशभूषा केलेले परीक्षक आहेत.

काहीच कळेनासं होतं. त्या हिंदीत तर भाड्याने आणल्यासारख्या मॉडेलच आणतात ना. हसण्यासाठी. म्हणजे विनोद फालतू असला तरी यांच्याकडे पाहून हसू यावं! काय रे ही खऱया विनोदाची ट्रजेडी?

तुला एक सांगू. सगळ्या प्राण्यांमध्ये हसू शकणारा प्राणी एकच माणूस. त्यातही कशाला हसावं आणि कशाला नाही, हे ज्याला समजतं तो शहाणा माणूस. तुला माहितेय का, अमेरिकेत एक विनोद आहे. कम्प्युटर कधीही माणसांची जागा घेऊ शकणार नाही, कारण साहेबांच्या विनोदावर हसण्याची कला त्याला येत नाही. तर कळालं ना...हसण्यासाठी आणखी जागा आहेत ना...साहेबांचे विनोद आहेत, चोवीस तास बाता मारणारे बातम्यांचे चॅनेल्स आहेत, गेला बाजार टीव्ही नको असेल तर एखाद्या वर्तमानपत्रातील वाचकांचा पत्रव्यवहार वाच...

...नको ना? ठीक आहे. तू नकोच वाचू. मी वाचेन आणि हसेनही. पण टीव्हीशप्पथ, ते कार्यक्रम पाहून हसणार नाही!

1 comment:

  1. चोवीस तास बातमीसाठी वाहून घेतलेल्या वाहिन्या कशा चालवायच्या यातून उद्‌भवलेल्या समस्येचा अचूक वेध या "ब्लॉक'मधून घेतला आहे. पु.ल. आणि आचार्य अत्रे यांचा उल्लेख करून मार्मिक विनोदाची जणू अप्रत्यक्ष व्याख्या नमूद केली आहे. त्यामुळे वाहिन्यांवर सुरू असलेला उथळपणा संवादाच्या माध्यमातून मांडण्यात यश आले आहे.

    ReplyDelete