Thursday, March 18, 2010

काम करा, गाणी ऐका पण बोलू नका

KARUNANIDHIमहाराष्ट्रातील मराठी नेत्यांना, म्हणजे मराठी भाषेसाठी आग्रह धरा असं सांगणाऱ्या नेते अडचणीत आले किंवा त्यांचे युक्तिवाद खुंटले, की दक्षिणी राज्यांचे उदाहरण देण्याची त्यांची रीत आहे. दक्षिण भारतात  खासकरून तमिळनाडूत पाहा, कसा हिंदीला विरोध होतो, हे ते वारंवार सांगत असतात. मात्र हिंदीला विरोध करतानाच, हिंदी भाषकांना जी वागणूक दक्षिणेतील नेते किंवा एकूणच समाज देतो, ते अधूनमधून समोर येतं. का कोणास ठाऊक, आपल्याकडे या गोष्टींची चर्चा होत नाही.

आता करूणानिधींचंच घ्या ना. हिंदी आणि हिंदू विरोधावर कारकीर्द उभी करणाऱ्या करुणानिधींनी परवा हिंदी भाषक कामगारांना चेन्नईत जी जागा दाखवून दिली, ती अगदी दाद देण्यासारखीच होती. तमिळनाडू विधानसभेच्या नव्या इमारतीचे बांधकाम झाल्याबद्दल 15 मार्चला दहा हजार कामगारांना तमिळनाडू सरकारच्या खर्चाने जेवण देण्यात आले. मेजवानीच म्हणा ना. या कामगारांमध्ये बहुतांशी उत्तर भारतीय होते. त्यामुळेच या समारंभात हिंदी गाणीही लावण्यात आली होती. “हिंदू”चे संपादक एन. राम यांनी करुणानिधींना याबद्दल छेडले, तेव्हा एकाक्ष (व चाणाक्ष) कलैञर (करुणानिधींची तमिळ उपाधी) उत्तरले, की सगळ्या भाषकांनी मिळून मिसळून बोलले पाहिजे. त्यानंतरचं जे वाक्य ते बोलले ते अधिक महत्वाचे होते.

“या कामगारांना खाऊ द्या, हिंदी गाणी ऐकू द्या. पण तमिळनाडूत हिंदी बोलण्याची गरज नाही,” असॆ करुणानिधींनी जाहीर भाषणात  सांगितलं. (लिंक तमिळ भाषेतील दिली आहे मात्र त्याला इलाज नाही. दिनकरन या सन समुहाच्या पर्यायाने करुणानिधींच्याच वर्तमानपत्रात आलेलं हे जशास तसे भाषण आहे. हीच बातमी वेगळ्या स्वरूपात हिंदूत आली आहे. ) हिंदी वाहिन्या किंवा अन्य माध्यमांनी याकडे लक्ष न देणं समजता येईल. मात्र आपल्याकडच्या राजकीय पक्षांनी किंवा माध्यमांचेही इकडे लक्ष गेलं नाही. “बिहार, ओरिसा यांसारख्या राज्यांतील लोकांनी ही इमारत उभी केली आहे. त्याबद्दल त्यांना आनंद झाल्यामुळे ते नाच-गाणे करत आहेत,” असं कलैञरांचं म्हणणं आहे.

त्यांची वाक्यं पाहा आणि ते किंवा तत्सम कुठे ऐकले आहेत का, जरा आठवून पाहा. करुणानिधींच्याच शब्दांतः एखादी भाषा सगळ्या भारतभर बोलली जाऊन त्यातून एका राज्याचा दुसऱ्या राज्याशी संपर्क होणे, यावर आमचा काही आक्षेप नाही. मात्र एखादी भाषा मोठी आणि अन्य भाषा दुय्यम ही भूमिका आम्हाला मान्य नाही. दुसऱ्या राज्यातून आलेले तुम्ही, आता मनाप्रमाणे आपल्या भाषेतील गाणी ऐकली. त्याचप्रमाणे तमिळ गाणी लागली तेव्हा त्याला आक्षेप घेतला नाही. असं एकमेकांशी एकोप्याने न वागता, एखाद्याने दुसऱ्याला वरचढ असल्याचे दाखवणे, याला आमचा विरोध आहे. (आणखी एकः हिंदी कामगारांसमोर भाषण मात्र तमिळमध्येच केलं कलैञरांनी! )

आपल्याकडे राज ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे काय सांगतात? मात्र त्यांच्याविरूद्ध काय गहजब झाला असता. करुणानिधींच्या भाषणाच्या दुसऱ्या दिवशी कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी तिथेच होते. मात्र बिहारी लोकांच्या या  अपमानाचे वारे त्यांच्या कानावरूनही गेले नाही. अजापुत्रं बलीं दद्यात्, दुसरं काय?

8 comments:

  1. खरंच त्या करुणानिधींची कारकीर्द फक्त हिंदी आणि हिंदू विरोधावर उभी आहे बाकी त्याचं कर्तृत्व तसं शून्यच आहे. (अपवाद जयललिताच्या साड्या फेडणे). त्याच्यावर त्या राजदीप सरदेसाई, तो वागळ्या आणि एकूणच हिंदी मिडियाची जीभ कधी उचकटलेली बघितली नाही. शेवटी "अजापुत्रं बलीं दद्यात्" हेच अगदी खरं.

    ReplyDelete
  2. खरं आहे हेरंब. वास्तविक करुणानिधी लेखक किंवा कवी म्हणून मोठे आहेत. मात्र राजकारणाची वेळ आल्यावर तमिळशिवाय अन्य कशालाही ते महत्त्व देत नाहीत. मात्र महाराष्ट्रातील नेते आणि करुणानिधी यांची भूमिका अगदी सारखी असताना ठाकरेंविरूद्ध जो गहजब होतो, तो अशावेळेस कुठे जातो, हा खरा प्रश्न आहे.

    ReplyDelete
  3. या कामगारांना खाऊ द्या, हिंदी गाणी ऐकू द्या. पण तमिळनाडूत हिंदी बोलण्याची गरज नाही,”
    समजा वरिल वाक्य असे असते तर
    या कामगारांना खाऊ द्या, हिंदी गाणी ऐकू द्या. पण तमिळनाडूत हिंदी बोलण्याची मस्ती करु नये, केल्यास त्यांना त्यांची जागा दाखवुन देउ,”
    तर काय परिणाम झाला असता?

    कोणतीहि अस्मिता हाताळणे फारच अवघड ब्वॉ!

    ReplyDelete
  4. नाही प्रकाशजी. करुणानिधी जे बोलले त्याचा मथितार्थ हाच होता. शिवाय जागा दाखविण्याची भाषा करण्याची त्यांना गरज नाही. त्यांच्याकडे वीसहून अधिक खासदारांचं बळ आहे. जागा दाखविण्याची जी भाषा आज महाराष्ट्रात चालू आहे, त्याचे प्रात्यक्षिक तमिळनाडूत 60च्या दशकातच दाखविण्यात आले होते. त्यामुळे मस्ती दाखविण्याची कोणाची हिंमतही नाही.
    चेन्नईतील कार्यक्रमात हिंदी गाणी ऐकू आल्याने राष्ट्रीय म्हणविणाऱ्या वर्तमानपत्रांच्या संपादकांची भृकुटी ताणल्या गेल्या, हे लक्षात घ्या.

    ReplyDelete
  5. देविदास,
    प्रकाशजींच्या बोलण्याशी मीअगदी सहमत आहे. अहो एखादी गोष्ट सांगायची तर ती साध्या सरळ भाषेत सांगितली तर त्याचा विपर्यास होत नाही.

    पण तेच जर थोड्या वेगळ्या भाषेत सांगितले ( धमकी देणे, वगैरे प्रकारात) तर मात्र त्या प्रॉब्लेमचं डायमेन्शनच बदलून जाते, आणि मिडीया त्याचा विपर्यास करतो हे अगदी सत्य आहे.
    या मुळे कदाचित नॅशनल टिव्ही वर कव्हरेज, वगैरे मिळून प्रसिध्दी मिळते, पण ज्या गोष्टीसाठी हे सगळं असतं ती गोष्ट पुर्ण पणे दुर्लक्षीली जाते!

    ReplyDelete
  6. बरोबर आहे, महेंद्रजी. मात्र साध्या सरळ भाषेत सांगितलेले ऐकण्याची वृत्ती राहिली आहे का आपल्याकडे? साधं तुम्हीच उपस्थित केलेल्या मोबाईल कंपन्यांचे घ्या. एअरटेल आणि वोडाफोनला लोकांनी काय कमी विनवण्या केल्या होत्या मराठीत सेवा उपलब्ध करा म्हणून. आधी त्यांनी बेमुर्वतपणे दुर्लक्ष केले आणि ज्या दिवशी शो रूमवर दगडं पडले त्या दिवशी सुतासारखे सरळ आले.
    दक्षिणेतल्या लोकांना इतके कडक बोलावं लागत नाही कारण त्यांची वातावरण निर्मिती झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वापरली जाणारी भाषा कडकच असणार, हे साहजिक आहे. शिवाय मनसे किंवा शिवसेनेपेक्षा दसपट जहाल अशा संघटना कर्नाटकात आहेत. त्यांच्याबद्दल लिहीन कधीतरी.

    ReplyDelete
  7. अजापुत्रं बलीं दद्यात्... बरोबरयं!

    ReplyDelete
  8. धन्यवाद, आनंद. मऊ लागलं की कोपऱ्याने खणायची, ही जगाची रीतच आहे.

    ReplyDelete