Monday, January 18, 2010

शेतकरी, ज्योतिषी व जादुगार

देशाचे कृषीमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जगभरातील शेतकऱ्यांचे तारणहार शरद पवार यांनी शेवटी आज साखरेचे भाव उतरणार असल्याची बहुप्रतिक्षित घोषणा केली. याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. जनतेचा कडवटपणा बाहेर येईल, अशी  कोणती घटीका जवळ नसतानाही पवार यांनी अत्यंत तडफेने भाव उतरविण्याची किमया केली. त्यांचे हे भावनिक रूप जनतेला पहिल्यांदाच दिसलं आहे. आठवडाभरापूर्वी आपले हात झटकणाऱ्या जाणता राजाने आपल्या हातात काय काय कला आहेत, याचे दर्शनच घडविले जणू.

पवार हे मूळचे शेतकरी. तरीही त्यांना ज्योतिषी म्हणून कोण प्रसिद्धी दिली आणि त्यांची बदनामी (असं म्हणायचं असतं) केली कळत नाही.  नाही म्हणायला त्यांच्यात तशी काही लक्षणे आहेत. कोणी काही विचारलं, की आकडे फेकायचे आणि बऱ्याच दिवसांत कोणी विचारेनासे झाले, की कोड्यात पाडणारे काही तरी बोलायचे ही त्यांची खासियत. ही तशी ज्योतिषाचीच स्टाईल. ते नाही का असं आठव्या घरात शनी, नवव्या घरात रवी वगैरे वाक्प्रयोग साभिनय करतात. तसेच पवार साहेबही ‘चाळीस लाख लोकांना अडीचशे टन साखर,’ ‘तीन महिन्यांत सात टन ज्वारी’ वगैरे शब्दमौक्तिके उधळत असतात.

बिचाऱ्या जाणत्या राजांना दिल्लीत चारही दिशांनी घेरून त्यांची दशा-दशा करण्याची एकही संधी सोडत नाहीत लोकं. (लोकं म्हणजे पत्रकार आणि तत्सम निरुद्योगी मंडळी.) जगात सगळीकडे साखरेचे भाव वाढत असताना फक्त भारतातच ते कमी कसे काय असणार, हे पवार साहेब गळा खरडवून सांगत असताना ते कोणीच ऐकायला तयार नव्हतं. ज्योतिषांचंही तसंच असतं. ‘आम्ही काहीही सांगितलं तरी विधिलिखित बदलता येत नाही,’ हे त्यांचंही डिसक्लेमर असतंच की. मग?

शरद पवारएका बेसावध क्षणी, पत्रकारांनी विचारलं पवारांना आणि त्यांनीही सांगून टाकलं, “मी काही ज्योतिषी नाही साखरेचे भाव कधी उतरणार ते सांगायला.” पवारांचा कधीही देवावर विश्वास नव्हता आणि दैवावरही. त्यांना ओळखण्याऱ्या सगळ्यांना हे माहित आहे. (आता पवारांना कोणी पूर्णपणे ओळखू शकते, यावरही बहुतेकांचा विश्वास नाही हा भाग अलाहिदा. ) तरीही त्यांना कधी नाही तो अडचणीच्या काळात ज्योतिषी आठवला. (कधी नाही म्हणायचं कारण, पवार साहेबांना अडचण काय असते तेच माहित नाही. ) महाराष्ट्रात स्वतःच्याच लोकांकरवी त्यांनी उभ्या केलेल्या प्रतिमेनुसार, पवार साहेबांनी भल्याभल्यांच्या कुंडल्या मांडलेल्या आहेत तशाच बिघडविलेल्याही आहेत. त्यामुळे काही लोक त्यांनाच ज्योतिषी समजू लागले, तर त्यात लोकांचा काय दोष.

मात्र ज्योतिषांकडे नसलेली एक गोष्ट पवार साहेबांकडे आहे. ती म्हणजे धक्का देण्याची शक्यता.  हा त्यांचा हातखंडा प्रयोग. याबाबतीत एखादा जादुगारही त्यांचा हात धरू शकणार नाही. (कारण ते हाताने धक्का देतच नाहीत मुळी. फार फार तर असं म्हणता येईल, की घड्याळाने धक्का देतात. ) त्यातलाच एक प्रयोग आज त्यांनी केला. एका आठवड्याच्या आत साहेबांनी साखरेचे भाव उतरवून दाखविले बघा. हे जर एका आठवड्याच्या आतच होणार होतं, तर साहेबांनी तेव्हाच सांगितलं असतं तरी चाललं नसतं का? मात्र तसं झालं असतं, तर धक्का कसा बसला असता. एखाद्या कसलेल्या जादुगाराप्रमाणे त्यांनी जनतेला गाफिल ठेवले आणि भाव उतरल्याची घोषणा करून आज सगळ्यांचे तोंड गोड केले पहा. (कसलेले जादुगारच ते. शेतकऱ्याचे सुपुत्र असल्याने कधीकाळी शेतात कसलेलेच आहेत ते, असं त्यांचं म्हणणं आहे.)

आता या जादुगाराच्या या चलाखीवर टाळ्यांचे आवाज मला आताच ऐकू येऊ लागले आहेत. मागच्या वेळेस डाळीचे भडकलेले भाव कमी करण्यासाठी त्यांनी कोरियाहून खास न शिजणारी डाळ आणण्याची हातचलाखी केली होती. त्या टाळ्यांचे प्रतिसाद तुम्हालाही ऐकू येत असतील, कदाचित!

7 comments:

  1. mast vishleshan kela aahes, pawar jyala samajlaa tyala rajkaran samajala :-)

    ReplyDelete
  2. धन्यवाद, अजय. ज्याला पवार समजला त्याला राजकारण समजला पण पवारांना समजण्यातच अनेकांची हयात खर्ची पडली आहे.

    ReplyDelete
  3. वा वा पवारांनी ज्योतिषाला अशी भाववाढ सांगता येते असे अप्रत्यक्ष सांगितल्याने ज्योतिषांचा चांगलाच सन्मान झाला आहे

    ReplyDelete
  4. .....एका बेसावध क्षणी, पत्रकारांनी विचारलं पवारांना आणि त्यांनीही सांगून टाकलं, “मी काही ज्योतिषी नाही साखरेचे भाव कधी उतरणार ते सांगायला.”....
    साहेब राजकारणी नसते तर उत्तम ज्योतिषी झाले असते अगदी लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आत्मपुराण मधे वर्णन केलेल्या ज्योतिषासारखे

    ReplyDelete
  5. शरद पवारांना व साखरेचे भाव वाढले म्हणुन बोबंलाणाऱ्या तुमचा पगार किती पटीने वाढला आणि साखर किती पटीने वाढली एकदा शेती करुन बघा मग समजेल

    ReplyDelete
  6. To Anonymous :

    mi sudha eka shetkaryacha mulga aahe ani majhya ghari sudha sakharch pikate, pan mhanun sakhar 55 rs per kg ghene kunalach parwadanare nahi. sakhar jevha 17 rs per kg hoti tevha oosalaa 1200 Rs per ton asa bajar hota, sakhar 55 rs gelyvar, mhanje tin patine vadhlyvar ha bhav sudha tine patine vadhala hava naa mhanje 3600 per ton. pan to jhala kaa nahi ? shetkaryana 2000-2200 per ton asa rate milat aahe. mhanje madhle paise he jhale karkhandar karanyaryche ani pawarsarkhya pudharayache. shetkaryacha hitasathi jhato asa dakhvyacha ani madhla paisa gilayachaa he yancha kam.

    -Ajay

    ReplyDelete
  7. @घाटपांडेजी,
    साहेब राजकारणी नसते झाले तर ज्योतिषी किंवा जादुगार झाले असते. कृषीमंत्र्यांना न जमणारी कामे ज्योतिषांना जमतात असं त्यांना सुचवायचं असावं. बिचाऱ्यांचा होरा निवडणुकीत चुकला तेव्हापासून असं झालं असावं. त्या अर्थाने साहेब होराभूषण नाही तरी हाराभूषण झाले असते. :)
    @अनामिक,
    गेली दोन वर्षे माझा पगार तोच आहे. याकाळात बाकी सगळ्या गोष्टींचा भाव वाढलेला आहे. तीन महिन्यांपूर्वी साखरेचे भाव वाढणार नाही म्हणणारे पवार आता मात्र हात झटकून मोकळे होत आहेत. साखरेचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला असता तर राजू शेट्टी आणि अन्य नेत्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन झाले असते.
    @अजय,
    शेतकऱ्याच्या खऱ्या मुलाने उत्तर दिल्याने आणखी काही बोलण्याची गरज नाही. परस्पर उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete