Monday, January 11, 2010

फोलपटराव भावनादुखीग्रस्त

image

नमस्कार मित्रहो, ज्यांच्या दुखावलेल्या भावनांची वेदना सगळ्या महाराष्ट्रात आज ठसठसत आहे अशा कार्यकर्त्यांना आपण भेटणार आहोत. या कार्यकर्त्यांचे नाव महत्त्वाचे नाही, कारण काही वर्षांनी ते सगळ्यांना एक नेते म्हणून परिचित होणार आहेत. समाजाच्या संवेदनशीलतेचा वातकुक्कुट म्हणून त्यांची आता ख्याती पसरत आहे. त्यांच्याच तोंडून त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

प्रश्नः कार्यकर्ते साहेब, आम्हाला एक सांगा, तुमच्या भावना दुखावण्यासाठी नक्की कोणत्या प्रकारचे निमित्त लागते

कार्यकर्तेः आमच्या भावना या लाईटबल्बमधील तारेसारख्या असतात. त्या नाही का विजेच्या थोड्याशा चढउतारानेही विरघळतात. आमच्याही भावनांनाही थोड्याशा हालचालीने लगेच धक्का पोचतो. एखादा शब्द, वाक्य, लेख, कथा, कादंबरी, चित्रपट, व्हिडिओ...इतकंच काय कोणी काही बोललं नाही तरी आमच्या भावना दुखावतात. आमच्या शहरातील एका प्रसिद्ध गल्लीचे नाव चुकीच्या पद्धतीने छापले म्हणून आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. दोन महिने तो मुद्दा आम्ही लावून धरला आणि एका वर्तमानपत्राला माफी मागायला लावली.

सहा महिन्यांपूर्वी सगळ्या पेपरनी आमच्या विरोधात बातम्या छापल्या म्हणून आम्हाला राग आला. आता गेला महिनाभर एक अक्षरही छापून आलं नाही. मग आमचा तिळपापड होणार नाही तर काय? सध्या महाराष्ट्रात थंडी जास्त पडली असल्यामुळे भावना दुखावल्या आहेत की काय, याची वैद्यकीय तपासणी चालू आहे. त्या तपासणीचा अहवाल आल्यावर कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही थंडीमुळे दुखावलेल्या भावनांवर उपचार करण्याचा विचार करू.

प्रश्नः आम्हाला उत्सुकता आहे ते हे जाणून घ्यायची, की आपल्या भावना दुखावल्या आहेत हे नक्की कसं कळतं

कार्यकर्तेः त्याला नक्की असं ठोस उत्तर देता येणार नाही. खरं सांगायचं म्हणजे ज्याच्यामुळे आम्हाला त्रास होईल, असं काहीही वाचण्याची तसदी आम्ही घेत नाही. एवढं कशाला, आम्हाला अनुकूल असलेलं काही वाचण्याचेही काम आम्ही करत नाही. आमचे इतर माहितगार लोक असतात. त्यांच्या डोळ्यांखालून बरंच काही जात असतं. त्यातलं काही डोक्यात गेलं, की आम्हाला संकेत मिळतात. असे हात शिवशिवू लागले, की आता वेळ आल्याचे आम्हाला कळते. हा, काही बाबतींत मात्र आम्ही अगदी 'जाती'ने लक्ष घालतो. त्याला इलाज नाही. बऱ्याचदा काय होतं, की इतरांची जास्त विचारपूस होऊ लागली की आम्हालाही मैदानात उतरावं लागतं. एकुणात सांगायचं म्हणजे त्याचं खास असं लक्षण नाही.

गेल्या आठवड्यातीलच गोष्ट. आमच्या एका ज्येष्ठ सदस्यांच्या कुत्र्याला कोणीतरी 'हाड हाड' म्हटल्याने आमच्या संघटनेत तीव्र नाराजी पसरली. आता ते कुत्रं तर काय आम्हाला तोंडाने सांगू शकत नव्हतं. त्यामुळे दोन दिवस आम्हाला ती घटना कळालीच नाही. दोन दिवसांनी एका पोराने आम्हाला ती घटना सांगितली. त्या दिवशी आम्ही 'बोळ रोको' करून त्या घटनेचा निषेध केला. अशा काही आक्षेप घेण्यासारख्या गोष्टी आम्हाला उशिराने लक्षात येतात. त्याच्यावर आम्ही उशिराने आवाज उठवतो.

प्रश्नः तुमचा हा नाराजीचा ताप चढायची लक्षणे नसतील तर मग उतरण्याची तरी काय लक्षणे आहेत?

कार्यकर्तेः आमचं म्हणजे बघा वाळूसारखं आहे. गरम जितक्या चटकन होते तितकंच शांतही होतं. समजा काही वावगं झालं, की फटकन आम्ही निषेध नोंदवतो. त्यासाठी फार विचार करण्याची गरज नसते. तसंच आमच्या दुखावलेल्या भावनांवर मलमसुद्धा मुबलक मिळतो. चार पेपरनी बातम्या लावल्या, एखाद्याने फोटो छापला, कोणा चॅनलने बाईट घेतला की जे काय वाईट वाटलं असेल ते आम्ही रद्दबातल करतो. इतकं सोपं आहे ते. त्यात सरकारने दखल घेऊन आम्हाला बोलावले, तर दुखावलेल्या भावनांना अत्यानंदाचा मुलामा चढतो.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आमच्याकडे एका शाळेने सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सक्ती केली. आता पालिकेच्या शाळेने अशी सक्ती करणं बरं आहे का, तुम्हीच सांगा. मग आम्हीही घेऊन गेलो एक 'शिष्ट'मंडळ त्या शाळेवर. तुम्हाला सांगतो, त्याला एवढी प्रसिद्धी दिली सगळ्यांनी. नंतर महापौरांनीही सांगितलं, असं नाही करता येणार. लगेच पंधरा दिवसांनी आम्ही आमच्या मंडळातर्फे महापौरांचा सत्कार केला.

आमची काही दुश्मनी नाही हो कोणाशी. फक्त समाजाच्या भल्यासाठी आम्हाला करावं लागतं हे सगळं.

2 comments:

  1. हा..हा..हा..
    खर्या मुलाखतीत जरी हे सांगनार नाहीत तरी याचे कारणं ह्या पेक्षा वेगळे नसणार... :D

    ReplyDelete
  2. धन्यवाद आऩंद. अशी मुलाखत कोणी घेणारही नाही आणि हे लोक घेऊ देणारही नाही. विचारलाच एखादा वावगा प्रश्न तर यांच्या भावना तिथेच दुखावतलील.

    ReplyDelete