Thursday, February 18, 2010

फोलपटरावांचा लोकलप्रवास

डीडीच्या दुनियेत फोलपटराव त्या दिवशी अंमळ खुशीतच होते. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी घराबाहेर पाय ठेवला तेव्हाच त्यांना माहित होतं, की सरकारने आपले खरे कर्तव्य गांभीर्याने मनावर घेतले आहे. त्यामुळे शहराच्या रस्त्यारस्त्यावर चोख बंदोबस्त असून, एक नागरिक या नात्याने आज आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. सकाळी घरातून जसे निघालो तसेच वन पीस घरी परतणार आहोत. कुठे बाँबस्फोट होणार नाही का कुठे दंगल होणार नाही. रस्त्यावर फारसे पोलिस नसतीलच आणि जे असतील त्यांची जरब गुन्हेगारांवर असणार आहे. आपल्या पाकिटातील ऐवज कोणी चोरू नये म्हणून वाटा घेण्यासाठीच पोलिस उभे आहेत, असे लोकांनाही वाटणार नाही.

अशा रितीने गगनात मावत नसलेल्या आनंदाचा हवाई प्रवास थांबवून फोलपटरावांनी रेल्वे स्टेशनवर पाय ठेवला. त्यावेळी स्टेशनवर अगदी सगळं कसं शिस्तीत चाललं होतं. ऑटोरिक्षा वाट चुकल्यासारख्या रस्त्यात थांबल्या नव्हत्या, का मुसंडी मारणाऱ्या डुकरासारख्या टॅक्सी आवारात ठाण मांडून बसल्या नव्हत्या. आपले सांस्कृतिक संचित मांडून बसलेले भिकारी नव्हते, का उंदरावर झेप घेण्यासाठी सज्ज असलेल्या मांजरांसारखे ट्रॅव्हल एजंट उभे नव्हते. मुख्य म्हणजे फोलपटराव स्टेशनमध्ये शिरत असताना वाट कशी सगळी मोकळी होती. तिकीट काउंटरवर गटार तुंबल्यासारखी लोकांची रांग नव्हती का नाल्यात अडकलेल्या प्लॅस्टिकच्या थैल्यांसारखी कोणाची धक्काबुक्कीही नव्हती.

त्याच वेळेस फोलपटरावांना आपण घरातून फारसे पैसे न घेताच हवाई प्रवास केल्याचं लक्षात आलं. त्यांनी ताबडतोब एका टॅक्सीवाल्याला हात करून एटीएमचा रस्ता धरला. जवळचं भाडं असूनही टॅक्सीवाल्याने किंचितही कुरकुर न करता फोलपटरावांना अदबीने 'चला, साहेब' असं म्हटलं. माता-भगिनींचा उद्धार न करता टॅक्सीवाल्यानं त्यांच्याशी मातृभाषेतच संवाद साधल्याने फोलपटरावांना अगदी गदगदून आलं. त्यांना जवळपास हुंदकाच आला होता, पण त्यांनी तो खूप प्रयासाने आवरला. इतके दिवस मराठीत बोलण्याची उबळ त्यांनी जशी आवरली होती, तसाच त्यांनी हा हुंदकाही आवरला. एटीएममध्येही रांग नसल्याने त्यांनी लगेच पैसे काढले.

परत येऊन बघितले, तर तेव्हाही तिकीटबारीवर सामसूम होती. आज रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप आहे का, अशी शंकाही त्यांच्या मनाला चाटून गेली. मात्र आज आम आदमींचे राजे फोलपटरावच येणार म्हटल्यावर संपावर गेलेले कर्मचारीही खास कामावर रूजू झाले असते, हे त्यांना माहितच होतं. त्यामुळे त्यांनी काउंटरवर जाऊन शंभराची नोट सरकवली. पलिक़डच्या मराठी माणसाने (होय, तो मराठी होता आणि चक्क सुहास्य वदनाने उभा होता.) फोलपटरावांची नोट घेऊन त्यांना मुकाट्याने चिल्लर परत केले. त्याने त्याच्या नेहमीच्या शैलीत आयमायचा न काढता असे वर्तन करण्याचे कारण फोलपटरावांना माहित होते, ते म्हणजे त्यांच्यावर आयचा वरदहस्त होता.

कोणत्याही प्रकारची वाट न पाहता फोलपटरावांना सहज गाडी मिळाली. आता त्यांना कुठेही ऑफिसमध्ये जायचे नव्हते, दिसल त्या गाडीत त्यांना बसायचे होते त्यामुळे गाडीसाठी खोळंबा होण्याचा त्यांचा प्रश्नच नव्हता. वारूळात येरझारा घालणाऱ्या मुंग्यासारखे लोकं गाडीच्या डब्याला चिकटले नव्हते. त्यामुळे अगदी सावकाश आणि तब्येतीने फोलपटरावांनी डब्यात प्रवेश केला. कोणताही सव्यापसव्य त्यांना करावा लागला नाही का झटापटींमुळे त्यांना इजा झाली नाही. डब्यात असलेल्या इनमीन दहा पंधरा लोकांनी अगदी दोन्ही हात पसारून फोलपटारावांचे स्वागत केले. त्यातलं कोणीही गुजराती किंवा हिंदी बोलत नव्हतं. सगळे अगदी शुद्ध मराठी बोलत होते. त्यातल्या एकाने लगेच सरकून फोलपटरावांना खिडकीशी जागा करून दिली. पुढल्या दोन ते तीन मिनिटांत लोकलच्या खडखडाटासोबतच फोलपटराव आणि त्यांच्या सहप्रवाशांच्या गुजगोष्टी सुरू झाल्या. त्यातल्या काहिंनी तर फोलपटरावांना, “तुमच्यासारखे सामान्य लोक प्रवास करतात त्यामुळे या लोकलची शान आहे,” असंही सांगितलं. त्यामुळे फोलपटरावांना उगीचच अंगावर मुठभर मांस चढल्यासारखे झाले.

साधारण अर्धा तास प्रवास केल्यानंतर फोलपटरावांना त्या सुखावह प्रवासाचा कंटाळा आला. त्यांचा 'एक उनाड दिवस' पुरा झाला होता. एक चांगल्यापैकी स्टेशन बघून त्यांनी सहप्रवाशांचा निरोप घेतला आणि ते डब्यातून खाली उतरले. तिथे मात्र त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या धक्याला सामोरे जायचे होते. तिथे काही मंडळी कसलेतरी झेंडे घेऊन उभी होती. तो सगळा जमाव फोलपटरावांच्या दिशेने धावत आला आणि त्यांच्या गळ्यात एक जाडजूड हार घातला. सामान्य मध्यमवर्गीय असल्याने फोलपटरावांना हा सगळा प्रकार नवा होता.

भांबावलेल्या स्वरातच त्यांनी विचारले, “हे काय आहे?”

जमलेल्या मंडळींनी एका स्वरात उत्तर दिले, “आणखी एक दिवस कोणताही अपघात किंवा घातपात न होता लोकलचा सुरक्षित प्रवास केल्याबद्दल आम्ही तुमचा सत्कार करत आहोत.”

8 comments:

  1. धन्यवाद, अपर्णा आणि आनंद.

    ReplyDelete
  2. Bhannat liheele aahe. Maja aayaa!

    ReplyDelete
  3. धन्यवाद आदित्य आणि निरंजन. खूप दिवसांपासून ठसठसत होती गोष्ट.

    ReplyDelete
  4. जोरदार आहे.. एकदम झकास. सर्व संदर्भ,पात्र एकदम परफेक्ट. अगदी आवडले.

    ReplyDelete