Saturday, July 3, 2010

सरकारच्या आट्या-पाट्या-१

जागतिक अभिजात तमिळ भाषा संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी.
मराठी भाषेसाठी धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन समिती स्थापन केली आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून राज्यापुढील बहुतेक सगळ्या प्रश्नांची बा'समिती' खिचडी शिजत आहे. क्रीडा धोरण ठरविण्यासाठी राज्य सरकारने कालच चार वेगवेगळ्या समित्या नेमल्या आहेत आणि या चार समित्यांमध्ये समन्वय करण्यासाठी आणखी एक समिती नेमली आहे. आता या समित्या काय काम करणार आणि त्याची फलनिष्पत्ती काय होणार, हा वेगळाच प्रश्न आहे. याच दरम्यान, सत्ताधाऱ्यांना 'टाईमपास'साठी भाषेचा कसा उपयोग होतो, याची चुणूक तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी दाखवून दिली.

जून 23 ते 26 या कालावधीत कोईमुत्तुर किंवा कोवै(कोईम्बतुर) येथे ‘जागतिक अभिजात तमिळ भाषा संमेलन’ करुणानिधी यांनी भरविले. भरविले म्हणण्याचे कारण, या संमेलनाला नैमित्तिक कारण कुठलेही नव्हते. केवळ स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपायी करुणानिधी यांनी हा घाट घातला. जागतिक तमिळ संमेलन भरविण्याचे काम आंतरराष्ट्रीय तमिळ संशोधन संस्थेकडे आहे. याच संस्थेने आतापर्यंतची आठ संमेलने भरविली होती. संस्थेचे अध्यक्ष जपानमधील तमिळ विद्वान नोबोरू काराशिमा आहेत. तमिळनाडू सरकारला हे संमेलन अगदी त्वरीत भरवायचे होते. त्याला काराशिमा यांनी नकार दिला कारण तसे करणे अशक्यच होते. त्यावर उपाय म्हणून करुणानिधींनी अभिजात तमिळ संमेलनाच्या नावाखाली एक सोहळाच भरविला. त्यामागे या वयोवृद्ध नेत्याची एक अपुरी महत्त्वाकांक्षा होती.

तमिळनाडूच्या राजकारणात पाच दशके धुमाकूळ घालून किंवा या भाषेच्या नावाने स्वतःची कारकीर्द उभी करणाऱ्या करुणानिधींना एकदाही या संमेलनाचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली नाही. त्यांचं सध्याचं वय, ८६ वर्षे, पाहता पुढच्या संमेलनापर्यंत कळ काढण्याची त्यांची तयारी नाही. शिवाय जयललिता यांनी १९९५ मध्ये असे एक संमेलन भरवून, त्यात तेव्हाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना बोलावून, स्वतःची टिमकी वाजवून घेतली होती. स्वतःला लेखक, कवी आणि तमिळ संस्कृतीचे तारणहार समजणाऱ्या करुणानिधी यांच्या मनाला ही गोष्ट खात असल्यास नवल नाही. त्सुनामीच्या वेळेस प्रसिद्ध झालेला, कन्याकुमारी येथील १३३ फूट उंचीचा तिरुवळ्ळुवर यांचा पुतळा ही करूणानिधींचीच कामगिरी आहे. त्यांनीच तो बसवून घेतला आहे।

त्यामुळेच मिळतील तशी माणसे आणून, वर्तमानपत्रांत जाहिराती देऊन 'विद्वानां'ना आमंत्रित करून आजोबांनी मेळावा भरविला. या कार्यक्रमात द्रमुक (द्रविड मुन्नेट्ट्र कऴगम) किंवा सरकारची जाहिरात करू नका, असे कार्यकर्त्यांना आवाहन करून काय करायचे याची आखणी करून दिली. एवढेच नाही, तर अशा संस्थांची अडगळ नको म्हणून जागतिक तमिळ तोलकप्पियार अभिजात तमिळ संघम नावाच्या संस्थेचीही घोषणा करून टाकली. कार्यक्रमाला माणसं कमी पडू नयेत, यासाठी करुणानिधींनी राज्यातील सगळ्या शाळांना पाच दिवसांची सुट्टीही जाहीर करून टाकली. त्याला प्रत्युत्तर म्हणून राज्यात शाळा बंद, पण दारूची दुकाने मात्र उघडी अशा बातम्या जया टीव्हीने दाखविल्या.

इथे एक गोष्ट मात्र नमूद करावी लागेल, की राजकीय पक्षांचे काहीही धोरणे काहीही असली, तरी सर्वसामान्य तमिळ लोकांच्या दृष्टीने हा एक मोठा सोहळा ठरला. यानिमित्ताने वर्तमानपत्रांनी मोठ-मोठे लेख छापले. त्याबदल्यात सरकारकडून त्यांना पानभर रंगीत जाहिराती मिळाल्या. पाच दिवसांत या संमेलनाततमिळ भाषेबाबत ९१३ शोधनिबंध वाचण्यात आले. त्यातील १५३ परदेशी विद्वानांनी सादर केले होते, अशी माहिती स्वतः करुणानिधी यांनीच पत्रकारांना दिली. दररोज किमान पाच लाख लोकांनी या संमेलनाला भेट दिली. किमान चार लाख लोकांना प्रत्येकी ३०० रु. चे जेवणाचे पाकिट देण्यात आले. प्रादेशिक भाषा कोणाच्याही पोटा-पाण्याचा प्रश्न कसा सोडवू शकेल, या प्रश्नाला शोधलेले हे पाच दिवसांचे उत्तर होते! तमिळनाडू सरकारने ३०० कोटी रुपये या सोहळ्यावर खर्च केले, असा अंदाज आहे. यातील ६८ कोटी रु. आयोजनावर तर २४० कोटी रु. कोईमुत्तुरच्या मूलभूत सोयी-सुविधा वाढविण्यासाठी खर्च करण्यात आले.

तमिळ भाषेच्या नावाने करुणानिधी असा अश्वमेध यज्ञ करत असताना, जयाम्मा कशा मागे राहतील? या संमेलनाच्या सुरवातीलाच वकिलांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्य़ाचा आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला. चेन्नई उच्च न्यायालयातील नऊ वकीलांनी न्यायालयात तमिळमधून युक्तिवाद करण्याची परवानगी मिळावी, यासाठी या संमेलनाच्या आठ दिवस आधी उपोषण सुरू केले. अम्मांना ते चांगलेच कोलित मिळाले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना मोकळे सोडले. अखेर या वकीलांना परवानगी मिळाली आणि कुठलीही सुंठ न वापरता करुणानिधींचा खोकला गेला. जयाम्मा संमेल्नाला येण्याची सुतराम शक्यता नव्हतीच. त्यामुळे करुणानिधी अ‍ॅंड सन्स अ‍ॅंड डॉटर्स (अक्षरशः) मनमुराद वावरायला मोकळे झाले.

(क्रमशः)

4 comments:

  1. या सगळ्यात कितीही अतिरेक असला आणि कितीही राजकीय, वैयक्तिक फायदा आणि स्टंटबाजी असली तरी मला सगळ्यांत महत्वाचं वाटलेलं वाक्य/घटना म्हणजे " पाच दिवसांत या संमेलनाततमिळ भाषेबाबत ९१३ शोधनिबंध वाचण्यात आले. त्यातील १५३ परदेशी विद्वानांनी सादर केले होते, अशी माहिती स्वतः करुणानिधी यांनीच पत्रकारांना दिली." (अर्थात हे खरं असेल तर.) असा अतिरेक करून जर असं काही चांगलं (९१३ शोधनिबंध) घडत असेल तर तो स्वागतार्ह आणि कौतुकास्पदच आहे. याच्या १% अतिशयोक्ती दाखवून जरी मराठीसाठी महाराष्ट्रात काही केलं गेलं तर कुसुमाग्रजांचा आत्मा धान्य होईल.. !!!

    ReplyDelete
  2. खरं आहे हेरंब. त्यामुळंच कितीही भपका असला आणि स्वतःभोवती आरती ओवाळून घेण्याचा कितीही प्रयत्न करुणानिधींनी केला, तरीही तमिळ जनतेच्या दृष्टीने तो त्यांचा सोहळाच होता. असं महाराष्ट्रात कुठं होतं? उलट आपल्याकडे असा एखादा कार्यक्रम घ्यायचा झाला, तर राजकारण्यांना बोलवायचे की नाही, असे क्षुल्लक वाद घातले जातात.

    ReplyDelete
  3. कुणाच्या का कोंबड्यानं होईना उजाडणं महत्वाचं..पण आपल्याकडे उजाडूच देत नाहीत!

    ReplyDelete
  4. आपल्याकडे उजाडूही देत नाहीत आणि कोंबडंही मारून टाकतात. तमिळनाडू व कर्नाटकात सत्ताधारी भाषेच्या नावानं जागर करतात आणि आपल्याकडे सत्ताधाऱ्यांना भाषेचं सोयरसुतक नाही व विरोधकांचा गोंधळ संपता संपत नाही, असा हा गुंता आहे.

    ReplyDelete