Saturday, September 11, 2010

जनजागृतीचा उत्सव! –भाग 1

Ganesh Festival गणेशोत्सव "लोकमान्य टिळक आज असते, तर त्यांनी गणेशोत्सव बंद केला असता...," प्राध्यापक महाशय माझ्याशी तावातावाने त्यांच्या आवडत्या वाक्यावर आले होते. गायक जसा समेवर येतो किंवा एखादी बाई नवऱ्याबद्दल बोलताना ‘त्याला काही कळत नाही’ हे जसं आळवू-आळवून सांगते, तसं वरचं वाक्य आमच्या प्राध्यापक महाशयांचं त्यांच्यापुरतं चर्चेच्या निष्कर्षाला आल्याचं लक्षण आहे. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात बेडकांचं वर्षागान सुरू होतं. जुलैच्या मध्याला शहरातील भूमिगत गटारे भूतलाला आच्छादून वाहू लागतात. ऑगस्टमध्ये निसर्गात ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो आणि श्रावणानिमित्त बाजारात उपावासाच्या पदार्थांची आवक वाढते. या बाबींचा नैसर्गिक क्रम जेवढा ठरलेला, तेवढाच पोळ्याच्या जवळपास प्राध्यापकांचा गणेशोत्सवाच्या नावाने खडे फोडण्याचा कार्यक्रमही ओघाने येतो. त्यात एखाद दिवस इकडेतिकडे होईल...पण तो कार्यक्रम कधी रद्द झाल्याचं ऐकीवात नाही.

गणेशोत्सव 1893 पासून महाराष्ट्रात जनजागृतीचे काम करतो. त्यावेळी इंग्रजी राजवटीच्या विरोधात त्याने लोकांना जागे केले. आता गणेशोत्सव जवळ आला की वर्षभर शीतनिद्रा घेणारे समाजचिंतक जागे होतात. मग अत्यंत कळकळीची वर्तमानपत्रं जाहिराती लावून उरलेल्या जागेत, 'गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप' किंवा 'उत्सव हवा, उच्छाद नको' अशा छापाचे लेख बसवितात. त्यामुळंच यंदाही प्राध्यापक महाशय येऊन त्यांची वार्षिक चिंता व्यक्त करू लागले, त्याचं आश्यर्य वाटण्याचा प्रश्नच नव्हता. आता त्यांनी उत्सवाच्या नावाने कंठशोष केलाच होता, तेव्हा त्यांना चहा पाजणं क्रमप्राप्तच होतं. तो वाफाळलेला द्रवपदार्थ घशाखाली गेला, तसा प्राध्यापकांचा पाराही खाली आला. त्यांच्या सगळ्या रणभेरी आधीच वाजून झाल्या होत्या. निकराचा प्रयत्न म्हणून त्यांनी आपले ठेवणीतले वाक्य काढले...तेच ते वर लिहीलेलं. हे वाक्य जसं त्यांनी पहिल्यांदा उच्चारलं नव्हतं, तसंच मीही पहिल्यांदा ऐकलं नव्हतं.

“नसता बंद केला लोकमान्यांनी...” प्राध्यापकांना हे वाक्य ऐकून एकदम 2400 वॅटची डॉल्बीची भिंत त्यांच्या खिडकीशी वाजावी, असा झटका बसला असावा.

"कशावरून?” त्यांनी प्रश्न टाकला.

“कारण लोकमान्य प्रयत्नवादी होते. त्यांच्या काळातही टगेपणा करणारी मंडळी कमी नव्हती किंवा वाया जाणारी युवाशक्तीही कमी नव्हती. पण त्यांनी त्या शक्तीचा उपमर्द न करता त्यांना गणेशोत्सवात आणले. मूळ पुंडपणा करणारे चापेकर बंधू हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे उत्सवाच्या स्वरूपाला नावे ठेवण्यापेक्षा त्यांनी त्यातून काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न केला असता. एवढा मोठा उर्जेचा साठा शंभर वर्षांपासून समाजात उपलब्ध असताना, त्याला नाक मुरडत दिवस काढणाऱ्या संभावितांना ते जमलेले नाही. पण म्हणून लोकमान्यांना त्यासाठी जबाबदार धरणे किंवा ते तुमच्यासारखे वागले असते, हे पटत नाही,” मी म्हणालो.

“हा उर्जेचा स्रोत?” प्राध्यापक महाशय वीज सळसळावी तसे उसळून बोलू लागले. “अहो, बेबंदपणा आहे सगळा. स्वैराचार आहे. ही पोरं दारू पितात, जुगार खेळतात. वर्गणीची खंडणी केलीय. मुळात करायचाय काय उत्सव. आता स्वातंत्र्य मिळालंय. प्रबोधन करायला शाळा आहेत. मग गणपती कशाला पाहिजे?”

“अहो, ती दारू पितात, जुगार खेळतात म्हणजे काय? त्यांना रोखणारे कोणी नाही म्हणूनच ना? ज्यांना आपण समाजातील सचोटी सांभाळू शकतो, असे वाटते त्यांनी मंडळात जाऊन असं गैरकृत्य करणाऱ्यांना जाब विचारावा. त्यांना थांबवावे. तळं राखील तो पाणी चाखीलच ना. तुम्हाला आपल्या वन/टू बीएचकेतून बाहेर पडायचं नाही. जे आपल्या झोपडीतून बाहेर पडतायत त्यांना वाट दाखविणारं कोणी नाहीय. तरीही काही ठिकाणी चांगली कामे होतच आहेत. राहिला प्रबोधनाचा प्रश्न. ज्या राज्यात इतिहासातील चित्रे लागली म्हणून दंगली होतात, पुतळे हालविण्यासाठी धुमश्चक्रीसारखी परिस्थिती निर्माण होते त्या राज्यात तरी प्रबोधनासाठी वाव नाही, हे मला मान्य नाही.”

“वर्गणीची खंडणी...तिचं काय?”

“असं आहे, प्रत्येक धर्मात किंवा संस्कृतीत व्यक्तीने समाजासाठी वाटा उटलण्याची संकल्पना आहे. शीख पंथात आपल्या वार्षिक उत्पन्नाचा 10 टक्के वाटा प्रत्येक व्यक्ती गुरुद्वाराला अर्पण करतो. मुस्लिम लोक 2.5 टक्के जकात देतात. फक्त हिंदु लोकंच याबाबतीत स्वार्थी आहेत. त्यामुळंच दररोज जिथे भ्रष्टाचाराच्या कथा बाहेर पडतात, त्या शिर्डीत वा तिरुपतीत धनांचे हंडे रिकामे होतात, अन् सामाजिक काम करणाऱ्या अनेक संस्थांना-मग त्या धार्मिक का असेनात-दारोदार अपमान सहन करत फिरावे लागते. एखादं मंडळ किंवा संस्था चांगलं काम करतेय, म्हणून तुम्ही स्वतः जाऊन वर्गणी दिलीय का कधी? अशा परिस्थितीत कोणी सार्वजनिक कामासाठी रक्कम मागत असेल, तेही वर्षातून एकदा तर ते देण्यात काय वाईट आहे. आता एकदाची पैसे देऊन कटकट मिटवू असा 'व्यापारी' विचार केला, तर मग लोकंही सारखी पैसे मागायला येणारच. कारण 'अजापुत्रं बलिं दद्यात्!'

"वास्तविक मोठी रक्कम देण्याऐवजी जर लोकांनी सांगितलं, की आम्ही थोडीशी रक्कम देऊ पण मंडळाच्या कामात सहभागी होऊ, तर वर्गणी खंडणी होणार नाही. उलट ती लोकं तुमच्याकडे येणंच बंद होईल. कारण तुमच्यासारखे सच्छील लोकं त्यांना नकोच आहेत. पण वर्गणी घेणाऱ्यांनाही माहीत असतं, की लोकांना पैसे देऊन मोकळं व्हायचंय. कटकट नको म्हणून कितीही आणि कितीदाही पैसे देण्याची लोकांची तयारी आहे. मग ते वारंवार येणारच. आधी दहीहंडी, मग गणेशोत्सव, नंतर नवरात्र...अहो सर, जिथे लोकं आपल्या हिसकावेल्या घरांसाठी पुढे येण्यास तयार नाहीत, तिथे किरकोळ वर्गणीसाठी भांडणं कोण विकत घेणार. मग अशा पुळचट लोकांकडून 'जबरा' वर्गणी घेतली नाही, तर त्या कार्यकर्त्यांना वेड्यात काढणार नाहीत का?”


टीपः सदरच्या लेखातील प्राध्यापक ही वास्तवातील व्यक्ती असून, त्यांच्याशी वेळोवेळी झालेल्या संवादावरच हा लेख आधारलेला आहे.

4 comments:

  1. शीख पंथात आपल्या वार्षिक उत्पन्नाचा 10 टक्के वाटा प्रत्येक व्यक्ती गुरुद्वाराला अर्पण करतो. मुस्लिम लोक 2.5 टक्के जकात देतात. हे १०१% खरे आहे. शीख फक्त देणग्या देवूनच थांबत नाही तर गुरुद्वारा मध्ये जावून कारसेवा करतात. तेथे लंगर मध्ये काम करण्या पासून भाविकांच्या चप्पल सांभाळणे , गुरुद्वारा स्वच्छ करणे इत्यादी कामे स्वखुषीने करतात. या उलट हिंदूंची मंदिरे भोपी, बडवे , पुजारी आणि आता ट्रस्ट मध्यमा द्वारे राजकारण्यांच्या विळाख्यात अडकली आहेत. मंदिराची घाण अवस्था पाहून तेथे जावू वाटत नाही. गेले तर देवा पेक्षा लक्ष चप्पलांच कडे जास्त ठेवावे लागते

    ReplyDelete
  2. खरे आहे ठणठणपाळजी. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर विवेचन केलंय तुम्ही!
    माझे स्वतःचे सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दलचे अनेक गैरसमज दूर झालेत!
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  4. धन्यवाद, विद्याधऱ. वास्तविक ही मते कोणाला पटण्यासारखी नाहीत. परंतु, उठल्यासुटल्या ज्याप्रमाणे कोणीही गणेशोत्सवाला नावे ठेवतो, तितका तो वाईट नाही, असं माझं ठाम मत आहे.

    ReplyDelete