Tuesday, December 28, 2010

एक दिवस दादोजीचा

सोमवार. २७ डिसेंबर. सुरेश कलमाडीच्या घरांवरील छापे आणि काँग्रेस जनांच्या धास्तावलेल्या मनाचा धांडोळा घेऊन शकलेलो. त्यातच सकाळी उठून पहिली बातमी पाहायला मिळाली, ती दादोजी कोंडदेवांचा पुतळा लाल महालातून हलविल्याची. आता आली का पंचाईत. आजचा दिवस गडबडीचा जाणार ही खूणगाठ मनाशी बाळगली होतीच.

दुपारी बारा वाजता पांडुरंग बलकवडे यांची पत्रकार परिषद होणार होती. पानिपत रणसंग्रामाला २५० वर्षे पूर्ण होत आल्याबद्दल पुण्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यांची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद होती. तिथेच गाठून त्यांना या विषयावर बोलण्याचे ठरविले. बलकवडेजींनी दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी होण्याआधीच पालिकेने पुतळा हलविला. त्याबद्दल त्यांना बोलणार होतो. मात्र तिथे गेल्यावर कळाले, बलकवडेजी सुनावणीसाठी न्यायालयात गेले होते. त्यामुळे फुकट चक्कर झाली.

तिकडून मोर्चा वळविला लाल महालाकडे. शिवसेना-भाजपचा मोर्चा तिथून पालिकेवर जाणार होता. त्यामुळे एका सहकाऱ्यासोबत तिथे गेलो. लाल महालाच्या बाजूला जमा झालेली माणसे पाहून शिवसेना परत तोंडघशी पडणार की काय, अशी चिंता उत्पन्न झाली. मात्र थोड्याच वेळात गर्दी वाढू लागली आणि पक्षाची इज्जत कायम राहणार, याची खात्री झाली. तिथेच एक-दोन नेत्यांचे बोलणे कानावर पडले. राजदंड पळवू, पुढे जाऊ अशी वाक्ये ऐकली. दुपारच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेची तिथे पायाभरणी चालू असल्याचे ताडायला वेळ लागला नाही.

आज जीबी (पालिकेच्या बैठकीत) राडा होणार, मी सहकाऱ्याला म्हणालो. त्याला काही ते खरे वाटले नाही. लाल महालाच्या मागे १५०-२०० लोक जमल्यावर सहकारी तिथेच थांबला आणि दुसऱ्या एका बातमीसाठी डेक्कन कॉलेजला गेलो.

सुमारे दोन तास डेक्कन कॉलेजात घालविल्यानंतर कार्यालयात परतलो त्यावेळी पालिकेतील हस्तकलेची दृश्ये वाहिन्यांवर ओसंडून वाहत होती. सकाळचा अंदाज खरा ठरला होता. आता सगळ्या पक्षांच्या नेत्यांची रसवंती ओसंडून वाहणार होती.

शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. तशीच या घडामोडींवर अंतर्गत चर्चेला सुरुवात झाली.

मुद्दा क्र. १ – तीन वर्षांमध्ये राष्ट्रवादीने पुण्यात काहीही काम केले नाही. कलमाडींच्या ताब्यात पालिका असताना विकास चालू असण्याचा भास तरी असायचा. २००७ पासून मात्र तेही नाही. अलिकडच्या काळात तर पुण्याचे नाव जमीन गैरव्यवहारांच्या संदर्भातच गाजते आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बहुतेक नेत्यांचा पुण्यातील मोकळ्या जमिनींवर डोळा आहे, हे उघड गुपित आहे. त्यामुळे वर्षभरावर आलेल्या पालिका निवडणुकांसाठी मतांची झोळी भरण्यासाठी राष्ट्रवादीला अशा भाकड मुद्यांची गरज भासते आहे. शिवाय लवासा, कांदा किंवा भाज्यांची भाववाढ, शेतकरी आत्महत्या, आयपीएलचा गैरव्यवहार अशा कुठल्याही प्रसंगात `जाणता राजा` संकटात आला, की दादोजींचे भूत महाराष्ट्राच्या राजकारणात थैमान घालू लागते.

मुद्दा क्र. २ - या घटनेमुळे शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर राष्ट्रवादीला मोठी चपराक बसेल. थोड्याच वेळाने ही शक्यता खरी ठरली कारण शिवसेनेच्या बंदला सक्रिय पाठिंबा देण्याचे मनसेने जाहीर केले. ज्या दादोजींच्या मार्गदर्शनामुळे तमाम मराठ्यांना एकत्र करण्याची कामगिरी शिवरायांनी केली, त्याच दादोजींमुळे अखेर ३५० वर्षांनंतर उद्धव आणि राज यांची दुफळी सांधली गेली.

मुद्दा क्र. ३ – राष्ट्रवादी किंवा कुठल्याही पक्षाला आपण अजून आहोत, हा संदेश पोचविण्यासाठी शिवसेनेला अत्यंत हुकुमी मुद्दा मिळाला. राष्ट्रवादीने तोंडात पेढा भरावा तसा हा मुद्दा सेनेच्या झोळीत टाकला. आता राष्ट्रवादीला चिंता शिवसेनेची नसणार आहे. सेना आणि मनसे यांच्या स्पर्धेत अधिकाधिक आक्रमक होण्याची दोन्ही पक्षांमध्ये चुरस लागल्यास काय होणार आणि त्याचा पक्षाला फटका कसा बसणार, ही राष्ट्रवादीची खरी डोकेदुखी असणार आहे.

मुद्दा क्र. ४ – या सर्व गोंधळात काँग्रेसच्या कुठल्याही नगरसेवकाने आपला वाटा उचलला नाही. कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत नाना आघाड्यांवर जेरीस आलेल्या पक्षाच्या हा गोंधळ पथ्यावरच पडणार आहे. कारण आता दादोजी व मराठा-ब्राह्मण मुद्यांवर चर्चा चालत असताना कलमाडींबद्दल कोण बोलणार? शिवाय तोंडदेखला निषेध करण्यासाठी बैठका किंवा पत्रके काढण्यासही पक्षाची तालेवार मंडळी मोकळी आहेतच. प्रत्यक्ष गोंधळात सहभागी न होता त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार.

मुद्दा क्र. ५ - सेना-भाजप आणि काही प्रमाणात मनसेच्या सदस्यांनी पालिकेत केलेली हाणामारी आणि तोडफोड चुकीची होती, असे मत काही जणांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीशी 'रेशीमनाती' जपणाऱ्या वर्तमानपत्रांनी तर गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना राष्ट्रवादीच्या सदस्यांनी रोखल्याचीही माहिती दिली आहे. खुर्ची तोडणाऱ्या विकास मठकरींना ठोसा लगावताना सुदैवाने अनिल भोसलेंची प्रतिमा कॅमेराबद्ध झाल्याने लोकांना याचि देही याचि डोळा वास्तव काय आहे, ते कळाले. न्यायालयात खटला दाखल असताना आणि सकाळी साडे दहा वाजता सुनावणी असताना रात्री अडीच वाचता पालिका हडेलहप्पी करते. बरे, हा खटला कोणा राजकीय पक्षाने नव्हे तर एका इतिहास संशोधकाने दाखल केलेला. लोकशाही आंदोलनांना प्रशासन धूप घालत नाही. न्यायालयात न्याय मिळण्याची शक्यता नाही. सनदशीर मार्गाची अशी वासलात लागत असेल, तर हडेलहप्पी हा एकमेव उपाय उरतो. अशा परिस्थितीत विरोधी पक्षांकडे चोखाळण्याजोगा कोणता मार्ग राहिल?

2 comments:

  1. अतिशय हतबल करणारी सगळी परिस्थिती आहे..अन तुमच्यासारख्या पत्रकाराच्या नजरेतून पाहताना तर प्रचंड विषण्ण व्हायला होतं! :(
    बाकी >>ज्या दादोजींच्या मार्गदर्शनामुळे तमाम मराठ्यांना एकत्र करण्याची कामगिरी शिवरायांनी केली, त्याच दादोजींमुळे अखेर ३५० वर्षांनंतर उद्धव आणि राज यांची दुफळी सांधली गेली.
    हे मात्र खरं!

    ReplyDelete
  2. खरं आहे विश्वनाथ. माणसं इतिहास वाचतात पण इतिहासातून काही शिकत नाहीत. हाच या सगळ्या घडामोडींचा अर्थ.

    ReplyDelete