Tuesday, August 16, 2011

दादागिरी चालते, भाईगिरी चालते मग अण्णागिरी का नाही?

          १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनापेक्षाही अधिक उत्सुकता असलेले अण्णा हजारेंचे आंदोलन अखेर आज सुरू झाले आणि तुरुंगात त्यांची रवानगी होण्यात त्याची परिणतीही झाली. गोचिडांनी कातावलेल्या कुत्र्याने स्वतःभोवती गिरक्या घ्याव्यात त्याप्रमाणे अण्णांच्या आंदोलनाने भांबावलेल्या काँग्रेस सरकारने अत्यंत हडेलहप्पी करून अण्णांना अटक केली. अण्णांच्या आंदोलनाला बाबा रामदेव यांच्या फसलेल्या आंदोलनाचे स्वरूप देण्याची मंशा काँग्रेस नेत्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. मात्र बाबा रामदेव यांच्या नौटंकीवजा उपोषणापेक्षा अण्णांच्या उपोषणात नैतिकतेची धार कितीतरी अधिक होती व आहे. याचा अंदाज काँग्रेसच्या स्वयंमन्य नेत्यांना, ज्यांना इतरांना जिंकविण्याचे तर सोडाच पण स्वतःलाही जिंकणे जमणार नाही अशा नेत्यांना, हे समजण्याची शक्ती नाही. याच नेत्यांनी संसद ही लोकांनी निवडून दिलेली असल्याने ती अधिक पवित्र असल्याचा धोशा लावावा, ही अगदीच विसंगती होय.

            अण्णांच्या आंदोलनाला असलेली विद्यार्थ्यांची साथ ही गेल्या कित्येक दशकांतील अभूतपूर्व अशी घटना होय. गुजरात किंवा बिहारमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या कथा-कहाण्या वाचलेल्या आमच्यासारख्यांना या गोष्टीचे अप्रूप वाटावे, यात नवल काय. फक्त ही साथ केवळ बोलघेवडेपणापुरती राहण्याचा धोका अधिक आहे आणि शेवटपर्यंतची लढाई अण्णांना एकट्याने लढावी लागेल, ही भीती मी आधीपासून व्यक्त करत आहे. सकाळी अण्णांना अटक झाल्यानंतर देशभरात उमटलेल्या प्रतिक्रिया समाधान देणाऱ्या आणि उत्साह वाढविणाऱ्या असल्या, तरी त्यांतील जोर किती दिवस टिकेल, हा खरा कळीचा प्रश्न आहे.

           अण्णांना तिहारमध्ये पाठवून वेगळ्या खोलीत ठेवल्याचे वृत्त आता आले आहे. ज्या तुरुंगात सुरेश कलमाडी, ए. राजा व कनिमोळी यांसारखे भ्रष्टाचाराच्या माळेतील मणी राहत आहेत, त्याच तुरुंगात भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात रान उठविणारे अण्णा हजारे राहावेत, हे या देशाच्या न्यायव्यवस्थेचे क्रूर चित्र आहे. केवळ अण्णांच्या आंदोलनातून लोकक्षोभ होईल, म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करणाऱ्या सरकारने माध्यम आणि जनतेच्या भावना लक्षात न घेता, त्यांनी वेळोवेळी दिलेल्या इशाऱ्यांकडे कानाडोळा करून कलमाडी व राजांसारख्यांना मोकळे रान दिले.  इकडे महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे दादा लोक सुखैनेव फिरत आहेत. सरकारला दादागिरी चालते, भाईगिरी चालते पण लोकहीताच्या दृष्टीने उपास करणाऱ्यांची अण्णागिरी चालत नाही. ती का, हा खरा प्रश्न आहे आणि या आंदोलनातून त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, तर या सगळ्या घडामोडींचे चीज झाले असे म्हणता येईल.

1 comment:

  1. आज रोने से चील्लाने रास्ते पर धरना धरने से कुछ नही होगा. हमने गये ६५ साल में मतदान करते वक्त जो पाप कीया उसका ही यह फल है. आपने-हमने भ्रष्ट्र तरीका अपनाते हुवे मतदान कीया, फिर किस मुह से हम भ्रष्ट्राचार के खिलाफ आवाज उठायेगे. कभी धर्म मजहब के नाम कभी जात-पात देखकर कभी पैसा लेकर, कभी नेता पर अंध विश्वास रखकर, कभी एक शराब की बाटल तो कभी शबाब बदले में तो कभी भाषावाद के आड़ में , कभी तो कीसी गल्ली में मंदिर बनवाने के बदले तो कभी कंही मस्जिद बनवाने के बदले तो कभी यात्रा के बदले सौदा करते हुवे गलत आदमी को चुन के देते है. . हमने विष बोया उसे अमृत लगे ये अपेक्षा करना ही गलत है. हम गुलाम थे हम आझादी में रहने के लायक नही और भविष्य में गुलाम ही रहने के लायक है.
    http://thanthanpal.blogspot.com/2011/08/blog-post_16.html#more

    ReplyDelete