Monday, November 5, 2012

चिखलातील कमळ

g5343

कमळ ज्या प्रमाणे चिखलात जन्मते आणि वाढते, त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या कमळातून केवळ चिखलच बाहेर पडणार आहे की काय न कळे. पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी भोपाळमध्ये जी मुक्ताफळे उधळली, त्यामुळे परवा मुंबई आणि नागपूरच्या विमानतळावर त्यांचा जयजयकार करणाऱ्यांमध्ये आज हाहाकार माजला असेल, यात शंका नाही. नागपूरचे प्रतिनिधित्व करणारे, संघाच्या मुशीत तयार झालेले गडकरी अशा प्रकारे आपली अक्कल पाजळतील याची शंकाही कोणाला कालपर्यंत आली नसती. आता भलेही आपलीच वक्तव्ये फिरविण्याची कसरत गडकरी करत असले, तरी या वक्तव्याने त्यांनी आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेतला आहे. एरवी पूर्तीच्या घोटाळ्यांची चौकशी मॅनेज करता आली असती. "चार चौकशा ते आमची करतात, चार चौकशा आमच्या राज्यांत आम्ही त्यांच्या करतो. फारसं मनावर घ्यायचं कारण नाही," असं म्हणून त्यांना सुटता आले असते.

जिन्नाबाबत वक्तव्ये करणारे अडवाणी काय किंवा जसवंतसिंह काय, भाजपमध्ये बेफाट बोलणाऱ्यांची कमी नाही. आता गडकरींनी थेट स्वामी विवेकानंदांना वेठीस धरल्यामुळे पक्षाची उरलीसुरली अब्रू गेली आहे. सत्ता असो वा नसो, भाजपचे नेत ज्याप्रमाणे तोंड चालवतात, त्यावरून संघाच्या प्रशिक्षणात काही मुलभूत त्रुटी आहे की काय, असं वाटण्याजोगी परिस्थिती आली आहे.

स्व. माधवराव शिंदे यांनी भाजपचे वर्णन एकदा, "भागो जनता पकडेगी" असे केले होते. आता हे जर स्वामी विवेकानंद आणि दाऊदची तुलना करत असतील, तर लोकं खरोखरच यांना पकडून मारू लागले, तर त्यात नवल नाही.

1 comment:

  1. पार्टी विथ डिफरन्स म्हणत नाकाने साधनसुचीतेचे कांदे सोलणाऱ्या भाजपात आणि स्वातंत्र्य लढाईच्या पुण्याईच्या कथित सहभागाचे भांडवल करत जनतेला लुबाडणाऱ्या भ्रष्ट्राचाराच्या, बेईमानी च्या दलदलीत आकंठ बुडालेल्या सोनिया, पवार कॉंग्रेस यांच्यात फरक शोधून ही सापडणार नाही . हे येड्डा अप्पा ते नितीन गडकरी यांच्या भ्रष्ट्र धंद्या मुळे स्पष्ट झाले. केजरीवाला यांनी यांचे भांडे फोडताच यांची कुजबुज गैंग सक्रीय झाली आणि गडकरी कसे स्वच्छ चारित्र्याचे आहेत याचा गाजावाजा सुरु झाला..... हिटलरच्या गोबेल्स याला लाज वाटणारी अशी ही यांची खोटा प्रचार करणारी यंत्रणा .......पण कांही फायदा झाला नाही ....गडकरी अडचणीत आले ते आले .....

    ReplyDelete