Friday, August 23, 2013

कळपावेगळा विवेकवादी

पाच वर्षांपूर्वी 'टाईम्स'मध्ये नुकताच लागलो होतो, त्यावेळी पहिल्यांदा मला नरेंद्र दाभोलकर यांच्या एका कार्यक्रमाला जाण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी मी अनिच्छेनेच गेलो होतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल मला थोडीफार माहिती होतीच त्यात डॉ. दाभोलकर 'साधना'चे संपादक असल्याचे आणि ते नियतकालिक समाजवाद्यांचे मुखपत्र असल्याचेही मला माहीत होते. समाजवाद्यांबद्दल एकूणच मनात अढी असल्यामुळे अंनिसशी माझ्यासारख्या सश्रद्ध माणसाचे कसे काय जमणार, हा प्रश्न होता. तो कार्यक्रम होता शैक्षणिक अभ्यासक्रमात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याच्या हक्कांची सनद प्रसिद्ध करण्याचा किंवा त्याप्रकारचा कसला तरी. डॉ. रावसाहेब कसबे हे त्या कार्यक्रमात होते, हे आठवते. तो कार्यक्रम सुरू झाला आणि सर्वात आधी मला कशाने आकर्षित केले असेल तर ते म्हणजे डॉ. दाभोलकरांची भाषा. काहीशा अनुनासिक अशा उच्चारांमध्ये बोलायला लागले, की त्यात एक नाद असायचा आणि तो नाद कानात साठवून ठेवण्याजोगा असायचा.

त्यानंतर प्रसंगोपात डॉ. दाभोलकरांशी बोलण्याचा अनेकदा प्रसंग आला आणि जाणवली ती त्यांच्यातली प्रामाणिकता. समाजवादी कंपूत वावरूनही त्यातील दांभिकतेचा स्पर्शही डॉ. दाभोलकरांना झालेला नव्हता, हे जाणवू लागले. मंचावर त्या नादमय शब्दांमध्ये ते बोलायचे, तोच ओघ अनौपचारिक संवादातही असायचा. त्यात कधीही कटुता किंवा नैराश्य आल्याचे एवढ्यांदा त्यांच्याशी बोलल्यानंतरही जाणवले नाही. बोलताना रामदास आणि तुकाराम यांसारख्या संतांची वचने किंवा स्वा. सावरकरांची विधाने वापरून आपण कळपावेगळा असल्याची जाणीव ते करून देत. मात्र त्यात कोणताही प्रयत्न किंवा अभिनिवेश नसे. कितीही आडवे किंवा अडचणीचे प्रश्न विचारले, तरी त्यांचा तोल ढळाल्याचे कधी पाहण्यात आले नाही. खासगी बोलायचे असेल तर इतरांच्या नावाने सरळ शिवीगाळ करणारे समाजवादी सोंगं पाहिलेल्या माझ्यासारख्याला याचे कौतुक न वाटले तर नवल. एखाद्या वेळी फोन केला तर पलीकडून ते म्हणत, "आता कार्यक्रमात आहे, दहा मिनिटांनी करा," आणि खरोखरच थोड्या वेळाने फोन केला तर उचलत आणि बोलतही.

डॉ. श्रीराम लागू आणि डॉ. दाभोलकरांचा एक संवादात्मक कार्यक्रम होत असे. त्यात दोघेही ईश्वर, धर्म आणि श्रद्धा व अंधश्रद्धाविषयक मांडणी करत असत. डॉ. लागूंची ईश्वराला रिटायर करण्याची भूमिका सर्वश्रुत होती. मात्र डॉ. दाभोलकर ईश्वराला पूर्णपणे न नाकारता, त्याच्या नावाने अकर्मण्यतेचा अंगिकार करण्याच्या विरोधात भूमिका मांडत असत. "संकटकाळी किंवा कृतज्ञता म्हणून एखाद्याला ईश्वराला शरण जावे वाटत असेल, तर त्याला आमची ना नाही," ही त्यांची भूमिका स्वीकारार्ह आणि सुखावह होती. मात्र म्हणून त्यांच्या सर्व भूमिका पटण्यासारख्या होत्या, असेही नाही. तरीही डॉ. दाभोलकरांबद्दल आदर वाटायचे कारण म्हणजे, हा माणूस सच्चा असल्याची जाणीव होती. सामाजिक चळवळींमधील आक्रस्ताळेपणा आणि एकांगीपणा यांपासून कोसो दूर असलेली ही व्यक्ती होती.
एरवी डॉ. दाभोलकर आयुष्यभर भोंदूगिरीच्या विरोधात लढले तरी त्यांच्याच समाजवादी गोतावळ्यात अनेकांनी स्वतःचे मठ काढून भोंदूगिरी सुरू केली. त्यातील काही तसबिरींशी बोलतो, बैलांशी बोलतो म्हणून वैचारिक छा-छूगिरी करतात आणि ते लोकांना दाखविण्यात काहींना 'वेगळे'ही वाटत नाही. मात्र डॉ. दाभोलकरांनी कटाक्षाने अशा बाबींपासून स्वतःला वेगळे ठेवले. 'साधना'चे संपादक म्हणूनही त्या नियतकालिकाला जनमानसात व्यापक स्थान देण्यात त्यांना चांगलेच यश आले. इतकेच नव्हे, तर एस. एम. जोशी हॉलसारखे सभागृह करून व्यवहार आणि तत्त्वांची त्यांनी सुरेख सांगड घातली होती.

अशा या माणसाला कोणी मारले, हा खरा प्रश्न आहे. याच्या दोनच शक्यता आहेत. एक तर सनातन सारख्या संस्थेतील कोणी माथेफिरू किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खेळी. राजू परूळेकरांसारख्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच शरसंधान केले आहेगेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे महाराष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात मुस्लिम युवक कसे निर्दोष असतात आणि हिंदूही कसे दहशतवादी असू शकतात, याचे गळाभरून वर्णन केले होते. आता डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा पहिला संशय हिंदू संघटनांवरच आला आहे. नव्हे, काही माजी साथींनी तर ट्विटरवरून त्यांना दोषी ठरवून समाजवादी संसारही मांडला आहे.

डॉ. दाभोलकरांना सनातन सारख्या संस्थेने मारले असेल, तर आस्तिक म्हणवून घेण्याची त्यांची लायकी नाही. आस्तिक किंवा नास्तिक कोणाही माणसाला मनुष्याला मारण्याची परवानगीच नाही. कारण आस्तिकाच्या दृष्टीने ईश्वर जगाचा शास्ता असल्यामुळे कोणत्याही मनुष्याच्या जन्म-मरणाचा फैसला हा त्यानेच करायचा असते. नास्तिकाच्या दृष्टीने ईश्वर वगैरे काही नसल्यामुळे या जगात जबाबदारीने वागण्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असल्याने त्यालाही असे जघन्य कृत्य करता येत नाही. त्यामुळे कोणत्याही दृष्टीने ही हत्या अत्यंत निषेधार्ह आहे.

अंधश्रद्धा विरोधी कायदा हा केवळ एक भाग झाला. डॉ. दाभोलकरांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक चांगल्या मोहिमा राबविल्या होत्या. गणेश मूर्त्यांचे हौदात विसर्जन करणे, दिवाळीच्या फटाक्यांवर खर्च करण्याऐवजी ती रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे व राज्यातील सर्पमित्रांना एकत्र करून सापाच्या विषासाठी सहकारी संस्था काढणे, अशा अनेक योजना ते राबवत. मात्र त्यापेक्षाही आंतरजातीय विवाहासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. एक परिषद पुण्यातही आयोजित केली होती. जात पंचायतीची प्रकरणे पुढे यायला लागण्याच्या एक वर्ष आधी हे उपक्रम चालू केले होते. आता त्यांचे भवितव्य अंधातरीच असेल, असे सध्यातरी वाटत आहे.

या प्रकरणाचा तपास लागेल आणि दोषींवर कारवाई होईल, याबाबत मला फारशी आशा नाही. वास्तविक सध्याची एकूण परिस्थिती पाहता, मला कुठल्याच गोष्टीबद्दल कसलीही आशा नाही

4 comments:

  1. <<<"संकटकाळी किंवा कृतज्ञता म्हणून एखाद्याला ईश्वराला शरण जावे वाटत असेल, तर त्याला आमची ना नाही," ही त्यांची भूमिका स्वीकारार्ह आणि सुखावह होती.>>>>>
    अगदी सहमत आहे. कार्यकर्त्यांना गप्पांमधून मार्गदर्शन करताना ती ही भुमिका नेहमी मांडत. प्रबोधन व समन्वयवादावर त्यांचा भर होता. त्यांचे संघटन कौशल्य उत्तम होते. समविचारी नसलेल्या लोकांनाही ते आपलेसे करीत.

    ReplyDelete
  2. धन्यवाद प्रकाशजी.
    तुमची टीपणी अपेक्षित होती. अगदी खरं आहे.

    ReplyDelete
  3. मेलेल्या जनतेच्या प्रेताच्या टाळू वरील लोणी खाणारी ही राजकारण्याची जमात मतांच्या पेटी साठी जनतेचा खून तर करीलच…. पण त्याच बरोबर खुनी व्यक्ती कोणत्या जातीची , धर्माची आहे या वरून देशात दंगली माजवून अजून हजार दोन हजार जनतेचा मुडदा पाडण्यास कमी करणार नाही . सत्ताधाऱ्यांचे असे तर विरोधी पक्षाचे नेते याद राखा हिंदू धर्मा विरुद्ध असलेला हा कायदा आम्ही हाणून पाडू अश्या फुकट वल्गना करून या कायद्या विरुद्ध वातावरण तापवत आहे . अंधश्रद्धे चा गैर फायदा घेत जनतेला विविध सेवा आणि वस्तू विकण्याचा आज हजारो कोटी रुपयाचा धंदा झाला आहे. यात लिंबू मिरच्या, बिब्बा यांच्या माळा विकणारया रस्त्यावरील मांत्रिका तांत्रीका पासून ते लाफींग बुद्धा च्या मूर्ती विकणाऱ्या कारखानदार , भोंदू बाबा, महाराज या सर्वांना नरेंद्र दाभोळकरांनी एकाच वेळी शिंगावर घेतले याचा दुष्परिणाम समोर आहे . आणि मुळातच हा कायदा सर्वधर्म समभाव या प्रमाणे सर्व धर्मातील अंधश्रद्धे विरुद्ध आहे हे हेतुपुरस्पर सांगण्यात येत नाही . हि जनतेची शोकांतिका आहे .

    ReplyDelete
  4. ठणठणपाळजी,
    खणखणीत प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे दुखावले गेलेले व्यावसायिक हित असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    < आणि मुळातच हा कायदा सर्वधर्म समभाव या प्रमाणे सर्व धर्मातील अंधश्रद्धेविरुद्ध आहे हे हेतुपुरस्पर सांगण्यात येत नाही. हि जनतेची शोकांतिका आहे,> हा कायदा अंधश्रद्धेच्या विरूद्ध नसून अघोरी कर्मकांडाविरोधात आहे. त्याला अंधश्रद्धेविरोधातील कायदा असे नाव देऊन श्रद्धा-अंधश्रद्धेबाबत अंतहीन वाद निर्माण करून वेळ काढण्यात आला.

    ReplyDelete