Thursday, May 21, 2015

घुमानच्या निमित्ताने– 3 सुवर्ण मंदिराच्या शहरात

tumblr_nm9zlj5iky1u5hwlmo1_1280[2] नवी दिल्लीहून आधी अमृतसर येणे. त्यासाठी दिल्लीच्या महाराणा प्रताप आंतरराज्य बस स्थानकावर यायचे. तिथे गाडी पकडायची, असे सगळे सोपस्कार पार पाडले. परंतु तिथे गेल्यावर लक्षात आले, की दिल्लीहून थेट अमृतसरला बस नाही. म्हणजे गाड्यांवर पाट्या अमृतसरच्याच लागतात परंतु त्या तिथपर्यंत जात नाहीत. मार्गात जालंधर (पंजाबीत जलंधर) येथे थांबतात. त्यातही काही गाड्यांसाठी आधी तिकिट घ्यावे लागते आणि त्यांचे आसन क्रमांक ठरलेले असतात. त्यामुळे जालंधरच्या एका गाडीत चांगला बसलेलो असताना उतरावे लागले.

अशा दोन तीन गाड्या सोडल्यानंतर रात्रीचे साडे दहा-अकरा वाजू लागतात आणि आपला धीर खचायला लागतो. अमृतसरला कधी पोचणार, तिथले सुवर्ण मंदिर कधी पाहणार, जालियांवाला बाग कधी पाहणार, अशा नाना प्रकारच्या चिंता मनात येऊ लागतात. तेवढ्यात देवाने धाडल्यासारखी दिल्ली-अमृतसर अशी पाटी लागलेली एक गाडी येते. हिय्या करून आपण त्याला विचारतो, "गाडी अमृतसर जाएगी ना?" त्यावर तद्दन बाऊन्सरसारखा दिसणारा मात्र कंडक्टरचे काम करणारा इसम आपल्याला सांगतो, की जाईल पण साडे अकराला निघेल. तिकिट मीच देणार आहे, असेही सांगतो. आपल्याला वाटते, झाले, अब अमृतसर दूर नहीं. परंतु तिकिट फाडून हातात देताना कंडक्टर आपल्याला सांगतो, की तिकिटांचे यंत्र जालंधरचे असल्यामुळे जालंधरपर्यंतचे तिकिट घ्या आणि पुढचे नंतर देतो. पाऊण प्रवास झाल्यानंतर तोच कंडक्टर आपल्याला सांगतो, की गाडी जालंधरपर्यंतच जाणार आहे, तिथे अर्धा तास थांबेल. तुम्हाला उशीर होईल म्हणून तुम्ही दुसऱ्या गाडीने जा. शेवटी अडला हरी...ही म्हण मनातल्या मनात घोळत जालंधरच्या अलीकडे चार-पाच किलोमीटरवर आपण दुसऱ्या गाडीत बसतो. दुःखात सुख एवढेच, की कंडक्टर आपल्याला त्या गाडीत लवकर जाऊन बसायला सांगतो आणि दुसऱ्या गाडीच्या चालक-वाहकांना आपल्यासारख्या प्रवाशांसाठी थांबण्यास सांगतो.

असा हा प्रवास करून एकदाचा अमृतसरच्या दिशेने गाडीत जाणाऱ्या गाडीत बसलो. पहाट सरून ऐन सकाळची वेळ. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा आणि संपूर्ण गाडीत आपल्या अवतीभवती पगडीधारी मंडळी. अशा स्थितीत रस्त्यातील पाट्या नि गुरुद्वारे न्याहाळत मी प्रवास चालू ठेवला. अमृतसर...नांदेडमध्ये पहिल्यांदा ब्रॉडगेज ही गाडी धावू लागली (आणि हा मोठा ऐतिहासिक क्षण होता बरं का) तेव्हापासून ज्या शहरास जाणारी वाट नित्य दिसायची तेच हे शहर. नांदेड स्थानकावरून मुंबई पाठोपाठ ज्या शहरासाठी लांब पल्ल्याची गाडी सुरू झाली ते हे शहर. सचखंड एक्स्प्रेसने येथे यायचे, हा मनसुबा ही गाडी सुरू होऊन वीस वर्षे होत आली तरी मनसुबाच राहिला होता. तो काही अंशी पूर्ण होण्याची वेळ आज आली होती.

अमृतसर येण्यापूर्वी एकामागोमाग शुभ्र झळाळत्या घुमटांचे गुरूद्वारे मागे क्षितीजावर दिसू लागले. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे हवते गारवा होता आणि ओलाव्यामुळे या गुरुद्वाऱ्यांचे संगमरवरी पृष्ठभाग आणखीच उजळून निघत होते. अन् येथे काळ व वेळेचा गुंता निर्माण होऊ लागला. 'अॅन एरिया ऑफ डार्कनेस' या पुस्तकात सर व्हिवियन नायपॉल यांनी आपल्या जन्मगावाला भेट दिल्यानंतर अनेकदा काळ व वेळेची सरमिसळ झाल्याचा उल्लेख केला आहे. भारतीय खेड्यांमध्ये आपल्या पूर्वजांच्या गावांमध्ये नायपॉल यांना जन्मभूमीच्या, बालपणीच्या खाणाखुणा दिसत जातात आणि आपण कुठे आहोत, नक्की काळ कोणता आहे, असे प्रश्न त्यांच्या मनात उमटत जातात.

इथे उलट घडत होते. जन्मगाव सुटल्यानंतर १९ वर्षांनी एका परक्या प्रदेशात एका व्यक्तीला त्याच्या जन्मगावाशी साधर्म्य सांगणारी परिचित दृश्ये दिसत होती आणि आपण नक्की कुठे आलो आहे, काळ पुढे गेला आहे का मागे गेला आहे, असे विचार मनात गर्दी करू लागले. खुद्द अमृतसरला आल्यानंतर तर अशा ओळखचिन्हांची गिरवणी सुरू झाली. नांदेडची आठवण करून देणारे तेच अरूंद रस्ते, पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर तयार होणारे तेच डबके, तशाच पायरिक्षा, तोच गर्दी-गोंधळ आणि रस्त्यांच्या कडेने उघड्या हॉटेलांमधून येणारा तोच पराठा, भाजी व तंदुरी चिकनचा वास! खिशातील तिकिटे आणि खर्च झालेला पैसा यांची जाणीव होती म्हणून, नाही तर आपण परक्या प्रदेशात आलो आहोत, हे कोणी सांगूनही मी मान्य केले नसते.

2 comments:

  1. तेच अरूंद रस्ते, पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर तयार होणारे तेच डबके, तशाच पायरिक्षा, तोच गर्दी-गोंधळ आणि रस्त्यांच्या कडेने उघड्या हॉटेलांमधून येणारा तोच पराठा, भाजी व तंदुरी चिकनचा वास! आपण अमृतसरचे केलेले वर्णन हे भारतातील कोणत्या हि गावाचे किंवा शहराचे व्यवछेदक लक्षण आहे . मुंबई दिल्ली पासून ते एखाद्या ओसाडवाडी गावाचे हेच दृष्य आपणास दिसते . पण हे दृष्य तुम्हाला विचलीत करू शकत नाही. कारण या पेक्षा वेगळ्या गावाची आपण कल्पनाच करू शकत नाही .

    ReplyDelete
  2. खरं आहे ठणठणपाळजी. हे वातावरण माझ्या जाणीवेचा भाग झालेले आहे. खराब रस्ते, लोड शेडिंग, डबके हे सगळे आपल्या अंगवळणी पडले आहे. अजून हरियाणातील वर्णन यायचे आहे. लक्ष ठेवून असा. म्हणजे वरील वर्णन अगदीच किरकोळ वाटेल.

    ReplyDelete