Friday, June 12, 2015

घुमानच्या निमित्ताने-6 अमृतसरी कुलचा आणि लस्सी

tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo5_500[1] नाही म्हणायला, अमृतसर शहरात आल्याची भरभक्कम जाणीव होते ती येथील हॉटेल आणि लस्सीचे दुकान पाहून. त्यातही हरमंदिर साहिबच्या परिसरातील जी हॉटेल आहेत ती खऱ्या अर्थाने आस्वाद घेतलाच पाहिजे या वर्गवारीत मोडणारी आहेत.

हरमंदिर साहिबच्या आधी जी पहिली गल्ली आहे तिथेच थोडे आत गेले, की शर्मा भोजन भांडार नावाचे हॉटेल आहे. घुमानहून परतल्यानंतर मी हरमंदिर साहिबची परत भेट घेतली तेव्हा सकाळी या हॉटेलमध्ये गेलो होतो. अमृतसरी कुलचा नावाचा पराठ्याचा एक लांबचा नातेवाईक लागेल असा पदार्थ येथे खूप प्रसिद्ध आहे. पराठ्याप्रमाणेच नाना पदार्थ आतमध्ये सारून हा पदार्थ तयार केला जातो. मी आधी गोबी-बटाटा मिक्स कुलचा मागविला. त्याच्यासोबत हरभऱ्याची (चना) भाजी आणि कांदा, मिरची व आणखी काही पदार्थ असा बेत दिसला. शिवाय कुलच्यासोबत चमचाभर लोण्याचा 'चढावा' होताच. सर्वात आधी कुलच्याचा तुकडा आणि हरभऱ्याच्या भाजीचा घास घेतला आणि मन तृप्त झाले. शंभर मटणाच्या तोंडात मारेल, असा विसविशीत शिजलेला चना आणि तो कुलचा यांची चव म्हणजे ज्याचे नाव ते. त्यानंतर वाघा सीमेवरून परतल्यानंतर मी परत त्याच ह़ॉटेलमध्ये गेलो आणि दोन कुलचे खाल्ले. एक पनीर कुलचा आणि दुसरा गोबी कुलचा. प्रत्येकासोबत भाजी आणि चटणी होतीच. ही चटणी काही वेगळाच पदार्थ असेल, म्हणून मी वेटरला विचारले, याला काय म्हणतात. तो म्हणाला, "इसे चटनी बोलते है”. मग मात्र मी मूग गिळून गप्प बसावे, त्याप्रमाणे चने आणि कुलचा गिळून गप्प बसलो. अमृतसरी कुलच्याचा हा आस्वाद घेतल्यामुळे नंतर पानीपतला गेल्यावर तिथे जे कुलचे मी पाहिले, ते काही माझ्या गळी उतरले नाहीत. वेगवेगळ्या गाड्यांवर अगदीच लुसलुशीत कुलचे विकायला काढले होते त्यावरून त्यांच्या तोंडी न लागण्यातच शहाणपणा आहे, हे मी ताडले. tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo6_400[1]

अमृतसरच्या आणखी दोन खासियत म्हणजे लस्सी आणि कुल्फी. महाराष्ट्रात मिळणारी लस्सी हे लस्सीच्या नावावर चालणारे थोतांड आहे, असे मी म्हणणार नाही. परंतु  असे म्हणता येईल, की पंजाबी लस्सी म्हणजे कुंभमेळा आहे आणि महाराष्ट्रातील लस्सी ही गावची जत्रा आहे. यहां की लस्सी जैसी कोई नहीं. इतक्या दूर पंजाबमध्ये आल्यानंतर एखादी व्यक्ती लस्सी न पिता परत जाणार असेल तर त्या व्यक्तीकडे रसिकता नावालाही नाही, असे बेलाशक म्हणता येईल. 'हाय जालीम तूने पीही नहीं,' असे शायर म्हणतो ते अशा लोकांसाठीच.

आपल्याकडे जे ग्लास असतात त्याच्या साधारण दीडपट उंच आणि गोल स्टीलच्या पेल्यांमध्ये पुढ्यात आलेली थंडगार लस्सी जेव्हा घशाखाली जाते तेव्हा जगात दुःख, दैन्य, उपद्रव, भांडणे वगैरे गोष्टी असल्याची सूतराम आठवणही राहत नाही. उमर खय्याम म्हणतो त्याप्रमाणे थंडगार लस्सीने भरलेली एक सुरई आणि एक कवितेची वही, एवढ्या भांडवलावर कोणा व्यक्तीचे आयुष्य सहजपणे व्यतीत होऊ शकते.

गंमत म्हणजे, कुलच्याबाबत जे झाले ते लस्सीबाबत झाले नाही. अमृतसरला जी लस्सी मिळाली, त्या चवीची नाही परंतु आकार आणि घट्टपणाच्या बाबतीत त्याच तोडीची लस्सी पानीपतलाही मिळाली. त्यामुळे तेथेही मी दोनदा लस्सीशी दोन हात केले. या दोन्ही शहरांमधील लस्सी पिण्याचा उल्लेख केवळ भाषेची सवय म्हणूनच करायला पाहिजे. वास्तविक त्यांच्याबाबत लस्सी खाल्ली असे म्हणायला पाहिजे. तेवढी त्यांची घनता आणि घट्टता होतीच होती. तमिळमध्ये कॉफी पिली असे न म्हणता कॉफी खाल्ली असेच म्हणतात. (कॉफी साप्पिटेन). त्याच प्रमाणे पंजाबमध्ये लस्सी प्यायची बाब नसून खायची बाब आहे आणि कामचलाऊ पोट भरायचे असेल तर तीस रुपयांत पोटभर लस्सी हा उत्तम पर्याय आहे, एवढे ध्यानात घ्यावे. तसेही केवळ जेवायचे म्हटले तरी खुशाल एखाद्या हॉटेलात जावे आणि ३० ते ५० रुपयांत पोटोबाची सोय करून यावी, हे येथे अशक्य नाही.

tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo10_500[1] संस्कृतमध्ये लास या शब्दाचा अर्थ उत्सव करणे, नाचणे, मौजमजा करणे असा आहे. उल्लास, विलास वगैरे शब्द त्यांतूनच आलेले आहेत. पंजाबमधील लस्सीचे प्याले पाहिल्यानंतर या लस्सीचे कुळ लासमध्येच असावे, अशी खात्री पटते. एखाद्या मटक्यात 'लावायला' ठेवलेली लस्सी मस्त थंडगार झाली आणि ऐन तळपत्या उन्हात ती घशाखाली ओतली, तर मेजवानी, सेलिब्रेशन, स्वर्गसुख अशा सगळ्या कल्पना हात जोडून समोर उभ्या राहतात. अन् अशी मनसोक्त लस्सी पिल्यानंतर पेट भर गया लेकिन दिल नहीं भरा, अशी अवस्था होते. खल्लास!

2 comments:

  1. अमृतसर च्या गोल्डन टेम्पल चोकात खाल्लेल्या पवित्र देसी शुद्ध तुपातल्या जिलेबीची चव ४० वर्षा नंतर ही आज चीभेवर रेंगाळते आहे. आणि तुमचा लेख वाचल्यावर अमृतसर मध्ये ६ महीने राहीलेल्या सोनेरी दिवसाची आठवण ताजी झाली .
    एकदा तुम्ही अमृतसर मध्ये जेवलात तर पंजाबी प्लेट च्या नावाखाली महाराष्ट्रात जे कांही मसालेदार तेलकट बेचव जेवण आणि वातड तंदुरी रोटी नोन मिळते ते तुमच्या घश्या खाली जाणार नाही .
    अमृतसर चा केसर दा ढाबा मध्ये मिळणारे अप्रतिम पंजाबी जेवण दोन तंदूर रोटी मध्येच पोट गच्च भरते. घट्ट दह्यातील रायता दाल फ्राय आणि तंदूर रोटी व्वा क्या बात है ……

    …… आणि हो एक महत्वाचे
    दुधाचा महापूर असून सुद्धा तेथे महाराष्ट्रा सारखा बॉबी ज्युली असला घट्ट दुधाचा चहा मिळत नाही . दुधात पत्ती टाकून उकळण्या ऐवजी सरळ दुध लस्सी पिण्यावर ते भर देतात.

    ReplyDelete
  2. खरं आहे, ठणठणपाळजी. तुमजच्या प्रतिक्रियेमुळे पंजाबमधील जेवणाच्या आठवणी परत जाग्या झाल्या.

    ReplyDelete