Saturday, January 30, 2016

दर साल दर शेकडा वादाचे संमेलन

'नेमेचि येतो मग पावसाळा' या उक्तीतील पावसाने आता आपला नेम सोडला आहे. उलट पावसाने अवकाळी कोसळण्यातच अलीकडे अधिक सातत्य दाखवले आहे. मात्र पावसाच्या बरोबरीने सातत्य राखणाऱ्या साहित्याच्या बरसातीने अद्याप तरी तेवढा दगा दिलेला नाही. त्यामुळे दर साल दर शेकडा या दराने साहित्यिक मंडळी एकत्र जमून वाद-वाद खेळतात. (श्लेष साधल्याचा आनंद काही वेगळाच असतो!) त्यालाच साहित्य संमेलन असे म्हणतात.
साहित्य व कलेच्या नावाने चालणारी ही रंगपंचमी यंदा जरा जास्तच रंगली. दरवर्षी संमेलनाचे ठिकाण किंवा त्याचे नेपथ्य अथवा विषयपत्रिकेवर असलेले नसलेले मुद्दे अशा विषयांवर शाब्दिक आहेर दिले घेतले जातात. यंदा मात्र खुद्द संमेलनाध्यक्षांनीच असा काही पवित्रा घेतला होता, की जणू बघतोच हे संमेलन कसे होते ते, असेच काही ते विचारत होते.
८९व्या साहित्य संमेलनाची चर्चा सुरू झाली ती श्रीपाल सबनीस यांची योग्यता, त्यांनी निवडून येण्यासाठी वापरलेले भले-बुरे मार्ग, साहित्यक्षेत्रातील स्थान इ. विषयांवरून. नंतर त्यांनीच ती वेगळ्या दिशेने वळवली. आधी नको ते बोलून आणि नंतर नको त्या प्रकाराने त्याचे समर्थन करून त्यांनी या वार्षिक मेळाव्याचा नूरच पालटून टाकला. आधी सबनीसांनी उत्तम वातावरण निर्मिती करून आता विचारस्वातंत्र्याच्या यज्ञात पुढची आहुती त्यांचीच पडणार आहे, असा रागरंग निर्माण केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोंदीवरच शरसंधान केल्याने - आणि तेही अध्यक्ष सोडा कुठल्याही साहित्यिक म्हणविणाऱ्या माणसाच्या दृष्टीने लज्जास्पद रीतीने - अचानक त्यांच्यावर पुरोगामीत्वाचा शेंदूर फासला गेला आणि बघता बघता एका दगडाचा शेंदूर झाला. त्यामुळे सगळी विवेकवादी टाळकरी मंडळी त्यांच्या अवतीभोवती जमली. कोणी पत्रके काढली तर कोणी प्रभात फेऱ्या. त्यातच सनातन संस्थेच्या वकीलांनीही पाहुण्याच्या काठीने साप मारावा म्हणून आपलीही दुकानदारी करून घेतली.
मात्र अवतीभोवती जमलेल्या समस्त समाजवाद्यांचा मुखभंग करून श्रीपाल सबनीस यांनी अचानक जाहीर दिलगिरी व्यक्त केली. आदल्याच दिवशी सर्व पुरोगाम्यांच्या साक्षीने आणि साथीने सबनीस सर पुणे स्थानकाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्यापासून डॅा. आंबेडकर पुतळ्यापर्यंत चालत गेले होते. 'खुशाल मला गोळ्या डाला, पण सत्य सांगणे मी सोडणार नाही,' म्हणत होते. अन् चोवीस तास उलटायच्या आत तेच सबनीस पंतप्रधानांना दिलगिरीचे पत्र लिहिले असल्याचे सांगत होते. तसे हे पत्र त्यांनी पाच जानेवारी रोजीच लिहिले होते. याचा अर्थ आपण आगळीक केली आहे, ती आपल्या अंगावर शेकणार आहे, याचा अंदाज त्यांना आला होता. तरीही गॅलिलिओच्या आवेशाने मी माझे सत्य सोडणार नाही, असे सांगत ते सुटले होते.
याचे कारण म्हणजे नरेंद्र मोदी, रा. स्व. संघ किंवा हिंदुत्ववाद असे विषय आले, की त्यांना विरोध करणे हेच आपले जीवितकार्य आहे, असे ज्यांना वाटते त्यांची फूस किंवा त्यांच्याबद्दलचा विश्वास. भाजपच्या नाठाळ कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शैलीत सबनीसांच्या विरोधात ठणाणा सुरू केला, तेव्हाच सुतकी चेहऱ्याने वावरणाऱ्या पुरोगामी वासरांच्या कानात वारे शिरणार हे नक्की झाले होते. तेव्हा 'उजव्या' विचारसरणीच्या विरोधात तुम्ही तंबू ठोका, आम्ही शिबंदी घेऊन आलोच, असा कोणीतरी सर्वसमावेशक निरोप तरी दिला असावा. नाहीतर 'मी पुरोगामीत्वाची तलवार उपसल्यानंतर प्रगतीशील विचारांच्या झुंडी आपल्या मागे येणार म्हणजे येणार,' हा पक्का आत्मविश्वास सबनीस सरांकडे असावा. ज्या अर्थी दिलगिरीचे पत्र खुशाल पाठवून आठ दिवस पुरोगाम्यांना 'फिरविण्याचा' वामाचार सबनीसांनी केला, त्याअर्थी दुसरी शक्यता अधिक सबळ वाटते.

ते काही असो. आपल्या तिसऱ्या भूमिकेची अनोखी अदा सबनीसांनी दाखविली आणि सबनीसांच्या नादाला लागून महाराष्ट्रात 'असहिष्णुता पार्ट २'चे खेळ करण्याचे समाजवाद्यांनी केलेले मनसुबे पुरते उधळले गेले.
(क्रमशः)

No comments:

Post a Comment