Thursday, November 17, 2016

नोटाबंदी आणि इंद्राचा शाप


noteban demonitization
पुराणातील एक कथा आहे. (पुराण म्हणताच ज्यांच्या कपाळाला आठ्या चढतात आणि चेहरा वाकडा होतो, त्यांनी येथून पुढे नाही वाचले तरी चालेल). देवांचा राजा इंद्राला एकदा शाप मिळतो. त्यानुसार काही काळ त्याला डुकराच्या रूपात घालवायचा असतो. या शापाची अंमलबजावणी सुरू होते.
इंद्र जमिनीवर येऊन एका गटारात राहू लागतो. त्याचा कुटुंबकबिला वाढतो. काही काळाने त्याचा शापाचा कालावधी संपतो. परंतु इकडे गटाराची सवय लागलेल्या डुकराला म्हणजेच इंद्राला काही हे सुख (!) सोडून जाण्याची इच्छा होत नाही. दुसरीकडे राजेपद रिकामे राहिल्याने देवमंडळात खळबळ माजते. म्हणून राजेंद्रांना परत आणण्यासाठी ते नारदमुनींना पृथ्वीवर पाठवतात.
 नारदमुनी येतात तर काय पाहतात, तर डुकराच्या रूपातील इंद्र डुकरिणी आणि पिलांसोबत घाणीमध्ये सुखेनैव पडलाला असतो. आपण देवकुळातील असल्याचाही त्याला विसर पडलेला असतो.
"देवा, आता स्वर्गात चला. तुमचे इथले अवतारकार्य संपले आहे," नारद म्हणतात.
"कशासाठी?" डुक्कर विचारते.
"कशासाठी म्हणजे? अरे, तुझे राज्य तुझी वाट पाहत आहे! तुझा महाल, शची (इंद्राची पत्नी), ते नंदनवन सगळे तुझ्यासाठी प्रतीक्षा करत आहेत," नारद उत्तरतात.
"पण तेथे जाऊन काय होणार," डुक्कर परत विचारते.
"अरे, तेथे तुला सर्वोत्तम शय्या, स्वादिष्ट पदार्थ, आपल्या माणसांचा सहवास मिळतील," नारदमुनी नेट लावण्याचा प्रयत्न करतात.
"पण त्याने काय होणार?" डुक्कर परत विचारते.
"अरे, तू स्वर्गात चल. तू सुखात लोळशील, सुखात!!!" नारदमुनी आणखी जोर लावून विचारतात.
"मग आता मी काय करत आहे?" डुक्कर गटारात जागच्या जागी वळवळत विचारते.
 व्हाटस् अॅप नावाच्या अफवाप्रसव आणि छद्मवैचारिक साधनावर गेल्या आठ-दहा दिवसांत ज्या प्रकारे लेखांचा रतीब पडत आहे, त्यामुळे या कथेची वारंवार आठवण होते. यातील नावानिशी येऊन पडणाऱ्या लेखांना किमान मतप्रदर्शन म्हणून ढकलपास तरी करता येईल. पण परस्पर दुःखितांच्या वेदनांचे कढ काढत स्वतःची अक्कल पाजळणाऱ्यांचाच जास्त सुळसुळाट झाला आहे. इतका की, रघुराम राजन यांचा लेख म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बनावट शहाण्यांचे खर्डे खपविणाऱ्यांचा खूपच सुळसुळाट झाला आहे. स्वत:सोबत इतरांनाही गटारात लडबडायला लावून इंद्रपणाचे जाणूनबुजून विस्मरण करविण्याचे कारस्थान रचले जात आहे.
 काळा पैसा ही घाण आहे, हे तोंडदेखले बोलून दुसरीकडे ही घाण काढायला विरोधही चालू आहे. आणि हा विरोध करायला पुढे कोण येत आहे, तर सारदा चिटफंडात मानेपर्यंत रुतलेल्या ममता बॅनर्जी, दिल्लीत यथेच्छ गोंधळ घालून लोकांना त्राही माम करणारे अरविंद केजरीवाल, 'वृद्धत्वातही निज शैशवास' जपणारे राहुल गांधी! शंकराच्या वऱ्हाडात सामील झालेली भूतावळसुद्धा यांच्यापेक्षा अधिक साजरी असेल! अन् तर्कटपणाची हद्द गाठत त्यांच्या नावावर आपले शहाणपण विकणारे विचारवंत.
काय तर युक्तिवाद म्हणे बँकांबाहेरच्या रांगांमध्ये काळ्या पैसेवाले, धनाढ्य कोणी नाही. जो धनाढ्य आहे, उदा. शरद पवार, अंबानी किंवा गेला बाजार बजाज इ., त्यांच्याकडे कितीही पैसा असला तरी त्याचा हिशेब लावण्यात ते वाकबगार असतात. अन् त्यांना पैसे बदलायला जायचे असेल तर त्यांच्याकडे शंभर माणसे असतात. वर बँकांबाहेर ज्या रांगा आहेत त्या मुळात कष्टाचा, उजळमाथ्याचा पैसा असलेल्यांच्या आहेत. काळ्या पैसेवाल्यांची बँकांपर्यंत येण्याची हिंमत होणार तरी आहे का?
पुण्यातील कचराकुंडीत पडलेला, गंगेच्या पाण्यात वाहिलेला, निरनिराळ्या ठिकाणी पोलिसांनी पकडलेला पैसा हा कोणत्या रंगांचा होता की ज्यामुळे त्यांच्या मालकांना तो दिवसाउजेडी बाहेर आणता आला नाही. नागपुर महापालिकेत गेल्या ७८ वर्षांतील सर्वाधिक करभरणा झालाय. पुणे पालिकेला १०० कोटींपेक्षा जास्त कमाई झालीय. सोलापूरला स्वतः महापौरांसकट लोकांनीही कर भरल्यामुळे कधी नव्हे ती तिजोरी भरलीय. कर न दिलेला पैसा हा काळा पैसा, ही व्याख्या मान्य दिली तर कररूपाने आलेला हा पैसा काळा पैसाच नाही का? इतके दिवस तो डबोले दाबून बसलेल्यांच्या बुडाखाली होता, आता तो सरकारी यंत्रणेमध्ये आला. हा फायदा नाही का? का विद्यापीठीय पुस्तकांमधून आलेली ही कल्पना नाही म्हणून तिचे दृश्य परिणामही नाकारायचे आहेत? अन् अदृश्य परिणामांपर्यंत आपण अजून आलेलोही नाहीत.
या देशात काहीही होऊ शकत नाही, नशिबी आलेय ते भोगावे लागेल, अशी एक मनोवृत्ती गेल्या कित्येक वर्षांत झाली होती. त्या मनोवृत्तीला पहिल्यांदा धक्का लागला आहे. मात्र आधीचीच व्यवस्था किती छान होती, आपण सगळे कसे सुखाने जगत होतो, सगळ्यांचं कसं मजेत चाललं होतो, असे चित्र रंगविण्याचा प्रयत्न चालू आहे. ती व्यवस्था म्हणजे आपल्याला मिळालेल्या शापाचा काळ होता, असे समजून वागलो तरच दिवस बदलतील. नाही तर केवळ दिवस केवळ येतील आणि उलटतील. अन् शेवटी यातून खरोखरच फक्त हानी झाली, तर २०१९ फारसे दूर नाही. त्यावेळी आपली ताकद लोक दाखवून देतीलच. कारण शेवटी इंद्राला फक्त शाप मिळालेला असतो, त्याचे इंद्रपद गेलेले नसते!

6 comments: