Tuesday, August 29, 2017

डोकलाम – अगा जे घडणारच नव्हते

भारताला खुन्नस म्हणून चीनने सीमेवर उभी केलेली फौज परत घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस व्याकुळ होणाऱ्यांच्या छातीवरचे दडपण उतरणार आहे. डोकलाम कुठे आहे, हेही माहीत नसणाऱ्यांनी आता चीन जणू भारतात घुसला, अशा थाटात भाषणे द्यायला सुरूवात केली होती. तीही आता थांबतील. सिक्कीम आणि भारताच्या फौजा डोकलाममध्ये उभ्या आहेत, असे म्हणणाऱ्या एनडीटीव्हीलाही आता तणाव निवळल्याने हायसे वाटले असेल. आता कुठल्याही क्षणी चीन-भारत युद्धाची ठिणगी पडेल, अशी वाट पाहणाऱ्यांचा मात्र त्यामुळे भ्रमनिरास झाला असेल. शिवाय चीनच्या हातून भारताचा आणखी एक पराभव अटळ आहे, असे भयभाकीत वर्तविणाऱ्यांनाही आपोआप चपराक बसली आहे.


“सीमा सुरक्षेची आवश्यकता आणि स्थानिक जनजीवनातील सुधारणेसाठी चीन दीर्घकाळापासून डोकलाम भागात रस्त्यांसारख्या पायाभूत सोईसुविधा बनवत आहे. हवामानासह वेगवेगळ्या अनेक घटकांचा विचार करून चीन प्रत्यक्ष परिस्थितीनुसार हे काम चालू ठेवेल. तसेच चीनी सैनिक आपली गस्त चालूच ठेवेल,” असे चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते हुआ छुनइंग म्हणाले. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या भाषेत याचा अर्थ ‘आम्ही आमचे काम थांबवले आहे आणि आमचे सैनिक मागे घेतले आहेत,’ असा होतो.


भारत आणि चीनदेशांमध्ये डोकलाम प्रश्नावरून सुमारे 70 दिवस वाद सुरू होता. सोमवारी दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. या दरम्यान दोन्ही बाजूंनी वाग्ययुद्ध झाले, अगदी दगडफेकही झाली. पण संघर्षाला तोंड फुटले नाही. पन्नास ठिकाणी मान अडकलेल्या चीनला प्रत्यक्ष सशस्त्र संघर्ष परवडणाराच नव्हता, भले त्याची सज्जता कितीही असो.
सिक्कीममधील डोकलाम भागात चीनने आपले सैन्य जून महिन्यात घुसविले होते. त्याला उत्तर म्हणून भारतानेही आपले लष्कर उभे केले होते. “भारताने सैन्य मागे घेतले नाही तर युद्धाला तयार राहावे, 1962 सारखी अवस्था करू,” असा इशारा चीनने दिली होती. तर “आताचा भारत हा 1962चा भारत नाही,” असे ठामेठोक उत्तर भारताने दिले होते.


डोकलामच्या वादाचा फुगा मुळातच प्रमाणाबाहेर फुगवला गेला होता. चीन आणि भारत समोरासमोर आले होते, हेही खरे. दोन्ही देशांमध्ये संघर्षाची परिस्थिती आली होती, हेही खरे. पण तो संघर्ष होणारच आणि त्यात भारताची बाजू पडती असेल, हे छातीठोकपणे सांगणारे खोटे होते. पंचावन्न वर्षांपूर्वी एका नादान नेतृत्वाने आणलेल्या नामुष्कीच्या आठवणीत जगणाऱ्यांनी अंदाज पंचे मांडलेले ते गणित होते.


बेडकाला किमान बैल तरी व्हावे वाटले होते, थेट गुराखी व्हावे वाटले नव्हते. पण नवस्वतंत्र भारताचे नेतृत्व करताना नेहरूंना थेट जगाचे नेतृत्व करण्याची हौस निर्माण झाली होती. त्यामुळे 1959 पासूनच वारंवार इशारे देऊनही त्यांनी चीनच्या सीमेकडे दुर्लक्ष केले. आपला ‘चार्म’च असा, की चीनला आपण बोलता-बोलता पटवू, अशा इरेला पेटल्यासारखे त्यांचे वर्तन होते. त्याची परिणती व्हायची तीच झाली.


चीनने ईशान्येकडील एक मोठा लचका तोडला. त्यावेळी संरक्षण मंत्री असलेल्या कृष्ण मेनन यांना त्याचे काही वाटण्याचा प्र्शनच नव्हता. कारण ते कम्युनिस्टच होते. पण ‘स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या’ नेहरूंचे काय? तर त्यांनी “तिथे गवताचे पातेही उगवत नाही,” असे सांगून त्या प्रश्नाची वासलात लावली. त्यावर संसदेत चर्चा चालू असताना नेहरूंचे उत्तर ऐकून टंडन उठले. त्यांच्या डोक्यावर एकही केस नव्हता. “असे असेल तर या डोक्यालाही उडवून लावा, कारण त्याच्यावरही काही उगवत नाही,” असे ते म्हणाले होते.


या गफलतीची मिळायची ती शिक्षा भारताला मिळाली. तिबेटवर पाणी सोडावे लागले आणि अरुणाचलपासून काश्मीरपर्यंत चिन्यांना उभे राहायला जागा मिळाली. नेहरूनंतर आलेल्या प्रत्येक सत्ताधाऱ्याला चिनी धोक्याच्या सावटाखालीच राहावे लागले. भारताने १९६७ साली चिन्यांना चांगला धडा शिकविला असला, तरी १९६२ चा धसका कधीच गेला नाही. चीनचा उल्लेख आला, की ६२ चीच आठवण निघायचे आणि ‘इंच इंच लढवू,’चे निनाद उमटत राहायचे. भारताचे प्रारब्ध जणू हेच आहे, असा एकूण सूर असायचा. या ताज्या प्रकरणाने तो त्या कलंकित इतिहासाला नवा मुलामा चढला आहे – अधिक तेजस्वी आणि अधिक खंबीर!


त्यात कर्णाचे सारथ्य करणाऱ्या शल्यासारखे चीनसमोर भारताची मानखंडना करणारेच अधिक. त्यात इंग्रजी पेपरांतून हुबेहूब मजकूर मराठीत उतरवाणे लेखनबहाद्दर जसे होते, तसेच शरद पवारांसारखे संधिसाधूही होते. “यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘२५ वर्षांपूर्वीदेखील सीमेवर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा मी चीनला गेलो होतो. तेव्हा चीनच्या पंतप्रधानांशी समुद्र किनाऱ्यावर तब्बल २ तास चर्चा केली. त्यावेळी बोलताना चीनच्या पंतप्रधानांनी आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न बोलून दाखवले. जगाचे आर्थिक केंद्र होण्यासाठी २५ वर्षे कष्ट करणार असल्याचे त्यावेळी त्यांनी म्हटले होते आणि त्यानंतर चीन खरोखरच महासत्ता बनला,” असे पवार म्हणाल्याचे लोकसत्ताने म्हटले आहे.


पोटातील पाणी हलू न देणारे मिचमिच्या डोळ्यांचे चीनी शब्द न पाळण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या पवारांसमोर पोट मोकळे करतात. पुढच्या 25 वर्षांच्या योजना सांगतात आणिती योजना हे आता जाहीर करतात. सगळंच आक्रीत! यावर विश्वास ठेवणारे कुठले भक्त म्हणायचे?


असे शहाजोग सल्ला देताना प्रत्यक्षात चीनमध्ये काय परिस्थिती होती, याकडेही लक्ष द्यायची यांची तयारी नव्हती. परंतु पूर्वीच्या लेच्यापेच्या सरकारच्या तुलनेत सध्याचे सरकार खंबीर असल्यामुळे त्यांची डाळ शिजत नव्हती. या वादाची प्रत्यक्ष भूमी असलेले भूतान आणि चीनशी बेताचीच मैत्री असलेल्या जपानने भारतालाच पाठिंबा दिला होता, हेही लक्षात घ्यायला ते धजत नव्हते. फक्त जे घडणारच नव्हते, ते घडणार असे सांगून ‘लांडगा आला, लांडगा आला’ची आवई उठविण्यात त्यांना रस होता. ताज्या राजनयिक यशामुळे त्यांच्या या हुलकावणीचे खरे स्वरूप तर पुढे आलेच, पण त्यांचा अभ्यास किती उथळ आहे ते सुद्धा पुढे आले. हेही नसे थोडके!

No comments:

Post a Comment