Wednesday, May 30, 2018

हत्या झाली, बळी पडला दलित... आता दाखवा तुमचा कैवार!

दलितांवरील अत्याचार आणि मनुवादी इत्यादी टेप वाजविणाऱ्यांसाठी एक बातमी आली आहे. बातमी अशी खळबळजनक, की त्यांनी मूगच गिळून बसावे. ती आहे केरळची. रविवारी राज्यात चेंगन्नूर मतदारसंघात पोटनिवडणूक होती. अलीकडच्या प्रथेप्रमाणे ही पोटनिवडणूक म्हणजे सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी (लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट -एलडीएफ) सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचे मूल्यमापन म्हणून मिरविण्यात होत होती. एकीकडे या निवडणुकीसाठी मतदान होत होते आणि दुसरीकडे 23 वर्षांच्या एका युवकाची हत्या होत होती. केव्हिन पी. जोसेफ असे या युवकाचे नाव होते. त्याचा अपराध इतकाच होता, की तो दलित होता आणि एका सुसंपन्न ख्रिस्ती कुटुंबातील मुलीवर त्याने प्रेम केले होते.


इतक्यात अळीमिळी करण्याची मानसिक तयारी झाली नसेल तर समस्त पुरोगाम्यांसाठी पुढचे तपशील पाहू. ज्या टोळीने केव्हिनचे अपहरण करून त्याचा खून केला त्या टोळीचे नेतृत्व नियाझ नावाची व्यक्ती करत होती. हा नियाझ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा आघाडी असलेल्या डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडियाचा (डीवायएफआय) सचिव आहे. खुद्द राज्याच्या पोलिसांनी या वास्तवाला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी ईशान नावाच्या एका युवकाला ताब्यात घेतले आहे आणि तोही डीवायएफआयचा कार्यकर्ताच आहे.





केव्हिनचा मृतदेह सोमवारी सकाळी राज्याची राजधानी तिरुवनंतपुरम येथून जवळच असलेल्या थेनमाला येथे एका कालव्यात मिळाला. आधी त्याचे डोळे काढून नंतर मानेवर प्रहार करून त्याला मारल्याचा अनुमान पोलिसांनी व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री मुलीचा भाऊ शानू चाको, डीवायएफआय नेता नियाझ व इतरांच्या नेतृत्वाखाली दहा जणांनी केव्हिनच्या घरावर हल्ला करून त्याचे अपहरण केले होते.


गेले काही महिने दलितांच्या कल्याणाचा मक्ता घेतल्यासारखे छाती काढून चालणारे डावे पक्ष या प्रकरणानंतर जरा ताळ्यावर आले आहेत. त्यांचा चार अंगुळे वर चालणारा रथ काहीसा जमिनीवर यायला आता हरकत नाही. "या मुलीचे कुटुंब कोणत्याही किंमतीवर तिला परत आणू पाहत होते आणि यासाठी स्थानिक डीवायएफआय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यासाठी मदत केली. या हत्येमागे राजकीय पैलू आहेत आणि ते जात-आधारित राजकारणाचे आहे. केव्हिन हा अनुसूचित जातीचा मुलगा होता आणि केरळमध्ये वामपंथी पुरोगामी पक्षही अशा प्रकारच्या विवाहाच्या विरोधात आहेत, हे एक दुर्दैवी वास्तव आहे," असे दलित कार्यकर्त्या धन्या रामन यांनी ‘फर्स्टपोस्ट’ला सांगितले.





साम्यवाद्यांची सद्दी असलेल्या अन्य बहुतेक राज्यांप्रमाणे केरळचेही राजकारण रक्तपातावरच चालते. असे राजकारण करण्यासाठी पोलिसांचेही राजकीयकरण करणे आवश्यक असते. केरळमध्येही तेच घडले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एका महिन्यापूर्वीच एर्नाकुळम जिल्ह्यातील वारापुळा येथे राहणाऱ्या श्रीजीत नावाच्या कार्यकर्त्याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. एका व्यक्तीच्या मृत्यूच्या प्रकरणात केरळ पोलिसांनी श्रीजीत याला ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांच्या ताब्यात असतानाच एका रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला होता. पोलिस कोठडीत झालेल्या अत्याचारांमुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप श्रीजीतच्या नातेवाईकांनी केला होता. एर्नाकुळमच्या जिल्हा पोलिस उपअधीक्षकांवर त्या प्रकरणात ठपका ठेवण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्यावरूनच त्याला अटक करण्यात आल्याची बोलवा आहे.


'आम्हाला केरळमधील पोलिस स्थानकांमध्ये दररोज अशा घटना पाहायला मिळतात. पक्ष कार्यकर्त्यांच्या (म्हणजे कोण हे सांगायला पाहिजे का?) एका फोन कॉलवर दलित आणि अन्य लोकांविरुद्ध पोलिस खटले दाखल करतात. स्थानिक माकप नेत्यांसोबत पोलिसांचे एवढे गूळपीठ आहे, की तुम्हाला त्यांचा पाठिंबा नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही," असे धन्या रामन म्हणतात.


पोलिसांचे हे लालीकरण अशा थराला गेले, की पोलिस असोसिएशनच्या राज्य संमेलनात 50 पोलिस अधिकारी लाल रंगाचा शर्ट घालून गेले होते. तेथे त्यांनी डाव्या हुतात्मा नेत्यांना श्रद्धांजलीही वाहिली होती. हे सगळे पोलिस माकपचा गढ असलेल्या उत्तर केरळमधून आले होते.
याच राज्यात अट्टापडी नावाच्या जागी मधू नावाच्या आदिवासी युवकाला काही लोकांनी झाडाला बांधून त्याला मारहाण केली होती. तांदळाची चोरी करण्याचा त्याच्यावर आरोप होता. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्विट करताना क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने म्हटले होते, “केरळमध्ये मधूने केवळ एक किलो तांदूळ चोरला होता. यावरूनच उबेद, हुसेन आणि अब्दुलच्या गर्दीने त्या बिचाऱ्या गरीब आदिवासीला मारले. सभ्य समाजावरील हा कलंक आहे. हे घडूनही कोणालाही काहीही फरक पडत नाही, हा विचार करुन मला लाज वाटते.”


त्याहीपूर्वी फेब्रुवारी महिन्यात कन्नूर जिल्ह्यातील एस. पी. शोहेब या कार्यकर्त्याचा खून झाला होता. शोहेब हा तीस वर्षांचा होता. आपल्या मित्रांसोबत तो थांबलेला असताना चौघेजण कारमधून आले. त्यांनी आधी दहशत पसरविण्यासाठी बॉम्ब फेकला आणि त्यानंतर शोहेबवर तलवारीने वार केले, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे. तर शोहेबला माकपच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत होत्या तसेच अलीकडेच त्याला एका खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठविण्यात आले होते, असे त्याच्या वडिलांनी म्हटले होते.


तेव्हाही मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी ही हत्या केल्याचा आरोप कन्नूर काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. मे 2016 मध्ये पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर राज्यात झालेली ही एकविसावी राजकीय हत्या होती. "पोलिसांचे हात बांधले आहेत. निष्पक्ष चौकशी करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे विशेष तपास पथकाची स्थापना करुन त्यामार्फत या प्रकरणाचा तपास करावा," अशी मागणी केरळ काँग्रेसचे अध्यक्ष एम. एम. हसन यांनी तेव्हा केली होती. हे सर्व विस्ताराने सांगायचे कारण म्हणजे यातील कोणीही भक्त किंवा फॅसिस्ट नाही. पण अर्थात ते दिवसही लोकशाहीचे काळे दिवस नव्हते, की त्यामुळे देशातील असहिष्णुतेचा ज्वरही वाढला नव्हता.


रेल्वेत बसण्याच्या जागेवरून किंवा तत्सम किरकोळ कारणावरून मारहाण झाली, की मुस्लिम आणि दलितांना लक्ष्य करण्यात आल्याची बोंब ठोकणारी एक जमात अलीकडे निर्माण झाली आहे. अशा भाडोत्री आक्रोशकर्त्यांसाठी हे एक आव्हान आहे. दम असेल तर याही घटनेवर तेवढीच राळ उठवा, हिंमत असेल तर लालभाईंच्या अत्याचाराविरोधात बोला. येथे एक हत्या झालीय, त्यात दलित बळी पडला आहे...पण हे घडले ते राज्य तुमच्या डोळ्यात सलणारे नाही. ती तुम्ही आपले मानणाऱ्या राज्यात घडली आहे. आता दाखवा तुमचा कैवार आणि दाखवा इमान!

No comments:

Post a Comment