Friday, July 4, 2008

...तर बुशकडे मदत मागणार?

साहित्याचा आणि माझा तसा काही संबंध नाही. तसा म्हणायला पत्रकारितेत असलो आणि मराठी, इंग्रजी व अन्य भाषांमधून सर्रास उचलेगिरी करत असलो, तरी साहित्यविश्वाशी नाळ जोडण्यासाठी ते पुरेसे आहे का, ,याबाबत माझ्या मनात दाट शंका आहे. लेखन तर कोणीही करते, पण जगात महत्वाचे काही असले तर ते आपले व आपले आवडते लेखनच असा आव जो आणतो त्याला साहित्यिक म्हणायची आजकाल प्रथा आहे। त्यामुळे हाकेच्या अंतरावर साहित्य संमेलन होऊनही ते घरात बसल्या बसल्या टीव्हीवर एन्जॉय करण्याचीच आपली साधी मराठमोळी प्रवृत्ती आहे। हो, ऊगाच खोटं कशाला बोला?
माझ्या मते मराठीत दोन प्रकारचे लेखक आहेत। जे सातत्याने सकस लेखन करतात आणि दुसरे आपण साहित्य संमेलनात का जात नाहीत, याची दिसेल त्या व्यासपीठावर चर्चा करतात असे. त्यातील दुसऱया प्रकारच्या लेखकांशी आपली जरा जास्त जवळीक आहे. म्हणजे काय की, आपण कसं चपलेचा अंगठा तुटलेला आहे हे लपवत लपवत आजकालच्या वस्तूंचा घसरलेला दर्जा आणि पायांचे विकार अशी तात्विक चर्चा करतो, तसे हे दुसरे लेखकही करतात. शेजारून जाणारा माणूस आपल्याला ओळख देणार नाही म्हणून संमेलनाच्या मंडपात न येणारे लेखक, संमेलन म्हणजे केवळ वायफळ खर्च आहे किंवा तत्सम सैद्धांतिक बडबड करतात, त्या एका क्षणात कलेसाठी कला का जीवनासाठी कला असे क्षुल्लक वाद निकाली निघतात. जीवन जगताना खोटं बोलण्यासाठी कला, असं त्याला स्वरूप येतं. एक माजी संमेलनाधध्यक्ष शनिवारवाड्याजवळच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला आले असताना वेटरनेही त्यांना ओळखले नव्हते, ही घटना मी डोळ्यांनी पाहिलेली आहे. नंतर अशाच माणसांची “त्यांनी कोणताही बडेजाव न मिरवता सामान्य माणसासारखं जगले, ” अशी प्रशंसा केलेली बघितल्यावर हसू येणार नाही तर काय होणार?

त्यामुळेच यंदा दोन मराठी साहित्य संमेलने घेण्याची तयारी कौतिकराव ठाले पाटील यांनी दाखविली तेव्हा जरा हायसे वाटले. चला, म्हणजे नेहमीप्रमाणे प्रतिनिधींना पास देण्याची, त्यानिमित्ताने त्यांनीही आपल्या नातेवाईकांना जरा ‘गाव’ दाखवायला आणण्याची परंपरा पाळली जाणार तर. आपल्या नेहमीच्या संमेलनाची संयोजन व्यवस्था उत्तम। भिकार असल्याच्या बातम्या देण्याची सोय झाली. (संयोजन व्यवस्थेबाबतच्या बातम्या एकाआड एक वर्षी अनुकूल वा प्रतिकूल देण्यात येत असाव्यात असा मला अनेक वर्षांपासूनचा वहीम आहे. शेवटी संयोजकांना शिव्या देण्याशिवाय किंवा ते बडे राजकीय आसामी असल्यास त्यांची तारीफ केल्याशिवाय मराठीविषयीची आपली कळकळ, संमेलनाला हजर राहण्याची तत्परता आणि स्वभाषेसाठी कोणतेही कष्ट उपसण्याची तयारी कशी समजून येणार?) नेहमीप्रमाणे अध्यक्षांपेक्षा प्रमुख पाहुण्यांचेच भाषण जोरदार झाल्याचा अभिप्राय यंदाही .येणार तर. शिवाय कोणी मराठीचा अधिकाधिक वापर करायला हवा, असं म्हणालं की यांचीच मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात म्हणून रकानेही भरणार. (कोणा कोणाची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात यावर पी. एच.डी करणारे पत्रकार आहेत तसे वाचकांचा पत्रव्यवहारचे नेहमीचे यशस्वी कलाकारही आहेत. जणू काही मराठी माध्यमांच्या शाळेत शिकलेले सर्वच विद्यार्थी सरस्वतीच्या दरबारात नाच करतात.) सामाजिक बांधिलकीच्या नावाने गळा काढत गद्य न रचणाऱया कवींना मान्यता न देण्याच्या या काळात, असे मनोरंजक आणि वास्तवाशी संबंधित नसलेले लेखन प्रसवणारा कोण लेखक आहे आज?

बाय द वे, अमेरिकेत संमेलन होणार त्यामुळे महामंडळाच्या ग्लोबल कळवळुचीही बूज राखली जाणार. अमेरिकेतल्या यजमानांनाही वाईट वाटायला नको. तसं बघायला गेलं तर घरटी एक अपत्य अमेरिकेत वा इंग्लंडमध्ये असणाऱया कोणाही साहित्यिकाने किंवा साहित्यिक संस्थेच्या पदाधिकाऱयांनी या संमेलनासाठी खर्च मागू नये. तिथल्या अन्य संस्थांचा विरोध असलातरी त्याची काळजी करण्याची गरज नाही. आपण इथल्या, देशातल्या कोणाच्या विरोधाची पर्वा करतो का?

ठाले पाटील यांना या निर्णयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी कॅलिफोर्निया आर्टस असोसिएशनच्या पत्राबाबत विचारले. ते म्हणाले, “अमेरिकेतल्याच दोन संस्थांमध्ये काहीतरी अंतर्गत भांडणे आहेत. त्यामुळे त्यांनी ते पत्र पाठविले आहे.” दोन संस्थांमध्ये भांडणे? ही तर मराठी संस्कृती. ठाले पाटील यांना म्हणालो, “म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आधीच तिथे पोचली म्हणायची.” मात्र ते विनोदाच्या मूडमध्ये नसल्याने माझ्या विनोदावर मीच हसून लाज राखली.

दोन संमेलनाच्या निर्णयाचे द. मा. मिरासदार, राम शेवाळकर यांनीही स्वागत केले. मात्र खरी प्रतिक्रिया दिली ती विठ्ठल वाघ यांनी. ते म्हणाले, “साहित्य संमेलन अमेरिकेत घेण्याचा निर्णय म्हणजे आता मराठीबाबत महाराष्ट्रात काहीही करण्यासारखे नाही, असे होईल. मागच्या वेळी सोलापूर संमेलनात ठाले पाटील बेळगावच्या प्रश्नावर अत्यंत कळवळ्याने बोलले होते. आता ते अमेरिकेतील संमेलनात इराक-इराण प्रश्नावर बुश यांची मदत मागणार आहेत का.”

जाता जाताः कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या घोषणेने दोन दशकांपूर्वी महाराष्ट्रात हवा निर्माण केली होती. या संमेलनाच्या निमित्ताने का होईना रत्नागिरी आणि कॅलिफोर्निया एका पातळीवर येतील.
----------------

Friday, June 20, 2008

मूर्ती महान व किर्तीही महान...

माणसाने किती नम्र असावे?. गेल्या दोन दिवसांमध्ये दोन मोठ्या माणसांना भेटण्याची संधी मला मिळाली. (याचे कारण अर्थातच पत्रकारितेचा धंदा!) पण या दोन्ही माणसांना भेटून  त्यांच्या साधेपणाची आणि ऋजुतेची चुणुकच मला पहायला मिळाली. दोन्ही व्यक्तिंबद्दल मी यापूर्वी वाचलेलं, ऐकलं होतं. मात्र त्याची प्रचिती मला इतक्यात मिळेल, असे वाटले नव्हते.


यातील पहिली व्यक्ती म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक आणि सर्वेसर्वा एन. आर. नारायण मूर्ती. मूर्ती यांच्याबद्दल आधी खूपच ऐकलं होतं. आमच्या वर्तमानपत्राच्या सकाळच्या मिटिंगमध्ये मूर्ती आज शहरात आहेत, असं मी सांगितलं. त्यावर साहेबांचा हुकूम आला, की त्यांची एक एक्स्लूजिव मुलाखत घेऊन ये. मी (मनातल्या मनात) कपाळाला हात लावला. आता नारायण मूर्ती म्हणजे पुण्यातील कोणी पत्रकबाज पुढारी नाहीत, की उचलला मोबाईल अन मिळविली प्रतिक्रिया.




आधी मिडिया को-ऑर्डिनेटरला फोन लावला...त्यानं मोघम उत्तर दिल्यावर केवळ नशिबावरच हवाला ठेवला. त्यानंतर ल मेरिदियन या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोचलो. मूर्ती तिथे आलेले आहेत, हे कळाल्यावर जीवात जीव आला. पण त्यांच्यापर्यंत पोचायचे कसे ते कुठल्या सूटमध्ये आहेत, हे आधी शोधून काढले. त्यानंतर दारावरच स्वयंसेवकाने अडविले. पुन्हा प्रतिक्षा. थोड्या वेळाने शेवटी धीर करून आणि निर्वाणीचा उपाय म्हणून त्यांना विचारले, “सर, तुमच्याशी दोन मिनिटे बोलता येईल का?”


“नाही, मला आता वेळ नाही. कार्यक्रम सुरू होत आहे,” मूर्ती यांनी फारशा रुक्ष नसलेल्या स्वरात सांगितले. 


“सर, मग कार्यक्रम संपल्यावर तरी बोलूया,” मी चिकाटी न सोडता म्हणालो.


“नाही, कार्यक्रम संपला की लगेच मला विमान पकडून बंगळूरला जायचे आहे,” मूर्तींनी सांगितले. हा संवाद अर्थातच इंग्रजीत चालू होता. 


त्यानंतर मात्र मूर्ती यांची खास मुलाखत मिळण्याची आशा संपली. मात्र मी कार्यक्रमात बसलो होतो आणि आम्हाला हवं तसं ते मोजकेच मात्र पूरेसे बोलले. खासकरून ‘त्यावेळी आम्ही नऊ रुपयांत पोटभर जेवत असू,’ ही त्यांची आठवण मला खूप भावली. त्यातून आमची एक बातमी पूर्ण झाली.


दुसरे दिवशी कोल्हापूरचे राजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज पुण्यात होते. शिवरायांच्या नावाने आजकाल कोणीही दुकान थाटतो आणि येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळवितो. त्यावर महाराजांचे मत मिळवावे, अशी कल्पना मीच मांडली होती. त्याप्रकारे महाराष्ट्रातील गड किल्ले या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते आलेले आसताना त्यांना गाठण्याची संधी साधली. प्रकाशन समारंभानंतर दोन मिनिटांच्या विश्रामकाळात महाराजांकडे जाऊन त्यांना स्वतःची ओळख सांगितली. मग विषयाला हात घातला. त्यांनीही कुठलेही आढेवेढे न घेता बोलायला संमती दिली.


“महाराज, आजकाल कोणीही उठतो आणि शिवरायांचे नाव घेतो. त्यातून अनेकदा चुकीच्या गोष्टी घडत आहेत. यावर तुमचे मत काय आहे,” मी त्यांना विचारले. 




“शिवराय सर्वांचे आहेत. त्यांचे नाव कोणीही घेऊ शकतो. महाराष्ट्रात शिवरायांना वगळल्यास काय राहते. मात्र त्यातून चुकीच्या गोष्टीही घडत आहेत,” शाहू महाराज म्हणाले. त्यानंतरही आमचे प्रश्नात्तेर चालूच होते. कोणताही त्रागा न करता किंवा रुबाब न दाखविता शाहू महाराज उत्तरं देत होतं. कुठलाही लवाजमा न बाळगता आणि ‘पोझ’ न घेता ते बोलत होते. आदल्याच दिवशी काही सरकारी संस्थानिकांचा आणि मंत्र्यांचा बडेजाव आणि नाटकीपणा पाहणाऱया माझ्यासारख्याला हा प्रकार नवा होता. केवळ आजूबाजूच्या लोकांची गर्दी आणि गडबड वाढत असल्याने आम्हाला ती भेट आटोपती घ्यावी लागली.


अशाप्रकारे दोन दिवसांत दोन मोठ्या माणसांची भेट झाली होती. दोघांच्याही साधेपणाचा ठसा मनावर चांगलाच ठसला आहे. 


Saturday, June 7, 2008

पत्रकाराची प्रतिज्ञा

भारत माझा हल्ल्यांचा देश आहे. सारे हल्लेखोर भारतीय माझे बांधव आहेत. हल्ल्यांनंतर येणाऱया पुळचट प्रतिक्रियांवर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविध, तसेच वांरवार घडणाऱया हिंसक घटनांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा लक्ष्य होऊ नये, यासाठी मी प्रत्येक क्षणी देवाचा धावा करण्याचा सदैव प्रयत्न करीन.

मी माझ्या मालकांचा, राजकीय नेत्यांचा, पोलिस अधिकाऱयांचा व गावगुंडांचा नेहमी मान ठेवीन आणि त्यांच्याशी शक्य होईल तेवढे सौजन्याने वागेन.

माझ्या अवतीभवतीचे गुंड, समाजकंटक आणि टोळ्या यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यांतच माझ्या जीवाचे सौख्य आणि संरक्षण सामावले आहे.

Friday, May 30, 2008

मराठीशी केवळ सख्य…सहवास नको

एका छोट्या शहरातील तितक्याच छोट्या असलेल्या वर्तमानपत्राचे कार्यालय...एक होतकरू व्यंगचित्रकार आपली व्यंगचित्रे घेऊन संपादकाच्या केबिनबाहेर उभा आहे. खूप वेळ वाट पाहायला लावल्यानंतर संपादक महाशय (ज्यांची पदाची एकमेव अर्हता म्हणजे संबंधित वर्तमानपत्राचे मालक असलेल्या राजकारणी व्यक्तीचे ते क्लासमेट...वर्गमित्र आहेत!) आत बोलावतात. सगळी व्यंगचित्रे पाहिल्यानंतर आणि त्यांच्यावर आपल्या मगदुराप्रमाणे भाष्य केल्यानंतर ते प्रवचनबाजीकडे वळतात...

“टाईम्स ऑफ इंडियातील कार्टून पाहात जा. आर. के. लक्ष्मण बघा कसे अगदी फर्स्ट क्लास कार्टून काढतात. व्यंगचित्रात रेखाटनासोबतच कल्पनाही अगदी उत्तम असल्या पाहिजेत. लक्ष्मणना त्यासाठी मानायलाच पाहिजे...,” संपादक महाशयांची रसवंती अशीच चालत राहायची. दोन-तीनदा त्यांच्या केबिनमध्ये आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांची प्रशंसा ऐकल्यानंतर व्यंगचित्रकार एकदा थेट मालकांशी संपर्क साधतो. त्यांच्या राजकीय परिस्थितीला अनुकूल असलेले एक व्यंगचित्र निवडून मालक ते छापायला देतात अन ते छापूनही येतं.

सुमारे १३ वर्षांनंतरच्या या घटनेनंतर आजपर्यंत मला त्या व्यंगचित्राचे मानधन मिळालेले नाही. संपादक महाशय मला लक्ष्मण यांचे उदाहरण देऊन थकले मात्र लक्ष्मणना टाईम्स ऑफ इंडिया फुकट राबवून घेत नाही, हे तेव्हा वर्तमानपत्रांच्या धंद्यात नसलो तरी मला कळत होतं. शेवटी मराठीतील व्यंगचित्रांचा नाद सोडून मी जीवनाचे अन्य प्रांत धुंडाळत फिरलो. त्यात एक-दोनदा संस्कृतमध्ये व्यंगचित्रेही काढली आणि ती विनासायास प्रकाशितही झाली!

पोटासाठी अनेक उद्योग केल्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा वर्तमानपत्रांच्याच जगात प्रवेश झाला. मात्र यावेळी भाषा आणि भूमिकाही बदलली होती. ‘आज का आनंद’मध्ये काम करत असताना पत्रकारितेचा आनंद मिळायचा मात्र मराठीत काम करण्याची इच्छा मात्र उसळी मारत होती. खरं तर तशी निकड कोणतीही नव्हती आणि मला हिंदी येत नसल्याची मालक, मुद्रक, प्रकाशक आणि वाचकांचीही तक्रार नव्हती. तरीही काही जणांना नसते उपद्व्याप करण्याचा जीवघेणा छंद असतो. त्यामुळे मराठीत काम करण्याची हौस भागविण्यासाठी केसरीत गेलो. लोकमान्यांचे वर्तमानपत्र म्हणून केसरीबद्दल मला तेव्हा आदर होता. केसरीत गेलो नसतो तर तो, तसेच लोकमान्यांबद्दलचाही आदर तसाच टिकला असता. त्याचे सहानुभूतीत रुपांतर झाले नसते. बिन पगारी फुल अधिकारी हा काय प्रकार असतो ते केसरीत काम करत असताना पहिल्यांदा कळाले. पोटभर पगार आणि मनमुराद काम, ही आपली साधी अपेक्षा. त्याची फलश्रुती इथे पोटापुरता पगार आणि मणभर काम, अशी झालेली होती.

त्यानंतर पुण्यातील सर्वात मोठ्या मराठी वर्तमानपत्रात प्रवेश झाला. आता तरी इतरांसारखा पगार मिळेल, असे काही काळ वाटले. मात्र आपल्याला जे वाटते त्याच वास्तवाशी संबंध असायलाच हवा, असे नाही, हे मला इथे कळाले. शिवाय या लेखाच्या आरंभी सांगितल्याप्रमाणे, टाईम्स ऑफ इंडियाचे संदर्भ जोडीला होतेच. शासकीय कर्मचाऱयांना ज्याप्रमाणे हस्तपुस्तिका वाटलेल्या असतात, तसे टाईम्स ऑफ इंडिय हे मराठी वर्तमानपत्रांची हस्तपुस्तिका आहे. मात्र ते केवळ कामाच्या बाबतीत...पगाराच्या नव्हे. पगारासाठी रेफरन्स पॉइंट हा केसरी किंवा प्रभात हाच. तुमच्याकडे किती कौशल्य आहे, तुम्हाला काम काय येतं या मुद्यांना काहीही किंमत नाही. तुम्ही मराठीत काम करत असाल तर तुम्हाला तेवढाच पगार मिळणार. शिरीष कणेकर यांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे, “लोकमान्य-आगरकर कशी पत्रकारिता करायचे हे सगळेच सांगतात, ते काय खायचे हे कोणीच सांगत नाही.”

त्यामुळे आता खाण्यासाठी मिळेल, इतपत मिळेल अशा जागी आलो आहे. तात्पर्य एवढेच, की आता मी पुणे मिरर या इंग्रजी दैनिकात रुजू झालो आहे. त्याचमुळे काही कारणांनी नवीन पोस्ट टाकायला उशीर झाला...पण आता नियमित नक्की!

Saturday, January 5, 2008

चला मिटिंग मिटिंग खेळू...

करंद हा तसा सज्जन माणूस. त्याच्यासारखा सज्जन माणूस संपूर्ण शहरात सापडायचा नाही. कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. त्यामुळे होतं काय, की त्याच्या शेजाऱ्यांनाही त्याचं नाव माहित होत नाही. सालस तर एवढा, की लोक त्याच्या चारित्र्याचे उदाहरण आपल्या नादावलेल्या मुलांना आदर्श म्हणून देत. अन्‌ ती मुलं दिवसातील चोवीसपैकी सोळा ते सतरा तास त्याच्या नावाने खडी फोडत. मकरंदच्या गल्लीतच काय, तो गल्लीबाहेर निघाल्यावरही त्याच्या नजरेला नजर देण्याची टाप बाया-मुलींना होत नसे. तो दिसला की बाया आपला पदर नीट करत आणि मुली आपल्या ओढण्या सावरून घेत. इतका आसपासचा परिसरात त्याचा दरारा होता.

असा सदाचारी माणूस असतो तसाच मकरंदही निर्व्यसनी होता. त्याला कधी कोणी चहा पिताना अथवा चहाचे पैसे देतानाही पाहिले नव्हते. दारूची तर गोष्टच दूर. त्याच्यावर खार खाणारे म्हणत, की ऑफिसमध्ये फुकटात मिळणारा चहा पिऊनच तो आपली तल्लफ भागवत असे. राहता राहिली दारूची गोष्ट, तर दररोज हॉटेल किंवा बारचे पैसे चुकते करणारा मित्र कोणाला मिळणार? त्यामुळेच त्याचे दारूचे प्रमाण नियंत्रणात होते, अशीही एक वदंता होती. असो. लोकं काहीबाही बोलणारच. 'तत्को नाम सुगुणिनां यो दुर्जनैनाङ्कितः?' तर असा हा सत्ययुगातून थेट कलियुगात टपकलेला मकरंद नामे प्राणी जगतो कसा, हा कुतुहल निर्माण करणारा प्रश्‍न होता. त्या प्रश्‍नाचे उत्तर देण्याएवढी सवड शहरवासियांना नव्हती, म्हणून त्याचे बरे चालले होते म्हणायचे.

अशा या सुखी प्राण्याला व्यसन एकच, व्यसन कसले it was his passion, अन्‌ ते म्हणजे मिटिंगचे! तसा तो एका वर्तमानपत्रात कामाला होता, अन्‌ सध्याच्या कार्यालयात येण्यापूर्वी तसा तो अन्य द्विपाद प्राण्यांप्रमाणेच होता. दिवसभर काम करावे आणि घरी जावे, असा माणसासारखा त्याचा दिनक्रम होता. मात्र सध्याच्या कार्यालयात तो आला आणि त्याचे जीवनच बदलले. पूर्वी "आली लहर केला कहर,' असा बाणा हाडीमासी खिळलेला मकरंद आता "चर्चेने होत आहे रे, आधी चर्चाच पाहिजे,' अशा सैद्धांतिक भूमिकेपर्यंत आला होता. कार्यालयातील काम असो अथवा जीवनातील छोटा-मोठा निर्णय, तो सर्वांनी एकत्र बसून आणि चर्चा करूनच सोडविला पाहिजे, यावर त्याची ठाम श्रद्धा होती. त्यानुसार सोसायटीच्या मिटिंगपासून विविध चर्चासत्रापर्यंत जेथे म्हणून तोंड उघडता येईल, तेथे तोंड घालण्याची त्याने सवयच अंगी बाणवली होती.

एक बरं होतं, मकरंदचं लग्न आधीच झालेलं होतं. नाहीतर त्याने मुलगी पाहायला एक, साखरपुड्याला एक, कपडे खरेदीला एक, लग्नाआधी एक अशा मिटिंगांचा बारच उडविला असता. 'आधी लगीन मिटिंगचे, मग माझे' अशी त्याने गर्जनाच केली असती. मात्र तो या कार्यालयात आला आणि तो मकरंदराव ऐवजी मिटिंगराव झाला. त्यामुळे दर दोन दिवसांनी एखादा नवा प्रसंग उद्‌भवला, की सासरवाडीच्या माणसांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करायची, हा त्याचा नित्यक्रम झाला. सासरवाडीच्या माणसांना जावयाचे हे खूळ पसंद नसले, तरी ते काही करू शकत नव्हते. त्यामुळे ते मुकाट्याने चर्चेला तयार होत. मकरंदच्या या मिटिंगवेडाचा सर्वात मोठा फटका त्याच्या बायकोला बसला होता. नाही, म्हणजे दुसऱ्या घरातील बायका बडबड करायच्या आणि नवरे मुकाट ऐकायचे, इकडे मात्र मकरंदही बडबड करायचा आणि तिलाही बोलायला लावायचा, याचं शल्य तिला नव्हतं. तिचं दुःख वेगळंच होतं. मिटिंग आणि चर्चेच्या नावाखाली मकरंदची असंबद्ध बडबड तिला ऐकावी लागत होती. बरं त्याला विषयाचीही मर्यादा नव्हती.

एखाद्या दिवशी तिच्या हातून चहात कमी साखर पडली, तरी तिला सांगता यायचं नाही. कारण एकदा तिने असंच म्हणून दाखवलं, तर मकरंद म्हणाला, "चहा करण्यापूर्वी तू चर्चा का करत नाहीस? त्यामुळं नक्की किती साखर टाकायची, याचा तुला अंदाज येईल ना!''

ती साध्वी काय बोलणार? मकरंदची हौस सर्वाधिक फिटायची ती त्याच्या कार्यालयात. त्याच्या कार्यालयातच चर्चेची संस्कृती भिनलेली असल्यामुळे. "काम कम, बाते ज्यादा,' असा प्रकारच नव्हता. मोबाईलची रेंज मिळत नाही यापासून ते उद्या कोणत्या ड्यूटीला यायचं, यातील कोणत्याही विषयावर त्याच्या कार्यालयात मिटिंग भरू शकते. या वातावरणात त्याला इतकं बरं वाटतं, की कधीकधी आपण आयुष्यभर दिवस-रात्र कार्यालयातच रहावं, असं त्याला वाटतं. अर्थात त्याचीही गंमत आहे. या मिटिंगमुळे आणि चर्चेच्या फेऱ्यांमुळेच आपल्या संस्थेचं बरं चालू आहे, असे सर्वच मिटिंगरावांना वाटायचे; तर हे लोकं मिटिंगमुळे गुंतल्यामुळेच आपले काम चांगले करता येते, असा त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे.

एका संध्याकाळी मकरंदची बायको लाडात आली.

"अहो, आपण कित्येक दिवसात बाहेर फिरायला गेलो नाही, चला ना आज जाऊ,'' ती म्हणाली.

अर्थात ही नांदी दुपारच्या वेळेस झाली होती. त्यावर बरीच भवती न भवती झाल्यानंतर बाहेर पडायला संध्याकाळ होणार, याची तिला खात्री होती. तिच्या या विश्‍वासाला मकरंदनेही तडा जाऊ दिला नाही. सायंकाळी सूर्य अस्ताचलाला जात असताना हे जोडपे अंधारलेल्या रस्त्यावर अवतरले. बागेत जरा फिरणे वगैरे (म्हणजे वगैरेच जास्त) झाल्यावर दोघांनी प्रथेप्रमाणे काही खाद्यपदार्थ पोटात ढकलले. मकरंदच्या बायकोला खूप दिवसांचा बॅकलॉग भरून काढायचा होता. त्यामुळे एका बाईची साडी चांगली आहे, एक मुलगी जरा "ओवर'च वागतेय, तिच्या भावाला अमेरिकेत जाण्याची संधी मिळतेय अशा अनेक गोष्टी मकरंदला नव्यानेच कळाल्या. मकरंदचं मात्र चित्त थाऱ्यावर नव्हते. त्याला आठवण येत होती त्याच्या मिटिंगची. एकावर एक कडी करणाऱ्या (आणि प्रचंड शिळ्या कढीलाही ऊत आणणाऱ्या) चर्चा त्याच्या डोळ्यासमोर फेर धरत होत्या. बिचारा! तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करत होता. बागेच्या फाटकातून मकरंद आणि त्याची बायको बाहेर पडतच होते, त्यावेळी तिथे एक रिक्षा भर्रकन आली आणि तिथेच उभ्या असलेल्या एका व्यक्तीला जाऊन धडकली. अंगाने कृश आणि चेहऱ्यावर दयनीय भाव असलेला तो माणूस भेलकांडत एकीकडे गेला आणि तिथेच कोसळला. त्याच्या पायाला काहीशी जखम झाली होती. मकरंदने हे दृश्‍य पाहिले आणि त्याच्या तोंडून स्वाभाविकच "अरे,' असा उद्‌गार निघाला.

इकडे अशा प्रसंगी होते तसेच दृश्‍य निर्माण झाले. बागेबाहेरच्या हातगाड्यांवर इतका वेळ काहीबाही खात असलेला जमाव रिक्षाचालकावर तोंडसुख घेण्यास सरसावला. एक दोन तरुणांनी त्याची गचांडीही धरली. काहीजण कोपऱ्यात पडलेल्या व्यक्तीला उठविण्यास धावले. बघता बघता जमाव जमा झाला आणि बाचाबाची सुरू झाली. त्याचक्षणी...होय, त्याच क्षणी मकरंदचा डावा डोळा फडकू लागला. आता आपल्याला काही एक भूमिका निभावयास मिळणार, अशी त्याची खात्री पटू लागली. तोही त्या जमावात शिरला.

"मारो साले को,'' एक "नऊ ते पाच' कॅटॅगिरीतला चाकरमानी रिक्षावाल्याकडे पाहून ओरडला. इतर वेळी रिक्षातून उतरताना तोंडातल्या तोंडात "मीटर आजकाल जास्तच जोरात पळतं यांचं,'' असं म्हणणारे माणसं गर्दीत एकदम "गिअर'मध्ये येतात. त्याच्या वाक्‍यासरशी एक दोघांच्या तोंडून मराठी आणि हिंदीतील एकत्रित विदग्ध रसवंती ओसंडून वाहू लागली. भांडण आणि फुकटचा तमाशा म्हटले, की काही लोकांच्या प्रतिभेला प्रचंड बहर येतो. तसा तो इथेही आला आणि सारेच वातावरण मोहरून गेले.

"ए xxx, उसको भरपाई दे,'' एक होतकरू "अँग्री यंग मॅन' वसकन रिक्षावाल्यावर ओरडला. आता मकरंदच्याने राहवणार नव्हतं. त्याला आता एंट्री घ्यावीच लागणार होती. त्याने आवाज टाकला, "अरे, थांबा थांबा, असं एकदम घायकुतीवर येऊ नका. आधी चर्चा करा. संयम पाळा. चूक कोणाची हे आधी ठरवा.''

त्याच्या या वाक्‍याने एकदम शांतता पसरली. हा "राणीच्या बागे'तील आयटम बागेबाहेर कसा आला, या अर्थाने काहीजणांनी त्याच्याकडे नजरा फेकल्या. "ए चूप बैठ,'' मकरंदने आजपर्यंतच्या एकाही मिटिंगमध्ये न ऐकलेलं वाक्‍य एका टारगटानं उच्चारलं. त्यामुळे इथल्या चर्चेचा अजेंडा काही वेगळाच आहे, हे त्याच्या लक्षात आलं.

"हे बघा, आपण एक मिटिंग घेऊ. त्यात चूक कोणाची हे ठरवू,'' त्याने पुन्हा आपला मुद्दा रेटला. काही मुद्दा नसतानाही काहीतरी बोलायचं म्हणून अर्धा अर्धा तास बोलायचे प्रयोग त्याने अनेक मिटिंगमध्ये केले होते. त्यामानाने हे काहीच नव्हतं.

"ए सूट बूट, जा इथून, नाहीतर तूच मार खाशील,'' पुन्हा कोणा अज्ञात इसमाने त्याला इशारा दिला. हे चालू असताना कोपऱ्यात भेलकांडलेला इसम बऱ्यापैकी भानावर आला होता. पाचशे वगैरे रुपयांची कमाई करण्याची संधी त्याला चालून आली होती. या "मिटिंगखोरा'मुळे ती संधी आता जाणार, अशी साधार भीती त्याला वाटू लागली. त्याने हळूच संधी साधून जोराने कण्हण्याचा अभिनय केला. त्यामुळे जमावाची सहानुभूती पुन्हा त्याच्याकडे वळली.

"बघा, तो किती कण्हतोय. त्याला डॉक्‍टरकडे नेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, मग ठरवू आपण काय करायचे ते. वाटल्यास या रिक्षावाल्याचा नंबर आपण घेऊन ठेवू,'' तो म्हणाला. आता मात्र जमावाचा संयम ढळू लागला. भेलकांडलेल्याला पाचशे रुपये मिळवून देऊन त्याच्याकडून शंभर रुपये कमिशन काढायचा विचार होतकरु "अँग्री यंग मॅन'चा होता. तो सफल होण्याची शक्‍यता मावळणे त्याला परवडणारे नव्हते.

"साला, ये साहब लोगही ट्रॅफिकका प्रॉब्लेम करते है,'' त्याने डरकाळी फोडली. त्यामागची आर्तता त्याला आणि भेलकांडलेल्यालाच ठाऊक होती. तो आवाज विरतो न्‌ विरतो तोच त्याचा हात खाली येताना मकरंदला दिसला आणि पुढच्याच क्षणी त्याच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. मुसळधार पावसाच्या धारांप्रमाणे जमावाचे हात त्याच्यावर कोसळू लागले. जमावाच्या मागे उभी असलेली बायको बिचारी तगमग करत उभी होती, मात्र त्याचा काही उपयोग नव्हता. मकरंदच्या तोंडातून शब्द फुटणार नाहीत, या अवस्थेत येईपर्यंत त्याला बेदम मारल्यानंतर जमावाने रिक्षावाल्याला घेरले. रिक्षावाल्याने आयुष्यात कधी मिटिंग घेतलेली नसल्यामुळे त्याला तडकाफडकी निर्णय घेणे शक्‍य होते. चर्चेच्या गांधीमार्गापेक्षा पाचशेचे गांधीबाबा अधिक प्रभावी ठरतात, हे शहाणपण त्याच्याकडे होते. ते अनाठायी नव्हते. त्यामुळे लगेच जमाव पांगला.

भेलकांडलेला आणि होतकरु "अँग्री यंग मॅन' मिळून कुठंतरी गेले. ओठांतून रक्त येत असलेला आणि डोळ्यांखालचा भाग काळानिळा झालेला मकरंद झोकांड्या खात होता. त्याची बायको जवळ आली. तिने त्याच रिक्षावाल्याला दवाखान्यात जाण्याची गळ घातली.

"मॅडम, इसका तो पुलिस केस होगा,"? त्यानेही "धंदा' ओळखला. शेवटी पाचशे रुपये देते, म्हटल्यावर तो तयार झाला. त्यानतंर दवाखान्यात मकरंदला ओळखपट्टी करण्यात आली. या घटनेला आता पंधरा दिवस होत आहेत.?मकरंद आता बोलावं तिथंच बोलतो आणि शांत रहावं तिथं शांत राहतो. अलिकडे तर कधी तो बाथरुममध्ये आंघोळ करत असतो, बाहेर टीव्ही चालू असतो. त्यावर गाणं लागलेलं असतं, "राया चला बागामधी, रंग उडवू चला...'

मकरंद ते ऐकून म्हणतो, "राया चला ऑफिसमधी, मिटिंग खेळू चला....''

Friday, January 4, 2008

नववर्षाचे आगळे अभिनंदन


नववर्षाच्या स्वागतदिनी आपल्यापैकी बहुतेकांना आलेला अनुभव. फ्रेंच व्यंगचित्रकार शपाते याने ते अचूक पकडला आहे. मला आवडलेले हे अलिकडचे सुंजर व्यंगचित्र!

Tuesday, January 1, 2008

काही शुभेच्छा आणि काही संकल्प

शुभेच्छा...




...अन संकल्प
राखी सावंतचा संकल्प ः यंदा कोणत्याही वाहिनीवरील कोणत्याही कार्यक्रमात भाग घेणार नाही. सह्याद्री वाहिनीवर राखीपौर्णिमेनिमित्त होणाऱया कार्यक्रमाचा अपवाद वगळता ती छोट्या पडद्यावर दिसणार नाही तसेच कोणत्याच वाहिनीवर आरोपही करणार नाही.

भारतीय क्रिकेट संघाचा संकल्प ः ऑस्ट्रेलियाशी ऑस्ट्रेलियातच काय, जगाच्या कुठल्याही खेळपट्टीवर दोन हात करून त्यांचा पराभव आम्ही करू, हे केवळ तोंडानेच म्हणणार नाही तर कृतीतूनही सिद्ध करू.

नारायण राणे यांचा संकल्प ः मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदात काडीचाही रस नसून केवळ मराठी जनेतेची सेवा करण्यातच मी माझी हयात खर्च करणार आहे, अशी घोषणा करेन. विशेष म्हणजे त्या घोषणेवर किमान चार आठवडे अंमलही करेन.

गोपीनाथ मुंडे यांचा संकल्प ः या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार उरलेला नाही, हे वाक्य वर्षभरात तोंडातून चुकूनही काढणार नाही.

मराठी कलावंतांचा संकल्प ः तीस-चाळीस वर्षांपूर्वीच्या गाण्यांचेच कार्यक्रम करण्याऐवजी लोकप्रिय होतील असे गाणे रचून तेच सादर करू.मराठी चित्रपट निर्मात्यांचा संकल्प ः नवीन मराठी चित्रपट मुंबईसह महाराष्ट्रात एकाचवेळेस प्रदर्शित करू. त्यांच्या कथा जुन्या हिंदी चित्रपटांवरून घेतलेल्या नसतील आणि माझी विनंती आहे, की या चित्रपटांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, अशी दिग्दर्शक-कलावंतांना विनंती न करण्यास लावणार नाही. तरीही हे चित्रपट धो-धो चालवू.

मराठी साहित्यिकांचा संकल्प ः साहित्य हे संमेलन (मेळावा) घेऊन वाद घालण्यासाठी नसून वाचकांना मिळतील, परवडतील आणि वाचावीशी वाटतील अशी पुस्तके लिहिण्यासाठी आहे, हे एकमताने मान्य करू. म. द. हातकंणगलेकर यांच्या समीक्षेची लंडनच्या गल्लीगल्लीतही सटीप चर्चा चालू असते, असे मीना प्रभू यांच्याकडून वदवून घेऊ. त्यानंतर सहा महिन्यांनी प्रभू यांच्या लिखाणात ग्लोबल लोकमान्यता मिळविण्यासाठीचे गुण असतील, अशी कबुली हातकणंगलेकर यांच्याकडून घेऊ. विशेष म्हणजे केवळ या दोघांच्या मतांनाच किंमत देण्यात येत आहे, असा सूर अन्य उमेदवारही काढणार नाहीत.

मराठी जनतेचा संकल्प ः आणखी एक दोन मराठी व्यक्ती आंतरराष्ट्रीय बँका आणि कंपन्यांच्या प्रमुखपदी विराजमान झाले तरी त्यामुळे मराठी अस्मिता धोक्यात आल्याचे कोणालाही वाटणार नाही. तसेच त्या व्यक्तींचे अभिनंदन करतानाच ब्रेन ड्रेनमुळे भारताचे नुकसान कसे होते, यावरही कोणी प्रवचन देणार नाही. परप्रांतीय लोकांविरोधात कितीही बोंबाबोब केली तरी आपण स्वतः काम करणे, हाच त्यावर उपाय असल्याचे मराठी लोकांना कळून येईल. काही मराठी व्यक्ती अगदी परप्रांतांत जाऊनही नोकरी-व्यवसाय करण्याचा निर्धार करून तो पाळतीलही.

मराठी वृत्तपत्रांचा संकल्प ः पाकिस्तानशी मैत्री, विश्वबंधुत्व या गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी त्यासाठी महाराष्ट्रातील मराठी जनतेने जीवंत राहिले पाहिजे, हे जाणून घेऊ. त्यानुसार धोरणात बदल करू.
कंपन्यांचा संकल्प ः आता कोणतीही मराठी वृत्तवाहिनी सुरू होणार नाही व त्यावर चार तास बातम्या आणि बाकीचे वीस तास बॉलिवूडचे लफडे, भविष्यकथन, हेल्थ टिप्स अशा वायफळ गोष्टींवर खर्च करणार नाही.
----------