Friday, October 3, 2008

चल भाऊ, डोकं खाऊ!

मी पुण्यात राहतो. आता खरं तर हे आपणहून सांगायची गरज नाही. कारण कोणतीही व्यक्ती इतरांना न कळालेली गोष्ट आपल्याला कळाली आहे अशा आविर्भावात सांगू लागला, की तो एकतर पुण्यात राहतो किंवा केव्हा ना केव्हा पुण्याचं पाणी चाखलेला आहे हे लक्षात येतं. पुण्यात राहणार्‍या प्रत्येकाला नागरिकत्वाचा दाखला मिळो न मिळो, पण शहाणपणाचा मक्ता मिळालेला असतो हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट नाही तरी शनिवारवाड्याइतके उघड खचितच आहे.
तर अशा या शहाणपणाच्या पुण्यनगरीत अन्य लोकांना असतात तशाच सवयी मलाही आहेत. 'अभिमानाने सांगाल रांगेत उभे राहून या हॉटेलमध्ये जेवलो,' हे माझही ब्रीद आहे. 'ज्ञान मिळविताना असे मिळवा की आपल्या कधी मॄत्यू येणारच नाही, पुण्य करताना असा विचार करा की आपल्याला उद्याच मॄत्यू येणार आहे,' असं एक संस्कॄत वचन आहे. त्यात बदल करून मी असं वागतो, की 'जेवण करताना मी असं करतो की आपल्याला उद्याच मरण येणार आहे आणि जगाला उपदेश देताना असा देतो, की जगाच्या सुरवातीपासून मी येथे एकटाच शहाणा आहे.' तास तासभर दरवाजाजवळ 'ताट'कळत उभे राहिल्याशिवाय माझं पोटच भरत नाही. आणि एकदा का पोट भरलं की अख्ख्या जगाला फुकटची शिकवणी देण्याची जी मजा आहे, ती अन्य कशात आहे काय?

असं एकूण बरं चाललं असलं तरी आपण जास्त खातो की काय, अशी एक शंका मनाला चाटून जात होती. सांगणारे असंही सांगतात, की मी जगण्यासाठी खात नसून खाण्यासाठी जगत असतो. अन त्या खाण्याची रेंजही मोठी आहे. मात्र माझ्या या भूकेला आता शास्त्रीय आधार मिळाला आहे. मी माझ्या आयुष्यासाठी, वैयक्तिक फयद्यासाठी खावखाव करत नसून त्याचा माझ्या कौतुकास्पद बुद्धिमत्तेशी थेट संबंध आहे, असं शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यांच्या मते, बौद्धिक काम करणारी माणसं अधिक खातात. माझ्यावर खार खाऊन असणार्‍या लोकांच्या हे संशोधन पचनी पडणार नाही, हे मला पक्कं ठाऊक आहे। मात्र कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहतो थोडाच? आता शास्त्रज्ञांनी आणखी एक उपकार करावा। त्यांनी बुद्धिमान माणसे आळशी असतात असाही एक शोध लावावा. दिवस रात्र बसून राहणारी, कोणतंही काम व करणारी आणि आराम करायला मला वेळ पुरत नाही, अशी तक्रार अभिमानाने करणारी जी मोजकी मंडळी आहेत, त्यांची बुद्धिमत्ता इतरांपेक्षा जास्त असते, असा निष्कर्ष काढणारे एखादे संशोधन त्यांनी करावे, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी लागेल तितक्या वेळा सँपलिंग करण्यासाठी इतरांना सांगण्याचे माझी तयारी आहे। म्हणजे कसं, माझी प्रोफाईल पूर्ण होईल.

Sunday, September 28, 2008

वाघनखांचा शिर ‘पेच’

इंग्रजी पत्रकारितेत आलो, तेव्हा कोणत्या बातम्या कराव्या लागतील किंवा मी करेन, याबाबतीत इतरांइतकीच मलाही शंका होती. मात्र गेल्या महिन्यात मी दिलेल्या दोन बातम्यांमुळेच मला स्वतःला मी करत असलेल्या कामाबाबत अभिमान वाटत आहे। पहिली बातमी विंचूरकर वाड्याच्या बाबत होती. माझी गेली पोस्टही त्याचसंबंधात होती. ती बातमी पुणे मिररमध्ये आल्यानंतर मुंबई मिररनेही छापली. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा त्यात उल्लेख असल्याने त्यांनी या वृत्ताची दखल घेतली. ते स्वतः गणेशोत्सवाच्या काळातच पुण्यातील विंचूरकर वाड्यात येऊन गेल्याचे मला कळाले. तेव्हा त्यांच्याकडे यासंबंधात फॉलो-अपसाठी विचारणा करण्याची जबाबदारी साहजिकच येऊन पडली.

विविध मार्गांनी आर. आर. आबांशी संपर्क साधल्यानंतर, यथावकाश मूळ बातमीचा इम्पॅक्टही छापला. त्याचवेळेस आणखी एक मोठी बातमी माझ्या हाताला लागली. ती म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न चालू असल्याची.

आता ही बातमी मूळातच एवढी मोठी होती, की ती अगदी व्यवस्थित तयारी करून, सर्व माहिती करून आणि खातरजमा करूनच द्यावी लागणार होती। त्यामुळे आधी लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून आधी यासंबंधात माहिती मागवली. ‘कदाचित शिवाजी महाराजांची असणारी वाघनखे आमच्या संग्रहात आहेत. ती प्रदर्शनासाठी पाठविण्याबात आम्हाला विनंती करण्यात आली आहे. सुरक्षेची खात्री पटल्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ,’ असे त्यांचे उत्तर आले. अर्धे काम त्यात फत्ते झाले!

आता जबाबदारी होती आबांना स्वतःला विचारण्याची. त्यासाठी त्यांना फॅक्स केला, फोन करायचा प्रयत्न केला मात्र उत्तर काही आले नाही. त्यावेळी गणेशोत्सव चालू असल्याने साहेब गणपती पहायला गेले आहेत, असे त्यांचे कर्मचारी सांगायचे. (होय, असंच सांगायचे.) शेवटी जलसंपदा विभागातील यांत्रिकी विभागाच्या कार्यक्रमासाठी आबा येणार आहेत, असे कळाले तेव्हा तिथेच त्याना गाठायचे ठरविले. त्याच कार्यक्रमाच्या संबंधात मानार हाऊसची एक बातमी दिलेली असल्याने तिथंही अर्धे काम झाले होतेच.

त्या कार्यक्रमात तानाजी खोत याच्यासोबत नेट लावून बसलो. चार मंत्र्यांची बडबड, एका राजकीय कार्य़कर्त्याची चापलूसगिरी आणि काही सरकारी अधिकाऱयांची लाचारी सहन केल्यानंतर आबा व्यासपीठावरून उतरताना त्यांना गाठले. पाऊस मी म्हणत होता आणि इकडे आमच्या बातमीदारीचा कस लागत होता. कार्यक्रमाला आलेल्या अन्य सात-आठ बातमीदारांना झुकांडी देऊन, एकदाचा आबांचा कोट आम्हाला मिळाला.

“प्रस्ताव दिला होता त्यांना. आम्ही सुरक्षा पुरवावी अशी त्यांची मागणी आहे. ती फाईल चार दिवसांपूर्वी माझ्याकडे आली आहे,” आर. आर. पाटील म्हणाले आणि आमचे घोडे गंगेत न्हाले (म्हणजे शेजारून वाहणाऱया मुळा नदीत) नंतर जेवणावर ताव मारला तरी पोट आधीच भरले होते.

त्यानंतर इतिहास तज्ज्ञांना विचारावे, तर बाबासाहेब पुरंदरे अमेरिकेला गेलेले. त्यामुळे त्यांच्या आधीच्या एका लेखातूनच माहिती घेतली. निनाद बेडेकर यांना फोन केला तर त्यांचे म्हणणे असे, की शिवाजी महाराजांनी अफझलखानाला वाघनखांनी नव्हे, तर तलवारीने मारले होते. कवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभूषषण ग्रंथात ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराजांची वाघनखे आहेत, याचेही ठोस पुरावे नसून, नंतरच्या बखरींनी वाघनखांचा उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले. हा एक नवाच पेच निर्माण झाला होता. होता म्हणजे आहे. त्यात विकिपेडियावर शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे म्हणून जे छायाचित्र आहे, ते म्हैसूरचे असल्याचे त्या फलकावर लिहिले आहे.
विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाने ते छायाचित्र खरे आहे अथवा नाही, याबाबत काहीही भाष्य केलेले नाही। मात्र मूळ वाघनखांचे छायाचित्र मला पाठविल्याचा मेल पाठविला. पण त्यात छायाचित्राची लिंक नाही. संग्रहालयाच्या संकेतस्थळावर शोध घेतला असता वाघनखांचे (टाईगर क्लॉ) एक वेगळेच छायाचित्र दिसते. मात्र त्यात महाराष्ट्र किंवा शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही. असा हा घोळ आहे. अन तरीही, वाघनखांची बातमी ही माझ्या पत्रकारितेचा शिरपेच आहे!

Tuesday, September 2, 2008

विंचूरकर वाड्याची दुरवस्था

वघ्या महाराष्ट्रात आज गणेशोत्सव साजरा होत आहे. उत्साहाच्या या काळात, ज्या ठिकाणी या उत्सवाने बाळसे धरले, जेथे तो वाढला ती जागा मात्र आज दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाची बळी ठरत आहे. बहुतेकांना तर या जागेचे महत्त्वही माहित नाही. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेली ही वास्तु अगदी मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभी आहे.

विंचूरकर वाडा ही तशी पेशवेकालीन वास्तु. पेशव्यांच्या सरदारांपैकी असलेले विठ्ठ्ल शिवदेव यांनी बांधलेला हा वाडा सुमारे १६,००० चौ। फुट आकाराचा आहे. लोकमान्य टिळक येथे १८९२ पासून १९०७ पर्यंत राहत होते. याच काळात लोकमान्यांनी १८९४ साली पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. लोकमान्यांच्याही आधी भाऊ रंगारी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गणपतीची स्थापनी केली होती. मात्र त्याला सार्वजनिक आणि सुसंगत रूप मिळाले लोकमान्यांमुळे. त्यावेळी लोकमान्य टिळक कायद्याच्या विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग घेत असत. त्यामुळे या गणपतीला 'लॉ क्लासचा गणपती' म्हणून ओळखले जात असे. लोकमान्य गायकवाड वाड्यात जाईपर्यंत येथेच सार्वजनिक गणपती बसत असे.

आज मात्र हा वाडा अगदीच दुर्लक्षित अवस्थेत उभा आहे। गेल्या वर्षी महाराष्ट्राचे घोषणाशूर गॄहमंत्री आर। आर. पाटील यांनी या वाड्याला भेट दिली होती. त्यावेळेपासून या वाड्याबद्द्ल मला उत्सुकता होत्ती. त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात आम्ही या वाड्याला भेटही दिली होती. तेव्हा तिथली अवस्था पाहून मन जरा खट्टूच झाले. त्यामुळे यंदा बातमी करण्याची संधी मिळाली, तेव्हा या वाड्यावर मी लक्षच ठेवून होतो. बातमी करण्यासाठी गेलो तेव्हा कळाले, की वाड्याचा ताबा मुळात या गणेश मंडळाकडे नाहीच आहे. 'लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट' या मंडळाला गणपतीच्या केवळ दहा दिवसांसाठी ताबा मिळतो. इतर वेळी खादी ग्रामोद्योग मंडळाकडे हा ताबा असतो. या मंडळाचे कर्मचारी सामान ठेवण्यासाठी या खोलीचा वापर करतात, असे कळाले. ट्र्स्ट्चे एक विश्वस्त रविंद्र पठारे यांनी सांगितले, की गेल्या वर्षी तर या कर्मचार्‍यांनी खोलीतील ऐतिहासिक तसबिरी बाहेर काढण्याची मजल गाठली होती. हे ऐकून मी मराठी माणसांच्या इतिहास प्रेमाला मनातूनच साष्टांग दंडवत घातला.

पठारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाडा विकल्याचे त्यांच्या कानावर आले आहे. "पुढच्या वर्षी गणपती बसवू का नाही, याची आम्हाला शंकाच आहे," पठारे म्हणाले तेव्हा परिस्थिती किती बिकट आहे, याची जाणीव झाली।

केवळ गणपतीच नाही, आणखी एका ऐतिहासिक घटनेमुळे या वाड्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही महत्त्व आहे. स्वामी विवेकानंद यांचे या वाड्यात काही दिवस वास्तव्य होते. लोकमान्य टिळक मुंबईहून पुण्याला येताना त्यांची आणि स्वामींजीची भेट झाली होती. स्वामींजीच्या विद्वत्तेने प्रभावित झालेले लोकमान्य त्यांना घरी घेऊन आले. याच विंचूरकर वाड्यातील एका खोलीत स्वामीजी राहत होते. काही दिवस वास्तव्य केल्यानंतर स्वामीजी कोणालाही न सांगता एके दिवशी निघून गेले. अशा या विलक्षण घटनेची माहिती आज केवळ मोजक्या लोकांना आहे. आमच्या वर्तमानपत्राने घेतलेल्या लोकांच्या मुलाखतीतून हीच माहिती समोर आली. खरे तर स्मृतीस्थळ म्हणून वर्षभर सुरू असावे, अशी योग्यता असलेली ही वास्तू आज शेवटच्या घटका मोजत आहे. 'कालाय तस्मै नम:' दुसरे काय?

Friday, July 25, 2008

युवराज बहु भाषणात बडबडला

नेहमीच्या शहरी गुत्त्यावरची, म्हणजेच बीअर बारमधील एक संध्याकाळ. नेहमीचीच चार, म्हणजे चार वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतील आणि वाहिन्यांतील कार्यकर्ते. चर्चा नेहमीसारखीच म्हणजेच त्या दिवशीच्या महत्त्वाच्या, म्हणजे प्रत्येकाच्या गळ्यात पडलेल्या बातम्यांची. घशाखाली उतरणाऱया प्रत्येक घोटाबरोबर प्रत्येक बातमीची चिरफाड आणि शवविच्छेदन चालू. त्यातच जगात कोणाच्याही डोक्यात न आलेली गोष्ट आपण कशी केली आणि त्यावर (काहीही न समजणाऱया) वरिष्टांनी कसा बोळा फिरविला याची साग्रसंगीत वादावादी चालू। हेही नेहमीचेच. फक्त नेहमीसारखी एकच गोष्ट त्या ठिकाणी आहे ती म्हणजे या चार चतुरांच्या सोबत एक पाचवा, पण न पचवणाराही सामील आहे.

"आज काय विश्वासदर्शक ठराव होता ना,” पहिल्याला ओला कंठ फुटतो.
"हो रे, जाम बोर झालं,” दुसरा ओलेता आवाज जणू काही आपणच सर्वांची भाषणे लिहून दिल्याप्रमाणे सांगतो.
"आडवाणी म्हणजे बोगस माणूस. उगीच बडबड करत होता,” तिसरा कॉकटेल आवाज. यावेळी त्या आवाजाच्या मालकाला प्रत्यक्ष पाहिलं असतं तर खुद्द आडवाणींनाही आपली आख्खी राजकीय कारकीर्द फुकट घालविल्याचे आगळे समाधान लाभले असते. चौथा आणि त्यानंतर परत पहिला ते तिसरा असे आळीपाळीने मग मायावती, लालूप्रसाद, करात, चंद्राबाबू नायडू, शरद पवार यांना काडीचीही अक्कल कशी नाही, याची ग्वाही देत देतात. बरं झालं, जॉर्ज बुश किंवा महात्मा गांधी यांचा या नाट्यात सहभाग नाही. नाही तर त्यांनीही राजकारण आणि प्रशासनाचे धडे याच बारमध्ये बसून कसे घ्यावेत, यावर या चौघांनी बौद्द्धिक घेतले असते, याबाबत पाचव्याला शंका उरत नाही.
एव्हाना पहिली फेरी संपलेली असते। दुसऱया फेरीची मागणी झालेली असते. स्वतःची शुद्ध घालवून बसलेले हे चौघे योग्य का शुद्धीवर असूनही निर्बुद्धासारखे बसलेले आपण मूर्ख असा प्रश्न पाचव्याला पडतो.

"राहुलचे भाषण सॉलिड झालं ना,” चौघांपैकी एकजण नव्या बाटलीसह नवा विषय सुरू करतो. नक्की कोण काय म्हणतंय, याची नोंद करणं पाचव्याने बंद केलेलं असतं.
"बेस्ट. आपल्या विदर्भाच्या दोन बायांचे उल्लेख केले. त्यांच्या घरी जाऊन आला तो,” चौघांपैकी एकजण बरळण्याच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या आवाजात बोलतो.
"तुला माहितेय का, तो जो बोलला ना, की गरीबीचे निर्मूलनही ऊर्जेतूनच होणार आहे, ते भारीच होतं. सही पॉईंट काढला ना, " आणखी एक कापरा आवाज बोलला.
"आपण मानलं त्याला. नाहीतर हे लोकं,' पुन्हा सर्व नेत्यांचा उद्धार करत दोन आवाज एक साथ बोलले.
दुसरी फेरी संपत आलेली असते। कोसळण्याच्या बेतात आल्याशिवाय सगळ्या ज्ञानाचे हलाहल पिण्याचे कार्य थांबवायचे नाही, या नेहमीच्या संकेताला अनुसरून तिसरी फेरी सुरू होणार असते.

एकाच टेबलावरच्या दुसऱया काठावर आपला आवाज जात आहे का नाही, याची पर्वा न करता पाचवा बोलू लागतो, "ते तुमचं सगळं ठिक आहे। पण मला एक सांगा, या दोन्ही बाया, ज्यांच्या झोपड्यात तुमचे युवराज गेले त्या विदर्भात गेले होते ना आणि विदर्भातच वीजनिर्मितीचे दोन मोठे प्रकल्प आहेत ना. मग आतापर्यंत ती वीज त्या झोपड्यांत कशी पोचली नाही. दोन झोपड्यांपैकी एका झोपडीतील महिलेच्या नवऱयाने आत्महत्या केली होती. तो विदर्भातीलच शेतकरी असल्याने बाकीच्यांना काही सोयरसुतक नाही हे मी समजू शकतो. पण तेथील शेतकऱयांसाठी पॅकेज जाहीर करून वर्ष होत आले तरी आत्महत्या थांबत नाहीत, त्या कोणती ऊर्जा मिळाल्यानंतर थांबणार आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून (म्हणजे ब्रिटीशमु्क्त) तुमच्या युवराजांच्याच पणजोबा, आजी, वडील आणि आईचे राज्य चालू आहे. त्यांनी कोणते दिवे लावले म्हणून आज कोट्यवधी लोक अशा परिस्थितीत जगत आहेत. त्या भाषणाबद्दल बोलताना आणि लिहिताना तुम्हाला हे प्रश्न पडत नाहीत का रे?”

पाचव्याचे स्वगत संपल्यानंतर चौघेही एकमेकांकडे पाहतात. पार्टी ऐन रंगात आलेली असताना असा थर्ट पार्टी व्यत्यय त्यांना नको असतो. नव्हे, एव्हाना ते याला विसरलेलेही असतात. त्यांची ती अवस्था पाहून पाचवा जायला निघतो. तो गेटबाहेर गेल्याची खात्री झाल्यानंतर पहिला उरलेल्या तिघांना म्हणतो, "तरी मी म्हणत होतो, न पिणाऱयाला आपल्यामध्ये घेत जाऊ नका,” अन ते परत तिसऱया फेरीचे चिअर्स करतात.

Tuesday, July 22, 2008

विश्वासदर्शक ठराव २०-२० चा हवा

दोन दिवस चाललेल्या उखाळ्या पाखाळ्या, निंदानालस्ती आणि काथ्याकुटीनंतर अखेर डॉ. मनमोहनसिंग यांच्या नावाने, मात्र प्रत्यक्षात सोनिया गांधी यांनी चालविलेल्या सरकारने आपले बहुमत लोकसभेत सिद्ध केले. लोकसत्ताच्या भाषेत सांगायचे तर या दोन महामानवांच्या विरूद्ध समस्त असुर मंडळींनी छेडलेल्या युद्धात, या असुर टोळ्यांचेच नाक कापले गेले. (सोनिया आणि कॉंग्रेस यांच्या नेतृत्वावर शंका घेणारा कोणताही पक्ष लोकसत्ताच्या दृष्टीने टोळ्या असतो.) 

नेहमीच्या चर्चांप्रमाणे आम्हीही टीव्ही बंद ठेवून ही चर्चा एन्जॉय केली. मात्र त्यात मतदानाच्या वेळी ज्याप्रमाणे चुरस निर्माण झाली, त्यावरून २०-ट्वेंटी स्पर्धेची आठवण झाली की नाही? त्यामुळेच येथून पुढे होणाऱया सर्व चर्चा याच स्पर्धेच्या साच्यात व्हाव्यात, असे आमचे एक मत पडले. त्यासाठी हवे तर काही नियम आपण ठरवायलाही तयार आहोत. शंभर स्पर्धांमध्ये मार खाल्ल्यानंतर योगायोगाने २०-ट्वेंटीमध्ये जिंकल्यानंतर, मुंबईत खेळांडूंची वरात काढून मिरवून घेणारे शरद पवारच संसदेतही फिक्सिंगच्या प्रयत्नात असतात. सोबतीला अंबानी बंधू, विजय मल्ल्या अशी मातब्बर आणि क्रीडाप्रेमी मंडळी आहेतच. त्यामुळे त्या अर्थानेही हा योग योग्यच ठरेल यात काय शंका.

आता तुम्ही विचाराल, की नक्की कशा प्रकारचा फॉर्मॅट हवा, तर असं बघा. सुरवात होईल आय़कॉन खेळाडूंच्या लिलावाने. सोनिया, अडवाणी, करात, अमरसिंग, मायावती अशा आयकॉनला आधी आपण विक्रीसाठी ठेवू. त्यानंतर ते स्वतःच्या बहुमतासाठी अन्य खेळाडू विकत घेतील. म्हणजे लालूप्रसाद यादव, चंद्राबाबू नायडू, फारूख अब्दुल्ला वगैरै मंडळी. या मंडळींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या खेळात सातत्य नसलं तरी अडचणीच्या वेळी धावून जाण्यात ते वाकबगार आहेत. (धावून जाण्यात म्हणजे मित्रांच्या मदतीला आणि विरोधकांच्या अंगावर, या दोन्ही अर्थाने!) आणखी एक तिसरा प्रकार आहे देवेगौडा, अजितसिंग यांच्यासारख्या खेळाडूंचा. ही मंडळी मुळात आधी कोणत्या टीमकडून खेळतायत याचा नेमच नाही, शिवाय त्यांना खेळापेक्षा जाहिरातीत अधिक रूची आहे. जाहिरातीच्या या छंदापायी ते कधी कधी चिअऱ लीडर्स व्हायलाही तयार असतात, अशी चर्चा आहे. खासकरून फिक्सिंग करणाऱया बुकींच्या दृष्टीने ही मंडळी अधिक आकर्षक असतात, कारण स्वतःच्या परफॉर्मन्सपेक्षा त्यांना इतरांना रन आऊट करण्याची कला अधिक अवगत असते. 

ही अशी उतरंड केली आणि एकदा का खरेदीचा व्यवहार पारदर्शक केला, की कोणाची बिशाद आहे संसदेत घोडाबाजार होतो म्हणायची. (एकूणात, घोडाबाजार हा शब्द शोधून काढणाऱया व्यक्तीने, भारताच्या संसदेत चालणारे व्यवहार बघून घोड्यांना काय वाटते याचा विचार केला नसावा!) तर एवढ्या पूर्वतयारीनंतर ठराव मांडला गेला पाहिजे.

आता २०-ट्वेंटीमध्ये कसं, गडी खेळपट्टीवर आला की अंदाज घ्या, सेट व्हा अशा भानगडीत पडत नाही. महापालिकेचे कर्मचारी कसं, दिसलं कुत्रं की घाल गाडीत अशी मोहीम राबवितात, तसंच हा खेळाडूही दिसला चेंडू की हाण हवेत असं करत राहतो. तो खेळ वगैरे तिकडे, इथं आपल्याला मनोरंजन करायचं हाच त्याचा खाक्या. संसदेच्या आम्ही प्रस्ताव ठेवलेल्या नव्या फॉर्ममध्ये असाच प्रकार असणार आहे. चर्चा कशावर आहे, मुद्दा काय आहे याकडे फारसं लक्ष न देण्याची मुभा सगळ्या खेळाडूंना आम्ही देणार आहोत. प्रत्येकाने फक्त माईक घ्यायचा आणि समोरच्यावर (म्हणजेच विरोधकांवर) आरोप करायचे. आरोप जेव्हढा बेफाम तेवढं आपलं एंटरटेनमेंट जास्त, कसं? हरभजन-इशांत प्रकरणासारखे एखाद्याने तोंडाऐवजी हाताचा वापर केला तर त्यासाठी चौकशी समिती नेमून एकमेकांना पाठिंबा देण्याच्या बोलीवर निर्दोषही सोडले जाईल. (मात्र कोणत्याही परिस्थितीत डोके वापरू देणार नाही, ते काम राजकारण्यांचे नाही!) 

अशारितीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून झाले, चिखलफेक करून झाले की याच खेळाडूंना त्यांच्या सामन्याचा निर्णय घेऊ द्यावा. त्यासाठी कोणत्याही त्रयस्त पंचाचा वेळ जायला नको. आपल्याला बुवा ही आय़डीया खूप आवडली. त्यामुळे संसदेतल्या चर्चा दोन दोन दिवस चालण्यापेक्षा एकाच दिवसांत येतील, कसे? यात फक्त एकच समस्या आहे. बीसीसीआयच्या २०-ट्वेंटी आणि आयपीएलला फक्त आयसीएलची स्पर्धा आहे. संसदेतल्या चर्चेच्या खेळाला मात्र विधानसभा, विधान परिषद, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,नगर पंचायत, ग्राम पंचायत अशी स्पर्धकांची साखळीच आहे. त्याचं बुवा बघा कोणीतरी.  

----------

Friday, July 4, 2008

...तर बुशकडे मदत मागणार?

साहित्याचा आणि माझा तसा काही संबंध नाही. तसा म्हणायला पत्रकारितेत असलो आणि मराठी, इंग्रजी व अन्य भाषांमधून सर्रास उचलेगिरी करत असलो, तरी साहित्यविश्वाशी नाळ जोडण्यासाठी ते पुरेसे आहे का, ,याबाबत माझ्या मनात दाट शंका आहे. लेखन तर कोणीही करते, पण जगात महत्वाचे काही असले तर ते आपले व आपले आवडते लेखनच असा आव जो आणतो त्याला साहित्यिक म्हणायची आजकाल प्रथा आहे। त्यामुळे हाकेच्या अंतरावर साहित्य संमेलन होऊनही ते घरात बसल्या बसल्या टीव्हीवर एन्जॉय करण्याचीच आपली साधी मराठमोळी प्रवृत्ती आहे। हो, ऊगाच खोटं कशाला बोला?
माझ्या मते मराठीत दोन प्रकारचे लेखक आहेत। जे सातत्याने सकस लेखन करतात आणि दुसरे आपण साहित्य संमेलनात का जात नाहीत, याची दिसेल त्या व्यासपीठावर चर्चा करतात असे. त्यातील दुसऱया प्रकारच्या लेखकांशी आपली जरा जास्त जवळीक आहे. म्हणजे काय की, आपण कसं चपलेचा अंगठा तुटलेला आहे हे लपवत लपवत आजकालच्या वस्तूंचा घसरलेला दर्जा आणि पायांचे विकार अशी तात्विक चर्चा करतो, तसे हे दुसरे लेखकही करतात. शेजारून जाणारा माणूस आपल्याला ओळख देणार नाही म्हणून संमेलनाच्या मंडपात न येणारे लेखक, संमेलन म्हणजे केवळ वायफळ खर्च आहे किंवा तत्सम सैद्धांतिक बडबड करतात, त्या एका क्षणात कलेसाठी कला का जीवनासाठी कला असे क्षुल्लक वाद निकाली निघतात. जीवन जगताना खोटं बोलण्यासाठी कला, असं त्याला स्वरूप येतं. एक माजी संमेलनाधध्यक्ष शनिवारवाड्याजवळच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला आले असताना वेटरनेही त्यांना ओळखले नव्हते, ही घटना मी डोळ्यांनी पाहिलेली आहे. नंतर अशाच माणसांची “त्यांनी कोणताही बडेजाव न मिरवता सामान्य माणसासारखं जगले, ” अशी प्रशंसा केलेली बघितल्यावर हसू येणार नाही तर काय होणार?

त्यामुळेच यंदा दोन मराठी साहित्य संमेलने घेण्याची तयारी कौतिकराव ठाले पाटील यांनी दाखविली तेव्हा जरा हायसे वाटले. चला, म्हणजे नेहमीप्रमाणे प्रतिनिधींना पास देण्याची, त्यानिमित्ताने त्यांनीही आपल्या नातेवाईकांना जरा ‘गाव’ दाखवायला आणण्याची परंपरा पाळली जाणार तर. आपल्या नेहमीच्या संमेलनाची संयोजन व्यवस्था उत्तम। भिकार असल्याच्या बातम्या देण्याची सोय झाली. (संयोजन व्यवस्थेबाबतच्या बातम्या एकाआड एक वर्षी अनुकूल वा प्रतिकूल देण्यात येत असाव्यात असा मला अनेक वर्षांपासूनचा वहीम आहे. शेवटी संयोजकांना शिव्या देण्याशिवाय किंवा ते बडे राजकीय आसामी असल्यास त्यांची तारीफ केल्याशिवाय मराठीविषयीची आपली कळकळ, संमेलनाला हजर राहण्याची तत्परता आणि स्वभाषेसाठी कोणतेही कष्ट उपसण्याची तयारी कशी समजून येणार?) नेहमीप्रमाणे अध्यक्षांपेक्षा प्रमुख पाहुण्यांचेच भाषण जोरदार झाल्याचा अभिप्राय यंदाही .येणार तर. शिवाय कोणी मराठीचा अधिकाधिक वापर करायला हवा, असं म्हणालं की यांचीच मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात म्हणून रकानेही भरणार. (कोणा कोणाची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात यावर पी. एच.डी करणारे पत्रकार आहेत तसे वाचकांचा पत्रव्यवहारचे नेहमीचे यशस्वी कलाकारही आहेत. जणू काही मराठी माध्यमांच्या शाळेत शिकलेले सर्वच विद्यार्थी सरस्वतीच्या दरबारात नाच करतात.) सामाजिक बांधिलकीच्या नावाने गळा काढत गद्य न रचणाऱया कवींना मान्यता न देण्याच्या या काळात, असे मनोरंजक आणि वास्तवाशी संबंधित नसलेले लेखन प्रसवणारा कोण लेखक आहे आज?

बाय द वे, अमेरिकेत संमेलन होणार त्यामुळे महामंडळाच्या ग्लोबल कळवळुचीही बूज राखली जाणार. अमेरिकेतल्या यजमानांनाही वाईट वाटायला नको. तसं बघायला गेलं तर घरटी एक अपत्य अमेरिकेत वा इंग्लंडमध्ये असणाऱया कोणाही साहित्यिकाने किंवा साहित्यिक संस्थेच्या पदाधिकाऱयांनी या संमेलनासाठी खर्च मागू नये. तिथल्या अन्य संस्थांचा विरोध असलातरी त्याची काळजी करण्याची गरज नाही. आपण इथल्या, देशातल्या कोणाच्या विरोधाची पर्वा करतो का?

ठाले पाटील यांना या निर्णयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी कॅलिफोर्निया आर्टस असोसिएशनच्या पत्राबाबत विचारले. ते म्हणाले, “अमेरिकेतल्याच दोन संस्थांमध्ये काहीतरी अंतर्गत भांडणे आहेत. त्यामुळे त्यांनी ते पत्र पाठविले आहे.” दोन संस्थांमध्ये भांडणे? ही तर मराठी संस्कृती. ठाले पाटील यांना म्हणालो, “म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आधीच तिथे पोचली म्हणायची.” मात्र ते विनोदाच्या मूडमध्ये नसल्याने माझ्या विनोदावर मीच हसून लाज राखली.

दोन संमेलनाच्या निर्णयाचे द. मा. मिरासदार, राम शेवाळकर यांनीही स्वागत केले. मात्र खरी प्रतिक्रिया दिली ती विठ्ठल वाघ यांनी. ते म्हणाले, “साहित्य संमेलन अमेरिकेत घेण्याचा निर्णय म्हणजे आता मराठीबाबत महाराष्ट्रात काहीही करण्यासारखे नाही, असे होईल. मागच्या वेळी सोलापूर संमेलनात ठाले पाटील बेळगावच्या प्रश्नावर अत्यंत कळवळ्याने बोलले होते. आता ते अमेरिकेतील संमेलनात इराक-इराण प्रश्नावर बुश यांची मदत मागणार आहेत का.”

जाता जाताः कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या घोषणेने दोन दशकांपूर्वी महाराष्ट्रात हवा निर्माण केली होती. या संमेलनाच्या निमित्ताने का होईना रत्नागिरी आणि कॅलिफोर्निया एका पातळीवर येतील.
----------------

Friday, June 20, 2008

मूर्ती महान व किर्तीही महान...

माणसाने किती नम्र असावे?. गेल्या दोन दिवसांमध्ये दोन मोठ्या माणसांना भेटण्याची संधी मला मिळाली. (याचे कारण अर्थातच पत्रकारितेचा धंदा!) पण या दोन्ही माणसांना भेटून  त्यांच्या साधेपणाची आणि ऋजुतेची चुणुकच मला पहायला मिळाली. दोन्ही व्यक्तिंबद्दल मी यापूर्वी वाचलेलं, ऐकलं होतं. मात्र त्याची प्रचिती मला इतक्यात मिळेल, असे वाटले नव्हते.


यातील पहिली व्यक्ती म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक आणि सर्वेसर्वा एन. आर. नारायण मूर्ती. मूर्ती यांच्याबद्दल आधी खूपच ऐकलं होतं. आमच्या वर्तमानपत्राच्या सकाळच्या मिटिंगमध्ये मूर्ती आज शहरात आहेत, असं मी सांगितलं. त्यावर साहेबांचा हुकूम आला, की त्यांची एक एक्स्लूजिव मुलाखत घेऊन ये. मी (मनातल्या मनात) कपाळाला हात लावला. आता नारायण मूर्ती म्हणजे पुण्यातील कोणी पत्रकबाज पुढारी नाहीत, की उचलला मोबाईल अन मिळविली प्रतिक्रिया.




आधी मिडिया को-ऑर्डिनेटरला फोन लावला...त्यानं मोघम उत्तर दिल्यावर केवळ नशिबावरच हवाला ठेवला. त्यानंतर ल मेरिदियन या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोचलो. मूर्ती तिथे आलेले आहेत, हे कळाल्यावर जीवात जीव आला. पण त्यांच्यापर्यंत पोचायचे कसे ते कुठल्या सूटमध्ये आहेत, हे आधी शोधून काढले. त्यानंतर दारावरच स्वयंसेवकाने अडविले. पुन्हा प्रतिक्षा. थोड्या वेळाने शेवटी धीर करून आणि निर्वाणीचा उपाय म्हणून त्यांना विचारले, “सर, तुमच्याशी दोन मिनिटे बोलता येईल का?”


“नाही, मला आता वेळ नाही. कार्यक्रम सुरू होत आहे,” मूर्ती यांनी फारशा रुक्ष नसलेल्या स्वरात सांगितले. 


“सर, मग कार्यक्रम संपल्यावर तरी बोलूया,” मी चिकाटी न सोडता म्हणालो.


“नाही, कार्यक्रम संपला की लगेच मला विमान पकडून बंगळूरला जायचे आहे,” मूर्तींनी सांगितले. हा संवाद अर्थातच इंग्रजीत चालू होता. 


त्यानंतर मात्र मूर्ती यांची खास मुलाखत मिळण्याची आशा संपली. मात्र मी कार्यक्रमात बसलो होतो आणि आम्हाला हवं तसं ते मोजकेच मात्र पूरेसे बोलले. खासकरून ‘त्यावेळी आम्ही नऊ रुपयांत पोटभर जेवत असू,’ ही त्यांची आठवण मला खूप भावली. त्यातून आमची एक बातमी पूर्ण झाली.


दुसरे दिवशी कोल्हापूरचे राजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज पुण्यात होते. शिवरायांच्या नावाने आजकाल कोणीही दुकान थाटतो आणि येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळवितो. त्यावर महाराजांचे मत मिळवावे, अशी कल्पना मीच मांडली होती. त्याप्रकारे महाराष्ट्रातील गड किल्ले या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते आलेले आसताना त्यांना गाठण्याची संधी साधली. प्रकाशन समारंभानंतर दोन मिनिटांच्या विश्रामकाळात महाराजांकडे जाऊन त्यांना स्वतःची ओळख सांगितली. मग विषयाला हात घातला. त्यांनीही कुठलेही आढेवेढे न घेता बोलायला संमती दिली.


“महाराज, आजकाल कोणीही उठतो आणि शिवरायांचे नाव घेतो. त्यातून अनेकदा चुकीच्या गोष्टी घडत आहेत. यावर तुमचे मत काय आहे,” मी त्यांना विचारले. 




“शिवराय सर्वांचे आहेत. त्यांचे नाव कोणीही घेऊ शकतो. महाराष्ट्रात शिवरायांना वगळल्यास काय राहते. मात्र त्यातून चुकीच्या गोष्टीही घडत आहेत,” शाहू महाराज म्हणाले. त्यानंतरही आमचे प्रश्नात्तेर चालूच होते. कोणताही त्रागा न करता किंवा रुबाब न दाखविता शाहू महाराज उत्तरं देत होतं. कुठलाही लवाजमा न बाळगता आणि ‘पोझ’ न घेता ते बोलत होते. आदल्याच दिवशी काही सरकारी संस्थानिकांचा आणि मंत्र्यांचा बडेजाव आणि नाटकीपणा पाहणाऱया माझ्यासारख्याला हा प्रकार नवा होता. केवळ आजूबाजूच्या लोकांची गर्दी आणि गडबड वाढत असल्याने आम्हाला ती भेट आटोपती घ्यावी लागली.


अशाप्रकारे दोन दिवसांत दोन मोठ्या माणसांची भेट झाली होती. दोघांच्याही साधेपणाचा ठसा मनावर चांगलाच ठसला आहे.