Saturday, June 7, 2008

पत्रकाराची प्रतिज्ञा

भारत माझा हल्ल्यांचा देश आहे. सारे हल्लेखोर भारतीय माझे बांधव आहेत. हल्ल्यांनंतर येणाऱया पुळचट प्रतिक्रियांवर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविध, तसेच वांरवार घडणाऱया हिंसक घटनांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा लक्ष्य होऊ नये, यासाठी मी प्रत्येक क्षणी देवाचा धावा करण्याचा सदैव प्रयत्न करीन.

मी माझ्या मालकांचा, राजकीय नेत्यांचा, पोलिस अधिकाऱयांचा व गावगुंडांचा नेहमी मान ठेवीन आणि त्यांच्याशी शक्य होईल तेवढे सौजन्याने वागेन.

माझ्या अवतीभवतीचे गुंड, समाजकंटक आणि टोळ्या यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यांतच माझ्या जीवाचे सौख्य आणि संरक्षण सामावले आहे.

Friday, May 30, 2008

मराठीशी केवळ सख्य…सहवास नको

एका छोट्या शहरातील तितक्याच छोट्या असलेल्या वर्तमानपत्राचे कार्यालय...एक होतकरू व्यंगचित्रकार आपली व्यंगचित्रे घेऊन संपादकाच्या केबिनबाहेर उभा आहे. खूप वेळ वाट पाहायला लावल्यानंतर संपादक महाशय (ज्यांची पदाची एकमेव अर्हता म्हणजे संबंधित वर्तमानपत्राचे मालक असलेल्या राजकारणी व्यक्तीचे ते क्लासमेट...वर्गमित्र आहेत!) आत बोलावतात. सगळी व्यंगचित्रे पाहिल्यानंतर आणि त्यांच्यावर आपल्या मगदुराप्रमाणे भाष्य केल्यानंतर ते प्रवचनबाजीकडे वळतात...

“टाईम्स ऑफ इंडियातील कार्टून पाहात जा. आर. के. लक्ष्मण बघा कसे अगदी फर्स्ट क्लास कार्टून काढतात. व्यंगचित्रात रेखाटनासोबतच कल्पनाही अगदी उत्तम असल्या पाहिजेत. लक्ष्मणना त्यासाठी मानायलाच पाहिजे...,” संपादक महाशयांची रसवंती अशीच चालत राहायची. दोन-तीनदा त्यांच्या केबिनमध्ये आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांची प्रशंसा ऐकल्यानंतर व्यंगचित्रकार एकदा थेट मालकांशी संपर्क साधतो. त्यांच्या राजकीय परिस्थितीला अनुकूल असलेले एक व्यंगचित्र निवडून मालक ते छापायला देतात अन ते छापूनही येतं.

सुमारे १३ वर्षांनंतरच्या या घटनेनंतर आजपर्यंत मला त्या व्यंगचित्राचे मानधन मिळालेले नाही. संपादक महाशय मला लक्ष्मण यांचे उदाहरण देऊन थकले मात्र लक्ष्मणना टाईम्स ऑफ इंडिया फुकट राबवून घेत नाही, हे तेव्हा वर्तमानपत्रांच्या धंद्यात नसलो तरी मला कळत होतं. शेवटी मराठीतील व्यंगचित्रांचा नाद सोडून मी जीवनाचे अन्य प्रांत धुंडाळत फिरलो. त्यात एक-दोनदा संस्कृतमध्ये व्यंगचित्रेही काढली आणि ती विनासायास प्रकाशितही झाली!

पोटासाठी अनेक उद्योग केल्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा वर्तमानपत्रांच्याच जगात प्रवेश झाला. मात्र यावेळी भाषा आणि भूमिकाही बदलली होती. ‘आज का आनंद’मध्ये काम करत असताना पत्रकारितेचा आनंद मिळायचा मात्र मराठीत काम करण्याची इच्छा मात्र उसळी मारत होती. खरं तर तशी निकड कोणतीही नव्हती आणि मला हिंदी येत नसल्याची मालक, मुद्रक, प्रकाशक आणि वाचकांचीही तक्रार नव्हती. तरीही काही जणांना नसते उपद्व्याप करण्याचा जीवघेणा छंद असतो. त्यामुळे मराठीत काम करण्याची हौस भागविण्यासाठी केसरीत गेलो. लोकमान्यांचे वर्तमानपत्र म्हणून केसरीबद्दल मला तेव्हा आदर होता. केसरीत गेलो नसतो तर तो, तसेच लोकमान्यांबद्दलचाही आदर तसाच टिकला असता. त्याचे सहानुभूतीत रुपांतर झाले नसते. बिन पगारी फुल अधिकारी हा काय प्रकार असतो ते केसरीत काम करत असताना पहिल्यांदा कळाले. पोटभर पगार आणि मनमुराद काम, ही आपली साधी अपेक्षा. त्याची फलश्रुती इथे पोटापुरता पगार आणि मणभर काम, अशी झालेली होती.

त्यानंतर पुण्यातील सर्वात मोठ्या मराठी वर्तमानपत्रात प्रवेश झाला. आता तरी इतरांसारखा पगार मिळेल, असे काही काळ वाटले. मात्र आपल्याला जे वाटते त्याच वास्तवाशी संबंध असायलाच हवा, असे नाही, हे मला इथे कळाले. शिवाय या लेखाच्या आरंभी सांगितल्याप्रमाणे, टाईम्स ऑफ इंडियाचे संदर्भ जोडीला होतेच. शासकीय कर्मचाऱयांना ज्याप्रमाणे हस्तपुस्तिका वाटलेल्या असतात, तसे टाईम्स ऑफ इंडिय हे मराठी वर्तमानपत्रांची हस्तपुस्तिका आहे. मात्र ते केवळ कामाच्या बाबतीत...पगाराच्या नव्हे. पगारासाठी रेफरन्स पॉइंट हा केसरी किंवा प्रभात हाच. तुमच्याकडे किती कौशल्य आहे, तुम्हाला काम काय येतं या मुद्यांना काहीही किंमत नाही. तुम्ही मराठीत काम करत असाल तर तुम्हाला तेवढाच पगार मिळणार. शिरीष कणेकर यांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे, “लोकमान्य-आगरकर कशी पत्रकारिता करायचे हे सगळेच सांगतात, ते काय खायचे हे कोणीच सांगत नाही.”

त्यामुळे आता खाण्यासाठी मिळेल, इतपत मिळेल अशा जागी आलो आहे. तात्पर्य एवढेच, की आता मी पुणे मिरर या इंग्रजी दैनिकात रुजू झालो आहे. त्याचमुळे काही कारणांनी नवीन पोस्ट टाकायला उशीर झाला...पण आता नियमित नक्की!

Saturday, January 5, 2008

चला मिटिंग मिटिंग खेळू...

करंद हा तसा सज्जन माणूस. त्याच्यासारखा सज्जन माणूस संपूर्ण शहरात सापडायचा नाही. कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. त्यामुळे होतं काय, की त्याच्या शेजाऱ्यांनाही त्याचं नाव माहित होत नाही. सालस तर एवढा, की लोक त्याच्या चारित्र्याचे उदाहरण आपल्या नादावलेल्या मुलांना आदर्श म्हणून देत. अन्‌ ती मुलं दिवसातील चोवीसपैकी सोळा ते सतरा तास त्याच्या नावाने खडी फोडत. मकरंदच्या गल्लीतच काय, तो गल्लीबाहेर निघाल्यावरही त्याच्या नजरेला नजर देण्याची टाप बाया-मुलींना होत नसे. तो दिसला की बाया आपला पदर नीट करत आणि मुली आपल्या ओढण्या सावरून घेत. इतका आसपासचा परिसरात त्याचा दरारा होता.

असा सदाचारी माणूस असतो तसाच मकरंदही निर्व्यसनी होता. त्याला कधी कोणी चहा पिताना अथवा चहाचे पैसे देतानाही पाहिले नव्हते. दारूची तर गोष्टच दूर. त्याच्यावर खार खाणारे म्हणत, की ऑफिसमध्ये फुकटात मिळणारा चहा पिऊनच तो आपली तल्लफ भागवत असे. राहता राहिली दारूची गोष्ट, तर दररोज हॉटेल किंवा बारचे पैसे चुकते करणारा मित्र कोणाला मिळणार? त्यामुळेच त्याचे दारूचे प्रमाण नियंत्रणात होते, अशीही एक वदंता होती. असो. लोकं काहीबाही बोलणारच. 'तत्को नाम सुगुणिनां यो दुर्जनैनाङ्कितः?' तर असा हा सत्ययुगातून थेट कलियुगात टपकलेला मकरंद नामे प्राणी जगतो कसा, हा कुतुहल निर्माण करणारा प्रश्‍न होता. त्या प्रश्‍नाचे उत्तर देण्याएवढी सवड शहरवासियांना नव्हती, म्हणून त्याचे बरे चालले होते म्हणायचे.

अशा या सुखी प्राण्याला व्यसन एकच, व्यसन कसले it was his passion, अन्‌ ते म्हणजे मिटिंगचे! तसा तो एका वर्तमानपत्रात कामाला होता, अन्‌ सध्याच्या कार्यालयात येण्यापूर्वी तसा तो अन्य द्विपाद प्राण्यांप्रमाणेच होता. दिवसभर काम करावे आणि घरी जावे, असा माणसासारखा त्याचा दिनक्रम होता. मात्र सध्याच्या कार्यालयात तो आला आणि त्याचे जीवनच बदलले. पूर्वी "आली लहर केला कहर,' असा बाणा हाडीमासी खिळलेला मकरंद आता "चर्चेने होत आहे रे, आधी चर्चाच पाहिजे,' अशा सैद्धांतिक भूमिकेपर्यंत आला होता. कार्यालयातील काम असो अथवा जीवनातील छोटा-मोठा निर्णय, तो सर्वांनी एकत्र बसून आणि चर्चा करूनच सोडविला पाहिजे, यावर त्याची ठाम श्रद्धा होती. त्यानुसार सोसायटीच्या मिटिंगपासून विविध चर्चासत्रापर्यंत जेथे म्हणून तोंड उघडता येईल, तेथे तोंड घालण्याची त्याने सवयच अंगी बाणवली होती.

एक बरं होतं, मकरंदचं लग्न आधीच झालेलं होतं. नाहीतर त्याने मुलगी पाहायला एक, साखरपुड्याला एक, कपडे खरेदीला एक, लग्नाआधी एक अशा मिटिंगांचा बारच उडविला असता. 'आधी लगीन मिटिंगचे, मग माझे' अशी त्याने गर्जनाच केली असती. मात्र तो या कार्यालयात आला आणि तो मकरंदराव ऐवजी मिटिंगराव झाला. त्यामुळे दर दोन दिवसांनी एखादा नवा प्रसंग उद्‌भवला, की सासरवाडीच्या माणसांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करायची, हा त्याचा नित्यक्रम झाला. सासरवाडीच्या माणसांना जावयाचे हे खूळ पसंद नसले, तरी ते काही करू शकत नव्हते. त्यामुळे ते मुकाट्याने चर्चेला तयार होत. मकरंदच्या या मिटिंगवेडाचा सर्वात मोठा फटका त्याच्या बायकोला बसला होता. नाही, म्हणजे दुसऱ्या घरातील बायका बडबड करायच्या आणि नवरे मुकाट ऐकायचे, इकडे मात्र मकरंदही बडबड करायचा आणि तिलाही बोलायला लावायचा, याचं शल्य तिला नव्हतं. तिचं दुःख वेगळंच होतं. मिटिंग आणि चर्चेच्या नावाखाली मकरंदची असंबद्ध बडबड तिला ऐकावी लागत होती. बरं त्याला विषयाचीही मर्यादा नव्हती.

एखाद्या दिवशी तिच्या हातून चहात कमी साखर पडली, तरी तिला सांगता यायचं नाही. कारण एकदा तिने असंच म्हणून दाखवलं, तर मकरंद म्हणाला, "चहा करण्यापूर्वी तू चर्चा का करत नाहीस? त्यामुळं नक्की किती साखर टाकायची, याचा तुला अंदाज येईल ना!''

ती साध्वी काय बोलणार? मकरंदची हौस सर्वाधिक फिटायची ती त्याच्या कार्यालयात. त्याच्या कार्यालयातच चर्चेची संस्कृती भिनलेली असल्यामुळे. "काम कम, बाते ज्यादा,' असा प्रकारच नव्हता. मोबाईलची रेंज मिळत नाही यापासून ते उद्या कोणत्या ड्यूटीला यायचं, यातील कोणत्याही विषयावर त्याच्या कार्यालयात मिटिंग भरू शकते. या वातावरणात त्याला इतकं बरं वाटतं, की कधीकधी आपण आयुष्यभर दिवस-रात्र कार्यालयातच रहावं, असं त्याला वाटतं. अर्थात त्याचीही गंमत आहे. या मिटिंगमुळे आणि चर्चेच्या फेऱ्यांमुळेच आपल्या संस्थेचं बरं चालू आहे, असे सर्वच मिटिंगरावांना वाटायचे; तर हे लोकं मिटिंगमुळे गुंतल्यामुळेच आपले काम चांगले करता येते, असा त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे.

एका संध्याकाळी मकरंदची बायको लाडात आली.

"अहो, आपण कित्येक दिवसात बाहेर फिरायला गेलो नाही, चला ना आज जाऊ,'' ती म्हणाली.

अर्थात ही नांदी दुपारच्या वेळेस झाली होती. त्यावर बरीच भवती न भवती झाल्यानंतर बाहेर पडायला संध्याकाळ होणार, याची तिला खात्री होती. तिच्या या विश्‍वासाला मकरंदनेही तडा जाऊ दिला नाही. सायंकाळी सूर्य अस्ताचलाला जात असताना हे जोडपे अंधारलेल्या रस्त्यावर अवतरले. बागेत जरा फिरणे वगैरे (म्हणजे वगैरेच जास्त) झाल्यावर दोघांनी प्रथेप्रमाणे काही खाद्यपदार्थ पोटात ढकलले. मकरंदच्या बायकोला खूप दिवसांचा बॅकलॉग भरून काढायचा होता. त्यामुळे एका बाईची साडी चांगली आहे, एक मुलगी जरा "ओवर'च वागतेय, तिच्या भावाला अमेरिकेत जाण्याची संधी मिळतेय अशा अनेक गोष्टी मकरंदला नव्यानेच कळाल्या. मकरंदचं मात्र चित्त थाऱ्यावर नव्हते. त्याला आठवण येत होती त्याच्या मिटिंगची. एकावर एक कडी करणाऱ्या (आणि प्रचंड शिळ्या कढीलाही ऊत आणणाऱ्या) चर्चा त्याच्या डोळ्यासमोर फेर धरत होत्या. बिचारा! तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करत होता. बागेच्या फाटकातून मकरंद आणि त्याची बायको बाहेर पडतच होते, त्यावेळी तिथे एक रिक्षा भर्रकन आली आणि तिथेच उभ्या असलेल्या एका व्यक्तीला जाऊन धडकली. अंगाने कृश आणि चेहऱ्यावर दयनीय भाव असलेला तो माणूस भेलकांडत एकीकडे गेला आणि तिथेच कोसळला. त्याच्या पायाला काहीशी जखम झाली होती. मकरंदने हे दृश्‍य पाहिले आणि त्याच्या तोंडून स्वाभाविकच "अरे,' असा उद्‌गार निघाला.

इकडे अशा प्रसंगी होते तसेच दृश्‍य निर्माण झाले. बागेबाहेरच्या हातगाड्यांवर इतका वेळ काहीबाही खात असलेला जमाव रिक्षाचालकावर तोंडसुख घेण्यास सरसावला. एक दोन तरुणांनी त्याची गचांडीही धरली. काहीजण कोपऱ्यात पडलेल्या व्यक्तीला उठविण्यास धावले. बघता बघता जमाव जमा झाला आणि बाचाबाची सुरू झाली. त्याचक्षणी...होय, त्याच क्षणी मकरंदचा डावा डोळा फडकू लागला. आता आपल्याला काही एक भूमिका निभावयास मिळणार, अशी त्याची खात्री पटू लागली. तोही त्या जमावात शिरला.

"मारो साले को,'' एक "नऊ ते पाच' कॅटॅगिरीतला चाकरमानी रिक्षावाल्याकडे पाहून ओरडला. इतर वेळी रिक्षातून उतरताना तोंडातल्या तोंडात "मीटर आजकाल जास्तच जोरात पळतं यांचं,'' असं म्हणणारे माणसं गर्दीत एकदम "गिअर'मध्ये येतात. त्याच्या वाक्‍यासरशी एक दोघांच्या तोंडून मराठी आणि हिंदीतील एकत्रित विदग्ध रसवंती ओसंडून वाहू लागली. भांडण आणि फुकटचा तमाशा म्हटले, की काही लोकांच्या प्रतिभेला प्रचंड बहर येतो. तसा तो इथेही आला आणि सारेच वातावरण मोहरून गेले.

"ए xxx, उसको भरपाई दे,'' एक होतकरू "अँग्री यंग मॅन' वसकन रिक्षावाल्यावर ओरडला. आता मकरंदच्याने राहवणार नव्हतं. त्याला आता एंट्री घ्यावीच लागणार होती. त्याने आवाज टाकला, "अरे, थांबा थांबा, असं एकदम घायकुतीवर येऊ नका. आधी चर्चा करा. संयम पाळा. चूक कोणाची हे आधी ठरवा.''

त्याच्या या वाक्‍याने एकदम शांतता पसरली. हा "राणीच्या बागे'तील आयटम बागेबाहेर कसा आला, या अर्थाने काहीजणांनी त्याच्याकडे नजरा फेकल्या. "ए चूप बैठ,'' मकरंदने आजपर्यंतच्या एकाही मिटिंगमध्ये न ऐकलेलं वाक्‍य एका टारगटानं उच्चारलं. त्यामुळे इथल्या चर्चेचा अजेंडा काही वेगळाच आहे, हे त्याच्या लक्षात आलं.

"हे बघा, आपण एक मिटिंग घेऊ. त्यात चूक कोणाची हे ठरवू,'' त्याने पुन्हा आपला मुद्दा रेटला. काही मुद्दा नसतानाही काहीतरी बोलायचं म्हणून अर्धा अर्धा तास बोलायचे प्रयोग त्याने अनेक मिटिंगमध्ये केले होते. त्यामानाने हे काहीच नव्हतं.

"ए सूट बूट, जा इथून, नाहीतर तूच मार खाशील,'' पुन्हा कोणा अज्ञात इसमाने त्याला इशारा दिला. हे चालू असताना कोपऱ्यात भेलकांडलेला इसम बऱ्यापैकी भानावर आला होता. पाचशे वगैरे रुपयांची कमाई करण्याची संधी त्याला चालून आली होती. या "मिटिंगखोरा'मुळे ती संधी आता जाणार, अशी साधार भीती त्याला वाटू लागली. त्याने हळूच संधी साधून जोराने कण्हण्याचा अभिनय केला. त्यामुळे जमावाची सहानुभूती पुन्हा त्याच्याकडे वळली.

"बघा, तो किती कण्हतोय. त्याला डॉक्‍टरकडे नेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, मग ठरवू आपण काय करायचे ते. वाटल्यास या रिक्षावाल्याचा नंबर आपण घेऊन ठेवू,'' तो म्हणाला. आता मात्र जमावाचा संयम ढळू लागला. भेलकांडलेल्याला पाचशे रुपये मिळवून देऊन त्याच्याकडून शंभर रुपये कमिशन काढायचा विचार होतकरु "अँग्री यंग मॅन'चा होता. तो सफल होण्याची शक्‍यता मावळणे त्याला परवडणारे नव्हते.

"साला, ये साहब लोगही ट्रॅफिकका प्रॉब्लेम करते है,'' त्याने डरकाळी फोडली. त्यामागची आर्तता त्याला आणि भेलकांडलेल्यालाच ठाऊक होती. तो आवाज विरतो न्‌ विरतो तोच त्याचा हात खाली येताना मकरंदला दिसला आणि पुढच्याच क्षणी त्याच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. मुसळधार पावसाच्या धारांप्रमाणे जमावाचे हात त्याच्यावर कोसळू लागले. जमावाच्या मागे उभी असलेली बायको बिचारी तगमग करत उभी होती, मात्र त्याचा काही उपयोग नव्हता. मकरंदच्या तोंडातून शब्द फुटणार नाहीत, या अवस्थेत येईपर्यंत त्याला बेदम मारल्यानंतर जमावाने रिक्षावाल्याला घेरले. रिक्षावाल्याने आयुष्यात कधी मिटिंग घेतलेली नसल्यामुळे त्याला तडकाफडकी निर्णय घेणे शक्‍य होते. चर्चेच्या गांधीमार्गापेक्षा पाचशेचे गांधीबाबा अधिक प्रभावी ठरतात, हे शहाणपण त्याच्याकडे होते. ते अनाठायी नव्हते. त्यामुळे लगेच जमाव पांगला.

भेलकांडलेला आणि होतकरु "अँग्री यंग मॅन' मिळून कुठंतरी गेले. ओठांतून रक्त येत असलेला आणि डोळ्यांखालचा भाग काळानिळा झालेला मकरंद झोकांड्या खात होता. त्याची बायको जवळ आली. तिने त्याच रिक्षावाल्याला दवाखान्यात जाण्याची गळ घातली.

"मॅडम, इसका तो पुलिस केस होगा,"? त्यानेही "धंदा' ओळखला. शेवटी पाचशे रुपये देते, म्हटल्यावर तो तयार झाला. त्यानतंर दवाखान्यात मकरंदला ओळखपट्टी करण्यात आली. या घटनेला आता पंधरा दिवस होत आहेत.?मकरंद आता बोलावं तिथंच बोलतो आणि शांत रहावं तिथं शांत राहतो. अलिकडे तर कधी तो बाथरुममध्ये आंघोळ करत असतो, बाहेर टीव्ही चालू असतो. त्यावर गाणं लागलेलं असतं, "राया चला बागामधी, रंग उडवू चला...'

मकरंद ते ऐकून म्हणतो, "राया चला ऑफिसमधी, मिटिंग खेळू चला....''

Friday, January 4, 2008

नववर्षाचे आगळे अभिनंदन


नववर्षाच्या स्वागतदिनी आपल्यापैकी बहुतेकांना आलेला अनुभव. फ्रेंच व्यंगचित्रकार शपाते याने ते अचूक पकडला आहे. मला आवडलेले हे अलिकडचे सुंजर व्यंगचित्र!

Tuesday, January 1, 2008

काही शुभेच्छा आणि काही संकल्प

शुभेच्छा...




...अन संकल्प
राखी सावंतचा संकल्प ः यंदा कोणत्याही वाहिनीवरील कोणत्याही कार्यक्रमात भाग घेणार नाही. सह्याद्री वाहिनीवर राखीपौर्णिमेनिमित्त होणाऱया कार्यक्रमाचा अपवाद वगळता ती छोट्या पडद्यावर दिसणार नाही तसेच कोणत्याच वाहिनीवर आरोपही करणार नाही.

भारतीय क्रिकेट संघाचा संकल्प ः ऑस्ट्रेलियाशी ऑस्ट्रेलियातच काय, जगाच्या कुठल्याही खेळपट्टीवर दोन हात करून त्यांचा पराभव आम्ही करू, हे केवळ तोंडानेच म्हणणार नाही तर कृतीतूनही सिद्ध करू.

नारायण राणे यांचा संकल्प ः मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदात काडीचाही रस नसून केवळ मराठी जनेतेची सेवा करण्यातच मी माझी हयात खर्च करणार आहे, अशी घोषणा करेन. विशेष म्हणजे त्या घोषणेवर किमान चार आठवडे अंमलही करेन.

गोपीनाथ मुंडे यांचा संकल्प ः या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार उरलेला नाही, हे वाक्य वर्षभरात तोंडातून चुकूनही काढणार नाही.

मराठी कलावंतांचा संकल्प ः तीस-चाळीस वर्षांपूर्वीच्या गाण्यांचेच कार्यक्रम करण्याऐवजी लोकप्रिय होतील असे गाणे रचून तेच सादर करू.मराठी चित्रपट निर्मात्यांचा संकल्प ः नवीन मराठी चित्रपट मुंबईसह महाराष्ट्रात एकाचवेळेस प्रदर्शित करू. त्यांच्या कथा जुन्या हिंदी चित्रपटांवरून घेतलेल्या नसतील आणि माझी विनंती आहे, की या चित्रपटांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, अशी दिग्दर्शक-कलावंतांना विनंती न करण्यास लावणार नाही. तरीही हे चित्रपट धो-धो चालवू.

मराठी साहित्यिकांचा संकल्प ः साहित्य हे संमेलन (मेळावा) घेऊन वाद घालण्यासाठी नसून वाचकांना मिळतील, परवडतील आणि वाचावीशी वाटतील अशी पुस्तके लिहिण्यासाठी आहे, हे एकमताने मान्य करू. म. द. हातकंणगलेकर यांच्या समीक्षेची लंडनच्या गल्लीगल्लीतही सटीप चर्चा चालू असते, असे मीना प्रभू यांच्याकडून वदवून घेऊ. त्यानंतर सहा महिन्यांनी प्रभू यांच्या लिखाणात ग्लोबल लोकमान्यता मिळविण्यासाठीचे गुण असतील, अशी कबुली हातकणंगलेकर यांच्याकडून घेऊ. विशेष म्हणजे केवळ या दोघांच्या मतांनाच किंमत देण्यात येत आहे, असा सूर अन्य उमेदवारही काढणार नाहीत.

मराठी जनतेचा संकल्प ः आणखी एक दोन मराठी व्यक्ती आंतरराष्ट्रीय बँका आणि कंपन्यांच्या प्रमुखपदी विराजमान झाले तरी त्यामुळे मराठी अस्मिता धोक्यात आल्याचे कोणालाही वाटणार नाही. तसेच त्या व्यक्तींचे अभिनंदन करतानाच ब्रेन ड्रेनमुळे भारताचे नुकसान कसे होते, यावरही कोणी प्रवचन देणार नाही. परप्रांतीय लोकांविरोधात कितीही बोंबाबोब केली तरी आपण स्वतः काम करणे, हाच त्यावर उपाय असल्याचे मराठी लोकांना कळून येईल. काही मराठी व्यक्ती अगदी परप्रांतांत जाऊनही नोकरी-व्यवसाय करण्याचा निर्धार करून तो पाळतीलही.

मराठी वृत्तपत्रांचा संकल्प ः पाकिस्तानशी मैत्री, विश्वबंधुत्व या गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी त्यासाठी महाराष्ट्रातील मराठी जनतेने जीवंत राहिले पाहिजे, हे जाणून घेऊ. त्यानुसार धोरणात बदल करू.
कंपन्यांचा संकल्प ः आता कोणतीही मराठी वृत्तवाहिनी सुरू होणार नाही व त्यावर चार तास बातम्या आणि बाकीचे वीस तास बॉलिवूडचे लफडे, भविष्यकथन, हेल्थ टिप्स अशा वायफळ गोष्टींवर खर्च करणार नाही.
----------

Thursday, December 27, 2007

इतना सन्नाटा क्यों है भाई

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर नरेंद्र मोदी आरूढ होऊन आता पाच दिवस होत आले आहेत. मात्र या काळात मराठी ब्लॉग (अलिकडे कोणत्याही मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा मी यांवर जास्त भिस्त ठेवतो. ) अथवा माध्यमांमध्ये फारशी चर्चा झालेली दिसत नाही, हे खरोखरीच खूप आश्चर्यकारक आहे. मोदी विरूद्ध इतर सर्व असा (निवडणुकीचा) लढा ज्या गुजरातेत झाला, तेथील वर्तमानपत्रे वगळता कोणीही या विजयाबद्दल फारशा कौतुकाने बोलतानाही दिसत नाही. (या घटनेचाच उल्लेख अगदी अपरिहार्य झाले म्हणून केला असल्यास न कळे!) मोदी यांचा पराभव झाला असता, तर हेच चित्र दिसले असते का, हा प्रश्न त्यामुळेच विचारावासा वाटतो.

गुजरातमधील निवडणुकांबाबतचे हे बिनविरोध मौन मात्र निकालानंतरच जाणवत आहे, अशातला भाग नाही. निवडणुका संपल्यानंतर म्हणजे मतदानाचे दोन टप्पे पार पडल्यानंतरही त्याबाबत लक्षणीय सामसूम होतीच. बोटाला शाई लागलेला मतदार केव्हा एकदा बाहेर पडतो आणि केव्हा आपण त्याच्या ताज्या मतदानाचा अदमास घेऊन एक्झिट पोलची पोतडी दर्शकांपुढे रिकामी करू, अशा बेतात असलेल्या वाहिन्याही यावेळी बेताबेतानेच आपले अंदाज व्यक्त करत होत्या. त्यांना शक्य असतं, तर मोदी यांचा सपशेल पराभव होणार, असा जाहीर हाकारा त्यांनी केव्हाच घातला असता. संपूर्ण प्रचाराच्या काळात आणि मतदानाच्या वेळेसही (स्पष्टच सांगायचं तर गेल्या एक दीड वर्षातही) वाहिन्या आणि वर्तमानपत्रांनी आडून आडून तसे सुचविलेही होते. मात्र थेट आपली कल्हई उघडी न करता वेगवेगळ्या मिषाने मोदींचा उपमर्द करण्याचा प्रयत्न चालूच होता.

मोदींच्या विरोधात बंड करणारे कोण, त्यांचा इतिहास काय याचा काडीमात्र अभ्यास न करता त्यांच्या बळावर गुजरातेत भारतीय जनता पक्षाला पराभवास सामोरे जावे लागेल, असे भाकित वर्तविणारे काही जण होते. त्याचप्रमाणे सोनिया गांधी यांच्या 'चाणाक्ष राजकीय' खेळीमुळे सोहराबुद्दीन प्रकरणाच्या जाळ्यात मोदी सपशेल अडकले, असे ठोकून देणारेही या काळात पाहायला मिळाले. एका मोठ्या मराठी वर्तमानपत्राने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मणीनगरमध्ये (नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ) प्रचार सभा घेऊन कॉंग्रेसच्या बाजूने हवा कशी निर्माण केली, याचा ऑंखो देखा हाल वर्णन केला होता. सोहराबुद्दीनप्रकरणी
तिस्ता सेटलवाड सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 'अशा प्रकरणांतून न्यायालयांनी दूर राहायला हवे,' अशा आशयाचा अग्रलेख 'मुंबई समाचार' या १५० वर्षांहून अधिक जुन्या गुजराती वृत्तपत्राने लिहिला होता. मात्र त्याची दखल घेण्याची कोणाला गरज वाटत नव्हती.

रविवारी, २३ डिसेंबरपासून मात्र कोणत्याही तज्ज्ञांचा आवाज ऐकू येईनासा झाला आहे. केवळ हिंदूत्वाच्या आणि पुराणकथांच्या गोष्टी करणाऱयांना विकास काय कळणार, असा प्रश्न विचारणाऱयांना केवळ विकासाच्या मुद्यावर एखाद्या हिंदुत्ववादी नेत्याने विजय मिळविल्याचे पाहावे लागावे, यांहून अधिक दुर्दैव ते कोणते? मॅडमनी सांगितले तर मी घरीही बसेन किंवा मॅडमच्या गेल्या पाच पिढ्यांच्या कर्तृत्वामुळेच या देशाला भाग्याचे दिवस आले आहेत, असे सांगणाऱया स्वाभिमानी नेत्यांच्या या देशात, अमेरिकेने व्हीसा नाकारल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्योजकांशी संपर्क साधून विक्रमी गुंतवणूक आकर्षित करणारा नेता काय कामाचा? अशांचे कुठे कौतुक करायचे? त्यामुळे गेल्या काही दिवसांत सुरू झालेल्या चर्चेची धूळ अचानक खाली बसली आहे. शोलेचे निर्माते जी. पी. सिप्पी यांचे नुकतेच निधन झाले. याच चित्रपटातील एका संवादाची त्यामुळे अवचित आठवण झाली...

"इतना सन्नाटा क्यों है भाई?"

Wednesday, December 19, 2007

निषेध असो...

पुण्यातील कोणत्याही गल्लीबोळातील, कोणालाही सहजासहजी सापडणार नाही अशा इमारतीतील कुठल्याही एका राजकीय पक्षाचे कार्यालय. साधारण दोन खोल्या बसतील असा एकच हॉल. एका कोपऱयात मोठा टेबल. त्याच्यासमोर तीन चार खुर्च्या. सध्या या खुर्च्या रिकाम्या आहेत. पलिकडच्या बाजूस एक खिडकी. टेबलच्या थेट समोर एक टीव्ही. त्याच्यावर कुठलेतरी गाण्याचे एक चॅनल चालू असल्याचे दिसते. त्यावर हिमेश रेशमिया किंवा बेसुरेपणात त्याच्याशी स्पर्धा करेल, अशा एखाद्या गायकाचा चेहरा झळकतो. अधूनमधून काही जाहिरातीही.

हॉलमधील टेबलवर बसलेली व्यक्ती सर्वात प्रथम नजरेत भरते. साधारणतः चाळीशीची व्यक्ती. डोक्यावर मध्यम आकारचे केस, मात्र त्यांचा भांग पाडून खूप वेळ झाल्याचे चटकन जाणवते. पान किंवा गुटखा खाल्ल्यामुळे लाल झालेले ओठ. या व्यक्तीच्या खिशात एक मोबाईल आणि टेबलवर एक मोबाईल ठेवलेला. शिवाय टेबलवर एक टेलिफोन वेगळा. टेबलवर पडलेल्या वर्तमानपत्रांच्या गठ्ठ्यातून एक एक वर्तमानपत्र काढून वाचण्यात ही व्यक्ती दंग आहे. प्रत्येक पेपरमधील प्रत्येक पानाचे अत्यंत काळजीपूर्वक वाचन चालू असल्याचे दिसत आहे. तितक्यात आणखी एक व्यक्ती खोलीत प्रवेश करते. सुमारे वीस-बावीस वर्षांचा मुलगा. याच्याही तोंडात गुटखा. मात्र त्यातही कसलेतरी गाणे गुणगुणण्याचा त्याचा प्रयत्न.

“अरे नेते, कधी आलात,” युवकाचा प्रश्न. त्यावर आत्ताच असे नेत्याचे उत्तर. पाठोपाठ नेत्याचा प्रश्न, “काय रे वाचलेस का आजचे पेपर?”

“वाचले ना, काय नाय सापडलं नेते,” युवकाचे लागलीच उत्तर. दरम्यान त्याने गाण्याचे चॅनल बदलून बातम्यांचे चॅनेल लावलेले असते. त्यावर काही वेळ जाहिरातीच चालू. मुलगा पुन्हा बोलू लागतो, “सगळे चॅनेल पाहून झाले. आज काय नाहीच दिसतं. तिकडंबी ते शारुखचं पिक्चर हिट झाल्याचीच बातमी देतायत. नव्या कोण्या पिक्चरची बातच करत नाय कोणी.”

नेते उत्तर देणार एवढ्यात त्यांचा एक मोबाईल वाजतो. सवयीने ते खिशातला मोबाईल काढून बोलू लागतात, “हां, बोलतोय. हां, आरं तयार हायेत पत्रकं सगळी. पन आज काय कोणी चान्स दिलेला दिसत नाय. सगळ्या बातम्या पाहिल्या. कशावर पत्रक काढणार?.”

काही वेळ नेते पलिकडच्या व्यक्तीचं ऐकतात. त्यानंतर पुन्हा सुरू, “हां...पन आज आहे पालिकेला सुट्टी. तिथलं काय लफडं नाही कळालं. तिकडं दिल्लीतल्या सरकारनं जबानच बंद केली ना राव. कोणी काही बोलतच नाही...आरं तो कसला तरी करार आहे ना तेच्यावर. सालं कम्युनिस्ट बी आता तेच्यावर बोलत नाही त्यांचं नंदीग्राम झाल्यापासून. इकडं मुंबईतले सगळे गेलेत गुजरातला. त्यांच्याकडून बी काही ऐकायला मिळत नाही. कोणाला पकडावं आता तूच सांग. सगळा धंदा मंद झालाय भाऊ...”

नेते फोन ठेवतात. त्यानंतर काही वेळ खिडकीशी जाऊन बाहेर पाहात उभे राहतात. मध्येच हाक मारतात, “ए संज्या.” लगेच संज्या त्यांच्याजवळ जाऊन उभा राहतो. “का रे, रस्त्यावर एवढी गर्दी का,” नेते विचारतात.

“रोजच होते ना नेते. शाळा आहे ना पलिकडे. तिथल्या पोरांमुळे इथे ट्रॅफिक जॅम होतं,” संज्या प्रामाणिकपणे माहिती पुरवतो.

“अरे, मग याच्यावरच काढू ना पत्रक. या रस्त्यावर विद्यार्थ्यांमुळे गर्दी होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन दाद घेत नाही. याचा आम्ही निषेध करतो...,”नेत्यांनी तोंडपाठ असल्यासारखा पत्रकाचा मजकूर सांगितला. त्यांना अर्ध्या रात्री उठविलं असतं तरी हाच मजकूर त्यांनी पाकिस्तानकडून बाबर क्षेपणास्त्राची चाचणी किंवा खटखटवाडीत डांबरी रस्ता करण्याकडे दुर्लक्ष अशा कोणत्याही विषयाला धरून सांगितला असता. मात्र त्यांचा आज्ञाधारक सेवक संज्या जागचा हालत नसल्याचे पाहून नेत्यांचा पारा चढू लागतो. तेवढ्यात संज्याच तोंड उघडतो, म्हणजे आधी खिडकीतून गुटखा थुंकायला आणि त्यानंतर नेत्यांना माहिती द्यायला, “नेते, परवाच दिला ना हा मजकूर. तीन पेप्रांत छापून बी आलाय ना.”

या उत्तरावर नेत्यांचा चेहरा गोरामोरा होतो. पुन्हा खिडकीबाहेर पाहून ते शून्यांत हरवतात. पंधरा वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अशी वेळ कधी आली नव्हती. प्रसंग कोणताही येवो, बातमी वर्तमानपत्रांत नंतर छापून यायची अन नेत्यांच्या निषेधाचं पत्रक आदी वर्तमानपत्रांच्या कार्यालयात पोचायचं. एक दोन वेळेस त्यांच्याकडून पत्रक वेळेवर गेले नव्हते, त्यामुळे काही वर्तमानपत्रांनी मूळ बातमीच छापायला नकार दिला होता. नेत्यांचं पत्रक आलं नाही त्याअर्थी ती बातमी खोटी आहे, अशी बिचाऱया पत्रकारांची समजूत. इतका पत्रकारांचा नेत्यांवर विश्वास! अन आज त्याच नेत्यांवर पत्रकासाठी विषय शोधायची वेळ यावी?

नेत्यांनी एकदा टेबलामागे ठेवलेल्या लेटरहेडच्या गठ्ठ्याकडे पाहिलं. पगाराच्या दिवशी एखाद्याला प्रत्येक दुकानाच्या शो-केसमध्ये ठेवलेल्या वस्तूंना खुणवावं, तसे ती होतकरू पत्रकं त्यांना आव्हान देत होती. थोड्या वेळाने त्यांना पत्नीसमवेत एका हॉटेलमध्ये जायचं होतं. पंधरा मिनिटांच्या आत पत्रक लिहून पाठविणं आवश्यक होतं. नाहीतर उद्या छापून आलं नसतं.

विमनस्कपणे नेते पुन्हा टेबलकडे येतात. चालू असलेल्या चॅनेलवरील कोणताही कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे इतका वेळ स्पोर्टस चॅनेलवर रेसलिंगची हाणामारी सुखैनैव पाहणारा संजू अस्वस्थ होतो. “चहा सांगू का,” तो विचारतो. नेते मानेनेच होकार देतात. लगेच संजू कोणातरी छोटूच्या नावाने चहाची ऑर्डर देतो.

थोड्या वेळाने चहा येतो. नेते एक घोट घेतात. दरम्यान आता टेबलवरील मोबाईल वाजलेला असतो. “हो निघालोच,” लगेच पाच मिनिटांत असं काहीबाही बोलून ते संभाषण आटोपतं घेतात. संजू आपले लक्ष नाही असं दाखवितो.

“साखर कमी टाकलीय का रे यानं,” नेत्याच्या या प्रश्नावर तो दचकतो. एका चॅनेलवर बातम्या म्हणून एका हिरोईनचं लफडं दाखवित असतात. त्यात त्याचं लक्ष असतं. चहात साखर कमी असल्यानं त्याला काहीही फरक पडलेला नसतो.

“मला बी वाटलं तसं,” तो उगाच सांगतो. इतक्यात नेते पुढला प्रश्न विचारतात, “साखर संकुलात ती बैठक होती ना रे ती आज?”.

“नाय झाली आज,” संज्या उत्तरतो, “अशा दहा बैठका लिहिल्यात त्या तुमच्या डायरीत. एक बी झाली नाही. त्यात काही झालं असतं तर आपल्याला बरं, नाही का?”

त्याच्या या उत्तरावर नेत्यांचा चेहरा अचानक उजळतो. लगेच ते मागे वळून लेटरहेडचा गठ्ठा काढतात. त्यातील एक लेटरहेड घेऊन लगेच लिहायला बसतात. थोड्या वेळाने लिहून झाल्यावर संज्याला सांगतात, “संज्या, आजचं आपलं पत्रक झालं. आता याची झेरॉक्स काढून सगळ्यांना पाठव. सालं, आलंच पाहिजे उद्या-परवा सगळीकडे.”

संज्याच्या चेहऱयावर प्रश्नचिन्हांची गर्दी होते. त्याला अजून राजकारणात गती नसल्याने पत्रकात काय लिहिलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्याचा तो प्रश्न नेते सोडवतात, “ऐक काय लिहिलंय...आपल्या शहरात आणि राज्यात तसेच देशातही अनेक प्रश्नांचं थैमान सुरू आहे. त्यासाठी आमच्या संघटनेने अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर शासनाने समित्यांची नियुक्ती केली. मात्र त्या समित्यांची बैठक होत नाही. राज्याच्या या प्रश्नांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सरकारच्या या वेळकाढूपणाचा आम्ही निषेध करतो. या संदर्भात त्वरीत काही कारवाई न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत...”

नेत्यांच्या या वाक्यासरशी संज्याच्या चेहऱयावरही हास्य खेळू लागतं. निरनिराळ्या वर्तमानपत्रांच्या कार्यालयात जाण्यासाठी पेट्रोलचा खर्च म्हणून त्यालाही शंभर-दीडशे रुपये मिळणार असतात अन आपला आजचा निषेधाचा कोटा पूर्ण झाला, या आनंदात नेते पत्नीसह सुखाचा घास घेऊ शकणार असतात...